“प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन शिकायला मिळते. 'जुम्मा चुम्मा' हे गीत 19 भाषांमध्ये गायले. सतत म्हणजे 24 तास गाणी ऐकत राहणे, हाच माझा रियाज आहे. इच्छा असो अथवा नसो, एकदा स्टेजवर पाय ठेवला की दुखणे पळून जाते, कळत नाही... तिथे काय जादू होते हे लक्षातही येत नाही. रसिक मायबाप हीच आमची ऊर्जा आहे...” ही भावना 64 वर्षीय सुप्रसिद्ध गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे व्यक्त केली. “मी फक्त एंटरटेनर आहे, लोकांचे मनोरंजन करणे मला आवडते,” असेही ते म्हणाले,
आविष्कार कल्चरल ग्रुपतर्फे आयोजित संगीत महोत्सवाच्या निमित्ताने इस्लामपुरात आलेले, अमिताभ बच्चन यांच्या आवाजासाठी सुप्रसिद्ध असलेले गायक सुदेश भोसले यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “1982 पासून खऱ्या अर्थाने करिअर सुरू झाले. अशोककुमार आणि प्रमोदकुमार सराफ यांच्याबरोबर पुण्यातल्या ‘मेलडी मेकर्स' हा 61 वर्षे जुना असलेला ऑकेस्ट्रा जॉईन केला. संपूर्ण जगभर कार्यक्रम केले. 1990 ला 'जुम्मा-चुम्मा' या गाण्याने स्वतंत्र ओळख दिली. जगात सगळीकडे हिंदुस्तानी, पाकिस्तानी आणि अफगाणी लोक आहेत ते आपल्या संगीताचे चाहते आहेत. एक कलाकार म्हणून मनापासून दाद द्यायला ते येतात. आई सुमन आणि आजी दुर्गाबाई शिरोडकर या माझ्या खऱ्या गुरू आहेत. कोणत्याही प्रकारचे संगीत शिक्षण न घेता अपघाताने या क्षेत्रात आलो. वडील चांगले पेंटर होते. जुन्या सिनेमांचे पोस्टर्स ते बनवायचे. मीही हळूहळू चित्रांकडे वळलो. मेलडी मेकर्सचे मालक यांच्या कन्येशी म्हणजे हेमाशी त्यांचा विवाह झाला. आज त्यांचा मुलगा सिद्धांत हिंदी- मराठी आणि जुनी नवी गाणी म्हणत आहे. कन्या पेंटिंग करते.
पुढे त्यामध्येच करिअर होईल, असे वाटत असतानाच अचानक संगीत क्षेत्रात आलो. घरातील सांगीतिक वातावरणामुळे आठव्या वर्षी मला दोनशे गाणी पाठ होती. वडिलांचा हिंदी गाण्यांना विरोधे होता; परंतु तरीही मी चोरून ती गाणी ऐकायचो. कॉलेजमध्ये शिकत असताना मित्रांच्या आग्रहामुळे अमिताभच्या आवाजाची सहज नकल केली आणि तेथून हा आवाज माझ्यासोबत आयुष्यभर राहिला. अनिलकुमार, अनुपम खेर या दिग्गजांना मी आवाज दिला. 'गुपचूप-गुपचूप' हे पहिले मराठी गाणे तर हिंदीत 'जलजला' मध्ये पाहिले गाणे गायले.
मी लिखित कार्यक्रम करत नाही. आज प्रत्येक माणूस तणावात आहे. त्यामुळे लोकांची निखळ करमणूक करायची, लोकांना हसवायचे हा आमचा प्रयत्न असतो. आमच्यासाठी प्रत्येक कार्यक्रम हा पहिला असतो. तो कार्यक्रम काहीतरी नवं नवं देऊन जातो. आमच्याकडे असे म्हणतात की बढ गया, तो रेट कम होता है. आम्ही कला मंचावर कार्यक्रम करतो, लोकांच्या आमच्याकडे नजरा असतात.त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागते. गेल्या ४५ वर्षापासून मी मराठी, हिंदी, गुजरातीमध्ये गात आहे. काम आले की करायचे. त्यामुळे इतक्या वर्षात गाणी किती गायली सांगता येणार नाही. पुणे, गोवा ही माझी आवडती ठिकाणे आहेत. आपल्या देशात इतकी चांगली ठिकाणे असताना लोक स्वित्झर्लंडला का जातात, हे समजत नाही.
सध्याचे संगीत आणि भवितव्य यावर भोसले म्हणाले, “रिअँलिटी शोमध्ये आज खूप लहान मुले चमकदार कामगिरी करत आहेत; परंतु या मुलांचे पुढे काय होते? यातील किती मुले कलाकार म्हणून मोठे होतात, लहान वयातच त्यांच्यावर वाईट परिणाम होतात. जगात त्यांच्यासारखा गायक नाही, असेच त्यांना दाखवले जाते. पालकही त्याला बळी पडतात. सहा महिन्यांत हा शो संपतो. नंतर या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार झाल्यामुळे प्रत्यक्षात वास्तवात जातात, तेव्हा हीच मुळे भविष्यात डिप्रेशन, ड्रग्जच्या आहारी जातात. पालकांनी मुलांवर अवास्तव ओझे लादू नये, त्यांना जे आवडते तेच करू द्यावे. कितीही कितीही हुशार असूद्या, पाल्यांना नॉर्मल ट्रीटमेंट द्या.”
No comments:
Post a Comment