सिनेसृष्टीत आपलं स्थान बळकट करण्यासाठी कलाकारांना दीर्घ संघर्ष करावा लागतो. प्रत्येक काळात हा संघर्ष सुरूच असतो, फक्त कलाकार बदलत असतात. धर्मेंद्र, जितेंद्र पासून मिथुन चक्रवर्ती, मनोज वाजपेयीपर्यंतच्या कलाकारांनी संघर्षातूनच आपलं स्थान पक्कं केलं. काहींनी यशोशिखर गाठलं तर काहींनी वेगळी वाट धुंडाळली. पण त्यांनी आपला एक ठसा उमटवला. काळाबरोबर कलाकारांची एक पूर्ण पिढी बदलली आहे. नव्या पिढीचे नवे कलाकार सिनेसृष्टीत दाखल होत आहेत. अशाच संघर्षातून आपले स्थान बळकट करणाऱ्या अलीकडच्या काही कलाकारांवर एक दृष्टिक्षेप...
आयुष्यमान खुराना, राजकुमार राव
सलमान, शाहरुख,आमिर खान आदी मंडळी या क्षेत्रात अनेक दशकं अधिराज्य गाजवून आहेत. ते जसे बिग आहेत, तसे त्यांचे चित्रपटही बिग बजेटचे असतात. त्यामुळे काही निर्मात्यांना त्यांचे बजेट सोसत नाहीत. साहजिकच आपल्या लो बजेटनुसार कलाकारही शोधताना दिसतात. पूर्वी अमिताभ मिळत नाही म्हणून मिथुन चक्रवर्तीला निर्माते साइन करत. त्यावेळी मिथुनला 'गरिबांचा अमिताभ' म्हटले जात असे. पण त्यानेही या चित्रसृष्टीत आपले एक वेगळे स्थान पक्के केले होते. याच दरम्यान समांतर चित्रपट येत तेही वेगळ्या विषयामुळे भाव खाऊन जात. सध्या छोट्या बजेटचे चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.असे छोट्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवतात आणि त्यांची गणना मोठ्या चित्रपटांबरोबर होते तेव्हा त्यातील कलाकारही चर्चेत येतात. आयुष्यमान खुराना छोट्या बजेटच्या चित्रपटांतून स्टार बनला आहे. डीजे म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या खुरानाला 'विकी डोनर' ने अचानक मोठ्या कलाकारांच्या पंक्तीत नेऊन बसवलं.आपल्या भूमिकेत विविधता जपत त्याने 'विकी डोनर', 'बरेली की बर्फी', 'अंधाधून', 'बाला' आणि 'ड्रीम गर्ल' सारख्या चित्रपटातून यश मिळवले आणि आपले स्वतःचे एक स्थान निर्माण केले. आयुष्यमानला आपण आगामी काळात'छोटी सी बात' च्या रिमेकखेरीज 'चंदिगढ करे आशिकी', 'डॉक्टर जी', 'गुगली' सारख्या चित्रपटांमध्ये पाहणार आहोत. आयुष्यमान खुरानाखेरीज वेगाने आपले स्थान पक्के करत आहे तो राजकुमार राव. प्रतिभावंत रावने एक राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्म फेअर पुरस्कार पटकावले आहेत. 'काई पो छे', 'क्वीन', 'न्यूटन', 'स्त्री', 'रागिणी एमएमएस', 'रुही' सारख्या चित्रपटांमध्ये राजकुमारने आपली प्रतिभा दाखवून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. प्रियांका चोप्रासोबत 'द वाइट टायगर' मध्ये काम केलेल्या रावचे 'बधाई हो' चा सिक्वेल 'बधाई दो', ' सेकंड इनिंग', 'स्वागत', हम दो हमारे दो' सारखे आगामी चित्रपट आहेत.
आणखी एका हिरोने आपल्या जबरदस्त अभिनयाने काही वर्षातच प्रेक्षकांसमोर आपली क्षमता दाखवून दिली आहे. याचं नाव आहे विकी कौशल. 'मसान' सारख्या चित्रपटातून पुढे आलेल्या विकी कौशलने नंतर 'उरी:द सर्जिकल स्ट्राइक', 'राजी', 'भूत', 'संजू', 'रामन राधव 2' चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो 'सरदार उधम सिंग', 'इर्मोटल अश्वस्थामा' आणि करण जौहरच्या 'तख्त' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ऍक्शन हिरोच्या रुपात खूप वेगाने पुढे आला तो जॅकी श्राफचा मुलगा टायगर श्रॉफ. 'हिरोपंती', 'स्टुडंट ऑफ द इअर2', 'बागी 2', 'बागी 3' आणि 'वार' मधल्या कामाची प्रेक्षकांनी टायगरची खूप प्रशंसा केली. 'गणपत', ''हिरोपंती2', 'रेम्बो', 'बागी 4' आणि 'जुडवा 3' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.
कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा
'प्यार का पंचनामा' चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या कार्तिक आर्यनने 'सोनू के टिटू की स्वीटी', 'पती पत्नी और वो', 'लव आज कल', 'लुका छिपी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पाहता पाहता चित्रपट निर्मात्यांना आपल्याकडे खेचून घेतले.कार्तिक आर्यन 'भूलभुलैया 2', 'दोस्ताना2' आणि 'धमाका' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.सिद्धार्थ मल्होत्रादेखील कित्येक वर्षांपासून स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटाद्वारा आपले करिअर सुरू करणाऱ्या सिद्धार्थने ‘एक विलेन’, ‘मरजावा’, ‘बार बार देखो’, ‘कपूर एंड संस’, सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये सैन्याधिकारी विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबरोबरच तामिळ चित्रपट 'थाडम' चा रिमेक 'गुमराह', ' थँक गॉड', 'मलंग2', 'आशिकी 3' या चित्रपटांचा समावेश आहे.
अभिनेत्रीही मागे नाहीत
अभिनेत्रींची नवी पिढीदेखील बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. खेरीज त्या इथे दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत घेत आहेत. यात पाहिलं नाव येतं ते किअरा अडवाणीचं. किअरा 'धोनी अनटोल्ड स्टोरी', 'गुड न्यूज', 'कबीर सिंग' सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आली. ती आता 'भूलभुलैया 2' , 'शेरशाह', 'जुग जुग जिओ', 'मिस्टर लेले' आदी चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे. किअराप्रमाणेच भूमी पेडणेकरनेदेखील 'सांड की आंख', 'सोन चिडीया', 'टायलेट एक प्रेम कथा', 'बाला' आदी चित्रपटांतील सक्षम भूमिकांमुळे प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेतले आहे. ती 'तख्त', 'मिस्टर लेले', 'बधाई दो' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'थप्पड', 'पिंक', 'सांड की आंख', 'बेबी', 'बेबी अटॅक', 'नाम शबाना', 'जुडवा 2' या चित्रपटांमधून तापसी पन्नूने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘लूप लपेटा’, ‘रश्मि राकेट’, ‘दोबारा’, ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटांमधून तिचा अभिनय पाहता येणार आहे. दिशा पटनी आणि रकुल प्रीत यांनीही आपल्या कामाच्या माध्यमातून सिनेसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे. तेलुगु चित्रपट ‘लोफर’ पासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या दिशाला सलमान खानच्या ‘राधे- द मोस्ट वांटेड भाई’ पासून मोठी आशा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment