Monday, May 11, 2020

अभिनेत्री प्राजक्ता वाडिये

'रात्रीस खेळ चाले' या झी वाहिनीवरील दुसऱ्या पर्वातील मालिकेत सरिताची भूमिका प्राजक्ता वाडिये हिने केली. ही मालिका आणि तिची भूमिका खूप गाजली. या प्राजक्ताचा जन्म कणकवलीतील तराळे गावातला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. लहानपणापासून तिला अभ्यासापेक्षा नृत्यात अधिक रस होता. आईवडिलांनीही तिला तिच्या आवडीसाठी प्रोत्साहनच दिले. शाळांमध्ये स्नेहसंमेलनात तिचा भाग हमखास असायचा आणि बक्षीसही!
अकरावीत असताना तिने तिच्या बाबांच्याच नाटकात काम केलं होतं. त्यांनी गावातल्या एका कार्यक्रमासाठी नाटक बसवलं होतं. या अभिनयासाठी तिला पारितोषिकही मिळालं. अशा रीतीने तिचा अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश झाला. त्यानंतर बाळा कदम लिखित 'गणपो लगीन करता' या मालवणी नाटकात काम केलं. ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी केलेल्या एका नाटकातही तिने काम केलं आणि तिला अभिनयासाठी पहिलं पारितोषिक मिळालं. नंतर तिने कणकवली येथील कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मध्ये कला शाखेतून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. या काळात स्थानिक नाटकांमध्ये तिचा अभिनय सुरू होता.
वसंतराव आसबेकर यांच्यामुळे मराठी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. मालवणी भाषा बोलत असल्याने सुरुवातीला तिला मराठी नाटकात काम करत असताना अडचणी आल्या, पण नंतर तिने यासाठी खूप सराव केला. मराठी बाराखडी आणि वेगवेगळी स्तोत्रे  मोठ्याने म्हणायचा उपक्रम तिने केला. कणकवली येथील युथ फेस्टिव्हल मधील एकांकिका मध्ये ती भाग घेऊ लागली. अभिनयासाठी बक्षिसेही मिळू लागली.
पुढे तिने मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमामुळे तिला नाटकाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला. दरम्यान, ती काही प्रायोगिक नाटकांमध्ये कामं करत होती. व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळावं म्हणून तिचा प्रयत्न सुरू होता. हा काळ तिच्यासाठी खडतर होता. तिला फारसं यश मिळत नव्हतं. मुंबईमध्ये वडिलांच्या पैशांतून चरितार्थ चालू होता. काहींनी तिला पार्टटाइम जॉब करण्याचा सल्ला दिला मात्र तिने तो स्वीकारला नाही. याच काळात संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' या चित्रपटात 'मनीषा' नावाची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली.  हा तिचा दुसरा चित्रपट! ती बारावीला असताना सुमित्रा भावे दिग्दर्शित 'घो मला असला हवा' या चित्रपटात तिला छोटीशी भूमिका करायला मिळाली होती. यानंतर तिने 'दिशा' चित्रपट केला. गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल मध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. या फेस्टिव्हल मध्ये तिला 'उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार' मिळाला. त्यानंतर 'बारायण' (मराठी), बस्तरसागा (छत्तीसगड) हे चित्रपट केले.
'गर्ल्स होस्टेल' या मालिकेतही काम करण्याची प्राजक्ताला संधी मिळाली. चित्रपट आणि मालिकांमध्ये लहान- मोठ्या भूमिका साकारत असतानाच तिला 'रात्रीस खेळ चाले'  या मालिकेच्या पहिल्या पर्वात महिला कॉन्स्टेबल ची भूमिका करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या पर्वातही तिला सरिता साकारायला मिळाली. याशिवाय काही नाटक, सिनेमांमध्येही कामं सुरू आहेत.तिला वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. यासाठी तिला संधीची प्रतीक्षा आहे.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...