बड्या निर्मात्यांना त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली आहे,तरीही अजून चित्रपट प्रदर्शित करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीएल तर आता सुरू झालंच आहे, पुढे रमजान महिना आहे. त्यामुळे आधीच व्यवसाय बसला असताना आता आणखी दोन महिने तरी सिनेमागृहात शुकशुकाट असणार आहे. साहजिकच सिनेमागृहातील वर्दळ रमजाननंतरच वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे बंद आणि प्रतिबंध या मार्गाने जाणाऱ्या बॉलिवूडला आता एक वर्ष उलटून गेलं आहे. एका वर्षात भरभराटीच्या या व्यवसायाची दशा आणि दिशाच पार बिघडून गेली आहे. अजूनही बंद आणि प्रतिबंधाची परिस्थिती'जैसे थे'च आहे. 22 मार्च 2020 ला केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेनंतर बंद झालेली सिनेमागृहे ऑक्टोबर 2020 मध्ये निम्म्याने आणि फेब्रुवारी 2021 नंतर पूर्ण क्षमतेने उघडण्यात आली होती. तिकीट खिडकीवर याचा परिणामही दिसला.
एका अंदाजानुसार 2019 मध्ये 4 हजार 891 कोटी व्यवसाय करणाऱ्या बॉलिवूडने 2020 मध्ये फक्त 870 कोटींचा व्यवसाय केला. वर्षाला 1 हजार 460 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या तामिळ चित्रपटसृष्टीने तिकीट खिडकीवर फक्त 320 कोटींचा गल्ला जमवला. 1हजार 404 कोटींची व्यवसाय करणाऱ्या तेलगू चित्रपटांचा धंदा 525 कोटींवर आला.520 कोटी रुपयांचा कन्नड चित्रपटांचा कारोबार फक्त 45 कोटीच झाला. 2019 मध्ये 604 कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या मल्याळम चित्रपट सृष्टीने केवळ 150 कोटी मिळवू शकली. हॉलिवूडच्या भारतात रिलीज होणाऱ्या चित्रपटांना तर मोठा दणकाच बसला आहे. 2019 मध्ये दीड हजार कोटींची कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांच्या हाताला फक्त 70 कोटीच लागले. ही आकडेवारी बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीला किती फटका देणारी आहे, हे लक्षात येते. भारतीय चित्रपटसृष्टी हा काळ इतिहासात कधीच विसरणार नाही. गेल्या वर्षभरात निर्मात्यांना अनेकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. असाच एक चित्रपट होता 'सूर्यवंशी', जो गेल्या ईद सणाला रिलीज होणार होता,पण अजुनपर्यंत रिलीजची तारीख निश्चित झाली नाही. मात्र यादरम्यान अनेकदा रिलीजच्या तारखा घोषित करण्यात आल्या. मागच्या घोषणेनुसार रिलीजची तारीख 30 एप्रिल आहे.
परंतु महाराष्ट्र सरकारद्वारा 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने आणि सिनेमागृहे बंद ठेवण्याचा आदेश दिला गेल्याने निर्मात्यांना 'सूर्यवंशी'ची रिलीज तारीख स्थगित करावी लागली आहे. अमिताभ बच्चन यांचा 'चेहरे' आणि राणी मुखर्जीचा 'बंटी और बबली 3' चे प्रदर्शन अगोदरच स्थगित करण्यात आले आहे.सध्या तरी चित्रपट प्रदर्शित करण्यासारखी परिस्थिती नाही.
30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रामधील सिनेमागृहे बंद आहेत. जर एखाद्या निर्मात्याला त्याचा सिनेमा प्रदर्शित करायचा असेल तर त्याला महाराष्ट्रातील व्यवसायावर पाणी सोडावे लागेल. महाराष्ट्रातला हा व्यवसाय एकूण व्यवसायापैकी एक तृतीयांश आहे. त्याखेरीज आता आयपीएलचे सामने सुरू झाले आहेत. या स्पर्धा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. भारतीय लोक सिनेमा आणि क्रिकेटवर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळे साहजिकच क्रिकेटकडे प्रेक्षक वळणार हे ठरलेले आहे. निर्माते क्रिकेटच्या सीझनमध्ये सिनेमे फारसे प्रदर्शित करत नाहीत.
दुसऱ्या बाजूला 12 एप्रिल पासून रमजानचा महिना सुरू होतोय. 13 मेला ईदची सांगता आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज सिनेमागृहांपासून लांबच राहतो.पण सलमान खानदेखील 13 मे ला प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या 'राधे' चित्रपताबाबतही संभ्रमात आहे. जर परिस्थिती निवळली तरच 'राधे' प्रदर्शित करणार असल्याचं सलमान खान म्हणाला आहे. नाहीतर 'राधे' पुढच्या ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment