Saturday, September 2, 2023

वास्तविक, भावनिक, आदर्श: चित्रपटातील शिक्षकाच्या विविध छटा


समाजात राहणाऱ्या आणि प्रत्येक व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्थान मिळाले आहे. समाजाला दिशा देणार्‍या शिक्षकांवरदेखील अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. कधी छोट्याशा स्वरूपात, छोट्या भूमिकेत तर कधी मुख्य पात्र म्हणून चित्रपटांच्या माध्यमातून शिक्षक प्रेक्षकांसमोर आला आहे.

शिस्तप्रिय शिक्षक: काही दशकांपूर्वी 'जागृती' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभि भट्टाचार्य यांनी शिस्तप्रिय आणि प्रतिष्ठित शिक्षकाची भूमिका साकारली होती. ते आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच  शिस्त लावण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करायचे. या चित्रपटातील 'आओ बच्चों तुम्हे दिखाएं झांकी हिंदुस्तान की' आणि 'दे दी हमें आजादी' ही गाणी खूप गाजली.विनोद खन्ना यांच्या 'इम्तिहान' या चित्रपटातही शिस्तप्रिय शिक्षकाला दमदारपणे सादर करण्यात आले होते. ते एक असे शिक्षक होते जे विद्यार्थ्यांमध्ये राहून त्यांच्या समस्या ऐकून घ्यायचे आणि त्या सोडवायचे. ते विद्यार्थ्यांसोबत खेळायचे आणि गरज पडेल तेव्हा त्यांना फटकारायचेही.  त्यावेळी विनोद खन्नाने त्याच्या प्रतिमेच्या विरुद्ध ही धडाकेबाज प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. आणि त्याचे कौतुकही झाले होते.



एकनिष्ठ आणि समर्पित शिक्षक: राजकुमारने 'बुलंदी' चित्रपटात प्राध्यापकाच्या भूमिकेत जीव ओतला होता. एक निष्ठावंत पण दबंग प्राध्यापक जो कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही, अशी ती व्यक्तिरेखा होती. बेलगाम विद्यार्थ्यांशी आपल्याच शैलीत वागणारा हा प्राध्यापक शेवटी घराणेशाही आणि पक्षपाताचा बळी ठरतो. ही असहायता राजकुमारने पडद्यावर अगदी उत्तम प्रकारे उतरवली होती. त्याच धर्तीवर 'प्रतिघात' आला, ज्यात सुजाता मेहता यांनी विद्यार्थी राजकारण आणि त्यात अडकलेल्या प्राध्यापकाच्या भूमिकेत उठावदार कामगिरी केली होती.

नव्या शैलीत शिक्षकाचे अध्यापन: आमिर खानने 'तारे जमीन पर'मध्ये एका शिक्षकाच्या भूमिकेत एक नवीन शैली सादर केली जी बाल मानसशास्त्र समजून घेते आणि त्यांचे गुण ओळखून त्यांचे व्यक्तिमत्व घढवते.चित्रपटातील त्याची शिकवण्याची शैली प्रेक्षकांना भावली. गुलजार दिग्दर्शित 'परिचय' या चित्रपटात पारंपारिक शैली सोडून इतर खेळांच्या माध्यमातून शिकवण्याची कला शिकवण्याचा संदेश देणार्‍या गुलजार दिग्दर्शित 'परिचय' या चित्रपटात आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका जितेंद्रने साकारली होती. या चित्रपटाद्वारे जितेंद्रने त्याची जंपिंग जॅक इमेजही खोडून काढली होती.हिंदी चित्रपटांमध्ये अभि भट्टाचार्य, सत्येन कप्पू असे काही कलाकार आहेत जे शिक्षकाच्या भूमिकेत परिपूर्ण दिसले होते. पण काही चित्रपट असेही बनले आहेत ज्यात चॉकलेट हिरो किंवा स्टार दर्जाचे कलाकारदेखील शिक्षक म्हणून दिसले आहेत.'हम नौजवान' आणि 'मनपसंद'मध्ये देवानंद प्रोफेसरच्या भूमिकेत दिसला होता, तर शम्मी कपूरही 'प्रोफेसर'मध्ये काही प्रमाणात असाच दिसला होता. 'कोरा कागज'मध्ये विजय आनंद एका गंभीर शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता, तर राजेश खन्ना यांनी 'मास्टर जी' आणि 'रोटी'मध्ये शिक्षकाची भूमिका साकारली होती. शिक्षकाच्या सशक्त भूमिकेबद्दल सांगायचे तर, आपल्या मुलाची अस्थी मिळण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या 'सारांश'चे अनुपम खेर यांना कोणीही विसरू शकत नाही. तर चॉकलेट हिरो हृतिक रोशननेही 'सुपर ३०'मध्ये शिक्षकाची ऑफबीट भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांनीही अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या शैलीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. 'कस्मेवादे' या चित्रपटात त्यांनी एका समर्पित प्राध्यापकाची भूमिका साकारली होती, जो विद्यार्थ्यांमधील संघर्ष सोडवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतो. ते 'आरक्षण'मध्ये सिद्धांतवादी प्रोफेसर होते तर 'सत्याग्रह'मध्ये निवृत्त शिक्षक आणि 'मोहब्बतें'मध्ये कडक शिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. 'ब्लेक'मध्ये त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्याला प्रशिक्षण देण्याच्या भूमिकेत प्राण फुंकले होते तर 'चुपके चुपके'मध्ये ते एका सभ्य प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसले होते. बोमन इराणी यांनीदेखील शिक्षक म्हणून उत्कृष्ट  काम केले आहे.  विशेषतः त्यांचे '3 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे दोन चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशा शिक्षकांमध्ये 'स्वदेश' मधील गावात राहणाऱ्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षिका गायत्री जोशी आणि 'हिचकी'मध्ये शिक्षिकेची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी यांचीही नावे समोर येतात.


क्रीडा प्रशिक्षक म्हणून: शिक्षकाचे एक नवीन रूप म्हणजे प्रशिक्षक हे क्रीडा आधारित चित्रपटांमध्ये दिसले आहे. 'चक दे ​​इंडिया'मध्ये प्रशिक्षक शाहरुख खान कमकुवत असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला विजेतेपद मिळवण्याइतपत सक्षम बनवतो. आमिर खान स्टारर 'दंगल' या चित्रपटात वडीलच आपल्या मुलींचे प्रशिक्षक बनतात आणि त्यांना क्रीडा विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बनवण्याचा प्रयत्न करतात. राजकिरण अभिनीत 'हिप हिप हुर्रे' हा शिक्षक-विद्यार्थी संबंध दर्शविणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. राजकिरण त्याच्या फुटबॉल टीमच्या विद्यार्थ्यांना जिंकण्यासाठी प्रेरित करताना दिसतो, तर नसीरुद्दीन शाह यांनी 'इकबाल'मध्ये ड्रग व्यसनी प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. नसीर यांनी 'सर'मध्येदेखील शिक्षकाची प्रभावी भूमिका साकारली होती.


विनोदी भूमिकेत शिक्षक : 'कुछ कुछ होता है' आणि 'शोला और शबनम' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये शिक्षकांची खिल्ली उडवली गेली आहे. त्यांच्यामध्ये अनुपम खेर आणि अर्चना पूरण सिंगसारखे प्राध्यापक आहेत, जे कॉमिक शैलीत रोमान्स करत राहतात. कॉलेज कॅम्पसच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या इतर अनेक चित्रपटांमध्ये शिक्षकांना विनोदी कलाकार म्हणूनही दाखवण्यात आले आहे.'जंगल में मंगल'मध्येही प्राणने अशाच शिक्षकाची भूमिका साकारली होती. कादर खाननेही अनेक चित्रपटांमध्ये विनोदी शिक्षकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. सांगायचा सारांश असा आहे की शिक्षकाची व्यक्तिरेखा अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, मात्र प्रेक्षकांनी त्याचे कधी  कौतुक केले आहे तर कधी नाकारले आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...