सलमान खानला घेऊन आदित्य चोप्राने 'टायगर 3' ची घोषणा केली आहे. हा 'एक थर टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांचा तिसरा भाग आहे. सध्याला बॉलिवूडमध्ये 'दोस्ताना 2', 'बागी 4, 'बंटी और बबली 2', ' क्रिश 4', 'अपने 2, ' गो गोवा गोन 2' सारख्या हिट चित्रपटांचे सीक्वेल बनत आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या रथाची चाके जुन्या-पुराण्या रिमेक आणि हिट चित्रपटांच्या सीक्वेलमध्ये अडकली असल्याचे दिसत आहे.
सीक्वेल चित्रपट बनवणे आता सोपा आणि सोयीचा धंदा झाला आहे. कारण एक सीक्वेल चित्रपट कमीत कमी पाचशे कोटींचा व्यवसाय देऊन जात आहे. 'धूम' चित्रपटांच्या श्रुखलेच्या तीन चित्रपटांनी आठशे कोटींचा व्यवसाय मिळवून दिला. 'बाहुबली' च्या दोन चित्रपटांनी दणक्यात रेकॉर्ड ब्रेक अडीच हजार कोटींचा व्यवसाय केला. सलमान खानने पोलिसांची वर्दी घालून दंबगिरी करत तीन चित्रपटांच्या माध्यमातून हजारो कोटी कमावले. बाकीच्या फुटकळ चित्रपटांची कमाई तर सोडूनच द्या. बागी, क्रिश, रेस, हाऊसपुल, गोलमालसारख्या चित्रपटांनी तर 500-500 कोटींच्या वर कमाई केली. कमाई करताना तुम्हाला फक्त त्यातलं टेक्निक माहीत असायला हवं.
सीक्वेल चित्रपट बनवताना तुम्हाला फार काही मेहनत करावी लागत नाही. फक्त एका संत्र्याचा ज्यूस काढा. आणि तो जो चोथा राहिला आहे, त्यात थोडी साखर आणि बर्फ टाका. त्यात पाणी घालून पुन्हा मिक्सरला लावून घुसळा. झाला ज्यूस तयार. अशा प्रकारे ज्यूस तयार करत राहा. वास्तविक चित्रपट व्यवसाय आता मिठाईच्या धंद्यासारखा झाला आहे. साखरेच्या पाकात गुलाब जामून बुडवून द्या. मिठाईचे दुकान साखरेवरच चालते, तसे बॉलिवूड फक्त सीक्वेलवर चालत आहे. साखरेचा पाक बनवायचा.त्यात गुलाब जामून टाकायचे.गुलाब जामून विकल्यावर उरलेल्या पाकातून जिलेबी बुडवून काढायची. तरीही साखरेचा पाक उरला तर आणखी एकादा पदार्थ बुडवून काढायचा. सगळी मिठाई साखरेपासूनच बनते, पण सगळ्यांची चव वेगवेगळी राहते. मिठाईवाला 'साखरेच्या नावानं चांगभलं ...: म्हणतो तर सिनेमावले ' सीक्वेलच्या नावाने चांगभलं...' म्हणताहेत.
हा खेळ साधासोपा आहे. धावणाऱ्या घोड्याच्या शेपटीला काहीही बांधले तरी तेही धावायला लागते. हा जुनाच प्रकार आहे आणि हा बोलपटांपासून चालला आहे. 'हंटरवाली’ (1935) चित्रपट हिट झाला होता. तेव्हा वाडिया बंधूंनी 'हंटरवाली की बेटी ' (1943) बनवला. दोन्ही चित्रपट चालले आणि तिथून सीक्वेल चित्रपटांचा व्यवसाय चालू झाला. आज हा व्यवसाय कमाईचा महत्त्वाचा घटक बनला आहे.
यशराज फिल्म्स तर बॉलिवूडचे नाक आहे. या कंपनीने अलीकडेच ' एक था टायगर', 'टायगर जिंदा है', बनवले. आता या चित्रपटांचा सीक्वेल ' टायगर 3' बनवण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत या दोन 'टायगर' चित्रपटांनी 900 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. टायगर (सलमान खान) भारतीय रॉ एजंट आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर एजंट संस्था 'आयएसआय'ची एजंट जोया (कॅटरिना) शी भिडतो. दोघे प्रेमात पडतात आणि 900 कोटी यशराज फिल्म्सच्या अकाऊंटमध्ये टाकतात. आता 'टायगर 3' या तिसऱ्या चित्रपटात लेखक आदित्य चोप्रा या दोघांना पुन्हा एकदा तिसऱ्या मिशनवर पाठवणार हे नक्की.
यशराज फिल्म्स आणि करण जौहरची धर्मा प्रोडक्शन्स यासारख्या अनेक कंपन्या आधुनिक सिनेमाच्या फॅक्टऱ्या आहेत, ज्या सिनेमे बनवत नाहीत तर उगवतात. इतक्या चित्रपटांसाठी कथा कोठून आणतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्यांच्यासाठी हे सारं सोप्पं आहे. करण जौहर याच्या वडिलांनी 1980 मध्ये 'दोस्ताना' नावाचा चित्रपट बनवला होता. याच नावाने करणने 2008 मध्ये 'दोस्ताना' बनवला. आणि आता त्याच 'दोस्ताना ' नावाच्या चित्रपटाचा सीक्वेल 'दोस्ताना 2' नावाने बनवला जात आहे. त्याच्या वडिलांनी 1990 मध्ये बनवलेल्या 'अग्निपथ'ला 2012 मध्ये त्याने पुन्हा 'अग्निपथ' नावाने बनवला आणि अडीचशे कोटींचा गल्ला जमवला. करण शेवटी करणार काय?
आजकाल सगळे हेच करत आहेत. त्यामुळे हिंदी सिनेमा एक तर रिमेकवर चालला आहे नाहीतर सीक्वेलवर! या हिंदी सिनेमाच्या रथाचे एक चाक सीक्वेलच्या खड्ड्यात अडकले आहे तर दुसरे रिमेकच्या चिखलात रुतले आहे. यातून बॉलिवूडच्या रथाची चाके बाहेर निघणं कठीण आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 9423368970
No comments:
Post a Comment