मुंबईला जे ग्लॅमर प्राप्त झाले आहे ते बॉलिवूडमुळे! इथे दरवर्षी शेकडो चित्रपट जन्माला येतात, त्यामुळे लोक या शहराला 'स्वप्नांचे शहर' असेही म्हणतात. ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर मुंबईशिवाय भारतात दुसरे कुठले शहर नाही. भारतीय चित्रपटसृष्टीच्या 104 वर्षांमध्ये, डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने मुंबईतील अनेक ठिकाणी आणि दीड डझनहून अधिक स्टुडिओमध्ये साकार झाली आहेत. या स्टुडिओंनी हजारो चित्रपटांना जन्म दिला आहे.
मुंबईच्या उपनगरातील गोरेगाव (पश्चिम) येथे चित्रपट निर्माते सशधर मुखर्जी आणि अशोक कुमार यांनी 1943 मध्ये स्थापन केलेला 'फिल्मिस्तान स्टुडिओ' हा मुंबईतील सर्वात जुना फिल्म स्टुडिओ आहे. यात रुग्णालय, जेल आणि पोलिस स्टेशन यांसारखे कायमस्वरूपी विविध 14 स्टेजेज आहेत.शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी या स्टुडिओतून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. या स्टुडिओमध्ये 'शहीद', 'जंजीर', 'ओम शांती ओम', 'रॉ वन' यांसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांचे शूटिंग झाले आहे. 'इंडियन आयडॉल' आणि 'नच बलिये' या टीव्ही शोचे बहुतांश भाग याच स्टुडिओमध्ये शूट झाले आहेत.
1958 मध्ये, सशधर मुखर्जी यांनी फिल्मिस्तान स्टुडिओची भागीदारी तोलाराम जालानला विकली आणि स्वतःचा स्टुडिओ 'फिल्मालय' स्थापन केला जो आता अस्तित्वात नाही.
1946 मध्ये, शिराज अली हकीम यांनी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ हाजी अलीच्या समोर महालक्ष्मी रेसकोर्सच्या मागे प्रसिद्ध स्टुडिओची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर ते फायनान्सर श्री रुंगटा यांनी विकत घेतले. ‘ताजमहाल’, ‘सीता और गीता’, ‘कन्यादान’, ‘हम साथ साथ हैं’ अशा अगणित चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओमध्ये झाले. यात रेकॉर्डिंग स्टुडिओ, पूर्वावलोकन (प्रिव्यू) थिएटर आणि 9 शूटिंग मजले आहेत. या ठिकाणी चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचीही सोय आहे. या स्टुडिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे चित्रीकरणासाठी वापरलेली उपकरणेही (इक्विपमेंट) भाड्याने दिली जातात.
आरके फिल्म स्टुडिओची स्थापना 1948 मध्ये बॉलीवूडचे दिग्गज निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर यांनी पूर्व मुंबई चेंबूरच्या उपनगरात केली होती. या स्टुडिओमध्ये राज कपूर यांनी 'आवारा', 'श्री 420', 'जिस देश में गंगा बेहती है' आणि 'मेरा नाम जोकर' यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली. राज कपूर यांच्या निधनानंतर देखभालीअभावी आता आर.के. स्टुडिओ ओसाड बनला. मात्र राज कपूर यांची आठवण असलेला 70 वर्षीय जुना आरके स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केला. मुंबईतील चेंबूर परिसरात 2.2 एकरमध्ये पसरलेला आरके स्टुडिओ रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्या मालकीचा होता. आरके स्टुडिओमध्ये 33,000 चौरस मीटर परिसरात आधुनिक निवासी अपार्टमेंट आणि लक्झरी रिटेल स्पेस बनविण्यात येत आहे.पूर्वी याठिकाणी होळी आणि गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यायचे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या वेळी उपस्थित राहत असत. 2017 मध्ये आरके स्टुडिओचा मोठा भाग आगीत भस्मसात झाला होता. यानंतर कपूर कुटुंबाने तो स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला.
चित्रपट निर्माते मेहबूब खान यांनी 1954 मध्ये हिल रोड, वांद्रे पश्चिम येथे सुमारे 20,000 स्क्वेअर यार्डमध्ये मेहबूब स्टुडिओची स्थापना केली होती. फिल्मसिटी आणि कमालिस्तान नंतर हा मुंबईतील तिसरा सर्वात मोठा स्टुडिओ आहे. यात रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि मेकअप रूम देखील आहे. याठिकाणी 'मदर इंडिया', 'कागज के फूल', 'गाईड' यांसारखे अनेक हिट आणि अविस्मरणीय चित्रपट शूट झाले. गुरु दत्त, देव आनंद, नासिर हुसेन यांसारख्या चित्रपट निर्मात्यांचा हा आवडता स्टुडिओ होता. मेहबूब स्टुडिओ अमिताभ बच्चन यांच्यासाठी संस्मरणीय आहे,कारण ते 1968 मध्ये पहिल्यांदा सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांना भेटले होते आणि त्यानंतर 'रेश्मा और शेरा'साठी स्क्रीन टेस्ट केली होती. सुनील दत्त त्यावेळी 'पडोसन'साठी डबिंग करत होते. आजही जेव्हा जेव्हा 'मेहबूब स्टुडिओ'चा उल्लेख होतो तेव्हा अमिताभ बच्चन फ्लॅशबॅकमध्ये जातात.
कमाल अमरोही यांनी 1958 मध्ये अंधेरी पूर्व येथे कमालिस्तान स्टुडिओ उभारला होता. 'मुघल-ए-आझम', 'पाकीजा' आणि 'अमर अकबर अँथनी' सारखे चित्रपट या ठिकाणी शूट करण्यात आले. मनमोहन देसाई आणि सुभाष घई या स्टुडिओला स्वतःसाठी खूप भाग्यवान समजत होते. सलमान खानच्या 'दबंग' आणि 'दबंग 2'चे बहुतांश शूटिंग याच स्टुडिओमध्ये झाले आहे. सध्या रोहित शेट्टीच्या 'गोलमाल 4'चे शूटिंग सुरू आहे.
गोरेगाव पश्चिम येथील ग्रीन झोनमध्ये 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला फिल्मसिटी हा मुंबईतील एकमेव सरकारी स्टुडिओ आहे. 1977 मध्ये स्थापन झालेले, फिल्मसिटी आपल्या नावाप्रमाणेच एक मोठे शहर आहे आणि संपूर्ण चित्रपट विश्वच येथे साकारले आहे. गेल्या चार दशकांपासून मुंबईत बनलेल्या बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओमध्ये होते. यामध्ये 'लवारीस', 'कर्ज', 'चांदनी', 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे', 3 इडियट्स आणि 'क्रिश' सारखे प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपट बनवले गेले. टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाचीही उत्तम व्यवस्था येथे आहे. 2001 मध्ये त्याचे नाव बदलून 'दादासाहेब फाळके चित्रनगरी' असे करण्यात आले. याठिकाणी सध्या 16 स्टुडिओ आणि 42 बाह्य स्थाने आहेत, ज्यात उद्याने, तलाव आणि मंदिरे, हेलिपॅड, नद्या, धबधबे आणि तलाव यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईत राज कमल, मोहन आणि सेठ स्टुडिओ होते, पण ते आता अस्तित्वात नाहीत. रिलायन्स, बालाजी फिल्म्स, यशराज स्टुडिओ हे अलिकडील स्टुडिओज आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment