हिंदी चित्रपटसृष्टीला सुरुवातीपासूनच स्वतःचा असा एक प्रवाह आहे.काही विषय सोडले तर प्रेक्षकांच्या आवडी-निवडी आणि बदलत्या काळानुसार हा प्रवाह नेहमीच बदलत आला आहे.कधी या प्रवाहावर काळाच्या घटनांचा प्रभाव पडला, कधी सामाजिक बदलांचा तर कधी इतिहासाची पाने उलटून त्यातून कथा शोधल्या गेल्या. एक काळ असा आला की समाजाबरोबरच चित्रपट निर्मात्यांनीही साहित्यिक पुस्तकांमध्ये स्वत:साठी सामुग्री शोधली. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा हिंदी सिनेमा सुरू झाला तेव्हा त्याला सर्वात जास्त मदत धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक पुस्तकांमध्ये असलेल्या कथांनी केली. यानंतर स्वातंत्र्य चळवळ आणि महात्मा गांधींचे आदर्श सिनेमात प्रतिबिंबित होत राहिले.
सुरुवातीपासून बनत आले असे चित्रपट: असं मानलं जातं की, कादंबरी, कथा किंवा नाटकावर आधारित एखादा चित्रपट जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा त्याचा मनावर अधिक प्रभाव पडतो.त्यामुळेच चित्रपट विश्वात प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित चित्रपट बनले आहेत.चित्रपट निर्मात्यांनी त्या काळात लिहिलेल्या पुस्तकांचा उपयोग सामाजिक चिंतेचे माध्यम म्हणून केला. आठवणींची पाने उलटली तर लक्षात येईल की सामाजिक प्रश्नांवर बिमल राय यांच्या दिग्दर्शनाखाली 1953 मध्ये पहिल्यांदा 'दो बिघा जमीन' बनवण्यात आला होता. हा चित्रपट सलील चौधरी यांच्या प्रसिद्ध कथेवर आधारित होता. तो त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला गेला. कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित हा बहुधा पहिलाच वास्तववादी चित्रपट असावा. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या जीवनातील समस्यांचे करुण आणि जिवंत चित्रण करण्यात आले आहे. 1954 ते 60 असा सामाजिक चित्रपटांचा काळ होता.वास्तवाचा चेहरा दाखवण्याचे काम शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘परिणिता’नेही केले. यानंतर शरतचंद्रांच्या कादंबरीवर ‘देवदास’ही तयार झाला. त्यांच्या अनेक पुस्तकांवर हिंदी आणि बंगाली चित्रपट तयार झाले.
कथा कादंबर्यांवर बनवलेले लोकप्रिय चित्रपट: प्रेमचंद यांच्या 'दो बेलों की कथा' या कथेवर आधारित कृष्णा चोप्रा यांनी 'हीरा मोती' नावाचा चित्रपट बनवला, जो साहित्य आणि चित्रपट यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरला.सत्यजित रे यांनी प्रेमचंद यांच्या कथांवर आधारित 'शतरंज के खिलाड़ी' आणि 'गर्दिश' बनवला. फणीश्वरनाथ रेणू यांच्या 'मारे गये गुलफाम' या कथेवर आधारित 'तीसरी कसम' हा चित्रपट, मन्नू भंडारी यांच्या 'यही सच है' या कथेवर आधारित 'रजनीगंधा' आणि तसेच त्यांच्या 'आप का बंटी' आणि 'महाभोज' या कादंबऱ्यांवर देखील चित्रपट तयार झाले.शैवाल यांच्या कादंबरीवर आधारित 'दामुल' या चित्रपटाशिवाय केशव प्रसाद मिश्रा यांच्या 'कोहबर की शर्त' या हिंदी कादंबरीवर आधारित 'नदिया के पार' आणि नंतर 'हम आपके है कौन' हे चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवले गेले.राजेंद्र सिंह बेदी यांच्या 'एक चादर मैली सी' या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट बनला होता, धरमवीर भारती यांच्या 'सूरज का सातवां घोडा' या कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपट बनला होता, तर विजयदान देथा यांच्या 'दुविधा' नावाच्या कथेवर 'पहेली' नावाचा चित्रपट बनवला होता. उदय प्रकाश यांच्या लघु कादंबरीवर 'मोहनदास' नावाचा चित्रपट तयार झाला.
इतर भाषांमधील पुस्तकांवर आधारित हिंदी चित्रपट: 1968 चा हिंदी चित्रपट 'सरस्वतीचंद्र' हा गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांनी लिहिलेल्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेला देव आनंदचा ‘गाइड’ हा चित्रपट आरके नारायणन यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीवर आधारित होता. १९७१ मध्ये आलेला 'तेरे मेरे सपने' हा चित्रपट लेखक ए.जे. क्रोनिन यांच्या 'सिटाडेल' या कादंबरीवर आधारित होता. श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली 'जुनून' 1978 मध्ये बनवण्यात आला होता, हा चित्रपट लेखक रस्किन बाँड यांच्या 'ए फ्लाइट ऑफ पिजन्स' या इंग्रजी कादंबरीवर आधारित होता. 1981 मध्ये 'उमराव जान अदा' या उर्दू कादंबरीवर आधारित आलेल्या 'उमराव जान' चित्रपटाने तर इतिहास रचला होता. त्याचा रचनाकार मिर्झा हादी रुसवा होता.
नव्या युगातही हा ट्रेंड कायम आहे : आजही काही लेखकांच्या पुस्तकांवर चित्रपट बनवले जात आहेत. सुशांत सिंग राजपूतचा पहिला चित्रपट 'काई पोचे' हा चेतन भगतच्या 'द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या कादंबरीवर आधारित होता.तर आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवनचा 'थ्री इडियट्स' हा चित्रपटही चेतन भगतच्या 'फाइव्ह पॉइंट सम वन' या कादंबरीवर आधारित होता. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूरचा 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपटही चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित होता, पण हा चित्रपट चालला नाही.
काही चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले : प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित चित्रपट नेहमीच यशस्वी होतात असे नाही. अनेक चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले.वास्तविक, विषयाची समज आणि पटकथेची सर्जनशील क्षमता या गोष्टी सोप्या नाहीत. चित्रपटाचे तंत्र आणि पुस्तकाचे आकलन यांची योग्य ती सांगड घालून पटकथेला आकार देऊ शकणारे चित्रपट निर्माते फार कमी आहेत.गोदान, 'उसने कहा था', 'चित्रलेखा' आणि 'एक चादर मैली सी' हे असे चित्रपट होते जे लोकप्रिय पुस्तकांवर बनवले गेले, पण अयशस्वी झाले. किंबहुना, पुस्तकाच्या मूळ भावविश्वाशी एकरूप होऊन चित्रपट बनवणे आणि त्यात खोलवर जाणे ही एक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.कदाचित त्यामुळेच साहित्याचे चित्रपटात रुपांतर करणारे मोजकेच दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.त्यात बिमल रॉय, सत्यजित रे, श्याम बेनेगल, प्रकाश झा, गोविंद निहलानी यांसारखे चित्रपट निर्माते आघाडीवर आहेत. चित्रपटांनंतर आता ओटीटीवर पुस्तकांवर आधारित वेब सीरिजही बनवल्या जात आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment