Sunday, May 10, 2020

'आंधी' चित्रपटाला झाली 45 वर्षे

खरोखर!  भारतीय चित्रपटसृष्टीत 'आंधी' चित्रपटाला एक अनोखा इतिहास आहे.  या चित्रपटातील उत्तम अभिनयाबद्दल संजीव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.  गुलजार यांचा 'आंधी'' हा चित्रपट रिलीज होऊन 45 वर्षे झाली आहेत.  भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट खरोखरीच 'वादळी' ठरला.  'आंधी'  हा चित्रपट 13 फेब्रुवारी 1975 रोजी भारतात प्रदर्शित झाला.  परंतु तो आणीबाणीचा काळ होता, त्यामुळे काही महिन्यांतच या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. असं म्हणतात की या चित्रपटाची कथा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पती यांच्या नात्यावर आधारित होता.  हेच या चित्रपटाच्या बंदीचे कारण होते.  1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर सत्ताधारी जनता पक्षाने या चित्रपटाला पुन्हा मान्यता दिली आणि शिवाय सरकारी दूरदर्शनवरसुद्धा प्रसारित केले.

 लेखक कमलेश्वर यांच्या 'काली आंधी' या कादंबरीवर आधारित  हा चित्रपट बनला होता. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाले.  'आंधी' या चित्रपटाची गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत.
श्रीनगरमधील ऐतिहासिक परी महल गार्डनमध्ये 'तुम आ गये  हो, नूर आया है…' हे गाणे चित्रित करण्यात आले होते.  'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं…' या चित्रपटाच्या सुंदर गाण्याचे चित्रण अनंतनाग येथील आठव्या शतकातील 'मार्तंड सन टेंपल' मध्ये झाले.  काश्मीरच्या पहलगाममध्ये 'इस मोड़ से जाते हैं…’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते.  किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांची 'आंधी' मधील सर्व गाणी हिट आहेत.  मोहम्मद रफी, अमित कुमार आणि भूपेंद्र सिंह यांनी गायिलेले ‘सलाम कीजिए आई हैं नामक…’  गाणेही खूप गाजले आहे.
'आंधी' चित्रपटातील बरीच पात्रं आज हयात नाहीत.  अभिनेता संजीव कुमार यांचे 6 नोव्हेंबर 1985 रोजी निधन झाले.  17 जानेवारी 2014 रोजी अभिनेत्री सुचित्रा सेन यांचेही निधन झाले.  दोघेही ‘आंधी’ चित्रपटाचे मुख्य पात्र होते.  सीएस दुबे, ओमप्रकाश, ओम शिवपुरी आणि ए.के. हंगल हेही जिवंत नाहीत.  संगीतकार राहुल देव बर्मनही आज नाहीत.  किशोर कुमार आणि मोहम्मद रफी साहेब यांचेही निधन झाले आहे.  गायिका लता मंगेशकर आणि 'आंधी' चित्रपटाचे दिग्दर्शक गुलजार साहेब हेच काय ते या चित्रपटाचे जिवंत पुरावे आहेत. कोणत्या भारतीय प्रेक्षकांना यांचा अत्यंत अभिमान आहे.
बंगाली सिनेमाचा वारसा समजल्या जाणार्‍या सुचित्रा सेनने फारच कमी हिंदी चित्रपट केले आहेत. दिलीप कुमार यांच्यासोबत 'देवदास' (1955), देवानंदसोबत 'बॉम्बे का बाबू' (1960 ) धर्मेंद्र आणि अशोक कुमार यांच्यासोबत 'ममता' (1966) आणि  संजीव कुमारसोबत 'आंधी' (1975)  असे मोजकेच हिंदी चित्रपट  सुचित्रा सेनने केले आहेत. सुचित्रा सेनचे हे चारही चित्रपट अजूनही संस्मरणीय आणि अप्रतिम मानले जातात. असे म्हणतात की दिग्दर्शक गुलजार यांनी केवळ सुचित्रा सेन यांच्यासाठी ‘आंधी’ हा चित्रपट लिहिला होता.  जर सुचित्रा सेन यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असता तर गुलजार साहेबांनी हा चित्रपटही काढला नसता.
सुचित्रा सेन यांची नात अभिनेत्री रायमा सेन असं म्हणते की माझ्या आजीने 'आंधी'मधील तिच्या पात्राला अजरामर करून टाकलं आहे.  रायमा म्हणाली, "आजीला आयुष्यभर 'आंधी'चाचा अभिमान  वाटत होता. गुलजार सरांनी  'आंधी' चित्रपटात आपला जीव ओतला होता.
खरोखर!  भारतीय चित्रपटसृष्टीत 'आंधी' चित्रपटाला एक अनोखा इतिहास आहे.  या चित्रपटातील उत्तम अभिनयाबद्दल संजीव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.  अभिनेत्री सुचित्रा सेन यांनाही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.  पण, दिग्दर्शक गुलजार!  ‘आंधी’ बनवूनही ते शांत बसले असते, तरीही  त्यांचा  हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला असता!  खरेच!  'आंधी' हा चित्रपट सदाबहार आहे.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...