Saturday, May 16, 2020

अनुपम संगीताचा बादशहा:खेमचंद प्रकाश

सर्वसामान्यांना 'महल' या चित्रपटासाठी आठवणीत असलेल्या खेमचंद प्रकाश यांचा जन्म राजस्थानमध्ये 1903 च्या सुमारास झाला. त्यांचं कुटुंब सुजानगढजवळच्या गावातलं. वडील पं. गोवर्धन प्रसाद जयपूरच्या महाराजांच्या सेवेत होते. खेमचंद यांनी तिसच्या दशकाच्या मध्यास चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं अन 1939 साली 'गाझी सलाहुद्दीन' या चित्रपटाला सर्वप्रथम संगीत दिलं. पुढच्या वर्षी ते रणजीत  मुव्हीटोन या संस्थेत दाखल झाले. खेमचंद प्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत एकंदर 35 ते 40 चित्रपटांना संगीत दिलं. त्यातले किमान 15 चित्रपट रणजीत मुव्हीटोन चे होते.
यावरून त्यांचं या बॅनरशी असलेलं नातं लक्षात येईल. 'दिवाली', 'होली', परदेसी हे काही त्यांचे आरंभीचे चित्रपट पण त्यांना नाव मिळालं ते सैगल आणि खुर्शीद यांची भूमिका असलेल्या  1943 च्या 'तानसेन' चित्रपटानं. यातली सर्वच गाणी कमालीची गाजली. विशेषतः ' घटा घनघोर...', 'मोरे बालापन के साथी...', 'रुमझुम रुमझुम चाल तिहारी..'सप्तसुरन तीन ग्राम...', 'बाग लगा दू सजनी...' या गीतांनी जनमानसात कायमचं स्थान पटकावलं. 'तानसेन'साठी खेमचंद प्रकाशकडे सहाय्यक म्हणून काम केलेल्या बुलो सी. रानी यांनी पुढे स्वतंत्ररित्या संगीत दिग्दर्शन सुरू केलं. खुद्द नौशादही आपल्या उमेदवारीच्या दिवसांत काही काळ खेमचंदजींकडे सहायक होते.
राजस्थानी लोकसंगीत अन शास्त्रीय संगीत यांचा योग्य मेळ साधल्यानं खेमचंद प्रकाश यांच्या संगीताला त्याकाळी सर्व थरांत चांगली प्रतिष्ठा मिळाली.'तानसेन' पाठोपाठ आलेल्या सुरेंद्र, अमीरबाई यांच्या ' भर्तृहरी' लाही ( भिक्षा दे दे मैया पिंगला) खेमचंदजींच्या संगीतानचं तारलं.
(आएगा आनेवाला... ' महल' मध्ये मधुबालावर चित्रित करण्यात आलं.)
रणजीत मुव्हीटोन च्या एकापाठोपाठ एक अशा 15 चित्रपटांची मालिका पूर्ण केल्यानंतर 1948 साली बॉम्बे टॉकीजनं त्यांना करारबद्ध केलं. त्यावर्षीचा 'जिददी' हा बॉम्बे टॉकीजसाठी त्यांनी केलेला पहिला चित्रपट. देव आनंद, कामिनी कौशल यांच्या 'जिददी' मधून त्यांनी किशोर कुमारला पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. 'मरने की दुवाएं क्यूँ मांगू...' हे किशोरचं पाहिलं गाणं संगीतबद्ध करण्याचं श्रेय अशा रीतीने खेमचंदजींकडे जातं. किशोरवर सैगलचा केवढा प्रभाव होता याचा नमुना म्हणून हे एकच गाणं ऐकावं. 'जिददी' चित्रपटानं खऱ्या अर्थानं पुढं आलं ते लताचं नाव. खरं तर त्याच वर्षी आलेल्या 'आशा' मध्ये खेमचंदजींनी लताच्या आवाजात पाच गाणी ध्वनिमुद्रित केली होती. पण त्या ऐवजी 'जिददी' मधलं 'चंदा रे जा रे जा रे...'हेच सर्वमुखी झालं. या गाण्यातली लताच्या स्वराची कोवळीक आजही मन मोहून टाकते. याखेरीज लता-किशोरचं 'ये कौन आया रे' हे हलक्या फुलक्या शैलीतलं गाणंही त्याकाळी अनेकांना आवडलं.
त्यानंतर आली 'महल' ची अजोड कलाकृती. पुन्हा बॉम्बे टॉकीजचीच निर्मिती, कमाल अमरोहीसारखा कवी मनाचा दिग्दर्शक, लावण्यवती मधुबाला अन आघाडीचा नट अशोक कुमार ही जोडी आणि या सर्वांवर मात करणारं, चित्रपटाच्या गूढ पार्श्वभूमीला आणखी प्रभावी करणारं खेमचंद प्रकाश यांचं संगीत.
'महल' च्या आएगा आनेवाला' नं पुढल्या चार पिढयांना झपाटून सोडलं. सत्तर वर्षे उलटली तरी या गाण्याला अद्याप तोड नाही. हिंदी चित्रपटामध्ये रुळलेल्या गूढ गीतांच्या ( हॉंटिंग सोंग्ज) प्रकारात 'आएगा आनेवाला' या गाण्याचं अव्वल स्थान आजवर अबाधित आहे. विशेषतः गाण्याच्या पूर्वार्धातील (खामोश है जमाना... चुपचाप है सितारे) ती गूढ सूचक वाद्यवृंद रचना अभिनव अशीच होती.
'आएगा आनेवाला' एवढं गाजलं की त्यापुढं या चित्रपटातल्या अन्य गाण्यांना दुय्यम स्थान मिळालं. लताचं 'मुश्किल है...' कोण विसरू शकेल? अन तिच्याच स्वरातलं 'दिल ने फिर याद किया' हे गाणं? 'महल' मध्ये राजकुमारी देखील काय प्रभावीपणे गाऊन गेली! 'घबराके जो हम सर को', 'एक तीर चला', 'मैं वो हँसी हूं' या राजकुमारीच्या गाण्यांना दरबारी संगीताचा भरजरी स्पर्श लाभला होता.
खेमचंदजींच्या त्या काळात लताला केवढी मदत झाली याची आठवण कै. माई मंगेशकर यांनी एका ठिकाणी नोंदवली आहे. लतावरच्या 'थोरली' या लेखात त्या म्हणतात... मला आठवते आहे; खेमचंद प्रकाश यांच्याकडे ती गाऊ लागली तेव्हा आमचे वाईट दिवस पालटू लागले. खेमचंद तिची काळजी घेत. खाण्यापिण्याची वास्तपुस्त करीत. पण तरीही रखडपट्टी चालूच होती. पुढे वर्षभर काम करून पैसे जमल्यानंतर तिने पहिली गाडी- हिलमन कार' घेतली. तेव्हा कुठे पायपीट थांबली. मग 1949 साली दुसरी गाडी घेतली. त्यानंतर सतत भरभराट च होत गेली...'
एकूण ' महल'नं खेमचंदजींच्या कारकिर्दीला झळाळी मिळाली. त्यानंतरच्या त्यांच्या उल्लेखनीय रचनांमध्ये 'जगमग जगमग करता निकला '(रिमझिम-किशोर कुमार), 'ए दिल ना मुझे याद दिला' (सावन आया रे-रफी, शमशाद बेगम), 'अरमानभरे दिल की लगन' (जान पहचान-तलत, गीता रॉय) या सारख्या गाण्यांचा समावेश होता. संगीतकारांची नवी पिढी आल्यावर खेमचंदजींची कारकीर्द उतरणीला लागली. काळाप्रमाणे नव्या धाटणीचं संगीत देण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांना रुचला नाही. हळूहळू ते बाजूला फेकले गेले. उपेक्षेचे आणखी भोग वाट्याला येण्याआधीच 10 ऑगस्ट 1950 रोजी खेमचंद प्रकाश यांना काळानं ओढून नेलं. मागे उरलं ते त्यांनी दिलेलं अनुपम संगीत!

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...