Wednesday, May 6, 2020

पंजाबी ढंगाचे संगीत आणणारे गुलाम हैदर

हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी बंगाली संगीतकारांचाच बोलबाला होता. मात्र त्यांना यशस्वी टक्कर देण्याचं काम आर.सी. बोराल(लाहोर),पंकज मलिक (मुंबई) आणि तिमिर बरन या 'न्यू थिएटर्स' च्या तिघांनी केलं. चालीसच दशक सुरू झाल्यानंतर पंजाबी विशेषतः मुस्लीम ढंगाचं संगीत देणाऱ्या संगीतकारांनी आपली चुणूक दाखवली आणि अवघ्या चार-पाच वर्षात च त्यांच्या 'फडकत्या' संगीतापुढं बंगाली संगीताची जादू चालायची बंद झाली.

त्या काळातल्या पंजाबी संगीतकारांमध्ये मुख्यत्त्वे मीरसाहेब (पुकार), झंडेखां (चित्रलेखा-जुना),फिरोज निजामी ( जुगनू),रफिक गजनवी(सिकंदर) आदींचा प्रभाव होता.पण या सर्वांमध्ये  आघाडीवर संगीतकार होते, मास्टर गुलाम हैदर. पन्नास एक वर्षांपूर्वी  काळाच्या पडद्याआड गेलेल्या गुलाम हैदरासाहेबांचं आज जुन्या संगीताचे दर्दी सोडल्यास कुणाच्या स्मरणातही नसेल.
पार्श्वगायनाच्या नभांगणात गेलं अर्धशतक तळपत असणाऱ्या लता मंगेशकरांनी असंख्य संगीतकारांकडे असंख्य गाणी गायली. पण लताच्या उमेदवारीच्या , संघर्षाच्या काळात तिच्या स्वरातले दैवी गुण ओळखण्याची पारख ज्या मोजक्या संगीतकारांनी दाखवली त्यात गुलाम हैदर अग्रभागी होते. खुद्द लताला त्यांच्याबद्दल आदरच होता. एचएमव्ही ने 1988 साली काढलेल्या 'माय फेव्हरेट्स:भाग 2 या संग्रहात लताने गुलाम हैदर यांच्याविषयी एक आठवण सांगितली होती. 1948 सालातल्या 'मजबूर' 'दिल मेरा तोडा...' या गण्याबाबतचा हा किस्सा आहे. गुलाम हैदर यांनी एके दिवशी लता मंगेशकर यांना फिल्मीस्थान' स्टुडिओ मध्ये बोलावलं. आणि त्यांचा आवाज एका निर्मात्याला ऐकवला. त्या निर्मात्याने नापसंदी दर्शवित सांगितलं. "हा आवाज खूपच बारीक आहे. या आभावाचा निभाव लागणार नाही." गुलाम हैदर यांना हे ऐकून फार वाईट वाटलं. ते लताला म्हणाले,'लता, चल माझ्याबरोबर..' ते गोरेगाव रेल्वे स्थानकावर आले. गाडी यायला अवकाश होता. मास्टरजी आपल्या पत्र्याच्या सिगारेट केसवर बोटांनी ताल धरत म्हणाले,"लता, जरा ही चाल गाऊन दाखव बरं.'
लतांनी गाऊन दाखवले. ते गाणं ऐकून म्हणाले,'हे गाणं तुझ्याच आवाजात रेकॉर्डिंग होईल.' गुलाम हैदरसारखी बडी असामी एका नवीन गायिकेच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करतेय, ही बातमी चित्रपटसृष्टीत पसरली. गाणं गाजलं. नंतर गुलाम हैदर साहेब यांनी त्याच निर्मात्याला सांगितलं,' जिच्या आवाजाला तुम्ही आज नाव ठेवताय ती ही मुलगी उद्या एवढी श्रेष्ठ गायिका होईल की,तिने आपल्या चित्रपटात गाणं म्हणावं यासाठी निर्माते रांगा लावतील.'आणि खरोखर तसेच घडले.पाकिस्तान मधील हैदराबादमध्ये 1908 साली जन्मलेले गुलाम हैदर चित्रपट सृष्टी त येण्यापूर्वी एक दंत वैद्य होते. संगीताच्या प्रेमापोटी हा पेशा सोडून कोलकात्याच्या एका नाटक कंपनीत हार्मोनियम वादक म्हणून दाखल झाले. पुढे लाहोरच्या चित्रपट जगतात नशीब आजमावण्यासाठी गेल्यानंतर 1932 साली 'स्वर्ग की सिढी' चित्रपटाद्वारे त्यांची संगीत कारकीर्द सुरू झाली. पुढल्या पंधरा वर्षात त्यांनी एवढं नाव कमावलं की, संगीतकारांना पाचशे ते हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जायचं,त्या काळात गुलाम हैदर यांच्या मानधनाचा आकडा पंचवीस हजारापर्यंत गेला.
1941 सालच्या 'खजांची' चित्रपटातल्या गाण्यांनी विशेषतः यातल्या 'सावन के नजारे है' या गाण्यानं धुमाकूळ घातला आणि गुलाम हैदर यांचं नाव सर्वतोमुखी झालं. या चित्रपटातील सगळीच्या सगळी नऊ गाणी त्यांनी शमशाद बेगम यांच्या आवाजात गाऊन घेतली होती. 'सावन के नजारे है, आहा आहा!' हे गाणं ट्रेंडसेंटर' ठरलं. त्या काळातल्या बुजूर्गांनी या गाण्यावर काहूर उठवलं होतं. 'खानदान' मधल्या नूरजहाँच्या गाण्यांनी तर गुलाम हैदरची कीर्ती पताका आणखी उंचावली गेली. खरं तर नूरजहाँ हिने पाहिलं गाणं गुलाम हैदर यांच्याकडेच गायलं होतं. 'गुलबकावली' या पंजाबी चित्रपटात. पण तिच्या स्वरांचा परिपूर्ण आविष्कार गुलाम हैदरन घडविला,तो 'खानदान'मध्ये! 'हम आंख मिचोली खेलेंगे..',' मेरे लिए जहान मे...,'या नूरजहाँ च्या गाण्यांनी तिच्या चाहत्यांना वेड लागलं.(पुढे खलनायक झालेला अभिनेता प्राण या चित्रपटात नूरजहाँ चा गायक होता.)नूरजहाँ प्रमाणेच सुरैयाला त्यांनी 'फूल' आणि 'जगबीती' या चित्रपटांमध्ये  सरस गाणी दिली. पण या दोघीही पार्श्वगायन न करता केवळ स्वतः साठीच गात असल्याने त्यांच्या आवाजाचा अधिक वापर करून घेण्याची संधी गुलाम हैदरना  मिळाली नाही. अन्य गायिकांमध्ये त्यांची भिस्त शमशाद बेगम, उमराजिया बेगम (जिच्याशी त्यांनी लग्न केलं) यांच्यावर असायची. तर पुरुष स्वरातील त्या काळात संख्येने कमीच असलेली गाणी त्यांनी खान मस्ताना, जी. एम. दुरांनी आणि पुढे महंमद रफीकडून गाऊन घेतली. 'चल चल रे नौजवान.',' मंजधार,' जमीदार', शमा, कनिज, पुतली हे त्यांचे अन्य चित्रपट.
लता मंगेशकर ही श्रेष्ठ गायिका होईल,असे भाकीत गुलाम हैदरने केले असले तरी प्रत्यक्षात लताला दोनच चित्रपटात गाणी दिली. 1948 सालच्या 'पद्मिनी' साठी 'बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के...' हे एकच गाणं हैदरनी लताला दिलं होतं. या गाण्यावर नूरजहाँ च्या गायकीचा कमालीचा ठसा होता. पण त्याच वर्षी च्या 'मजबूर' मध्ये त्यांनी लताला तब्बल सात गाणी दिली. 'दिल मेरा तोडा' या गाण्याचा उल्लेख तर वर आलेला आहेच. त्याखेरीज लता-मुकेश जोडीचं 'अब डरने की कोई बात नहीं अन्ग्रेजी छोरा चला गया' हे उडत्या चालीच गाणंही त्या काळात गाजलं. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याच वर्षी तयार झालेल्या दिलीपकुमार-कामिनी कौशलच्या 'शहीद'साठी गुलाम हैदर यांनी लता आणि मदन मोहन (संगीतकार) यांच्या आवाजात एक युगुलगीत ध्वनिमुद्रित केलं होतं. पण ना ते चित्रपटात समाविष्ठ केलं गेलं, ना त्याची रेकॉर्ड निघाली. 'गंधार स्वरयात्रा' या विश्वास नेरुरकर संपादित गीत कोशामध्ये 'शहीद' या गाण्याची नोंद आढळते. बाकी 'शाहिद'मधलं 'वतन की राह में वतन के नौ जवानां' हे रफी आणि खान मस्तानाचं गाणं देशभक्तीपर गीतांमधलं आजावरचं सरस गाणं मानलं जातं. या चित्रपटात त्यांनी सुरेंद्र कौर, गीता रॉय, ललिता देऊळकर यांनाही गाणी दिली.
फाळणीनंतर अनेक वादक पाकिस्तानला गेल्यामुळे गुलाम हैदर यांचं स्थान डळमळीत झालं. जवळपास बारा वर्षे त्यांच्याकडं सहाय्य क म्हणून काम केलेल्या जमाल सेन यांनीही 1951 साली 'शोखीयां' द्वारे सपना बन साजन आए' स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. याच अस्थिर अवस्थेत हैदरनी पुन्हा एकदा लाहोरला स्थलांतर केलं.तिथं त्यांनी 1953 मध्ये ' गुलनार' चित्रपटाला संगीत दिलं. पण दुर्दैव हे की,तो चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच त्यांचं निधन झालं.
हिंदी चित्रपटात पंजाबी ढंगाच्या संगीताचा सशक्त प्रवाह आणणारा , लतासारख्या गायिकेतील प्रतिभा ओळखणारा एक द्रष्टा संगीतकार वयाच्या अवघ्या पंचेचाळीस व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. 'मेरे लिए जहान में चैन ना करार है' अशी त्यांच्या चाहत्यांची अवस्था झाली.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...