हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजीव कुमार. त्यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते, ज्यांना लोक प्रेमाने आणि आदराने हरिभाई म्हणत. त्यांचा जन्म 9 जुलै 1938 रोजी गुजरातमधील सुरत येथील एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला.हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर प्रवेश केला आणि नंतर फिल्मालयाच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने आर्थर मिलरच्या 'ऑल माय सन्स'च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. ए.के. हंगलदिग्दर्शित डमरू नाटकात संजीव कुमार याची सहा मुले असलेल्या ६० वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती. दरम्यान, 1960 मध्ये त्यांना 'हम हिंदुस्तानी' चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
1962 मध्ये त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या 'आरती'साठी स्क्रीन टेस्ट दिली, ज्यामध्ये तो उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यानंतर त्याला अनेक 'बी-ग्रेड' चित्रपट मिळाले. इतके नगण्य चित्रपट असूनही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निशान' या चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1960 ते 1968 पर्यंत संजीव कुमार यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. जी काही भूमिका मिळाली, ती स्वीकारत गेले. त्यादरम्यान त्यांनी 'स्मगलर', 'पति-पत्नी', 'हुस्न और इश्क', 'बादल', 'नौनिहाल' आणि 'गुनहगार' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.
1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिकार या चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा 'फिल्मफेअर पुरस्कार'ही मिळाला. 1968 मध्ये रिलीज झालेल्या 'संघर्ष' या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केले होते. यानंतर 'आशीर्वाद', 'राजा और रंक', 'सत्यकाम' आणि 'अनोखी रात' यांसारख्या चित्रपटांच्या यशातून संजीव कुमार यांनी आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांमध्ये प्रस्थापित केले.1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खिलौना' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर संजीव कुमार यांनी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
1970 मध्येच प्रदर्शित झालेल्या 'दस्तक' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला होता.1972 मध्ये 'कोशिश' चित्रपटात ते एका मुक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'कोशिश' चित्रपटात संजीव कुमार यांना आपल्या मुलाचे लग्न एका मुक्या मुलीशी करायचे होते आणि त्यांचा मुलगा हे लग्न मान्य करत नाही. मग ते भिंतीवर टांगलेला त्यांच्या मृत पत्नीचा फोटो खाली घेतात. त्यांच्या डोळ्यात दुःखाची आणि चेहऱ्यावर रागाची गडद छाया दिसते.
भारतीय सिनेविश्वात संजीव कुमार हे बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जातात ज्यांनी नायक, सह-नायक, खलनायक आणि चरित्र कलाकार अशा भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. संजीव कुमार यांच्या अभिनयात एक खासियत होती की ते कोणत्याही प्रकारच्या भूमिकेसाठी नेहमीच योग्य असायचे.नंतर संजीव कुमार यांनी गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली 'आंधी', 'मौसम', 'नमकीन' आणि 'अंगूर' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 1982 मध्ये आलेल्या अंगूर चित्रपटात संजीव कुमार यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. संजीव कुमार यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आंधी' या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. यानंतर 1976 मध्ये 'अर्जुन पंडित' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 6 नोव्हेंबर 1985 रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment