लहान बाळ पहिल्यांदा बोलू लागते तेव्हा घरातल्या सर्वांनाच त्याचे कौतुक वाटते. ‘आलम आरा’ या चित्रपटासोबतही असेच काहीसे घडले. १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय संगीतप्रधान बोलपट आहे. बोलणारा सिनेमा पाहण्यासाठी त्यावेळी सिनेमागृहाबाहेर रसिकांची इतकी गर्दी जमली होती की, तिला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आज या बोलपटाने नव्वदीत पदार्पण केले आहे. मुंबईतल्या मॅजेस्टिक थिएटरमध्ये ‘आलम आरा’ प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने त्याकाळी लोकप्रियतेचे शिखर गाठले. सलग चार आठवडे सिनेमागृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी होती. तिकिटांच्या काळ्याबाजाराची सुरुवातही याच चित्रपटापासून झाली. चार आण्याचे तिकीट त्याकाळी ब्लॅकमध्ये तब्बल पाच रुपयांना विकले गेले. त्यामुळे थिएटरच्या बाहेरून तिकीट घेऊन येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी सूचना चित्रपटाच्या फलकावर लिहावी लागल्याचे सिनेअभ्यासक सांगतात.
इम्पिरीअल मुव्हीटोन (मुंबई) यांनी या १२४ मिनिटांच्या बोलपटाची निर्मिती केली होती. मास्टर विठ्ठल, जुबेदा, पृथ्वीराज कपूर, सुशीला, जिल्लो एलिझर, जगदीश अशा त्याकाळी नावाजलेल्या सिनेकलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. जोसेफ डेविड पेणकर यांनी लेखन केले होते. एका राजकुमाराचे आदिवासी युवतीवर जडलेले प्रेम हा कथेचा विषय होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आर्देशीर इराणी यांनी केले होते.
भारतीय चित्रपटसृष्टीतले पहिले गाणे
‘आलम आरा’ चित्रपटात ‘दे दे खुदा के नाम पर...’, ‘बदला दिलवाएगा...’, ‘रूठा है आसमान...’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा...’, ‘दे दिल को आराम...’, ‘भर भर के जाम पिला जा...’ आणि ‘दरस बिना मारे है...’ अशी सात गाणी आहेत. फिरोजशाह मिस्त्री यांनी ती संगीतबद्ध केली होती. त्यातील ‘दे दे खुदा के नाम पर...’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते. वजीर मोहम्मद खान यांनी ते गायले होते. हार्मेनियम, तबला आणि व्हायोलिन या वाद्यांसह हे गाणे लाइव्ह रेकॉर्ड करण्यात आले.
चित्रपटसृष्टीत घडवली क्रांती
त्याकाळी पुनर्मुद्रणाची (डबिंग) सुविधा नव्हती. संवाद आणि गाणी एकाच फितीमध्ये संग्रहित होत. त्यामुळे संपादनात बऱ्याच अडचणी येत असल्याने आजूबाजूला कोणताही आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे. ‘आलम आरा’चे चित्रीकरण ग्रॅण्ट रोड स्थानकालगतच्या ज्योती स्टुडिओमध्ये झाले. रेल्वे गाड्यांचे आवाज पूर्णतः थांबल्यानंतर रात्री १ ते सकाळी ४ यादरम्यान चित्रीकरण करण्यात येत असे. तोकड्या तंत्रज्ञानापुढे शरणागती न पत्करता दिग्दर्शक आर्देशीर इराणी यांनी आपले ध्येय पूर्ण करून भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली.
No comments:
Post a Comment