तीन-चार वर्षांपासून हिंदी चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांनी पूर्वीप्रमाणे 300-400 कोटींचा व्यवसाय करावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी साऊथच्या यशस्वी चित्रपटांचा रिमेक बनवायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक रिमेक चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला.आणि इथूनच अशा चित्रपटांचे युग सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात रिमेक चित्रपट यशस्वी होऊ लागले. त्यामुळे अनेक निर्माते असे चित्रपट बनवायला लागले. दक्षिणेत यशस्वी ठरलेल्या चित्रपटांचेच रिमेक निर्माते करू लागले. मात्र आता चित्र बदलायला लागले आहे. अलीकडचे काही फ्लॉप चित्रपट पाहिले तर असे लक्षात येते की, दक्षिणेतील चित्रपटांच्या हिंदी रिमेकला प्रेक्षक नाकारताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा रिमेक चित्रपटांचे भविष्य काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
खरं तर बऱ्याच काळापासून बॉलिवूड निर्माते दक्षिण चित्रपटांचा रिमेक बनवू लागले आहेत. सुरुवातीच्या काळात त्याला यशही दणक्यात मिळत गेले. मुन्ना भाई एमबीबीएस, हाउसफुल, कबीर सिंह, दृश्यम ,वॉन्टेड ,गजनी, युवा, भूल भुलैया या चित्रपटांनी चांगली कमाई केली. या चित्रपटांना यश मिळण्याचे कारण असे की जेव्हा साऊथचे चित्रपट रिमेक झाले तेव्हा कथा एकच असली तरी चित्रपटाची संपूर्ण निर्मिती खूप वेगळी आणि स्वतंत्र होती. हिंदी प्रेक्षकांचा विचार करून चित्रपट बनवले जात. पण आज निर्माते चर्चित दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनवत आहेत. पण
त्यात आता वेगळा बदल झालेला दिसत नाही. चित्रपट जसेच्या तसे बनवले जात आहेत. प्रत्येक सीन एखाद्या साऊथ चित्रपटासारखा चित्रित केला जात आहे. कलाकारांव्यतिरिक्त, चित्रपटातील सर्व काही मूळ चित्रपटासारखेच राहते. अशा परिस्थितीत बॉलीवूडने बनवलेल्या साऊथ चित्रपटांचा रिमेक प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक मूळ चित्रपट ओटीटीवर पाहिलेले असतात. अशा स्थितीत मूळ चित्रपट पाहिला गेला असताना, रिमेकमध्ये नेमका तोच चित्रपट पाहण्यात प्रेक्षकांना रस वाटत नाही. इतकंच नव्हे तर गाणीदेखील मूळ चित्रपटातीलच टाकली जातात. त्यामुळेच बड्या स्टार्सच्या बिग बजेट रिमेक चित्रपटांनाही या चित्रपटात नवीन काहीही नसल्यामुळे फटका बसत आहे. एखादी गोष्ट वारंवार केली तर त्याचा कंटाळा येतो.
साऊथ चित्रपटांचे रिमेक ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. ही देवाणघेवाण प्रत्येक दशकात होत असते. एक तर दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या उपलब्ध असल्यामुळे बहुतेक प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिलेला असतो, साहजिकच मग इथे हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांची संख्या कमी भेटते. दुसरं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्नही निर्माण होतो की पुन्हा पुन्हा रिमेक का निर्माण केले जातात? किंवा असले चित्रपट पुन्हा पुन्हा का पाहायचे? आपण आपले खरे चित्रपट का निर्माण करू शकत नाही? तिसरे म्हणजे, दक्षिण आणि उत्तरेकडील भावनिकतेत थोडा फार फरक आहे, अशा परिस्थितीत अचूक नकल करणे थोडे कठीण जाते. त्यामुळे आगामी काळात निर्मात्यांनी येणाऱ्या चित्रपटांचा रिमेक करताना विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. विचारमंथन आवश्यक आहे. अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन सारख्या बड्या कलाकारांचे फ्लॉप चित्रपट पाहिल्यावर समजू शकतो.
अक्षय कुमारचा 'सेल्फी' आणि कार्तिक आर्यनचा 'शहजादा' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर रिमेक चित्रपट बनवणारे अनेक बॉलिवूड निर्माते आता घाबरले आहेत.त्यामुळे काही निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. तर काही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटांमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली आहे.अजय देवगण रिमेकच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे कारण त्याचे दोन्ही दाक्षिणात्य रिमेक 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' यशस्वी झाले आहेत. त्यामुळे अजय देवगणलाही 'भोला'कडून खूप आशा आहेत. अजय देवगणचा 'दृश्यम 3' देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. तसेच 'पुष्पा 2', 'कंतारा 2' देखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत.आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा साऊथ चित्रपट 'थडम'चा रिमेक आहे. सूर्या या नावाने जोसेफचा रिमेक बनवला जात आहे. दाक्षिणात्य चित्रपट स्टार्टअपच्या रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि राधिका मदान दिसणार आहेत. सान्या मल्होत्रा 'द ग्रेट इंडियन किचन'च्या रिमेक चित्रपटात दिसणार आहे.छत्रपतीच्या रिमेकमध्ये दाक्षिणात्य अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास दिसणार आहे. साहजिकच साऊथच्या रिमेक चित्रपटांना एकापाठोपाठ एक फटका बसला तर बॉलीवूडचे मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत कोणताही रिमेक चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याकडे खूप लक्ष देणे गरजेचे आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment