Friday, April 16, 2021

ऐश्वर्याला डॉक्टर व्हायचं होतं, पण...


ऐश्वर्या राय म्हणजे केवळ रुपाचंच नव्हे तर बुद्धीचंही ऐश्वर्य लाभलेली एक अभिनेत्री. ऐश्वर्या मुंबईत सांताक्रूझच्या आर्य विद्यामंदिर या शाळेत शिकत होती. नंतर ती अकरावीला जयहिंद कॉलेजमध्ये व बारावीला रुपारेलला गेली. ती विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. झूऑलॉजी हा तिचा अत्यंत आवडीचा विषय होता. बारावीला नव्वद टक्के मार्क्स मिळवणारी  ऐश्वर्या शाळेत 'हेड गर्ल' होती. तिच्या वयाच्या मुलांपेक्षा नेहमीच वर्ष पुढे असणारी ऐश्वर्या मॉडेलिंगमध्ये अगदी योगायोगाने वळली. तिच्या एक शिक्षिका फोटोग्राफरही होत्या. त्यांनी ऐश्वर्याचे फोटो काढले. त्या फोटोंनी तेव्हा नववीत असलेल्या ऐश्वर्याला पहिली मॉडेलिंगची असाईनमेंट मिळवून दिली. कम्प्लिनसाठी तिनं आयुष्यातील पाहिलं मॉडेलिंग केलं. त्यानंतर पेप्सीच्या जाहिरातीनं तिला घराघरात पोहोचवलं. अमाप लोकप्रियता मिळवून दिलं. गार्डन, डी बिअर्सची नक्षत्र डायमंड ज्वेलरी यांच्यासाठीही तिनं मॉडेलिंग केलं आणि तिची जादू अशी की तिनं जाहिरात केल्यावर 'नक्षत्र' ची विक्री तीनशे टक्क्यांनी वाढली. तिनं 'आयबॅक असोसिएशन' साठी नेत्रदानाचीही जाहिरात केली,पण ती सामाजिक जाणिवेच्या भावनेतून होती. त्याच जाणिवेतून तिनं स्वतः ही नेत्रदानाचा संकल्प सोडलंय. 

खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं. बारावीला तिला 90 टक्के मार्क्सही मिळाले होते. पण तिला मेडिकलला ऍडमिशन मिळालं नाही. तिनं आर्किटेक्चर च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. दीड वर्ष तिने अभ्यास केलाही,पण तिनं आर्किटेक्ट व्हावं हेही नियतीला मंजूर नव्हतं. नियतीनं तिच्या आयुष्याला अशी काही कलाटणी दिली की, जिच्या खानदानात कुणीही ज्या क्षेत्राकडे कधीही वळले नव्हते,त्या क्षेत्रात शिरून , अभिनेत्री बनून देशविदेशातल्या करोडो रसिकांच्या हृदयावर राज्य करण्याचं भाग्य तिला लाभलं.

मॉडेलिंग करत असतानाच 1994 मध्ये तिनं 'मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेत तीच भारतसुंदरी बनणार याविषयी तिला घडवणाऱ्यांपासून आम लोकांपर्यंत सगळ्यांचीच खात्री होती, पण काही तरी गडबड झाली आणि तिचा तो मुकुट हुकला. तिला। 'फर्स्ट रनर अप' किताबावर समाधान मानावं लागलं,पण त्या पराभवानं ती खचली नाही. 'मिस वर्ल्ड'स्पर्धेसाठी तिनं कसून मेहनत घेतली आणि जगत सुंदरीचा किताब खेचून आणला.

जगत सुंदरी झालेल्या ऐश्वर्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले नसते तर नवलच. तिच्या खानदानात कुणीही या दुनियेकडे कधी वाळलेलं नव्हतं. पण तिला नियतीनं या चमचमत्या जगात आणून ठेवलं. ही दुनिया जादुई आहे.नशा लावणारी आहे ,पण ऐश्वर्या इथे आनंदानं स्थिरावली. सुरुवातीच्या काळात तिचे सिनेमे पडले पण तिने आपली अभिनयक्षमता सिद्ध केली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी अकॅडमीने तिला दिलेला 'स्मिता पाटील पुरस्कार' दिला. 'ताल', 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट गाजले. 1997 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक आणि रत्नम् यांच्या दिग्दर्शनाखाली'इकवर' या तामिळ चित्रपटाद्वारे तिनं रुपेरी पडदयावर पदार्पण केलं. त्यानंतर 'और प्यार हो गया', 'जीन्स', 'आ अब लौट चले', 'मेला', 'हमारा दिल आपके पास है', 'ढाई अक्षर प्रेम के', 'मोहब्बते', 'अलबेला' , 'देवदास' 'रोबोट' अशा अनेक चित्रपटात  काम केले. 

मधल्या काळात तिच्या आयुष्यात वावटळ आलं. ती सलमान खानच्या प्रेमात होती. अत्यंत सुसंस्कारीत, अभिजातपण जपणाऱ्या तिच्या आईवडिलांना तिचं सलमानवरचं प्रेम मान्य नव्हतं. शेवटी भावनिकदृष्ट्या जोडलेले प्रेमसंबंध तिने तोडले. अभिषेक बच्चन याच्याशी तिचा विवाह झाला.

ऐश्वर्या भरतनाट्यम् शिकली आहे. हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीताचे धडे गिरवलेत. ती लहानपणापासूनच खूप स्वप्नाळू आहे. ती स्वप्नं तुमच्या जीवनाचा प्रवाह ठप्प होऊ देत नाहीत. ते आपलं जीवन परिपूर्ण व जादुई बनवतात. त्यामुळे माणसानं आधी स्वप्नं बघावीत व मग ती पूर्ण करणाऱ्यासाठी धडपडावं ,असं ती सांगते. तिनं तसं केलं आणि तिची स्वप्नं पूर्ण केली. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...