Friday, May 15, 2020

बिना रॉय: एक तेजस्वी तारका

1950 च्या दशकात रुपेरी पडद्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं बिना रॉय! हिचा जन्म 4 जानेवारी 1931 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. 1960 चे दशकसुद्धा या रूप सुंदरीने आपल्या सौंदर्याच्या बळावर  रुपेरी पडदा गाजवला. 'काली घटा' या चित्रपटातून बिना रॉय प्रेमनाथ, किशोर साहू यांच्याबरोबर पडद्यावर झळकली. 1953 मध्ये नंदलाल जसवंतलाल यांचा 'अनारकली' आला आणि त्या चित्रपटाने बिना रॉय घराघरांत पोहचली. सलीम-अनारकली यांची ही अमर प्रीतिकथा पडद्यावर प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांनी अजरामर करून सोडली.
अनारकली म्हणून बिना रॉय इथे शंभर टक्के शोभून दिसली. घाऱ्या डोळ्यांची जादू, कमानदार भुवयांची दिलखेचक तिरंदाजी आणि लाडिक ओठांची हालचाल मोठीच खळबळ माजवून गेली. मिस्कील हास्य हे तिच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत होती.
यानंतरच्या कालखंडात प्रेमानाथ नावाच्या वादळाने बिना रॉयच्या आयुष्यात प्रवेश केला. राज कपूर-नर्गिस, दिलीप कुमार-मधुबाला, धर्मेंद्र-हेमामालिनी या प्रेमी युगुलांप्रमाणेच प्रेमनाथ-बिना रॉय यांचं प्रेमप्रकरण गाजलं. प्रीतीची वाटचाल खडतर काटेरी असते हे प्रेमानाथ आणि बिना रॉय यांना जितक्या तीव्रतेने जाणवलं, तेवढं कुणाच्याही वाट्याला आलं नसणार. त्यावेळी प्रेमनाथची चलती होती. हसतमुख आणि दिलदार, दणकट आणि रगेल, तरीही मृदू स्वभावाचा हा माणूस बिना रॉयच्या प्रेमात पडला.  दोघांनी काही चित्रपटात एकत्र कामही केलं. कालांतराने दोघांनी लग्नही केलं. प्रेमनाथ आपलं आयुष्य स्वच्छंद जगत राहिला. बिना रॉय मात्र या नव्या जीवनात चटकन रुळली नाही. एकीकडे प्रेमनाथचे चित्रपट चालेनासे झाले. पण बिना रॉयने चित्रपटात काम करायला त्याचा विरोध असावा. 'गोवलकुंडा का कैदी' हा चित्रपट प्रेमनाथने स्वतः च निर्माण केला. पण अपयशाने त्याची पाठ सोडली नाही. कारण चित्रपट साफ आपटला. नैराश्याने प्रेमनाथला घेरले. काही काळ तो अज्ञातवासात गेला. हिमालयात वास्तव्य करून आला. रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे, गायत्री मंत्राचे पठण यात रमला.
या सगळ्या अस्थिर आयुष्याचा बिना रॉयच्या मनावर परिणाम झाला असणार. तिचं मानसिक संतुलन लटपटलं. या परिस्थितीतही बिना रॉय हिने 'सरदार' (अशोक कुमार), 'समुंदर' या सारख्या चित्रपटात दिसली. जेमिनी फिल्म संस्थेच्या 'इंसानियत' हा तिचा या दरम्यानचा लक्षणीय चित्रपट. दिलीप कुमार आणि देव आनंद दोन नायक होते. पण बाजी मारून गेली बिना रॉय. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांना जिंकले. दोन नंबरचा मानकरी ठरलं ते चिम्पाझी माकड! मेकअप न करता वावरलेला दिलीप कुमार आणि मिशीत हास्यास्पद वाटणारा देव आनंद दोघेही फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. 1960 च्या दशकात पुन्हा एकदा जेमिनी संस्थेच्या 'घुंघट' या कौटुंबिक चित्रपटात बिना रॉयने आपल्या अभिनय नैपुण्याची वेगळीच उंची गाठली. दिलीप कुमार, भारत भूषण, आशा पारेख अशा नामांकित नट- नट्याची फौज इथे असताना अभिनयाची आणि कथा पुढे नेत त्यातली उत्कंठा वाढवत कथेचा परमोच्च बिंदू गाठण्याची किमया बिना रॉयनेच घडवली. अपघातात सापडलेली नववधू भलत्याच माणसाची पत्नी बनून भलत्याच घरात नाईलाजाने करावा लागणारा वावर, आपला खरा पती कोण हे कळल्यानंतर झालेला आनंद। आणि नंतर खरा पती मिळवण्यासाठी केलेली अविश्रांत धडपड हे सारेच दुवे आपल्या अप्रतिम मुद्राभिनयाने आणि सोशिक सहनशील आर्य स्त्रीचे सुंदर, सुभग दर्शन घडवत बिना रॉयने सहज घडवले.'घुंघट' साठी बिना रॉयने अभिनयाचं फिल्म फेअर पारितोषिक पटकावलं. यानंतर 1963 मध्ये हरि वालिया दिग्दर्शित चित्रपटात शम्मी कपूर सोबत ती दिसली. चित्रपट होता, 'वल्लाह क्या बात हैं'. मात्र हा चित्रपट चालला नाही. या चित्रपटात गाणी छान होती. पण या चित्रपटाला ते तारू शकले नाहीत.
पुन्हा एकदा आणखी एक अजरामर प्रेमकथा करण्याची संधी बिना रॉयला मिळाली. '  ताजमहल' नावाचा हा चित्रपट मात्र अविस्मरणीय ठरला. शाहजहा आणि मुमताज यांची ही शोकांतिका प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांच्या सुरेख अभिनयाने चिरंजीवी ठरली.
नंतरचा काही काळ बिना रॉय मानसिक रुग्ण म्हणून झुंज देत जगली. 1966 मध्ये प्रसाद प्रॉडक्शन च्या 'दादी माँ' या चित्रपटात बिना रॉय अशोक कुमारसोबत दिसली तेवढीच. तिचा मृत्यू 6 डिसेंबर 2009 रोजी मुंबईत झाला.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...