Monday, May 18, 2020

नृत्यकुशल, अभिनयनिपुण अभिनेत्री: वैजयंतीमाला

दाक्षिणात्य नायिकांमध्ये एक महत्त्वाचे अंग होते. वैजयंती मालादेखील त्याला अपवाद नव्हती. तामिळ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या अभिनय निपुण,सुस्वरूप आणि गोड चेहऱ्याच्या नायिकेने 1952 च्या सुमारास चेन्नई (तेव्हाचे मद्रास) मध्येच तयार झालेल्या 'बहार' या हिंदी चित्रपटाद्वारे नाचतच पदार्पण केले. आणि यथावकाश तिने अभिनयाचे ,लोकप्रियतेचे आणि कर्तृत्वाचे शिखर गाठले. सुरुवातीला तिने सुरेश (यास्मिन), प्रदीप कुमार (एक शोला/ जवानी की हवा), किशोर कुमार (पहली झलक), नागेश्वरराव (देवता) असे फारसे प्रसिद्ध नायक नसलेले चित्रपटही स्वीकारले.
त्यातील प्रदीप कुमार आणि किशोर कुमारबरोबर तर तिने सहा-सहा, सात-सात चित्रपट केले.मात्र यापैकी प्रदीप कुमारबरोबरचा 'फिल्मीस्तान' चा 'नागीन' हा चित्रपट त्या काळात सुपरहिट झाला. त्यावेळेस हिंदी चित्रपट सृष्टीला ठराविक काळानंतर नाग (डसत) असे! असे नागपट सर्वसाधारणपणे खेडेगावातून चांगला धंदा करत असत. मात्र 'नागीन' या चित्रपटाने मात्र आश्चर्य वाटावा , असा धंदा केला. शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला.
याच सुमारास व्ही. शांताराम, मेहबूब यांच्याबरोबरीने ज्यांचे नाव आदराने घेतले जात असे आणि चित्रपटाच्या कलात्मक बाजूला महत्त्वपूर्ण स्थान देऊन भावपूर्ण चित्रपट निर्माण करणारे म्हणून प्रसिद्ध पावलेले बिमल रॉय हे स्वतःच्या संस्थेतर्फे शरश्चंद्र यांच्या कादंबरीवरचा आणि कुंदनलाल सैगलने गाजवलेला 'न्यू थिएटर्स' चा 'देवदास' चित्रपट परत निर्माण करू इच्छित होते. त्यांनी त्यातील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाची निवड केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याचशा 'रिमेक' या आर्थिकदृष्ट्या तितक्याशा यशस्वी झालेल्या नाहीत. 'देवदास'च्या बाबतीतही ते खरे ठरले. मात्र या चित्रपटामुळे स्वतः वैजयंतीमालाचा दुहेरी फायदा झाला. एक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील जाणकार तिची दखल घेऊ लागले आणि दुसरे म्हणजे तिला त्या वर्षीचे सहाय्यक अभिनेत्रीचे 'फिल्म फेअर' पारितोषिक जाहीर झाले. त्यामुळे तिच्यावर लोकमान्यतेचे शिक्कामोर्तब झाले.  मात्र चंद्रमुखीची भूमिका ही दुय्यम भूमिका नसल्याने तिने ते पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ते पारितोषिक स्वीकारून जेवढा तिच्या नावाचा बोलबाला झाला असता, त्यापेक्षा जास्त बोलबाला तिने हे पारितोषिक नाकारल्यामुळे झाला, हे नमूद करावयास हवे.
इथून तिच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा सुरू झाला. हा टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. कारण याच अवधीत ती तिच्या कारकिर्दीच्या शिखराकडे गेली. 'देवदास' नंतर अशोककुमार (सितारों से आगे), बलराज साहनी (कठपुतली), देव आनंद (अमरदीप, ज्वेल थिफ,दुनिया), राज कपूर(नजराना), राजेंद्र कुमार (जिंदगी, संगम),सुनील दत्त (साधना, झूला), किशोर कुमार(रंगोली) अशा अभिनेत्यांबरोबरच बिमल रॉयच्या जोडीने ,  ग्यान मुखर्जी, अमिया चक्रवर्ती, नितीन बोस, टी प्रकाशराव, विजय आनंद, श्रीधर, रामानंद सागर, राज कपूर, बी.आर.चोप्रा, अमर कुमार अशा त्यावेळच्या नामवंत ,श्रेष्ठ आणि प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकांबरोबर तिला चित्रपट करण्याची संधी मिळत गेली. त्यामुळे ती मीना कुमारी, नूतन, नर्गिस यांच्यासारख्या प्रथितयश अभिनेत्रींच्या जोडीने प्रथम ओळीत केव्हा स्थानापन्न झाली,हे कळलेच नाही. या सारयांच्या बरोबरीने तिचे दिलीप कुमारबरोबरचे साहचर्य तिला खूप फायदेशीर ठरले. 1956 साली आलेल्या 'देवदास' नंतर 'नया दौर' (1957), मधुमती (1958), पैगाम (1959), आणि गंगा जमुना (1961) असे करीत त्यांचे चित्रपट येत गेले.
याच सुमारास तिचे नाव दिलीप कुमारच्या जोडीने घेतले जाऊ लागले. ते दोघे विवाह करणार असल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या. त्यातच दिलीप कुमार तमिळ भाषा शिकत असल्याचे प्रसिध्द झाले आणि हा विवाह झाल्याच्य वार्ता येऊ लागल्या. मात्र त्याच वेळेस विवाह करण्यासाठी वैजयंतीमालाने मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे असा आग्रह दिलीप कुमारने धरल्याचे आणि तिने या गोष्टीसाठी ठाम नकार दिल्याचे बोलले जाऊ लागले. कारण काही असो, हा विवाह झाला नाही एवढे मात्र खरे! 'नया दौर' चित्रपटासाठी त्यावेळेस दिलीप कुमारची तत्कालीन लोकप्रिय नायिका मधुबाला हिची निवड झाली होती. तिच्यावर त्या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरणही झाले होते. पण काही कारणाने दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात अंतर्गत वाद झाले. मग दिलीप कुमारने बी. आर. चोप्रावर दडपण आणून मधुबाला ऐवजी वैजयंतीमालाची निवड करून घेतली. मात्र नियतीची करामत बघा! जवळजवळ दहा वर्षांनी स्वतः वैजयंती मालावर तीच वेळ आली. मद्रासमध्ये 'राम और श्याम' चित्रपट तयार होत होता. नायक-नायिका म्हणून दिलीप कुमार-वैजयंतीमाला होते. त्यावेळेस उभयंतांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने दिलीप कुमारने वैजयंतीमालाच्या जागी वहिदा रेहमानची निवड निर्मात्यास करावयास लावली. नियतीने केलेली ही फिट्टमफाटच म्हणावयाची!
वारंवार मिळणाऱ्या यशाने ती धुंद झाली नाही, नवोदित वा दूर फेकले जात असलेल्यांबरोबरही ती चित्रपट
स्वीकारत राहिली. त्यामुळेच जॉय मुखर्जी ('इशारा'), मनोजकुमार ('फूलोंकी सेज') द्या त्यावेळच्या नवोदित आणि तिच्या दृष्टीने ज्युनिअर असलेल्या अभिनेत्यांबरोबर जसे तिने चित्रपट स्वीकारले, तसेच
राम मुखर्जीसारख्या प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर तिने 'लीडर' चित्रपट
स्वीकारला. त्याच सुमारास भारतभूषण हा एकेकाळचा
आघाडीचा, लोकप्रिय नायक उतरणीला लागला होता. पण तिने त्याच्याबरोबर कसलाही अनमान न करता 'नया कानून' या चित्रपटात भूमिका स्वीकारली. १९६४ साल तिला अतिशय यशस्वी गेले. दिलीपकुमार, राज कपूर, राजेंद्रकुमार हे त्यावेळचे आघाडीचे नायक होते. त्यांच्याबरोबरचे तिचे, 'लीडर,"संगम,"जिंदगी' हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि गाजले 'संगम' चित्रपटाने अफाट
लोकप्रियता मिळवली. त्यांच्यानंतर 'इशारा' आणि 'फूलोंकी सेज' हे चित्रपटही आले. त्यामुळे ती संपूर्ण वर्ष रसिकांच्या समोर कायम नवनवीन स्वरूपात येत राहिली.
१९६० साली ती आणि राज कपूर मद्रासमध्ये श्रीधर यांच्या 'नज़राना' चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्याच वेळेस राज कपूरने तिच्याशी तो निर्माण करणार असलेल्या 'संगम चित्रपटातल्या 'राधा'च्या भूमिकेविषयी बोलणे करून तिचा विश्वास मिळवला होता. मात्र प्रत्यक्ष करार करावयाची वेळ आली तेव्हा
वैजयंतीमाला मुंबईत नव्हती. म्हणून राज कपूरने तिला 'बोल राधा बोल, संगम होगा की नहीं ?' अशा
मजकुराची तार पाठवली! त्या तारेचा अर्थ तिने बरोबर ओळखला आणि 'होगा, होगा, होगा' अशी तार पाठवून
भूमिका स्वीकारल्याचे कळवले. या दोन्ही ओळींचा समावेश त्या चित्रपटाचा दिग्दर्शकही असलेल्या राज कपूरने 'मेरे मन की गंगा, तेरे मन की जमुना का...' या गीतात केला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तिने राज कपूरबरोबर परदेशवारी केली. त्या दोघांतील
जवळीक वाढल्याचे लोक बोलू लागले. पण तिने योग्य वेळी स्वत:ला सावरले आणि राज कपूरच्याच स्नेह्याशी-डॉ.बालीशी विवाह केला.
यानंतर तिच्या कारकीर्दीतला तिसरा टप्पा सुरू झाला. तिने चित्रपटांतून कामे करणे चालूच ठेवले. राजेंद्रकुमार (सूरज), धर्मेंद्र (प्यार ही प्यार), दिलीपकुमार (संघर्ष),
उत्तमकुमार (छोटीसी मुलाकात), शम्मी कपूर (प्रिन्स), देव आनंद (ज्युवेल थीफ, दुनिया) असे तिचे चित्रपट येत राहिले. मात्र 'सूरज' आणि 'संघर्ष'च्या काळात त्या
नायकांशी तिचे असलेले संबंध बिघडले. त्यामुळे नाराजीने पण निर्मात्याचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून तिने नायकांशी अबोला धरूनच चित्रीकरण पार पाडले.
दरम्यानच्या काळात तिने स्वत:च नाकारलेले 'फिल्मफेअर' पारितोषिक तिला दोनदा मिळाले. १९६३ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला चित्रपट व्यावसायिकांचा भव्य प्रमाणावर मेळावा भरला होता.
त्या वेळेस पंतप्रधान नेहरूंचे स्वागत करून मेळाव्यात त्यांच्याबरोबर वावरण्याची संधी तिला मिळाली. मूळची ती दाक्षिणात्य असल्याने तिला राजकारणाची ओढ होतीच, त्यामुळे १९६८ च्या सुमारास डॉ. बालीबरोबर तिने त्यावेळच्या जनसंघात (आताच्या भा.ज.प.मध्ये)
प्रवेश केला.१९६१ च्या एप्रिल, महिन्यात मुंबईच्या कफ परेडवर अटलबिहारी वाजपेयींच्या अध्यक्षतेखाली जनसंघाचे खुले अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात तिने संपूर्ण दिवस हजेरी लावली. अन्य सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ती वावरली आणि रांगेत उभे राहूनच तिने चहा, नाश्ता. भोजन घेतले. नंतर तिने काँग्रेसमध्येच प्रवेश करून दोनदा खासदारकी
उपभोगली. मात्र खासदार म्हणून तिची कामगिरी शून्यच! मुंबई ही कर्मभूमी असल्याने तिला मराठीविषयी प्रेम वाटू लागले. त्यामुळे तिने १९६८ मध्ये 'झेप' या मराठी चित्रपटची निर्मिती केली. (त्यातील सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले 'चिंधी बांधते द्रौपदी
हरिच्या बोटाला' हे अप्रतिम गाणे अजून बऱ्याच संगीतप्रेमींना आठवत असेलच!) त्यापूर्वी १९६३ मध्ये
पत्रकारांशी गप्पा मारताना तिने सर्व भारतीय भाषांतील गाण्यांपैकी मराठी भाषेतील 'लाखाची गोष्ट' या
चित्रपटतील 'माझा होशील का ? गाणे तिला सर्वात अधिक आवडत असल्याचे आवर्जून नमूद केले होते.
(हेही गाणे सुधीर फडके यांनीच स्वरबद्ध केले होते.) इतकेच नव्हे तर ते गाणे पत्रकारांना तिने गाऊनही
दाखवले होते. त्यावेळेस दिलीपकुमारबरोबर होणाऱ्या तिच्या विवाहच्या वातांना जोर आलेला असल्याने एका पत्रकाराने आपण हा प्रश्न (माझा होशील का?)
कोणाला केला आहे का, असे हास्यकल्लोळवत विचारले ! या प्रश्नाचे उत्तर तिने झक्कपैकी लाजूनच दिल्याने हास्यकल्लोळत भरच पडली!
१९७० च्या जुलैमध्ये नरेशकुमार दिग्दर्शित 'गँवार' हा तिची नायिकेची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित
झाला आणि तिने चित्रपट व्यवसायातून निवृत्ती स्वीकारत असल्याचे जाहीर केले, राजेंद्रकुमारसारखा नायक आणि नौशाद अलीसारखा तालेवार संगीत
दिग्दर्शक असूनही चित्रपट केला लागला आणि गेला, हे रसिकांना कळलेच नाही. तिच्यासारख्या अभिनेत्रीचा तो शेवटचा चित्रपट ही त्या चित्रपटाविषयीची ऐतिहासिक नोंद एवढेच त्या चित्रपटाने महत्त्व!

1 comment:

  1. वैजयंतीमाला एक माजी भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि संसदपटू आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील "गोल्डन एरा" मधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक, तिला दोन BFJA पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
    जन्म: 13 ऑगस्ट 1936 (वय 85 वर्षे), ट्रिपलिकेन, चेन्नई
    उंची: 1.6 मी
    जोडीदार: चमनलाल बाली (म. 1968-1986)
    मुले: सुचिंद्र बाली
    पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, अधिक

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...