फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरायला सुरुवात केल्याने बॉलिवूड काळजीत पडला आहे. ज्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यांच्या पुढेही काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिनेमागृहे पुन्हा बंद होतील का,हा प्रश्नही आहे. अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज तारीख 2 एप्रिल जवळपास निश्चित झाली होती,पण आता त्याला अनिश्चितीचे ग्रहण लागले आहे. अशीच अवस्था 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप आणि कपिल देववर बनत असलेल्या '83' चित्रपटाची झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे निर्माते काळजीत असले तरी नाउमेद झाले नाहीत.
सरकारी घोषणेनंतर चित्रपटगृहे शंभर टक्के उघडण्यात आली होती, मात्र ही चित्रपटगृहे मोठ्या चित्रपटाची अजूनही प्रतीक्षा करत आहेत. 19 मार्च ला यशराज फिल्म्सने अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'संदीप आणि पिंकी फरार ' तसेच टी सिरीजने जॉन अब्राहमचा 'मुंबई सागा' प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेमुळे वाटत होतं की बॉलीवूड रुळावर येत आहे. यशराज फिल्म्सने आपल्या पाच चित्रपटांची घोषणा करून जी सुरुवात केली होती,त्यामुळे निर्मात्यांचा आत्मविश्वास बळावला होता. परंतु वाढत्या कोरोना प्रकरणानंतर प्रदर्शन क्षेत्रात चिंतेची सावली आणखी गडद होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सतत रोज आठ- नऊ हजाराचे रुग्ण पाहायला मिळत असल्याने निर्माते पुन्हा 'थांबा आणि वाट पहा' या परिस्थितीत असल्याचे दिसते. यात आणखी एक भर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यकता भासल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना वाटतं की, खरेच चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडी राहतील का ?आणि प्रेक्षक पूर्ण क्षमतेने चित्रपट गृहांकडे परततील का?
प्रदर्शनासाठी तयार चित्रपट
कोरोनाची महामारी मार्च 2020 पासून सुरू झाली, ते नोव्हेंबर 2020 पर्यंत चित्रपटगृहांना टाळे लागले. या काळात कोणताच चित्रपट रिलीज होऊ शकत नव्हता. सरकारच्या शंभर टक्के क्षमतेने चित्रपट सुरू करण्याच्या घोषणेने काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या रिलीजच्या घोषणा केल्या आहेत, असं मानलं जातं आहे की, जवळपास 50 चित्रपट यावेळी रिलीजसाठी तयार आहेत. यशराज फिल्म्सने संदीप और पिंकी फरार', 'बंटी और बबली 2' , 'शमशेरा', 'जयेशभाई जोरदार' सोबतच 'पृथ्वीराज' या घोषणा मागच्या आठवड्यात केली होती.
ईद ला सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाचे प्रदर्शन निश्चित झाले आहे. अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चे प्रदर्शन दिवाळीला आणि आमिर खानच्या'लालसिंह चड्डा' प्रदर्शन ख्रिसमासला करण्याचे ठरले आहे. काही चित्रपटांची ऍडव्हान्स बुकिंगदेखील सुरू झाली आहे. चित्रपट मालकांबरोबरच निर्मात्यांचा गमावलेला आत्मविश्वासही परतू लागला होता आणि तामिळ चित्रपट 'मास्टर' द्वारा प्रेक्षकही चित्रपटगृहांकडे परतू लागले होते. कोरोनाचे प्रमाण वाढत असतानाही 11 मार्च ला रिलीज होणाऱ्या जान्हवी कपूरच्या 'रुही' चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित केलं नाही.
सूर्यवंशी' वर सगळ्यांच्या नजरा
यावेळेला बॉलिवूडच्या निर्मात्यांच्या नजरा ज्या चित्रपटावर खिळल्या आहेत, तो चित्रपट आहे 'सूर्यवंशी'! या चित्रपटाचे निर्माते आहेत करण जौहर, रोहित शेट्टी, अरुण मेहता आणि रिलायन्स एंटरटेनमेंट!रिलायन्स आणि मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआरवर यांच्या प्रदर्शनाची जबाबदारी आहे.निर्मात्यांनी याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. दुसरा मोठा चित्रपट 2 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाण्याची शक्यता आहे.
जर चित्रपट निश्चित तारखेला रिलीज झाला तर यामुळे बॉलिवूडच्या दुसऱ्या निर्मात्यांमध्ये उत्साह वाढणार आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर बॉलिवूडला जिवंतपणा येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेतल्याने लोकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी देशात अन्य ठिकाणी कोरोनाची प्रकरणे कमी दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे परतण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकांमध्ये आता कोरोनाची पहिल्यासारखी भीती राहिलेली नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment