Saturday, June 13, 2020

वेगळं करण्यासाठी धडपडणारी विद्या बालन

1995 मध्ये झी वाहिनीवरून 'हम पांच' नावाची एक विनोदी मालिका प्रसारित होत होती. यात बहिऱ्या आणि जाड भिंगाचा चष्मा आणि ढगळ कपडे घालणाऱ्या तिसऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालनने केली होती. पाचजणींमध्ये यथातथाच दिसणारी, अजिबात ग्लॅमरस नसणारी व्यक्तिरेखा तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली. यातल्या सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, व्यक्तिरेखा कुठलीही असली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात ती व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आहे, असा विश्वास विद्याच्या ठायी होता,हे महत्त्वाचे. त्यामुळेच ती विविध छटेच्या भूमिका करूनही ती प्रत्येक वेळी नव्या रुपात चाहत्यांसमोर येते. वेगळ्या रुपात आधीच्या भूमिकेची छाप तिच्यावर नसते.
म्हणूनच उत्तम अभिनेत्री म्हणून विद्याने आज हिंदी चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची ठाशीव मोहोर उमटवली आहे.
'हम पांच' नंतर विद्याने अभिनय हेच करिअर म्हणून निवडले. वडिलांच्या सांगण्यानुसार तिने पहिल्यांदा सेंट झेवीयर्स महाविद्यालयातून बी.ए. व मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणि या काळात ती अभिनय क्षेत्रातही धडपडत होती. या काळात तिनं गौतम गलदर दिग्दर्शित 'भालो' (2003) या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.अभिनयासाठी विद्याला 'आनंदलोक' पुरस्काराने गौरविण्यात आले. काही जाहिरात केल्या.  त्याकाळात विद्याची एक स्कुटर ची जाहिरात गाजत होती. याचदरम्यान विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरदार 'परिणिता' (2005) साठी मुख्य नायिकेच्या शोधात होते. त्यांनी हा चेहरा हेरला. 'परिणिता' प्रचंड गाजला. नंतर तिने राजकुमार हिरानी यांचा 'लगे रहो मुन्नाभाई ' (2006) केला. पहिल्या चित्रपटापेक्षा विषय वेगळा, भूमिका वेगळी. 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणणारी आरजे सगळ्यांना भावली. या चित्रपटाचे दोन्ही भाग गाजले.
'बेबी', 'किस्मत कनेक्शन', 'हल्लाबोल' चित्रपट चालले नाहीत. बालकी दिग्दर्शित 'पा' (2009) चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणारी ही आजच्या जमान्यातील पहिली अभिनेत्री. त्यातली तिची सहजता वाखाणण्यासारखी होती. तिने 'इष्कीया'(2010) मध्ये जी अदाकारी साकारली ते पाहताना प्रेक्षक अक्षरशः खल्लास झाले. नंतर तिने यु टर्न घेत 'नो वन किल्ड जेसीका'(2011) सारखा वेगळा चित्रपट केला. या सोज्वळ, देखण्या,ग्लॅमरची नवी बाजू दाखवणाऱ्या अभिनेत्रीला आपण हिरोईन आहोत, त्यामुळे पडदयावर परफेक्टच दिसलं पाहिजे, या गोष्टीची कधीच फिकीर नव्हती. तिचा एखादा चित्रपट प्रचंड ग्लॅमरस तर दुसऱ्या त त्याचा लवलेशही नाही. कधी तिचा वावर स्वप्नवत वाटतो तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या चित्रपटात ती आपल्याच घरातील वाटते. आणि हे सगळे शक्य झालं ते तिच्या ठायी असणाऱ्या अभिनय क्षमतेमुळेच! नंतर तिने सिल्क स्मिता या बोल्ड अभिनेत्रींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'डर्टी पिक्चर्स' (2011) केला. तिच्या बोल्ड रूपाने सगळेच अचंबित झाले. त्यावर्षी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला. यापूर्वी तिला 'परिणिता' साठी पदार्पणाचा, 'पा'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाच होता. नंतर ही तिला 'कहानी'(2012), 'तुम्हारा सुलू'(2017) या चित्रपटांसाठीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्काराने तिच्या अभिनयाचे मोजमाप करणे चुकीचे आहे. पण तिचा स्वतःच्या अभिनय क्षमतेवर असलेला विश्वास आणि वेगळं काही तरी करण्याची धडपड यामुळे तिच्या अभिनयाचा साक्षात्कार पाहायला मिळाला.'कहानी'  (2012) या सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात तर तिने अख्खा चित्रपट आपण सहज पेलू शकतो, हे दाखवून दिले. एका अभिनेत्रींच्या बळावर चित्रपट चालू शकतो, 'कहानी' पाहताना पटतं. आता ती सिद्धार्थ रॉय यांच्याशी लग्न करून संसारात रममाण झाली आहे. अर्थात तिचे अजून चित्रपट येणार आहेत.
'अपयश हा यशाकडे जाण्याचा मार्ग असतो.', हा तिचा आपल्यासाठी संदेश आहे.

2 comments:

  1. विद्या बालन जन्मदिवस 1 जानेवारी1979

    ReplyDelete
  2. यश तर मिळालं मात्र समाधान मिळाले नाही

    बॉलिवूडमध्ये अतिशय प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळख असलेली विद्या बालन चार वर्षांनंतर सिनेमात पुनरागमन करत आहे. “नीयत' सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही एक मर्डर मिस्ट्री असून विद्या बालन डिटेक्टिव्ह असणार आहे. विद्याने "कहानी", “इश्किया” सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विद्या बालन इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून आहे आणि मोजक्याच पण अप्रतिम भूमिका करत आहे. एका कार्यक्रमात ती आपल्या करिअरविषयी बोलली. विद्याने करिअरच्या सुरुवातीला ज्या भूमिका केल्या त्यातून तिला यश तर मिळालं मात्र समाधान मिळाले नाही. ती सांगते,'मी सुरुवातीला अनेक रोमॅंटिक भूमिका केल्या. पण मला त्यातून समाधान मिळाले नाही. मला आणखी चांगलं काम करायचे होते. मला असं वाटायचं की माझे काही योगदानच नाहीए.'
    २०१० साली आलेल्या “इश्किया' सिनेमामुळे तिला समाधान मिळाले. या सिनेमामुळे तिला जाणवले की, अभिनेत्री म्हणून तिचा पुनर्जन्म झाला आहे. बऱ्याच दिवसांपासूनची तिची प्रतीक्षा संपली. यानंतर विद्याने मागे वळून बघितलं नाही. विद्याने इंडस्ट्रीतील भेदभावाविषयीही बातचीत केली. जर एखादी महिला दिग्दर्शिका महिलांना क्रूमध्ये काम देते तर मला नाही वाटत त्यात काहीच गैर आहे. मी मिशन मंगलसारख्या सिनेमांमधून बदल बघितला आहे. आपण कोणालाही व्यक्तीच्या रुपात बघितलं पाहिजे ना की हे. त्यांच्या लिंगावरुन ओळख ठरवली पाहिजे. २०१७ मध्ये 'तुम्हारी सुलू' सिनेमावेळी तिला वजनवाढीचा सामना करावा लागला. पण ट्रोलिंगला न जुमानता तिने सर्वांना सडेतोड उत्तरं दिली. विद्या आता “नीयत” द्वारा पुन्हा आपल्या अभिनयाची छाप पाडायला तयार आहे. यामध्ये राम कपूर, राहुल बोस यांच्या भूमिका आहेत.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...