टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी मुंबईला जॉकी श्रॉफच्या घरी झाला. सुरुवातीला त्याचं नाव जय हेमंत ठेवण्यात आलं होतं. जॉकी यांचा हेमंत नावाचा भाऊ वारला होता. त्याच्या नावावरून जॉकीनं आपल्या मुलाचं नाव जय हेमंत ठेवलं होतं. मात्र या लहान जय हेमंतला लहानपणापासून दुसऱ्यांना चावण्याची आणि ओरबडण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे त्याचे नातलग, मित्र त्याला टायगर म्हणत. पुढे तेच नाव सगळ्यांना खरे वाटू लागल्याने जय हेमंतचा टायगर श्रॉफ झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने याच नावाने एन्ट्री केली.
अर्थात टायगर श्रॉफला इतर स्टारपुत्रासारखं स्वीकारलं गेलं नव्हतं. त्याला टोमणे, अवहेलना झेलत प्रवास करावा लागला. त्याचा पहिला चित्रपट चालला नाही. गुळमुळीत चेहऱ्यावरून त्याच्यावर टीका झाली. 'हिरोपंती' या सिनेमानं नफा कमावला, पदार्पणाचे पुरस्कार पटकावले असले तरी टायगरचा ठोकळेबाज वावर, भावनाशून्यता आणि संवादफेकीच्या अपयशयावर कडाडून टीका झाली. 'अ फ्लाईंग किस', 'मुन्ना मायकल' या चित्रपटाच्या यशांनीही पाठ फिरवली. 'मुन्ना मायकल'मध्ये त्याने एकाहून एक सरस नृत्य स्टेप्स दाखवल्या होत्या. पण ही डान्सची जादू कमाल दाखवू शकली नाही. नंतरच्या 'बागी 2 'ने मात्र 200 कोटींचा धंदा केला. लष्करातील जवान झालेल्या टायगरने अधिकच कोरून काढलेलं शरीर आणि करकरीत स्टंटस दाखवून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून घेतलं. ऍक्शन हिरो म्हणून त्याची नोंद झाली. सुरुवातीला अभिनयात सुधारणा करावी किंवा तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट दिसण्यावर भर द्यावा, असे दोन पर्याय त्याच्यासमोर होते. त्याने दुसरा पर्याय स्वीकारला. तो नृत्यानिपुण होता. शरीरही आखीवरेखीव होते. त्यानं याच गोष्टींवर अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली. संवादापेक्षा स्टंटच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. भावानेऐवजी रोमांचक दृशयांतून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
डुप्लिकेट न घेता स्वतःच सगळे स्टंट करण्याच्या निर्णयामुळे टायगरच्या'बागी'चं कौतुक झालं. तरुणाईला आकर्षित करून घेणारा डान्स आणि मार्शल आर्टच्या करामती दाखवून टायगरने नव्या पिढीच्या स्पर्धेत भक्कम पाय रोवले. अक्शन थिल्लर वगळता इतर कोणतेही प्रयोग करण्यात टायगरला सध्या तरी रस नाही. 'स्टुडेंट ऑफ द इयर 2 'च्या फजितीनंतर त्याने हा निर्णय अधोरेखित केलाय. म्हणूनच 'बागी 3' हा तिसरा थरारपट त्यानं वेळ न दवडता साइन करून टाकला. दरम्यान, सिल्व्हेस्टर स्टॅलॉनच्या सुप्रसिद्ध रॅम्बो फ्रेंचायजी'चा फर्स्ट ब्लड' हा पहिला भाग हिंदीत यायचा ठरल्यावर टायगर श्रॉफच्या नावाला पर्याय सापडेना. 'रॅम्बो'नं सिल्व्हेस्टर स्टॅलॉनला जगभरात प्रसिद्ध केलं. आता बॉलिवूडचा टायगरीरॅम्बो काय करामत करून दाखवतो, याची उत्सुकता आहे.
अफलातून डान्स, कोरीव शरीरसंपदा, नम्र स्वभाव, गोड चेहरा, मोहक हास्य अशी विविध कारण टायगरच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरली आहेत. याच बळावर तो तरुण-तरुणींच्या गळ्यातला ताईत झालाय. तरीसुद्धा पूर्ण रोमँटिक भूमिका करायला तो तयार नाही. असं वाचनात आलंय की, तो बायोपिक, अर्थपूर्ण सिनेमे किंवा कॉमेडीसुद्धा सध्या नकोच म्हणतोय. उत्कट भावना व्यक्त करणं, चेहऱ्यावर विविध हावभाव दाखवणं, अस्खलित संवाद बोलणं या एका अभिनेत्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गुणांमध्ये आपण काहीसे कमी पडतोय, याची जाणीव त्याला झाली असावी का? म्हणून कदाचित रॅम्बो'सारखा अॅक्शन थिलरचा आधार त्याला सोपा वाटला असेल. स्टंट्समध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत तो स्वत:ला आजमावणार असेल. पण, रॅम्बो-सिल्व्हेस्टर स्टेंलोन असो, नाहीतर आपल्याकडचे धर्मेंद्र, सन्नी देओल, अक्षयकुमारसारखे अॅक्शन हिरो; शरीरसंपदेच्या पुढे जाऊन त्यांनाही अभिनयाच्या कसोटीवर स्वतःला पारखून घ्यावंच लागलं होतं. स्पर्धेत टिकायचं असेल, तर टायगरलाही भविष्यात या गोष्टीचा विचार करावा लागेल.
No comments:
Post a Comment