चित्रपटसृष्टी हे एक ग्लॅमरचं जग आहे, ज्यामध्ये सौंदर्याला स्वतःचं एक महत्त्व आहे. चित्रपटसृष्टी अजूनही मधुबालाची आठवण काढते, कारण ती चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जात होती. मुंबई चित्रपट जगतात अनेक सौंदर्यवती अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्यावर अनेक चित्रपट निर्माते अक्षरशः लट्टू झाले. अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती वीणा. म्हणजेच ताजौर सुलताना, जिने शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची 14 नोव्हेंबर रोजी 16 वी पुण्यतिथी आहे.
विणा ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वीणा म्हणजेच तजौर सुल्ताना. ही घटना 1941 ची आहे. लाहोरमधील एका फिल्म कंपनीची जाहिरात वाचल्यानंतर अमृतसरमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीने म्हणजेच ताजौर सुलतानाने होऊ घातलेल्या 'गवंडी' नावाच्या पंजाबी चित्रपट निर्मात्याकडे आपले फोटो गुपचूपपणे पाठवून दिले. तिला तिच्या निवडीची खात्री होती, कारण तिला वाटत होते की तिच्यासारखी सुंदर दुसरी मुलगी अगदी दूर दूरपर्यंत नाही. तिचे पालक चित्रपटाविरोधात होते. असे असले तरी, सुलतानाचा भाऊ शहजादा इफ्तिखारदेखील 'गवंडी' ची जाहिरात देणाऱ्या फिल्म कंपनीत कॅमेरामॅनचा सहाय्यक होता.
या चित्रपटासाठी सुलतानाची निवड झाली. 'गवंडी'चे निर्माते सेठ किशोरी लाल यांनी सुलतानाचे नाव वीणा ठेवले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा घरात मोठा आगडोंब उसळला. ही गोष्ट महाविद्यालयात कळल्यावर तर महाविद्यालयाने सुलतानाचे नाव काढून टाकले. इकडे सुलतानाच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली. चित्रपट निर्माते प्रस्ताव घेऊन घरी येऊ लागले तेव्हा घरातले लोक गडबडून गेले. त्यांनी सुलतानाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं, तेव्हा शहजादा आपल्या बहिणीला घेऊन मुंबईला आला.
सुलताना म्हणजेच वीणा अप्रतिम सुंदर होती, जो कोणी तिला पाही, तो वेडा होऊन जाई. वीणा मुंबईला आली तेव्हा इथले प्रसिद्ध निर्माते तिच्यावर फिदाच झाले. मजहर खान या मोठ्या निर्मात्याने तिला 'याद' या आपल्या नव्या चित्रपटात घेतले. मेहबूब खान तर वीणाच्या सौंदर्याने इतका मोहित झाला की त्याने वीणाबरोबर दहा वर्षांचा करारच करून टाकला. तिला दरमहा दोन हजार रुपये वेतन निश्चित झाले, शिवाय अशोक कुमार 'नजमा' (1943) आणि 'हुमायून' (1945) मध्ये वीणाची वर्णी लावण्यात आली आणि नंतर 'मदर इंडिया'साठीही साइन करण्यात आले. मात्र नंतर ही भूमिका नरगिसने साकारली.
यानंतर, वीणा शीर्ष अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली. 'मुगल-ए-आजम' बनवणाऱ्या आसिफने तिला 'फूल' मध्ये संधी दिली. अशोक कुमार हेही तिच्यावर प्रभावित झाले होते, त्यांनी तिला आपल्या 'चलती का नाम गाडी' चित्रपटात घेतले. गुरुदत्त यांनी तिला'कागज के फूल' मध्ये संधी दिली. नाडियादवाला यांनी तिला 'ताजमहाल'मध्ये नूरजहां बनवले, तर शेख मुख्तार यांनी' नूरजहां 'हा चित्रपट बनवून वीणाला प्रमुख भूमिकेत घेतले. वय वाढत गेलं तसं वीणाने चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. 'दो रास्ता', 'पाकीजा' ते 'रझिया सुलतान' पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.
अख्खी मुंबई फिल्मीदुनिया वीणावर भाळली होती, पण वीणा मात्र अल नासिरला हृदय देऊन बसली होती. अगोदरच तीन लग्ने केलेला नासिर भोपाळच्या राजघराण्यातील होता. सुरैया हॉलिवूड स्टार ग्रेगरी पॅकची फॅन होती. जेव्हा ग्रेगरी मुंबईला आला, तेव्हा त्याला मध्यरात्रीत सुरैयाच्या घरी नेऊन तिची भेट घालून देण्याचं काम अल नसीरने केले. त्याकाळी सुरैयाची एक झलक पहाण्यासाठी सकाळपासूनच तिचे चाहते तिच्या घरासमोर गर्दी करायचे. त्यांच्यात एक तिचा प्रियकरही होता जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या घरासमोर उभे राहून सुरैयाची 'झलक' पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्याला बाजूला करण्यासाठी फिल्मी जगतातील नामांकित लोकांना खूप प्रयत्न करावे लागले होते. सुरैयाचा तो प्रेमी दुसरा-तिसरा कोणी नाही तर वीणाचा भाऊ शहजादा इफ्तिखार होता.
No comments:
Post a Comment