2020 चा फिल्म इंडस्ट्रीवर खूप मोठा वाईट परिणाम झाला आहे. 2019 मध्ये बक्कळ पैसा कमावणारा फिल्म उद्योग यंदा टाळेबंदीमुळे पूर्ण कोसळला आहे. 2019 मध्ये सुमारे 17 चित्रपट '100 कोटी क्लब'मध्ये सामील झाले होते, तर 2020 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत 40 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातला फक्त अजय देवगनच्या 'तानाजी' चित्रपटाने तेवढा चांगला व्यवसाय केला. मार्च 2020 मध्ये 'अन्ग्रेजी मिडीयम' च्या प्रदर्शनानंतर कोरोना टाळेबंदी दीर्घ काळ सुरू राहिली. हिंदी चित्रपट ज्या देशांमध्ये प्रदर्शित व्हायचे, त्या जगभरातील बर्याच देशांमध्ये, कोरोना आटोक्यात आल्याने दिलासा मिळाल्यामुळे सामान्य जीवन खूप अगोदर सुरळीत सुरु झाले होते. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि देशात सात महिन्यांची टाळेबंदी मागे घेतल्याने चांगले दिवस येतील असेही संकेत दिसत होते, पण आता वाढत्या थंडीमुळे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी लादण्यात आली आहे,त्यामुळे पुन्हा हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या पदरी निराशा आली आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर चित्रपटाची निर्मितीही सुरू झाली आहे. महाराष्ट्र हा हिंदी चित्रपटसृष्टीचा कणा आहे. म्हणून निर्मात्यांनी विस्तृत योजना बनवण्यास सुरुवात केली होती आणि परदेशातील मुक्त बाजारपेठाही त्यांना आकर्षित करत होती, परंतु ब्रिटन, अमेरिका, मलेशिया आणि इतर देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट आल्याने सगळा गडबडघोटाळा झाला आहे. ब्रिटनमध्ये पूर्ण एक महिन्यासाठी पूर्णवेळ टाळेबंदी लागू केली गेली आहे आणि त्याचबरोबर आणखी काही युरोपियन देशांमध्ये अशाच प्रकारची टाळेबंदी करण्यात आली आहे. विदेशांमध्ये हिंदी चित्रपटांची चांगली कमाई होत असते . त्यामुळे निर्माते आपल्या देशाबरोबरच विदेशातही एकाच वेळी चित्रपट रिलीज करत असतात. आता परदेशात संधी नाही,त्यामुळे फक्त भारतात चित्रपट प्रदर्शित करून नुकसानच पदरी पडणार आहे. शिवाय देशात आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत आहे, अशा परिस्थितीत लगेच चित्रपटगृहांना गर्दी होणार नाही. साहजिकच देश-परदेशात कमाईवर पाणी सोडावे लागणार असल्याने अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. सर्रास मोठे निर्माते दिवाळी आणि नाताळ यांसारख्या सण-उत्सव काळात आपले चित्रपट प्रदर्शित करत असतात. पण यावर्षी हा मुहूर्त सगळ्यांनी टाळला आहे. बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटाचीही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशाच प्रकारे रणवीर सिंह अभिनित क्रिकेटवर आधारित असलेल्या '83' या चित्रपटाचे प्रमोशन एमएमआर डी ग्राउंडमध्ये रियल क्रिकेटर्स आणि रील क्रिकेटर्स यांच्या उपस्थित होणार होते, परंतु इंग्लंड आणि मलेशियासह आणखी काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टाळेबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन रद्द करण्यात आले आहे.
फिक्कीच्या एका अहवालानुसार 2019 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला 191 अब्ज रुपयांची कमाई झाली होती, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारातून 21 अब्ज रुपये मिळाले होते. मलेशिया, चीन, ब्रिटन आणि यूएसएमध्ये हिंदी चित्रपट बर्यापैकी लोकप्रिय आहेत आणि येथे चित्रपट रिलीज केल्याने चित्रपट निर्मात्यांची मोठी कमाईदेखील होते. मलेशिया तर हिंदी आणि तमिळ चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठच आहे. सध्या तेथे सर्व थिएटर बंद आहेत, त्यामुळे चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
चीन गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडसह भारतीय चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट 70 देशांमधील 1300 थिएटरांमध्ये रिलीज झाला होता. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने देशात 387 कोटींचा व्यवसाय केला होता, तर केवळ चीनमध्ये याच चित्रपटाने तब्बल 1200 कोटींची कमाई केली होती. त्यामुळेच 2021 च्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत कोणताही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. एका चित्रपट व्यवसाय अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार परदेशी बाजाराशिवाय बडे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट रिलीज करण्याचा धोका पत्करणार नाहीत. साहजिकच ते योग्य वेळेची वाट पाहणे पसंद करतील. असो, कोरोनामुळे या उद्योगाला आतापर्यंत 1500 ते 2000 कोटींचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना आपले चित्रपट यूके, अमेरिका आणि मलेशियामध्ये घाईगडबडीत प्रदर्शित करणं आणखी आर्थिक नुकसानीचं ठरणार आहे. त्यातच हॉलिवूड चित्रपट देखील रिलीज होणार नाहीत. हॉलीवूड आणि भारतीय चित्रपट यांच्याबाबतची परिस्थिती वेगवेगळी आहे. हॉलीवूड निर्माते वेळ आणि पैशांचे गणित लावले तर त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन वर्षभरदेखील पुढे ढकलू शकतात. पण भारतीय चित्रपटांचे तसे नाही. भारतीय निर्माते पैसे जास्त काळ गुंतवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे विदेश बाजार खुला होण्याची वाट पाहण्याबरोबरच देशांतर्गत व्यवहारांवर सुरळीत होण्याची वाट पाहताना त्यांना आणखी चार महिने तरी आपले चित्रपट दडपून ठेवावे लागणार आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment