Saturday, March 20, 2021

दक्षिण चित्रपट बॉलिवूडला भारी


वीसपेक्षा अधिक भाषा आणि बोलींमध्ये चित्रपट बनवणाऱ्या भारतात बॉलिवूडला एक वेगळं स्थान आहे. प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या बजेटचे भव्य चित्रपट, अखिल भारतीय स्तरावरचे लोकप्रिय कलाकार , सर्वाधिक सिनेमागृहांमध्ये रिलीज होणारे चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवर वाढत चाललेला गल्ला यामुळे भारतीय चित्रपटांचा व्यापार अलीकडच्या काळात तेजीत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनने जसा सर्वच गोष्टींना फटका बसला तसा चित्रपटसृष्टीलाही बसला,पण अलीकडच्या काळात भारतीय सिनेमा उद्योगाची भरभराट चालू आहे.तसे आर्थिक गणितही बदलत चालले आहे. मात्र यात एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रादेशिक भाषांमधील चित्रपट बॉलिवूडला भव्यता, आधुनिक तंत्रज्ञान, मारधाड आणि वेगाच्या  बाबतीत मागे टाकले आहेच, पण बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन यातही दक्षिण भारतीय चित्रपट बॉलिवूडला ' दे धक्का' देताना दिसत आहे.

बॉलिवूडला सध्या दोन गोष्टींची नितांत गरज आहे, कारण प्रादेशिक चित्रपट त्याच्या बरोबरीला येऊन ठेपला आहे. सध्याच्या परिस्थितीत तर बॉलिवूडला एका तरी हिट चित्रपटाची आवश्यकता आहे आणि तोही आठवड्याभरात 100 - 200 कोटींचा गल्ला करणारा असावा. चित्रपटगृहांमध्ये ऑक्टोबरपासून जो अंध:कार पसरला आहे, तो नाहीसा व्हायला हवा आहे. सध्या सगळ्यांच्या नजरा 'ईद'ला रिलीज होणाऱ्या सलमान भाईच्या 'राधे' चित्रपटाकडे लागले आहे. एक असं स्वप्न रंगवायला हरकत नाही- चित्रपट मालकांनी याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी मिठाईवाल्यांकडे लाडवांची ऑर्डर देऊन टाकली आहे. दोन-चार दिवसांत 'राधे'ने शंभर कोटींचा पल्ला गाठला आहे.झेंडावाच्या फुलांनी सजवलेल्या चित्रपटगृहांमध्ये हर्ष-उत्साहाने लाडू वाटले जात आहेत. आणि याच आनंदात घोषणा दिल्या जात आहेत-'चला, बॉलिवूडला चांगले दिवस आले.'
बॉलिवूडला दुसरी महत्त्वाची गरज आहे ती गडगंज संपत्ती असलेल्या उद्योजकाची! जो सिनेमा निर्मितीवर मुक्तहस्ते पैसे उधळायला तयार आहे. म्हणजे जो सहजपणे कुठल्याही एका चित्रपटावर 500-1000 कोटी रुपये लावू शकेल. पण त्याला 'हार्ट अटॅक' आला नाही पाहिजे. बॉलिवूडला आता अशा तगड्या निर्मात्याची गरज आहे. कारण दक्षिण चित्रपट निर्माते 500-500 कोटी रुपये चित्रपटासाठी लावत आहेत.
इकडे बॉलिवूडचे निर्माते 200-300 कोटींपेक्षा पुढे जायला तयार नाहीत. अखिल भारतीय फिल्म विश्वात बॉलिवूड'फ्लॉगशिप इंडस्ट्री' आहे. बॉलिवूड म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे नाक आहे. सध्या सर्दीमुळे चोंदले आहे. हे नाक आतापर्यंत तरी आमिरखानने सांभाळले आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक कमाई करणारा 'दंगल' (2016) हा चित्रपट ओळखला जातो.त्याने 2000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे, पण 1800 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा 'बाहुबली' हा चित्रपट ' दंगल' पेक्षा फक्त 'बोटभर' मागे आहे. अशा कठीण परिस्थितीत बॉलिवूडला फक्त आमिर खानवर विसंबून चालत नाही.
दक्षिणेतील प्रादेशिक चित्रपटांसाठी कॉरपोरेट कंपन्यांनी आपल्या थैल्या अक्षरशः उघड्या ठेवल्या आहेत. लोकप्रिय कलाकारांना घेऊन  चित्रपट बनवणाऱ्या दक्षिण भारतीय चित्रपटाने आपले बजेट 500 कोटींच्या वर नेऊन ठेवले आहे. अजूनपर्यंत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 500 कोटींचा एकही चित्रपट तयार झाला नाही. तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2018 साली रजनीकांत यांचा 570 कोटी बजेटचा '2.0' चित्रपट रिलीज झाला होता. ब्रिटिश-श्रीलंकाई वंशाचे उद्योजक  सुबाकरन यांच्या लायका प्रॉडक्शन कंपनीने यासाठी पैसा लावला होता. हीच लायका कंपनी  आता मानिरत्नमद्वाराचा 400-500 कोटी बजेटचा 'पोन्नीइन सेल्वम' बनवत आहे. 'बाहुबली' चे तेलगू चित्रपट दिग्दर्शक एसएस राजमौली सध्या  400 कोटी बजेटचा 'आरआरआर' नावाचा चित्रपट साकारत आहेत. दुसरीकडे अजूनही बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे बजेट 200-300 कोटींच्या आसपास घुटमळत आहे. दक्षिण चित्रपटांनी बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर आव्हान दिले आहे. 13 जानेवारीला रिलीज झालेल्या 'मास्टर' तामिळ या चित्रपटाने आतापर्यंत 260 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर इकडे बॉलिवूडमध्ये ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकाही चित्रपटाने 'शंभर क्लब' मध्ये प्रवेश केला नाही. हे बॉलिवूडसाठी चांगले संकेत नाहीत,एवढेच म्हणावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली  9423368970

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...