मयुरी देशमुख मराठी अभिनेत्री. तिने थिएटरपासून सुरुवात केली आणि चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये येऊन स्थिरावली. काहीतरी वेगळं करण्याचा तिने चंगच बांधला होता. मुंबईत जन्मलेल्या मयुरीचे शिक्षण महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झाले. पुन्हा मुंबईत येऊन तिने डेंस्टीस्टचे शिक्षण घेतले. मात्र तिला राहून राहून वाटत होतं की हा आपला प्रांत नव्हे. या क्षेत्रात आपले मन रमणार नाही. शेवटी तिने अभिनयाला आपले करिअर निवडले. अभिनयाचे धडे गिरवता गिरवता ती नाटकात काम करू लागली. यातूनच मग ती पुढे पुढे जात राहिली. ती सध्या आपल्या कामावर खूश आहे. या क्षेत्रात तिला रोज काही ना काही नवं करायला मिळतं आहे.
तिला पूर्वी आई हेमा, वडील प्रभाकर देशमुख आणि आता पती आशुतोष भाकरे यांची उत्तम साथ मिळत आली आहे. लहानपणीच तिने चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. कारण तिला चित्रपट पाहण्याची आवड होती. तिला अनेक भूमिका आकर्षित करत. डेंटिस्टचे शिक्षण घेताना तिला त्यात स्वारस्य वाटत नव्हते. अंतर्मनाचा आवाज काही वेगळंच सांगत होता. मग तिने शिक्षण घेत असतानाच नाटकात काम करायला सुरुवात केली. तिच्या वडिलांनी तिला अभिनयाचे प्रशिक्षण घ्यायला सांगितले आणि तिने मुंबईतल्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
शिक्षण घेत असताना 'डॉ.बाबा आमटे- द रियल हिरो' या चित्रपटाचे दिग्दर्शक ऑडिशनसाठी अकादमीमध्ये आले असता मयुरीला एका पत्रकाराच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. सुरुवातीलाच एक चांगला चित्रपट तिला मिळाला होता. नंतर ती नाटक, टीव्ही मालिका यांमध्ये व्यस्त राहिली. मात्र इथे संघर्ष अटळ आहे, असे तिचे म्हणणे आहे. तिला वेगवेगळ्या भूमिकांचे आव्हान स्वीकारायला आवडते.
No comments:
Post a Comment