Thursday, May 14, 2020

सिने केसरी बाबूराव पेंटर


भारतीय चित्रपट इतिहासात बाबूराव कृष्णराव मेस्त्री अर्थात बाबूराव पेंटर यांचे नाव नेहमीच सन्मानानं घेतलं जाईल. चित्रपटांमध्ये शिल्प,कला, व्यवसाय आणि आदर्श यांचा अनोखा समन्वय करणारे ते पहिले भारतीय फिल्मकार होते. कोल्हापूर मध्ये 3 जून 1890 रोजी एका मूर्तिकार पित्याच्या घरी बाबूराव यांचा जन्म झाला. वडिलांच्या छत्र छायेखाली मूर्तिकलेचे धडे गिरवता गिरवता बाबूराव आणि त्यांचा चुलत भाऊ अनंतराव यांचे बालपण सरले. नंतर या दोघा भावांनी नाटकांचे पडदे अशा काही कुशलतेने रंगवायला सुरुवात केली की त्यामुळे  नाटकांपेक्षा अधिक त्यांची चर्चा होऊ लागली.
नाटककार कृष्णराव यांच्या निमंत्रणावरून दोघे भाऊ मुंबईला पोहचले. आणि तिथे गेल्यावर छायांकनचा नवा छंद जोपासला. ही गोष्ट जवळपास 1915-16 मधली असावी. मुंबईत विदेशी चित्रपट पाहून पाहून त्यांच्या मनात चित्रपट निर्मिती करण्याची उमेद जागृत झाली. तोपर्यंत भारतीय सिनेमाचे पितामह दादासाहेब फाळके यांनी अनेक यशस्वी मूकपटांची निर्मिती केली होती. त्यांच्यावर प्रभावित होऊन अनंतराव याने दादासाहेब फाळके यांना आपले गुरुदेखील मानले. भारतीय सिनेमा तोपर्यंत शैशव्य काळातच होता. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यात अजूनही बऱ्याच गोष्टींची कमतरता होती. सर्वात मोठी खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही चित्रपटात नायिकेची भूमिका पुरुषालाच करावी लागत होती. पण तरीही आपल्या गुरूच्या यशस्वी प्रयत्नांना प्रेरित होऊन अनंतराव यांनी चित्रकार भाऊ बाबूराव आणि फतेहलाल नावाचा आणखी एक मित्र यांच्या सोबत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. जवळ पैसे नव्हते तरीही आपल्या बायकोच्या बांगड्या तारण ठेवून आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी मुंबईतील चोर बाजारातून एक विदेशी जुना प्रोजेक्टर खरेदी केला. फतेहलालच्या मदतीने त्या प्रोजेक्टरचे कॅमेऱ्यात रूपांतर करण्यात आले. याच्या मदतीने तिघांनी मिळून 'गुड नाईट'  या एका प्रयोगात्मक लघुचित्राची निर्मिती केली. बाबूराव पेंटरांना त्या कमेरातून काढलेल्या फोटोंचा दर्जा काही पसंद पडला नाही. ते आपल्या स्तरावर एका नव्या कॅमेऱ्याच्या निर्मितीच्या खटपटीला लागले. या दरम्यान 1916 मध्ये अचानक अनंतराव यांचा मृत्यू झाला. बाबूराव एकटेच या आपल्या कामाला लागले. शेवटी त्यांना भारतातला पहिला देशी कॅमेरा बनवण्यात यश मिळाले.
सन 1918 मध्ये बाबूराव पेंटर यांनी काँग्रेस अधिवेशनाची एक रीळ या कॅमेऱ्याच्या साहाय्याने बनवली. ती त्यांनी लोकांना दाखवली आणि त्यांची प्रशंसा झाली. ही रीळ पाहिलेल्या प्रेक्षक आणि प्रशंसकांमध्ये श्रीमती तानाबाई या एक धनाढ्य महिलेचा समावेश होता. त्या या फिल्मवर इतक्या प्रभावित झाल्या होत्या की, त्यांनी बाबूरावांना बोलावून घेतले आणि फिल्म निर्मितीसाठी 20 हजारांची मदत देऊन टाकली. या रकमेतून बाबूराव पेंटर यांनी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.मूक युगातील एक फिल्म निर्माण संस्थेच्या रुपात या कंपनीने खूप वाहवा मिळवली. भारतीय फिल्मकलेच्या विकासात या कंपनीचे खूप मोठे योगदान राहिले आहे. व्ही शांताराम आणि जयराज सारख्या हस्तीदेखील या कंपनीच्या देण आहेत.
सन1919 मध्ये बाबूराव पेंटर यांनी आपल्या या कंपनीच्या बॅनरखाली आणि आपल्या बनवलेल्या देशी कॅमेऱ्याच्या मदतीने 'सैरंध्री' या प्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती केली. सेन्सर बोर्डाने केलेल्या काटछाटमधून बाहेर आलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. असं म्हटलं जातं की, भीम-कीचक युद्धाचा अत्यंत जिवंत देखावा पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडायचे, त्यामुळे शेवटी सेन्सरला हे दृश्य कापावे लागले. त्या काळातील हा एक अत्यंत प्रशंसनीय आणि यशस्वी चित्रपट होता. पडद्यांच्या पृष्ठभूमीमध्ये चित्रपटांचे चित्रण करण्यापेक्षा सेट निर्माण पद्धतीचा अंगीकार करण्यात आला तो या चित्रपटापासून. बाबूराव पेंटर यांनी  या चित्रपटाच्या प्रचारासाठी भारतीय सिने-इतिहासात पहिल्यांदा पोस्टर बनवले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या चित्रपटाने इतके प्रभावित झाले की, त्यांनी पुण्यात आर्य सिनेमामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बाबूराव पेंटर यांना सुवर्णपदक आणि 'सिने केसरी' ही उपाधी देऊन गौरव केला.
या चित्रपटाच्या यशाने प्रेरित होऊन बाबूराव दुप्पट जोशाने चित्रपट निर्मिती च्या कामाला लागले. त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या च चित्रपटांचे विवरण उपलब्ध नाही,पण पुढच्या तीन चार वर्षांत त्यांनी जवळपास 20 मूकपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.
1923 मध्ये 'सिंहगड' नावाचा आणखी एक अत्यंत यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय चित्रपट इतिहासात हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक चित्रपट मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत विश्वासू असलेल्या तानाजी या मावळ्याकडून आपले प्राण धोक्यात घालून कोंडाणा' (सिंहगड) जिंकल्याची साहसी घटनेवर आधारित हा चित्रपट होता. व्ही. शांताराम या दिवसांत महाराष्ट्र फिल्म कंपनीत स्पॉट बॉयचे काम करत होते. बाबूराव यांनी  या चित्रपटात त्यांना शेलारामामाचा छोटासा रोल दिला होता. या चित्रपटाद्वारा त्यांना सिनेमा पडद्यावर झळकण्याची पहिल्यांदा संधी मिळाली होती. नंतर ज्यावेळेला व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली, तेव्हा बाबूराव पेंटर यांच्या सन्मानार्थ त्यांनी त्यांचे सैरंध्री आणि सिंहगड या दोन्ही मूकपटाचे बोलपटात रूपांतर केले.
'सिंहगड' या चित्रपटाने त्यावेळेला मुंबईतील नावलटी सिनेगृहात लागोपाठ सोळा आठवडे चालला आणि एक नवा इतिहास झाला. फिल्म चित्रणावेळी रिफ्लेक्टरचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला होता. पुढच्या काही वर्षांत बाबूराव पेंटर यांनी आणखी दोन ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली. हे दोन चित्रपट म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि नेताजी पालकर. यांत शिवाजी महाराजांच्या सेनापतींद्वारा मराठा साम्राज्यासाठी केल्या गेलेल्या संघर्षाची कथा होती.
या दरम्यानच सन 1924 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माया बाजार' चित्रपटात फतेहलाल यांनी पहिल्यांदा ट्रिक फोटोग्राफीचा चमत्कार दाखवला. प्रेक्षक घटोत्कचला ढगांमधून जाताना अवाक होऊन पाहायचे. हा चित्रपदेखील खूपच गाजला. बाबूराव पेंटर महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी चित्रपट लिहायचे, दिग्दर्शन आणि अभिनयही करायचे.
चित्रपट निर्मितीच्या या यशस्वी प्रवासात त्यांनी आणखी एक चित्रपट बनवला. 1925 मध्ये  'सावकारी पाश' या चित्रपटातून त्यांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत संपूर्ण भारतात चित्रपटांची निर्मिती सुरू झाली होती. या क्षेत्रात अनेक फिल्म निर्माण संस्था उतरल्या होत्या. या काळात एक अशी घटना घडली की, त्यामुळे महाराष्ट्र फिल्म कंपनीचा डोलाराच डळमळीत झाला. संचालकांच्या आग्रहानुसार बाबूराव यांनी बी.गीडवाणी या युवकाची महिना चारशे रुपये वेतनावर कंपनीचा प्रबंधक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. कारण त्याला दिलेले वेतनाइतके  अन्य कुशल कर्मचाऱ्यालादेखील वेतन मिळत नव्हते. शिवाय गिडवाणी यांनी सूत्रे हाती घेतल्यावर कर्मचाऱ्यांवर रुबाब दाखवायला सुरुवात केली. यामुळे कंपनीत पहिल्यांदा मालक आणि नोकर अशी भावना निर्माण झाली. यापूर्वी कंपनी सगळे एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे राहत होते. त्यातच त्याने आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला कॅमेरामन म्हणून मोठ्या पगारावर नेमणूक केली. या दोघांनी मिळून 'मिडनाईट मेल'नावाचा चित्रपट बनवला आणि तो अगदी वाईट पद्धतीने आपटला.
बाबूराव हे सगळे गपगुमान सहन करीत राहिले आणि आपल्या कामात व्यस्त राहिले. त्यांना येणाऱ्या वादळाची चाहूल लागली होती. त्याच काळात त्यांनी व्ही. शांताराम यांच्यावर 'नेताजी पालकर' च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. या चित्रपटाची निर्मिती झाल्या झाल्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढवण्याची मागणी केली. ही मागणी धुडकवण्यात आली. बाबूराव पेंटर यांच्या चार प्रमुख सदस्यांनी -शांताराम, फतेहलाल, दामले आणि धेबर यांच्यासह अनेकांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीला सोडचिठ्ठी दिली. या चौघांनी मिळून शेठ सीताराम कुलकर्णी यांच्या सोबतीने 1 जून 1929 रोजी भारतीय सिनेमाचा वटवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली.
आपल्या अनेक सहकारी आणि मित्रांची साथ सांगत सुटल्यानंतरही त्यांनी चित्रपट सेवा कायम सुरू ठेवली. 1929 मध्ये त्यांनी मालवाच्या लोकप्रिय प्रेमकथेवर आधारित 'रानी रुपमती' चित्रपटाची निर्मिती केली. याचे कथानक गजानन जहागीरदार यांनी लिहिले होते.
प्रतिभाशाली कलाकारांनी कंपनी सोडल्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनी अधिक काळ जिवंत राहिली नाही. शेवटी 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली. बाबूराव पेंटर यांनी यानंतरसुद्धा आपली चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली. 1931 मध्ये बोलपटाच्या युग सुरू झाले. त्यांनी 'प्रेमसंगम' आणि 'सावकारी पाश' या आपल्या दोन पटांची बोलपटात निर्मिती केली. 1932 मध्ये बालगंधर्वच्या एका नाटकाचे रूपांतर 'साध्वी मीराबाई' या चित्रपटात केले. या चित्रपटात बालगंधर्व यांना मिराबाईच्या भूमिकेत सादर केले. मात्र हा एक अयशस्वी प्रयत्न राहिला. यानंतर बाबुराव पेंटर यांनी आपली फिल्म निर्मिती हळूहळू कमी केली. त्यांचा शेवटचा चित्रपट 'विश्वामित्र' होता. 16 जानेवारी 1954 मध्ये त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...