भारतीय चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' एक असा चित्रपट आहे,जो पुन्हा पुन्हा कितीदा जरी पाहिला तरी मन भरत नाही. 15 ऑगस्ट 1975 रोजी 'शोले' रिलीज झाला. आता त्याला 46 वर्षे होताहेत.या चित्रपटातले काही कलाकार अजून जीवित आहेत तर काही कलाकारांनी 'एक्झिट' घेतली आहे. 'शोले'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटातले कलाकार धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमामालिनी, जया भादुरी, हेलन ,जगदीप, असरानी तसेच पटकथा लेखक सलीम-जावेद या सगळ्यांनी हा चित्रपट संस्मरणीय केला.साल 2002 मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने 'शोले'चा सार्वकालिक दहा सर्वश्रेष्ठ (टॉप टेन) भारतीय चित्रपटांच्या श्रेणीत समावेश केला.
हा पहिला भारतीय चित्रपट आहे,ज्यामध्ये स्टीरियोफोनिक साउंड ट्रॅकचा वापर केला गेला 70 एमएम पडदयावर दाखवला गेला. या चित्रपटाचे शुटिंग 3 ऑक्टोबर1973 रोजी सुरू झाले होते आणि जवळपास अडीच वर्षे हा चित्रपट पूर्ण व्हायला लागला. चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावली गेली आणि मग शेवटी 15 ऑगस्ट 1975 रोजी भारतभर रिलीज झाला.
'शोले'चे कॅमेरामन द्वारका दिबेचा आणि कला दिग्दर्शक राम यादेकर होते. दोघेही आपापल्या क्षेत्रात निपुण होते. त्यांनी अक्षरशः या चित्रपटात आपला जीव ओतला. आर्ट डायरेक्टर यादेकर यांनी 'शोले' च्या शुटिंगसाठी बंगरुळू हाय-वेवर म्हणजेच कर्नाटकातल्या दक्षिण क्षेत्रातल्या एका निर्जन भागात रामनगर नावाचे एक पहाडी गावच वसवले होते. अजूनही हा भाग 'शोले'च्या शुटिंगसाठी ओळखला जातो. 'शोले' 198 मिनिटांचा होता. याच्या निर्मितीसाठी त्यावेळी 30 कोटी रुपये इतका खर्च आला होता. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा गल्ला जमवला. परदेशातही या मोठी कमाई केली. असं म्हटलं जातं की, हा चित्रपट पाहण्यासाठी सोव्हिएत रशियामध्ये लोकांच्या अक्षरशः उडया पडत. मुंबईतल्या मिनर्वा थिएटरमध्ये हा चित्रपट सलग पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालला.
मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासारख्या दिग्जजांनी याची कथा आणि पटकथा नाकारली होती. तेव्हा याचे पटकथा लेखक सलीम आणि जावेद या जोडगोळीने जी. पी.सिप्पी यांच्याशी संपर्क साधला. ते या चित्रपटासाठी पैसा घालायला तयार झाले आणि त्यांच्या मुलाने-रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. 'शोले'चा आणखी एक इतिहास असा की, 50 व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या समारोहात या चित्रपटाचा 'गेल्या पन्नास वर्षातील सर्वश्रेष्ठ भारतीय चित्रपट' म्हणून गौरव केला गेला. संगीतकार आर.डी.बर्मन यांनी याचा ओरिजनल साउंड ट्रॅक तयार केला होता. या साउंड ट्रक आणि 'शोले'च्या गब्बरसिंग व कालियावाल्या डायलॉगने विक्रीचा अनोखा रेकॉर्ड बनवला. साल 2014 च्या जानेवारीमध्ये या चित्रपटाचा 3डी फॉर्मेट रिलीज केला गेला. म्हटलं जातं की हा चित्रपट जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकिरा कुरोसोवा यांच्या 'सेवन सामुराई' या गाजलेल्या चित्रपटावर बेतला होता.
अभिनेता अमजद खान यांनी गब्बरसिंगची क्रूर भूमिका साकारली होती. परंतु या भूमिकेसाठी पहिल्यांदा डॅनी डोंजोंप्पा यांना विचारण्यात आले होते. पण त्यावेळी डॅनी फिरोज खानच्या 'धर्मात्मा' (1975) मध्ये व्यस्त होते.त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि तो अमजद खान यांना मिळाला. अशाच प्रकारे अमिताभच्या 'जय' भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी निवड करण्यात आली होती तर ठाकूरवाल्या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना पसंदी देण्यात आली होती. परंतु योगायोग काही जुळला नाही आणि या भूमिका अमिताभ आणि संजीव कुमार यांच्या वाट्याला आल्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली