Tuesday, March 9, 2021

लखलख चंदेरी तेजाची, न्यारी दुनिया...


दिवाळीच्या रात्री लखलख जातात. पण याच रात्री किंवा  अन्य वर्षभर या न त्या कार्यक्रमात एक गाणं लखलखत असतं. ते म्हणजे 'लखलख चंदेरी तेजाची, न्यारी दुनिया...'! संगीत कलानिधी मा. कृष्णराव यांची ही काळाच्या पुढे जाऊन केलेली अद्वितीय अनन्य स्वरचना. आज सुमारे 80 वर्षानंतरही हे गाणं लखलखत आहे. मा. कृष्णराव पुढील काळात येणारे संगीत आधीच पाहत असत. ते द्रष्टेपण त्यांच्यात होते. हे गीत, चित्रपट क्षेत्रातील आकाशात एक झळाळणारे  नक्षत्र झाले आहे. अनेक माध्यमातून झळकण्याचे भाग्य या गीताला लाभले. त्यामुळे ते 'ब्रॅण्ड सॉंग' झाले आहे. शांताराम आठवले यांनी मा.कृष्णराव स्वररचनेवर शब्द रचलेत. आजही या 'ब्रॅण्ड सॉंग' चा संचार सर्वत्र सुरू आहे. दूरदर्शन वाहिन्यांची शीर्षक गीते, मराठी चित्रपट समारंभ, त्यातील सामुहिक गायन, रंगमंचावरील गायन याला  प्रेक्षकांची भरपूर दाद मिळते. संगीतकार अजय-अतुल यांनी तर या नावाने लाइव्ह कार्यक्रम केले. या गीताची निर्मिती व ध्वनीमुद्रण 1940 सालचे व हे गीत असलेला चित्रपट 'शेजारी' प्रकाशित झाला 1941 साली! (हिंदीमध्ये चित्रपट 'पडोसी' व गीत 'कैसा छाया है' कवी मुन्शी अजीज) मराठी व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन मा. कृष्णराव यांचेच होते. मराठी गीतात श्रीमती जयश्री व वसंत देसाई प्रमुख गायक तर हिंदीमध्ये श्रीमती अनिस खातून व बालबीर, खान मस्ताना हे प्रमुख गायक होते. या गीतात वाद्यमेळ्यांच्या लयीत 'क्लॅप्स' चा (टाळ्यांचा) वापर प्रथम मा. कृणाराव यांनी केला नंतर पुढे मी केला , असे संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी एके ठिकाणी केला आहे. या गीतातील कोरसचे वैशिष्ट्य हे की, स्त्रियांच्या 'गळी आवाजात' अतितार सप्तकात गायलाय. पुढील काळात स्त्री पार्श्वगायनात असा 'गळी आवाज' प्रचलित झाला. या स्त्री आवाजात जयश्रीबाईंचा आवाज सहज ओळखू येतो. या सुमारास त्या माँ.कृष्णराव यांच्याकडे दीड वर्ष गायन शिकत होत्या. या गीतात जास्तीत जास्त वाद्ये विशेषतः  ताल वाद्ये वापरली आहेत. मा. कृष्णराव यांनी त्यांच्या कारकिर्दीत वाद्यांचा मोठा संचय प्रभात कंपनीत करून ठेवला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...