Thursday, July 20, 2023

२०२३ मध्ये ‘पठाण’ व ‘द केरला स्टोरी’ वगळता इतर चित्रपटांनी केली घोर निराशा

२०२३ चे सहा महीने उलटून गेले आहेत, या सहा महिन्यातील बॉलिवूडचं रिपोर्ट कार्ड समोर आलं आहे. २०२३ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये बॉलिवूड चित्रपट सृष्टीत ‘पठाण’ व ‘द केरला स्टोरी’ वगळता इतर चित्रपटांनी घोर निराशा केली आहे.

विशाल भारद्वाज यांच्या बॅनरखाली बनलेला त्यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेला ‘कुत्ते’ हा यावर्षीचा पहिला आणि फ्लॉप चित्रपट ठरला. अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ४.०४ कोटींचा व्यवसाय केला. ४ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानने मात्र बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. प्रचंड विरोध आणि बॉयकॉटचा सामना करूनही ‘पठाण’ ने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून तर जगभरात १००० कोटींहून अधिक व्यवसाय केला. ‘पठाण’ हा २०२३ चा पहिला सुपरहीट चित्रपट ठरला.

कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ‘शेहजादा’सुद्धा फारशी कमाल दाखवू शकला नाही. बिग बजेट असा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० कोटीसुद्धा कमवू शकला नाही. या चित्रपटाने ४७.४३ कोटींची कमाई केली. यानंतर अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसारख्या बड्या स्टारच्या ‘सेल्फी’ चित्रपटाने तर फारच निराशा केली. २३.६३ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ‘कैथी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला अजय देवगणचा ‘भोला’सुद्धा फारशी कमाई करू शकला नाही. जेमतेम १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने पार केला.

आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट तर कधी आला कधी गेला ते कोणालाच समजलं नाही. या चित्रपटाने जेमतेम १० कोटींची कमाई केली. हमखास सुपरहीट चित्रपट देणाऱ्या बॉलिवूडच्या भाईजानचीही यावेळी बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडली. सलमान खानचा बहुचर्चित ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाने १८० कोटींची कमाई केली, पण सलमानच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने मात्र अनपेक्षित असा व्यवसाय केला. कोणताही मोठा स्टार नसतानाही केवळ ज्वलंत विषय आणि त्याच्या मांडणीच्या आधारावर ‘द केरला स्टोरी’ने २४० कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला.

६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘आदिपुरुष’ने तर लोकांची घोर निराशा केली. प्रेक्षक तसेच समीक्षक सगळ्यांनीच या चित्रपटावर सडकून टीका केली. पहिल्या २ दिवसांत चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम २६६ कोटींचाच व्यवसाय केला. ‘आदिपुरुष’च्या मानाने कमी बजेटमध्ये बनलेला आणि हलकं फुलकं कथानक असलेला रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१९.८५ कोटींचा व्यवसाय केला. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या जोडीचा ‘सत्यप्रेम की कथा’ने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटाने अनपेक्षितपणे जवळपास ८० कोटींचा व्यवसाय केला आहे. 

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...