Wednesday, June 24, 2020

सौंदर्यवती कटरीना

कटरीना कैफ. दिसायला देखणी, भरपूर उंची, अतिशय सुडौल बांधा, नितळ त्वचा, रेशमी केस, ओठांची किंचिंत हालचाल करताच उमलणारं नैसर्गिक हसू, डोळ्यांतील चमक आणि या सगळ्यांसोबत असणारा चेहऱ्यातला एक निरागस गोडवा. त्यामुळे तिचं हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निश्चित झालं. मुळात हिंदी फार न येणाऱ्या आणि अभिनयातही उठावदार कामगिरी नसताना तिनं यश मिळवलं आहे, हे विशेष! आज सतरा वर्षे झाली या इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण तिचं नाणं अजून खणखणीत चाललं आहे.

कटरीनाचा जन्म हॉंगकाँगचा. पण इथं येण्या अगोदरचं सगळं आयुष्य लंडनमध्ये गेलं. आई-वडिलांचा घटस्फोट झालेला त्यामुळे आठ मुलांसह ती या देशातून त्या देशात भ्रमंती करत राहिली. कटरीना या सगळ्यात मधली. आई हा सगळा गोतावळा घेऊन सुरुवातीला चीन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, बेल्जियन आणि स्पेन असा प्रवास करत शेवटी लंडनला स्थिर झाली. कटरीना मुळात सुंदर असल्याने तिला अगदी दहा-बारा वर्षांची असल्यापासून मॉडेलिंगसाठी विचारणा होऊ लागली. फारशी न शिकलेल्या कटरीनाने लंडनमध्ये मॉडेलिंगने आपल्या करिअरला सुरवात केली. लंडनमध्ये एकदा एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना बॉलीवूडच्या कैजाद गुस्ताद या निर्माता-दिग्दर्शकानं तिला पाहिलं. त्यावेळी ते 'बूम' चित्रपटाची निर्मिती करत होते. यासाठी त्यांना एका देखण्या तरुण मॉडेलची आवश्यकता होती. त्यांनी कटरीनाला भूमिकेविषयी विचारलं. आणि कटरीना नावाचं वादळ भारतात दाखल झालं.
'बूम' चित्रपट आपटला. तिला कोणी निर्माता काम देईना. याला एक कारणही होतं, ते म्हणजे तिला धडपणे हिंदी बोलता येत नव्हतं. ती दिसायला सुंदर असली तरी तीन तासांच्या चित्रपटात ती काम करणं अशक्य होतं. चित्रपट मिळत नसले तरी जाहिराती मिळत होत्या. त्यामुळे तिचा फ्रेश चेहरा घराघरात पोहचला. त्यातच किंगफिशरच्या कॅलेंडरवर तिची वर्णी लागल्याने तिची गणना सुपर मॉडेलमध्ये होऊ लागली. या काळात तिला तामिळ 'मल्लिस्वरी' चित्रपट मिळाला. याचं मानधन तिने इतर तामिळ अभिनेत्रींपेक्षा अधिक मिळालं होतं. मात्र कटरीनाला खरी ओढ बॉलिवूडची लागली होती आणि तिला सलमान खान भेटला. मग तिचं सारं आयुष्यच बदलून गेलं.
हिंदी चित्रपटसृष्टीत पाय रोवायचं असेल तर हिंदी शिकलं पाहिजे,याची तीव्र जाणीव कटरीनाला झाली.त्यामुळे तिनं थोड बहुत हिंदी शिकून घेतलं. सलमान खानने तिला 'मैंने प्यार क्यों किया' चित्रपटात संधी दिली. चित्रपट चालला. नंतर रामगोपाळ वर्मा यांनी तिला 'सरदार' चित्रपटात भूमिका दिली. भूमिका छोटी होती आणि त्यात मुलगी पाश्चात्य देशातून आल्याचे दाखवल्याने तेच दोषही झाकले गेले. मात्र अखेर तिच्या करिअरचा गाडा मार्गाला लागला. 'नमस्ते लंडन', 'पार्टनर', 'वेलकम', 'रेस', 'सिंग इज किंग', 'अजब प्रेम की गजब कहानी', ' दे दना दन' आणि 'राजनीती' या तिच्या चित्रपटांनी यश मिळवले. मात्र यात तिचा अभिनय कुठेच दिसून आला नाही.  'न्यू यॉर्क'चित्रपटात मात्र तिला थोडी बहुत अभिनयाची जाण असल्याचे दिसून आले. पण तिची अभिनय क्षमता सिद्ध करणारा तिचा एकही चित्रपट आला नाही.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...