Friday, November 6, 2020

चित्रपट निर्मात्यांना आता 2021 ची प्रतीक्षा


महाराष्ट्र सरकारने 6 नोव्हेंबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लगेच प्रेक्षक सिनेमागृहांकडे फिरकणे शक्य नाही. साहजिकच दिवाळीनंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती आणि काही राज्यांनी सुरूही केली, पण नवीन चित्रपट नसल्याने त्याला मरगळ आली आहे.  महाराष्ट्रात बॉलीवूड चित्रपटांना अधिक पसंदी दिली जाते,परंतु राज्य सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. सिनेमागृहे लवकर सुरु करण्यास परवानगी दिली असती तर दिवाळीत तरी चित्रपट प्रदर्शित झाले असते आणि इंडस्ट्रीला दिवाळी उत्सवाचा फायदा झाला असता, पण आता त्यामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले, असे बोलले जात आहे. शेवटी कोरोनाचा संसर्गाचा प्रसार वाढू नये, यासाठी राज्य सरकारची भूमीकादेखील महत्त्वाचीच आहे. कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात 50 टक्के आणि अन्य राज्ये मिळून 50 टक्के, असे भयानक चित्र असताना महाराष्ट्र सरकारला काळजी घेणं भाग होतं. महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी नाही, तिथे सिनेमागृहांचे काय! पण आता मंदिरेदेखील उघडली जातील, अशी चिन्हे आहेत. सगळे काही व्यवस्थित चालले तर लवकरच  मंदिरे उघडली जातील. त्याची नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

गेल्या सात-आठ महिन्यापासून राज्यात सिनेमागृहे आणि नाटक- थिएटर बंद होते. या कालावधीत नाटकांचे आर्थिक कंबरडे  मोडले. पण सांगतो कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला. या कालावधीत ओटीटी माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. पण ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय नाही, हे मात्र पुढे आले.

कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून बिग बजेट चित्रपट ओटीटी(ओवर द टॉप) प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा जवळपास सगळ्याच नामवंत कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला नकार दिला होता. यात ईदला प्रदर्शित होणारा सलमान खानचा 'राधे',अजय देवगणचा 'मैदान' आणि अमीर खानचा 'लालसिंह चड्डा' , विकी कौशलचा 'सरदार उधमसिंह', अक्षय कुमारचा 'बेलबॉटम', रणवीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र',रणवीर सिंहचा '83' आदी चित्रपटांचे निर्माते  गोंधळात होते. ही सगळी निर्माता मंडळी प्रतीक्षा करायला तयार होते. या निर्मात्यांना वाटत होते की, ओटीटी प्लेटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे घाटयाचा सौदा आहे.

ओटीटी प्लेटफॉर्म हा नवीन पर्याय असला तरी तो सिनेमागृहांची बरोबरी कदापि करू शकत नाही. या प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांना घरातून बसून नवीन चित्रपट पाहायला मिळत असला तरी निर्मात्यांना या माध्यमातून व्यवसाय करायला अधिक फायदा दिसत नव्हता. जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' असेल किंवा विद्या बालनचा 'शकुंतला देवी' असेल अथवा अमिताभ बच्चन चा 'गुलाबो सीताबो', या चित्रपट निर्मात्यांना ओटीटी प्लेटफॉर्ममधून कसलाच मोठा फायदा नाही  झाला. त्यामुळे अन्य बाकी निर्माता आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला पुढे आले नाहीत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे चित्रपट निर्माते मंडळींचे 2020 मध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माता आता 2021 मध्येच आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

2020 मध्ये काही चित्रपट प्रदर्शित होणार होते,परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सिनेमागृहे बंद राहिली, साहजिकच या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. आता हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होतील. शिवाय 2021 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपटदेखील याच वर्षात प्रेक्षकांपुढे येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. 2021 साल चित्रपटसृष्टीसाठी फारच महत्त्वाचे असणार आहे. 2021 मध्ये अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी', 'रक्षाबंधन', आणि 'बेलबॉटम', अजय देवगणचा 'मैदान', 'कभी ईद कभी दिवाली', सलमान खानचा 'राधे', अमीर खानचा 'लालसिंह चड्डा', जान्हवी कपूरचा 'तख्त', 'आदित्य राय कपूरचा 'एक विलेन2', वरुण धवनचा 'मिस्टर लेले' असे काही महत्त्वाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

असं मानलं जातं आहे की, 2021 साल चित्रपटसृष्टीला मालामाल करून सोडेल. कारण या खजान्यात काही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. सिनेमागृहांचे मालकदेखील मोठ्या चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. कारण त्यांनी 2020 मध्ये मोठं नुकसान झेललं आहे. आता परीक्षा सिनेमागृहांची आहे. त्यांना सरकारने जाहीर केलेल्या नियम-कायद्याच्या चौकटीत चित्रपट प्रदर्शित करावयाचे आहेत. प्रत्येक शोनंतर सिनेमागृहांना जंतू मुक्त करावयाचं आहे. प्रेक्षकांना मास्क लावल्याशिवाय चित्रपट गृहांमध्ये प्रवेश मिळणार नाही.सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांचे नियम इत्यादी पाळावे लागणार आहेत.

2020 मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वच लोकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आशा आहे की, 2021 साल चित्रपट आणि त्यांच्या निर्मात्यांना मालामाल करून सोडेल. चित्रपट कर्त्यांना तर आता आशेची किरणे 2021 मध्येच दिसून येत आहेत. पूर्ण वर्षभर प्रतिबंध घालण्यात आल्याने सिनेमागृहांची रयाच गेली होती. भारतात सिनेमा आणि क्रिकेट यांचं वेड असणाऱ्या लोकांची संख्या भरमसाठ आहे. 2020 मध्ये जवळपास वर्षभर चित्रपट प्रेमी सिनेमागृहांपासून दूर राहिले आहेत. आता सिनेमागृहे नियम-अटींसह सुरू होत आहेत. हळूहळू नियम-अटी शिथिल होतील आणि प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील, परंतु यासाठी 2021 सालाची वाट पाहावी लागणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


1 comment:

  1. खूपच अभ्यासू माहिती सर

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...