त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराधुला बालसुब्रह्मण्यम असे होते.ते प्रसिद्ध पार्श्वगायक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता, अभिनेता, संगीत संयोजक, डबिंग कलाकार आणि चित्रपट निर्माता होते. ते आतापर्यंतचे सर्वात महान भारतीय गायकांपैकी एक मानले जातात.त्यांनी प्रामुख्याने तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसाठी काम केले आणि एकूण सोळा भाषांमध्ये गाणी गायली. दक्षिण भारतात त्यांची जितकी लोकप्रियता होती तितकीच ती हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आली.एसपी बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी नेल्लोर येथे झाला. लहान वयातच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि ते संगीत शिकले.त्याने अभियंता व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी इंजिनिअर होण्याच्या उद्देशाने जेएनटीयू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अनंतपूर येथे प्रवेश घेतला.
पण बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान संगीताचा सराव आणि गायन स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरूच ठेवले. त्यांनी या काळात अनेक बक्षिसे आणि पुरस्कार जिंकले. त्यांचे पहिले ऑडिशन गाणे होते 'निलावे एनीडम नेरुंगधे'. पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या चार वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेल्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचे सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.
तेलुगू सिनेमातील त्यांच्या कामासाठी पंचवीस आंध्र प्रदेश राज्य नंदी पुरस्कार तर कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारकडून आणि इतर अनेक राज्य पुरस्कार मिळाले.याशिवाय त्यांनी सहा फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. पन्नास हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.याशिवाय त्यांनी एका दिवसात तमिळमध्ये एकोणीस गाणी आणि हिंदीत सोळा गाणी रेकॉर्ड केली, हा रेकॉर्ड मानला गेला.2016 मध्ये, भारताच्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना भारत सरकारने पद्मश्री (2001), पद्मभूषण (2011) आणि पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित केले.
बालसुब्रह्मण्यम 1980 च्या दशकात 'शंकरभरम' या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय कीर्तीला पोहोचले. या चित्रपटाची गणना तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी 'फिल्मी संगीत' सौंदर्याचा वापर केला. त्यांचे हिंदी चित्रपटातील पहिले गाणे एक दुजे के लिए (1981), ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांची गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित होती, जसे की सागर संगम (1983) आणि रुद्रवीणा (1988), ज्यासाठी इलैयाराजा आणि बालसुब्रमण्यम या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचे राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. बालसुब्रमण्यम यांनी मैंने प्यार किया या चित्रपटात अभिनेता सलमान खानसाठी पार्श्वगायन केले.
'दिल दीवाना' गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बालसुब्रह्मण्यम यांचे लता मंगेशकर यांच्यासोबतचे 'दीदी तेरा देवर दीवाना' हे द्वंद्वगीत खूप गाजले. याने बालसुब्रह्मण्यम यांना भारतातील सर्वात मोठ्या पार्श्वगायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. एआर रहमानच्या 'रोजा' या डेब्यू चित्रपटात त्यांनी तीन गाणी रेकॉर्ड केली. त्यानंतर रहमानसोबत त्यांनी अनेक गाणी गायिली.त्यांनी कमल हासन, रजनीकांत, विष्णुवर्धन, सलमान खान, के.के. भाग्यराज, मोहन, अनिल कपूर, गिरीश कर्नाड, जेमिनी गणेशन, अर्जुन सर्जा, नागेश, कार्तिक यांच्यासह विविध कलाकारांना आवाज दिला.एसपी बालसुब्रमण्यम यांनी केजे येसुदास यांच्यासमवेत तेलुगू म्युझिकल रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रम पदुथा थेयागा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परीक्षक म्हणून काम केले.पडलानी उंडी, एंडारो महानुबावुलु आणि स्वराभिषेकम यांसारख्या इतर शोमध्ये देखील दिसला. त्यांचे कोरोनामुळे 25 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment