हिंदी सिनेमाची सुरुवात पौराणिक, धार्मिक बरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूकपटाने झाली होती.याचं कारण हे की जनमानसात यांच्याशी जुडलेल्या गोष्टी, किस्से,कथा-कहाण्या आणि घटना माहीत होत्या,लक्षात होत्या आणि भाषेशिवाय सिनेमा समजून घ्यायला सोपे पडत होते. नंतर सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनण्याचा काळ सुरू झाला. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमे प्रत्येक दशकात बनू लागले. आजदेखील सिनेनिर्मात्यांना त्यात स्वारस्य असल्याचे आगामी चित्रपटांच्या घोषणांवरून दिसून येत आहे.
मूकपटाच्या काळात लोकप्रिय पौराणिक कथांवर सिनेमे बनवण्याचा एकप्रकारे पूरच आला होता. रामायण आणि महाभारत संबंधित सिनेमे मोठ्या प्रमाणात बनले. 'कंस वध', 'लव कुश', 'कृष्ण सुदामा', 'महाभारत', 'वीर अभिमन्यू', 'राम रावण युद्ध', 'सीता वनवास' सारखे सिनेमे मोठ्या प्रमाणात पसंद केले गेले. याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनलेल्या ‘सम्राट अशोक’, ‘कालिदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रपति संभाजी’, ‘राणा प्रताप’ आदी मूकपटांना सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नंतर सामाजिक सिनेमांचा काळ आला.
मूकपट लोक मोठ्या चवीने पाहत होते कारण, लोकांसाठी पडदयावरच्या हालत्या-डुलत्या सावल्या त्यांच्यासाठी आश्चर्याचा विषय होता. ऐतिहासिक सिनेमांना लोकांनी पसंद केल्याने मोठ्या संख्येने अशा सिनेमांची निर्मिती व्हायला लागली. बहुतांश सिनेमे राजा-महाराजा,प्रसिध्द योद्धे आणि संतांच्या जीवनावर बनत होते. ऐतिहासिक सिनेमे प्रत्येक काळात बनले आणि आजदेखील बनत आहेत.
स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचा जोर वाढला. या काळात सशक्त दावेदार होते सोहराब मोदी आणि त्यांची कंपनी मिनर्वा मूविटोन.त्यांनी 'पुकार', 'सिकंदर', 'पृथ्वीवल्लभ', 'मिर्झागालिब' सारखे सिनेमांची निर्मिती केली. 1952 मध्ये त्यांनी 'झांशी की रानी' चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात झांशीच्या राणीची भूमिका त्यांची पत्नी मेहताब यांनी साकारली.
यानंतर दोन वर्षांनी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली,ज्याचे लेखन राजेंद्र सिंह आणि सआदत हसन मंटो यांनी केले. या काळात कोणी मुगल सम्राटांच्या जीवनावर आधारित तर कुणी शिवाजी महाराज आणि मराठा शासकांवर चित्रपट बनवत होते. स्वातंत्र्यानंतर एका बाजूला ‘सलीम अनारकली’ ‘मुगले आजम’, ‘जहांगीर’, ‘ताजमहल’ सारखे काही भव्य चित्रपट बनले, तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीवर आधारित ‘हकीकत’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘शहीद’ सारखे काही यशस्वी पीरियड चित्रपटदेखील पाहायला मिळाले.
लोकप्रिय ऐतिहासिक चित्रपट
हिंदी सिनेमा क्षेत्रातील त्रिमूर्ती- राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद-यांच्या दशकांनंतर जेव्हा बॉलीवुडमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान या तिकडीचा दबदबा वाढला तेव्हाही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. अलीकडेच काही वर्षांत बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये कंगना रानौत अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मणिकर्णिका’, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह अभिनीत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पदमावत’, ऋत्विक रोशन अभिनीत ‘मोहेनजोदड़ो’ आणि ‘जोधा अकबर’.आमिर खान अभिनीत ‘मंगल पांडे’ आणि शाहरूख खानचा ‘अशोका’ आदी चित्रपटांनी हिंदी सिनेमा क्षेत्रात आपले स्थान बनवले.
ऐतिहासिक चित्रपटांसंबंधित वाद
ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणं जितकं कठीण तितकंच रिलीज दरम्यान विवादावरून टीकाकारांना सामोरं जाणं कठीण असतं. खासकरून भारतात चित्रपटांच्या रिलीज दरम्यान दुखावलेल्या भावनांना वाट मोकळी केली जाते. खरं तर प्रत्येक दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाला वाद विवादाचा सामना करावा लागतो. संजय लीला भसांळी यांच्या ‘पद््मावत’ चित्रपटाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतकंच काय या वादामुळे चित्रपटाच्या नावात बदल करावा लागला. त्यानंतर ‘मणिकर्णिका’ दरम्यानदेखील अनेक वाद समोर आले.
आमिर खानच्या ‘मंगल पांडे’ मधील एक चुंबन दृश्य आणि काही अन्य दृश्यांबाबत चित्रपटावर विवाद उभा राहिला. अशाच प्रकारे संजय लीला भंसाळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘जोधा अकबर’ मध्ये ऐतिहासिक भूमिकांमध्ये छेडछाड केल्याप्रकारणावरून विवाद उभा राहिला. अशा चित्रपटांसाठी 200 ते 300 कोटी रुपये लागलेले असतात,त्यामुळे निर्मात्यांवर मोठा ताण येतो.
ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती सुरूच
आगामी काळातही ऐतिहासिक चित्रपटांचा नवा दौर सुरू होतो आहे, ज्यात काही भव्यदिव्य चित्रपटांचा समावेश आहे.यात अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज चौहान’, अजय देवगन, सोनाक्षी सिन्हाचा ‘भुज’, अजय देवगन, जूनियर एनटीआर, रामचरण, आलिया भटट यांचा ‘आरआरआर’, वरुण धवनचा मिस्टर लेले ,रणवीर सिंह आणि करीना कपूरचा ‘तख्त’, आमिर खान, करीना कपूर अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ , विक्की कौशल अभिनीत ‘सरदार उधम सिंह’, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल, बोमन इरानी अभिनीत ‘मुगल रोड’, अर्जुन रामपाल आणि दीगंगनाचा ‘द बैटल आॅफ भीमा कोरेगाव’, महाभारतातील कर्ण याच्या जीवनावर आधारित ‘महावीर कर्ण’, ज्यात अभिनेता विक्रम आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी दिसणार आहेत. हा चित्रपट कन्नड़, हिंदी, मल्याळम, तामिळमध्ये रिलीज होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज. पण हा फ्लॉप झाला. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिचा पहिलाच चित्रपट
ReplyDeleteसम्राट पृथ्वीराज
ReplyDeleteजोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांनी मोठी पसंती मिळाल्याचं आजवर पाहिला मिळालंय. मात्र याला अपवाद ठरला तो म्हणजे अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज 'चित्रपट. हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात फोल ठरला. अभिनेता अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमावर तब्बळ 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बॉक्स आफिसवर या सिनेमाने 64.62 कोटी एवढी कमाई केली.