Monday, May 11, 2020

हिट गाण्यांचा पतंगा (1949)

तसे पाहिले तर लता मंगेशकर हुसनलाल भगतराम यांच्याआधी सी.रामचंद्र यांच्याबरोबर गात होत्या. परंतु रामचंद्र यांच्याबरोबर लताला लोकप्रियता मिळाली ती 1949 साली प्रदर्शित झालेल्या 'पतंगा' चित्रपटाद्वारा! लोकप्रियतेच्या दृष्टीने सी.रामचंद्र यांच्यापेक्षा हुसनलाल भगतराम यांना अधिक गुण द्यावे लागतील. सुरैया सारख्या अभिनेत्री गायिकेसमोर लता टिकून राहिली तसेच शमशाद बेगम, अमिरबाई कर्नाटकी आणि ललिता देऊळकर यांच्यासारख्या पल्लेदार गायिकांसमोरही लताने आपले आगळे स्थान जमवले.
तरीही लताचा कंठ सी.रामचंद्र यांच्या कारकिर्दीला नवे वळण द्यायला निमित्त ठरले. कारकिर्दीच्या सुरुवातीला सी.रामचंद्र हळव्या, उडत्या आणि मास्टर भगवान यांच्या स्टंट चित्रपटांना अनुरूप तर्ज बनवायचे. लताचा कंठ अशा गाण्यांकरिता नव्हता. अनिल विश्वास यांच्या 'गर्ल्स स्कूल' चित्रपटासाठी लताने गायलेली हळवी गीते वेगळ्या प्रकारची होती. सी. रामचंद्र यांची हळवी गीते वेगळ्या प्रकारची असत. 'गर्ल्स स्कूल' मध्ये म्हणूनच तर अनिल विश्वास यांच्यापेक्षा आपल्या संगीताचा वेगळेपणा त्यांनी सिद्ध करून दाखवलाच.
यानंतर सी.रामचंद्र स्वतःच्या संगीताविषयी गंभीर झाले. 1949 साली वर्मा फिल्म्स च्या 'पतंगा'साठी सी. रामचंद्र यांनी जे नवे वळण आणले ते लक्षात घेण्यासारखे आहे. पतंगामध्ये लताने गायलेल्या 'दिल से भुला दो तुम हमें, हम न उंहें भुलाऐंगे', 'ठुकरा के मुझे ओ जानेवाले तुने अरमानों की  दुनिया लूट ली',' मूहब्बत की खुशी कभी खामोश हो जाना', या गाण्याच्या तुलनेत 'मेरे पिया गये रंगून किया है वहां से टेलिफून',' ओ दिलवाले दिल का लगाना...' व ' बोलो जी दिल लोगे क्या क्या दोगे...' गाणी पहा.
वेगळ्या भाषेत सांगायचे तर सी. रामचंद्र यांच्या हळव्या चालीत एकप्रकारची मस्तीही असे. पतंगा चित्रपटात सी.रामचंद्रांच्या संगीताने धमाल केली. या चित्रपटात राजेंद्र कृष्ण यांची गीते होती. राजेंद्र-रामचंद्र यांची जोडी असलेला हा पहिलाच चित्रपट . 'मेरे पिया गये रंगून ' या गाण्याने तर तेव्हा तुफान लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याविषयी एकदा या गाण्याचे रचनाकार राजेंद्र कृष्ण यांनी गंमतीची गोष्ट सांगितली होती. हे गीत रचले तेव्हा भारत आणि ब्रह्मदेशात दूरध्वनीची सोय नव्हती. पतंगा प्रदर्शित झाला आणि हे गाणे लोकप्रिय झाले तेव्हा दोन्ही देशांना जोडणारी दूरध्वनी सुरू झाली.
शमशाद बेगम यांनी या चित्रपटात गायलेली दोन्ही सोलो गाणी हिट ठरली होती. 'गोरे गोरे मुखडे पे गेसू जो छा गये...' आणि ' दुनिया को प्यारे फुल और सितारे...' या गाण्यांप्रमाणेच 'मेरे पिया गये रंगून किया है वहां से टेलिफून',' ओ दिलवाले दिल का लगाना...' ही शमशाद बेगमने सी. रामचंद्रांबरोबर गायलेली हिते तसेच ' बोलो जी दिल लोगे...' हे शमशाद ने रफीबरोबर गायलेले गाणे हिट झाले. या चित्रपटात लताने तीन गाणी गायली होती. याशिवाय शमशाद आणि कोरससह एक गीत गायले होते. 'प्यार के जहां की निराली...' या गाण्याबरोबरच आणखी एक हळवे गीत या चित्रपटात होते ते म्हणजे 'नमस्ते नमस्ते पहले जो गयी नमस्ते...' या गाण्याला शमशाद, रफी ,चितळकर यांच्याबरोबर मोहनतारा तळपदेचाही आवाज होता.
1940 च्या दशकात मोहनतारा ही एक आघाडीवरची गायिका होती. 1942 साली संगीतकार हरिशचंद्र बाली यांच्या संगीतांतर्गत 'मामाजी' या चित्रपटाद्वारा पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या मोहनताराने खेमचंद्र प्रकाश, वसंत देसाई, बुलो सी रानी, हंसराज बहल, शंकरराव व्यास, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, एस पुरुषोत्तम वगैरे संगीताकारांबरोबर पार्श्वगायन केले. काही मोजक्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केल्यानंतर 1949 साली विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमातच ती विसावली.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...