दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि राष्ट्रीय तसेच अनेक दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार पटकवणारी प्रख्यात अभिनेत्री रेवती महेश भट्ट दिग्दर्शित' अर्थ ' चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन करणार असल्याची बातमी आली आहे. कुलभूषण खरबंदा स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांची भूमिका असलेल्या 'अर्थ' या सिनेमाकडे एक उत्तम कलाकृती म्हणून पाहिलं जातं. आता या चित्रपटाचा रिमेक निर्माता शरतचंद्र करणार आहेत. रेवतीने 'लव्ह' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिचा नायक सलमान खान होता. यातील गाणी सुपरहिट झाली होती आणि तिच्या अभिनयाचे कौतुक केले गेले होते. त्यानंतर तिने जय मेहातासोबत'मुस्कुराहट' चित्रपट केला होता. याशिवाय 'रात', 'और एक प्रेम कहानी', आणि ' असे काही निवडक 'तर्पण' असे निवडक हिंदी सिनेमे केले होते.मात्र तिने दक्षिण चित्रपटांकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. साधारण तीस वर्षांपूर्वी भारतीराजाच्या 'मन वासनाई" (1983) या तामिळ चित्रपटाद्वारे रेवतीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज अखेर तिने तामिळ, मल्याळम, तेलगु, कन्नड आणि हिंदीमध्ये जवळपास सव्वाशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'कत्ताथे किलीकोडू' या तिच्या दुसऱ्याच मल्याळम चित्रपटाद्वारे तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर आणि रसिकांच्या मनावर आपली छाप उमटवली. 'काक्कोथिकाविले अप्पूपन थाडीकल' या चित्रपटातील अभिनयाने समीक्षकांनीही कौतुक केले. किलूक्कम'मधील तिच्या विनोदी भूमिकेने दर्शकांना सुखद धक्का दिला. 'देवासुरम' मध्येही तिने उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन घडवले. तिने वयानुरूप शोभतील अशा भूमिकाही स्वीकारण्याचे धाडस दाखवले आहे. वय वाढत चालले असल्याचे लक्षात घेऊन तिने 'रेवणप्रभू' मध्ये मोहनलालच्या आईची भूमिका केली. दर्शकांबरोबरच शासकीय पातळीवरही तिच्या अभिनयाची दखल घेण्यात आली. 'थेवर मगन' या तामिळ चित्रपटासाठी तिला 1992 मध्ये उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तिला 'मनवासनाई' (तामिळ), थेवर मगन' (तामिळ), 'अंजली' (तामिळ), 'अंकुरम' (तेलगू) आणि 'काक्कोथिकाविले अप्पूपन थाडीकल' (मल्याळम) या चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्याखेरीज फिल्म फॅन असोशियनचे आठ पुरस्कार, सिनेमा एक्सप्रेसचे चार आणि तामिळनाडू राज्य शासनाचा एक पुरस्कार मिळाला आहे. 'मित्र-माय फ्रेंड' च्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'फिर मिलेंगे' हा शिल्पा शेट्टी आणि सलमान खान स्टारर एड्स रोगावर भाष्य करणारा हा चित्रपट रेवतीने खूपच सुंदररित्या प्रेक्षकांसमोर मांडला होता. तसंच तिने मुंबई कटींग आणि केरला कॅफे यासारखेही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
सध्या ती दिग्दर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी बजावत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपली कारकीर्द घडवली असली तरी इतर नायिकांमप्रमाणे भडकपणा असणाऱ्या आणि सौंदर्याच्या नावाखाली अश्लीलतेच्या मार्गाने जाणाऱ्या भूमिका तिने कधीही स्वीकारल्या नाहीत. याबाबतीत तिचे दाक्षिणात्य नायिकांतील वेगळेपण निश्चित वेगळे आहे. यामुळेच तिचे आदराने घेतले जाते. हिंदी चित्रपटांच्या निर्माता-दिग्दर्शकांनी या अभिनेत्रीला गांभियाने घेतले नाही, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. रोमॅंटिक भूमिका तिने केल्या नाहीत असे नाही पण वास्तवतेच्या जवळ जाणाऱ्या भूमिकांनाच तिने प्राधान्य दिले. -मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment