Sunday, June 14, 2020

तेरे मस्त मस्त दो नैन...

डोळे अंतःकरणाचे आरसे आहेत म्हणून डोळे ओठांपेक्षा जास्त बोलतात.  जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळे हृदयाचे शब्द होतात, म्हणूनच बॉलिवूड चित्रपटात डोळ्यांच्या सौंदर्यावर बरीच गाणी बनली आहेत. रोमॅंटिक चित्रपट असो अथवा मारधाड असलेला चित्रपट. विनोदी असो अथवा सस्पेन्स सगळ्या चित्रपटांमध्ये नायक-नायिका यांची भेट होते, नजरानजर होते. दोघे डोळ्यांनी बोलतात.  हा सगळा नायक-नायिकेच्या प्रेमाचा खेळ असतो. त्याच्याशिवाय आपला हिंदी चित्रपट कधी पूर्णच होत नाही. प्रचंड रक्तपातानं बरबटलेले कुठलेही 'हिंसापट' काढा- तीन तासांच्या हाणामारीत पाच मिनिटांसाठी का होईना, पण मधूनच नायिका अवतरते.
सगळ्या 'महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या विसरून नायकही तिथं येतो. दोघंही एकमेकांना पाहतात. नेत्रपल्लवीच्या या नादात ती सलज्ज बाला मूकपणे आपली नजर झुकवून त्याच्या डोळ्यांना एका अर्थी प्रतिसादच देते. ती दोघं काहीही न बोलता मग त्यांचे डोळेच बोलू लागतात. म्हणूनच अनेक डोळ्यांवरल्या  गाण्यांत नायक- नायिकेपेक्षा डोळ्यांनाच अधिक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय.
प्रेमाचा केन्द्रबिंदू असलेल्या या डोळ्यांवर वेगवेगळ्या कल्पना करून गीतकार गाणी लिहीत गेले आणि त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. ही परंपरा थेट सैगल काळापासून चालत आलीय. कलकत्याच्या 'न्यू थिएटर्स' चित्रसंस्थेचा सैगल हा हुकमी गायक नट, स्वातंत्र्यपूर्व काळातील रसिक प्रेक्षक सैगल-जमुना या लोकप्रिय जोडीच्या चित्रपटांवर तुटून पडत, चाळीस सालच्या 'जिंदगी'मध्ये जमुनाच्या पाणीदार डोळ्यांची तारीफ करणारं एक सुरेख गाणं केदार शर्मानं लिहिलं होतं 'मै क्या जानू क्या जादू है, इन दो मतवाले नैनों में, जादू है...' एकीकडे नायिकेच्या जादूमय डोळ्यांची तारीफ करणारा सैगल 'माय सिस्टर'मध्ये मात्र तिच्या नयनबाणांनी अस्वस्थ होऊन उद्गारतो 'दो नैना मतवाले तिहारे, हम पर जुल्म करे...' आजही आपली लोकप्रियता टिकवून असलेली सैगलची ही दोन सोलो पंकज मलिकनं स्वरबद्ध केली होती.
'न्यू थिएटर्स'चा 'माय सिस्टर' १९४४ सालचा. त्याच वर्षी नौशाद मियाँचा रेकॉर्डब्रेकर 'रतन' येऊन धडकला. देखणी स्वर्णलता आणि करण, दिवाण ही यातली जोडी. परंतु चित्रपटाचे प्रमुख आकर्षण त्यातली गाणीच. नायक आपला टांगा येऊन शहरात जायला निघतो तेव्हा त्याला वाटेत अडवून त्याच्या खोड्या करीत ती त्याला"जाऊ देत नाही. तो ऐकत नाही, असं लक्षात येताच त्याची आर्जव करीत ती गाऊ लागते.
'अखियाँ मिला के, जिया भरमा के चले नही जाना...' बहारदार टेकिंगमुळे जोहर अंबालावालीच्या या गाण्याची खुमारी अद्यापही कायम आहे. याच आशयाचं आणखी एक गाणं 'फेमस पिक्चर्स'च्या 'बडी बहन'मध्ये होत. अल्लड कॉलेज युवतीची अवखळ भूमिका करणाऱ्या गीताबालीनं आपल्या पहिल्याच एन्ट्रीत गायला सुरवात केली. 'चले जाना नही, नैन मिला के, हाय सैंया बेदर्दी...' फिल्मिस्तानची चित्रनिर्मिती म्हणजे हलकेफुलके करमणूकप्रधान चित्रपट. सत्तेचाळीस सालच्या 'शहनाईनं तर सगळीकडे धुमाकूळ घातला होता. नायकाच्या प्रेमात पडून नंतर विरहाकूल झालेली रेहाना 'मार कटारी मर जाना...' म्हणताना सगळ्यांना बजावत होती- 'पर अखियाँ किसी से मिलाना ना...'अमीरबाई कर्नाटकीनं गायलेलं हे गाणं 'शहनाई'चा हायलाईट ठरलं. याच रेहानानं मदन
मोहनच्या 'अदा'मध्ये मात्र 'आँखो आँखो में उन से प्यार हो गया, मै ना जानू क्यू ये दिल बेकरार हो गया...' (लता) अशी खुल्या दिलानं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सुरैया-रेहमानचा 'प्यार की जीत' जेव्हा इंपिरिअल थिएटरला प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातली हिट गाणी थिएटरबाहेरच्या भिंतीवर सुवाच्य अक्षरात लिहिण्यात आली. ती वाचायला प्रेक्षकांची झुंबड उडे. त्यात सुरैयाने नायकावर सरळ सरळ चोरीचा आरोप करून म्हटलेलं 'तेरे नैनो ने चोरी किया, मेरा छोटासा जिया परदेसीया...' हे गाणं ठाऊक नसलेला रसिक विराळाच. अर्थात रेहमानही त्या काळातला तसा देखणा हिरो. म्हणूनच तर मधुबालासारखी सौंदर्यवती 'परदेस'मध्ये त्याच्या प्रेमात पडते तेव्हा तो गोंधळून जातो. तिच्याकडे पाहण्याचंही त्याला धाडस होत नाही. अखेर तिलाच पुढाकार घेऊन सांगावं लागतं'अखियाँ मिला के जरा बात करो जी, चोरी चोरी हम से मुलाकात करो जी..' गुलाम महंमदनं दिलेल्या लता आणि रफीच्या या ठेकेदार गाण्याची लज्जत न्यारीच!
इरसाल खलनायकी करणाऱ्या जीवननं पडद्यावर गाणं म्हणावं आणि तेही रफीच्या आवाजात, ही कल्पनाच आपण करू शकत नाही. परंतु बी. आर. चोप्रांच्या 'अफसाना' (१९५१) मध्ये त्यानं नृत्यांगना कक्कूसमवेत एक धमाल द्वंद्वगीत म्हटलं होतं. त्याचा मुखडा होता- 'चौपाटी में कल जो तुझ से आँख मटक्का हो गया...' त्यात रफीसोबत शमशादची टरेबाज आवाजाची साथ लाभलेली. अशाच प्रकारचा विनोदीबाज असलेलं एक सुरेख गाणं 'तरंग' चित्रपटात संगीतकार चित्रगुप्तनं स्वतःच गाऊन स्वरबद्ध केलं होतं. प्रेयसीच्या मदनबाणांनी हैराण झालेला हा प्रेमी तिच्यापुढे शरणागती पत्करून म्हणतो'सुनो मेरी सरकार, चले अब नैनो की तलवार, लो सीना खोल दिया...' डोळ्यांचा निळा रंग ही कपूर कुलोत्पन नायकांची आगळी खासीयत. त्यामुळे त्या रंगाचा संदर्भ घेऊनही काही गाणी तयार करण्यात आली. आर. के.च्या 'आवारा'त नायकाच्या फसव्या प्रेमानं दुखावलेली नर्गिस 'इक बेवफा से प्यार किया...' असे पश्चात्तापाचे सूर आळविताना मध्येच 'दे गई धोखा हमे नीली नीली आँखें' असा त्या डोळ्यांवर आरोप करून जाते. शम्मी
कपूरच्या 'दिल देके देखो'मधल्या कोवळ्या आशा पारेखनं तर त्याला 'बडे है दिल के काले, हा यही नीली सी आँखोवाले...' असं म्हणत चक्क शिव्याशाप घातले होते. मात्र त्याच शम्मी कपूरला 'जाने अंजाने' मधल्या लीना चंदावरकरनं 'तेरी नीली नीली आँखो के दिल पे तीर चल गए...' असं म्हणत स्वतःच्या प्रेमाची पावती देऊन टाकली.
अमिया चक्रवर्तीच्या 'दाग'मध्ये उषा किरणचं जवाहर कौलबरोबर प्रेम दाखविलं होतं. हातात मेंडोलिन घेऊन तिच्या मागे जाणाऱ्या या नायकाला उद्देशून ती गाऊ लागते- 'लागे जब से नैन लागे, मेरा दिल तो गया, क्या जाने क्या होगा आगे, जब से नैन लागे...' शंकर जयकिशननी दिलेलं लताचं हे सोलो फारसं लोकप्रिय ठरलं नाही. पण याच जोडीनं उडत्या चालीत
बांधलेलं 'नैनों से नैन हुए चार, आज मेरा दिल आ गया...' छान जमून गेलं. लतानं म्हटलेल्या या सोलो गीताबरोबरच शंकर जयकिशननी डोळ्यांवर बेतलेली 'नैन मिले चैन कहाँ' (बसंत बहार) आणि 'दिल की नजर से, नजरों की दिलसे (अनाडी) यासारखी हलकीफुलकी द्वंद्व गीतंही लोकप्रिय ठरली. गुरुदत्त-गीताबालीचा 'बाज' हा तसा सामान्य पोषाखी पट. ओ. पी. नय्यरचं ढंगदार संगीतही त्याला तारू शकलं नाही. गीताबालीची तडफदार भूमिका हीच याची जमेची बाजू. त्यात नायकाचे आभार मानण्यासाठी त्याच्या पुढे उभ्या ठाकलेल्या गीताबालीनं 'जरा सामने आ, जरा आँखे मिला, तेरा शुक्रिया कर दूँ अदा...' असं म्हणत पेश केलेलं हे गाणं गीतादत्तच्या नखरेल आवाजानं चांगलंच रंगतदार ठरलं होतं.
गीताबालीच्या नजरेला नजर देण्याचं धाडस गुरुदत्तला 'बाज'मध्ये झालं नसलं तरी 'मिस्टर अँड मिसेस ५५'ची नायिका मधुबाला मात्र त्याला प्रथमदर्शनीच आपल्या सौंदर्याची भुरळ घालते आणि हा खुळावलेला प्रेमी जॉनी वॉकरला स्वतःच्या मनाची अवस्था 'दिल पर हुआ ऐसा जादू, तबीयत बदल बदल गई, नजरे मिली क्या किसी से कि हालत मचल मचल गई...'या शब्दात कथन करतो. या नेत्रपल्लवीतून देव आनंद सुटला, तर तो चॉकलेट हिरो कसला? म्हणूनच 'सी. आय. डी.'मधल्या शकिलासमवेत प्रेमाच्या आणाभाका घेताना तो गाऊन गेला. 'आँखो ही आँखो में इशारा हो गया...' अर्थात
नुसत्या या गोडगोड प्रेमाव्यतिरिक्त गैरसमज, रुसवा, लटका राग असायलाच हवा. मग रागावलेल्या नायिकेची समजूत काढण्यासाठी रस्त्यावरच्या गाणाऱ्यांची मदत घेऊन 'लेके पहला पहला प्यार, भर के आँखो में खुमार, जादूनगरी से आया है कोई जादूगर...' अशी पुन्हा एकदा नव्यानं प्रेमाची
. खेळी खेळतो.
याच चित्रपटात ओ. पी. नय्यरनं डोळ्यांवर आणखी एक खुमासदार गाणं दिलं होतं. वहिदा रेहमाननं पडद्यावर पेश केलेल्या त्या ठेकेदार गाण्याचा मुखडा होता- 'कही में निगाहे, कही में निशाना...' बाकी ओ. पी. नय्यर अशा प्रकारची गाणी. देण्यात नेहमीच आघाडीवर ठरला. 'मिस्टर अॅण्ड मिसेस ५५ मध्ये आपलं हरवलेलं 'जिगर' शोधणाऱ्या जॉनी वॉकरला त्याची प्रेयसी 'बडी बडी अखियों से डर गया जी... असं उत्तर देऊन मोकळी झाली. 'आँखो की तलाशी दे दे, मेरे दिल की हो गई चोरी...' असं म्हणत आशा नाडकर्णीच्या डोळ्यांत शोध घेऊ लागला. शिवाय ओ. पी.च्याच 'कजरा मुहब्बतवाला'नं (किस्मत) त्या काळात अनेकांना वेड लावलं होतंच. कधी कधी डोळ्यांत लपलेलं हे प्रेमभाव नेमके जाणून घेण्यासाठी एकमेकांना प्रश्नही विचारले जातात. नवकेतनच्या 'नौ दो ग्यारह मध्ये बर्मनदांनी असंच एक खट्याळ गीत दिलं होतं. ती त्याला विचारतेय 'आँखों में क्या जी? आणि तो उत्तरतोय 'रूपहला बादल..' हे गाणं एवढं लोकप्रिय झालं, की पुढे गुरुदत्तच्या 'प्यासा'तही अशाच प्रकारचं संगीत देण्याचा मोह बर्मनदांना झाला. अतिशय सुंदर टेकिंग असलेल्या या गाण्यात सुटाबुटातला गुरुदत्त माला सिन्हासमवेत नृत्य करता करता तिच्या टपोऱ्या डोळ्यांतील भाव टिपू लागतो.
अचानक त्याला एक भन्नाट कल्पना सुचते नि तो तिला विचारतो- 'हम आप की आँखो में इस दिल को बसा दूँ तो?' परंतु पहिल्याच वेळी प्रियकराला प्रतिसाद देईल ती नायिका कसली? सरळ सरळ त्याला धुडकावून लावत तीच प्रतिप्रश्न करते 'हम मूंद के पलकों को उस दिल को गिरा दे तो?"खरंतर 'प्यासा' ही एक कवीच्या आयुष्याची शोकांतिका. परंतु हे हलकंफुलकं द्वंद्वगीत मात्र मनाला विरंगुळा निर्माण करतं. सुनील दत्त- मधुबालाच्या 'इन्सान जाग उठा'लाही बर्मनदाचं संगीत लाभलेलं. त्यात अशाच प्रकारात मोडणारं रफी आणि
आशाचं द्वंद्वगीत होतं. आपली प्रेयसी लाजेनं चूर झालेली पाहून तो विचारतो 'चाँद सा मुखडा क्यूँ शरमाया' तेव्हा थरथरत्या आवाजात ती उत्तरते 'आँख मिली और दिल घबराया... त्यानंतर बर्मनदांच्या या खास प्रश्नोत्तरी द्वंद्वगीताची लज्जत ओ. पी. रल्हनच्या बिग बजेट 'तलाश'मध्येही दिसून आली.
जातिवंत कविमनाच्या मजरुह सुलतानपुरीनं डोळ्यांना केन्द्रस्थानी ठेवून त्यांनाच बोलकं करण्याची सुंदर कल्पना आकाराला आणली नि राजेन्द्रकुमार त्या शर्मिलाला विचारू लागला- 'पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला, फिर से तो फरमाना...?' तिनंही मग आपल्या भावना तशाच शब्दांत मांडल्या- 'नयनों ने सपनों की महफिल सजाई है, तुम भी जरूर आना...' दादा बर्मननी या अर्थपूर्ण शब्दांना दिलेली आगळी सुरावट नि शर्मिलाचं पडद्यावर लोभसवाणं दिसणं, सगळंच अप्रतिम!
प्रेमाची धुंदी डोळ्यांत उतरल्यावर त्याला येणारा मादक नशीलेपणा भल्याभल्यांना घायाळ करून टाकतो.
अनेकांना तो साक्षात मदिरेच्या नशेप्रमाणे भासू लागतो. आपल्या प्रेयसीच्या सौंदयांचं अतिशय ओजस्वी वर्णन करणाऱ्या 'छाया'मधल्या सुनील दत्तला तिचे ते नशीले
डोळे पाहिल्यावर दुसरं काही न सुचता. 'आँखो में मस्ती शराब की,...' असं म्हणावंसं वाटतं आणि 'आरजू मधला भर पार्टीत साधनाचे डोळे बघून 'छल के तेरी आँखो से शराब और ज्यादा...' अशी गझल आळवून मोकळा होतो. मात्र राजेश खन्नासारख्या आधुनिक प्रेमवीराला प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या प्रियतमेच्या चक्क डोळ्यांत उतरल्याचा भास होऊन स्वतःच्या मनाची अवस्था 'गुलाबी आँखे, जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया...'अशी प्रकट करावी लागते.
प्रणयाचे विविध आविष्कार डोळ्यांतून व्यक्त झाल्यावर नायक-नायिकेचा विरह ओघानं आलाच. 1954 च्या 'परिचय'मध्ये शशीकला नायिका होती. नायक अभी भट्टाचार्यला नाइलाजानं तिच्याशी लग्न करता येत नाही, तेव्हा दारुण प्रेमभंग झालेल्या या नायिकेला हा अनपेक्षित आघात असह्य होऊन तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात- 'जल के दिल खाक हुआ, आँख से रोया न गया...' आणि '२६ जनवरी' चित्रपटातल्या नलिनी जयवंतला तर 'आँखे रोई मगर मुस्कुराना पडा' असं म्हणत आपलं दुःख दाबून टाकावं लागतं. लताच्या काही निवडक उत्कृष्ट सोलोत मोडणारी ही दोन गाणी नेमक्या कोणत्या शब्दांत वर्णावी, असा संभ्रम पडतो.
राज कपूरच्या 'बॉबी'मध्ये नायकनायिकेच्या विरहाची भावना व्यक्त करणारं 'अखियों को रहने दे, अखियों के
आसपास...' हे लताचं आणखी एक चांगलं सोलो चित्रपटात कोणाच्याही तोंडी न देता मोठ्या खुबीनं पार्श्वसंगीतात (बॅकग्राऊंडला) वापरण्यात आलं होतं. त्यानंतर प्रदीर्घ काळानं ऋषी कपूर- डिंपल ही जोडी 'सागर'मध्ये एकत्र आली. त्यात प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडलेला हा नायक तिचं नाव विचारायला जातो, तेव्हा ते सरळ न विचारता 'सागर जैसी आँखोवाली ये तो बता तेरा नाम है क्या?' असं नकळत वर्णन करून जातो.
आपल्या हिंदी चित्रपट संगीतात तसं पाहायला गेलं तर नुसत्या डोळ्यांची असंख्य गाणी सांगता येतील. 'जादू कर गये किसी के नैना' (लता -जिद्दी),नैन मिले, नैन हुए बावरे' (तलत/लता-तराना),'नैना है जादू भरे' (मुकेश- बेदर्द जमाना क्या जाने), 'जरा नजरों से कह दो जी (हेमंतकुमारकोहरा), 'नैना बरसे रिमझिम रिमझिम' (लता- वह कौन थी), 'पिया तोसे नैना लागे रे' (लता- गाईड-) वगैरे. अर्थात त्या सर्वांचा इथं समावेश करणं शक्य नाहीच. परंतु अशा प्रकारच्या गाण्यातून दिसून आलेला वेगळेपणा मात्र इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय. अलीकडच्या नव्या पिढीत जूही चावलाचे डोळे असेच टपोरे नि सुंदर आहेत. म्हणूनच 'डर'मधला शाहरुख त्याच्या आवडत्या किरणला 'जादू तेरी नजर' असं. योग्यच म्हणाला होता. परंतु रविनाचे डोळे  तसे नसतानाही आपला अजय देवगण 'कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखे...' असं तिचं गुणगान करतोच आहे. आणि काजोलच्या डोळ्यांचा रंग चक्क तपकिरी असूनही तिचं वर्णन- 'ये काली. काली आँखे...' असं करण्यात येतं.
त्यामानानं मग आपली माधुरी बरी! अभिनयाचा गंध नसलेल्या ठोंब्या संजय कपूरच्या प्रेमात पडून खुशाल 'अखियाँ मिलाए कभी अखियाँ चुराए, क्या तूने किया जादू...' असं म्हणत प्रेक्षकांवरच स्वतःच्या नयनबाणांचा जादूमय वापर करतेय. नंतरच्या काळात अभिनेत्री या चित्रपटांमध्ये फक्त 'शो पीस' राहिल्या. त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या दिसण्याकडे अधिक लक्ष दिले गेल्याने त्यांच्या डोळ्यांतले भाव गाण्यातून व्यक्त होत असले तरी प्रत्यक्षात मात्र नायिका असो वा नायक ते भाव त्यांच्या नजरेत पाहायला मिळणं अवघड आहे. पण म्हणून डोळ्यांवरची गाणी लिहायची थांबली नाहीत. ती लिहीत गेलीच आणि पुढेही लिहिली जात राहतील. आजही डोळ्यांवरली गाणी रसिकांच्या ओठांवर आहेत.आंखों की गुस्ताख़ियां माफ़ हों (फिल्म- हम दिल दे चुके सनम), आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं (फिल्म ओम शांति ओम), तेरे नैना बड़े दगाबाज़ रे - (फिल्म दबंग 2) ,सुरीली अंखियों वाले सुना है तेरी अंखियों में - (फिल्म वीर) कत्थई आंखों वाली एक लड़की (फिल्म डुप्लीकेट), तेरे मस्त-मस्त दो नैन (फिल्म दबंग)  तेरे नैना हंस दिए (फिल्म -चांदनी चौक टु चाइना), तेरी काली अंखियों से जिंद मेरी जागे - (फिल्म माय नेम इज़…), आँखों में 'तेरी अजब सी अदायें हैं (ओम शांती ओम) ही गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत. आँखों ने तुम्हां री (ईश्क विश्क) हे गाणं चित्रपट आपटला असला तरी कोणी विसरू शकत नाही.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...