'जब तक बैठने को कहा ना जाए शराफत से खड़े रहो' हे वाक्य ऐकलं की आपल्या समोर येतात ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे तर, जगभरातही करोडो चाहते आहेत. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. आपल्या करिअरमध्ये अमिताभ यांनी 'शोले' , 'डॉन', 'सिलसिला', 'शान', 'जंजीर “महान', 'कालिया' अशा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लटफार्मवरसुद्धा पाहता येणार आहे. आज अमिताभ बच्चन अजूनही चित्रपटात काम करतात. वेगवेगळी भूमिका करतात. पण एक काळ असा होता की त्यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. एकाच वेळी १२ चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही उत्सुक नव्हते. परंतु जेव्हा त्यांना 'जंजीर' चित्रपटासाठी कास्ट केले तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. यामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर 'विजय' हे पात्र साकारले होते, यानंतर चित्रपटसृष्टीत अमिताभ यांना 'एंग्री यंग मॅन' म्हणून ओळखले जाऊ लागले.
प्रकाश मेहरा प्रोडक्शनची पहिलीच निर्मिती आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित पाचवा चित्रपट ठरलेला ‘जंजीर’ बॉलीवूडमध्ये ॲक्शनपटांची लाट घेऊनच आला आणि याला कारण होतं त्यातून निर्माण झालेलं ‘अँग्री यंग मॅन’ नावाचं वादळ! अमिताभ बच्चन, जया, प्राण, ओम प्रकाश आणि अजित इत्यादी कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवरही यशस्वी ठरला होता. कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीने ‘जंजीर’साठी संगीत दिलं होतं तर गुलशन बावरा यांनी लिहलेल्या गाण्यांना मन्ना डे, आशा भोसले, लता मंगेशकर आणि मोहंमद रफी यांनी आपला आवाज दिला होता.
जंजीरची स्क्रिप्ट धर्मेंद्रने लेखक सलीम-जावेद यांच्याकडून आधीच विकत घेऊन ठेवली होती, पण नंतर ‘समाधी’च्या स्क्रिप्टच्या बदल्यात ती त्याने राकेश मेहरांना देऊ केली. त्याचवेळी मेहरांनी त्याच्याकडून विजयच्या रोलसाठी तारखाही मागितल्या होत्या वर स्वतः धर्मेंद्रनेच सहनिर्माता बनावे, अशी इच्छाही व्यक्त केली होती, जी धर्मेंद्रने मान्य केली. यानंतर नायिकेच्या भूमिकेसाठी मुमताजच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण कालांतराने धर्मेंद्र ही फिल्म करायचं टाळू लागल्यावर मेहरांनी त्याच्याशी बोलून हा करार मागे घेतला आणि देव आनंदला विजयची भूमिका देऊ केली. मात्र चित्रपटात आपल्यासाठीही गाणी हवीत हा देव आनंदचा हट्ट त्यांना पटला नाही, त्यामुळे ते त्यांची ऑफर घेऊन राजकुमारकडे गेले. राजकुमार तेव्हा मुमताजसोबतच मद्रासमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी मेहरांना मद्रासमध्येच हा चित्रपट शूट करायला सांगितलं पण मेहरांचा मुंबईमध्येच जंजीर बनवण्याचा निर्णय असल्याने, त्यांनी या फिल्ममधून माघार घेतली. त्यानंतर राजेश खन्ना यांनीही गाणी नसल्याने आणि दिलीपकुमार यांनीही भूमिकेत दम नसल्याचे सांगत काम करण्यास नकार दिला.
मोठमोठ्या स्टार्सने या फिल्मकडे पाठ फिरवल्यावर मेहरा अडचणीत सापडले होते पण यावेळी लेखक सलीम-जावेद व अभिनेते प्राण त्यांच्या मदतीला धावून आले. तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी मेहमूदने दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे टू गोवा’ पाहिला आणि त्यांना अमिताभची भूमिका प्रचंड आवडली. क्लबमध्ये शत्रुघ्न आणि त्याच्या साथीदारांची बेदरकारपणे धुलाई करणाऱ्या अमिताभच्या नजरेत त्यांना विजयच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेले भाव दिसले आणि अमिताभच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं.
‘जंजीर’ येईपर्यंत ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ वगळता अमिताभचा एकही चित्रपट हिट झाला नव्हता. नावाजलेल्या स्टार्सला नकार देऊन तब्बल बारा फ्लॉप चित्रपटांचा हिरो प्रकाश मेहरांनी आपल्या फिल्ममध्ये घेतल्याने त्यांचं दिवाळं निघणार, अशी उलटसुलट चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली. त्यात मुमताजनेही ऐनवेळी आपल्या लग्नाचं कारण पुढे करत चित्रपटातून माघार घेतल्याने मेहरा खचून गेले. त्यावेळी अभिनेत्री जया भादुरी हिला मेहरा आणि अमिताभकडून नायिकेच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आणि तिने लगेच आपला होकार कळवला. सुरुवातीला आपल्या खलनायकी भूमिकांसाठी नावाजले गेलेले आणि ‘जंजीर’ येण्यापूर्वी चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत स्थिरावू पाहणारे प्राण यांनी ‘आन बान’ (१९७२) नंतर पुन्हा एकदा ‘जंजीर’च्या निमित्ताने प्रकाश मेहरांशी हात मिळवणी केली.
‘जंजीर’ रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर झपाट्याने गल्ला जमवायला सुरुवात केली. रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात पाच रुपयांचं तिकीट ब्लॅकमध्ये १०० रुपयांना विकलं जाऊ लागलं. त्याच सुमारास, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडीयाचा ‘बॉबी’ही प्रदर्शनाच्या वाटेवर होता. कल्याणजी-आनंदजींनी संगीत दिलेल्या ‘जंजीर’च्या गाण्यांचा ‘बॉबी’च्या गाण्यांवर परिणाम होऊ नये, म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘जंजीर’च्या सर्वच कॅसेट्स आधीच विकत घेतल्या होत्या, असं प्रकाश मेहरा सांगतात. -अनिकेत ऐनापुरे, पुणे
No comments:
Post a Comment