Sunday, June 14, 2020

कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री: सितारादेवी

वाजपेयी सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला, तेव्हा 'भारतरत्न'पेक्षा खालचा किताब आपल्याला जाहीर करणे हा आपला अपमान आहे, असे सांगून सीतारादेवी यांनी तो परत केला.कथ्थकची प्रतिभाशाली नर्तकी म्हणून प्रसिद्ध राहिलेल्या सितारादेवी यांनी हिंदी चित्रपटांच्या एका जमान्यावर नायिका, खलनायिका व सहनायिका म्हणून आपला ठसा उमटवला होता.  वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी 'नृत्यसम्राज्ञी' हा किताब उत्स्फूर्तपणे दिला होता. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी कलकत्त्यात झाला. त्यांचे नाव धनलक्ष्मी, पण धन्नो म्हणूनच त्यांना ओळखीत.
आई मत्स्यकुमारी या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित आणि वडील वाराणसीचे संस्कृत पंडित. कोलकात्यात हे कुटुंब चरितार्थाकरिता आले, तेव्हा सितारादेवींचा १९२० मध्ये जन्म झाला. त्या वेळी चेहरा थोडासा बेढब होता, म्हणून आईवडिलांनी तिच्या आयाकडेच तिला ठेवले. आठव्या वर्षी तिला घरी आणताच तिच्या लग्नाचीच बोलणी सुरू केली. बऱ्याच आदळआपटीनंतर लग्न थांबले आणि तिला शाळेत जाता आले. वडील सुखदेवमहाराज हे नृत्यनिपूण होते. त्यांनी सितारादेवींच्या थोरल्या बहिणीला नृत्य शिकविले. त्या वेळी ती फक्त त्याकडे पाहत असे. ही थोरली बहिण म्हणजे तारा. तिच्या पोटी जन्मले नृत्य सम्राट गोपीकृष्ण, शाळेच्या एका नाटिकेत योगायोगाने तिला भूमिका मिळाली. तेव्हा तिने एका प्रसंगात नृत्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा लावून धरला. सत्यवान-सावित्रीमधील ही नृत्याची संधीच पुढे जागतिक कीर्ती मिळवायच्या धडपडीचा पाया ठरली. वयाच्या दहाव्या वर्षी तिने एकटीचा नृत्याविष्कार प्रकट केला. अकराव्या वर्षी आईवडिलांसमवेत सितारादेवींनी मुंबई गाठले. त्यावर्षी मुंबईच्या टाटा पॅलेसमध्ये तिच्या नृत्याच्या कार्यक्रमास गुरुदेव
रवींद्रनाथ उपस्थित होते. सितारादेवींनी त्या वेळी ५० रुपयांचे पारितोषिक स्वीकारताना गुरुदेवांकडे सितारादेवी यांनी आपण नृत्यात क्रांती करू, असा आशीर्वाद द्यायची मागणी केली. त्यांनी तो दिला आणि सितारादेवींनी तो शब्दशः खरा
केला.
त्याच वेळी विविध शहरांतून तिच्या नृत्याचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. चित्रसृष्टीतील निर्मात्यांचंही तिच्याकडे लक्ष गेलं. एक-दोन चित्रपटांत 'सोलो डान्स'पुरती आलेली सितारा १९३३ मध्ये 'औरत का दिल' ची नायिका म्हणून रूपेरी पडद्यावर चमकली. त्या काळच्या फिल्म कंपन्यांतून कलावंतांना मासिक वेतनावर करारबद्ध केलं जाई. सितारा १९३४ मध्ये साग़र मुव्हीटोनमध्ये 'अनोखी मुहब्बत'साठी नायिका म्हणून महिना पाचशे रुपये पगारावर रुजू झाली. त्यात तिचा नायक होता कुमार. तिथं तिनं शहर का जादू, कोकिला, जजमेंट ऑफ अल्लाह वगैरे चित्रपटांतून भूमिका केल्या. मेहबूब खाननी दिग्दर्शित केलेला १९३८ चा 'वतन' हा सिताराचा सागर कंपनीतील शेवटचा चित्रपट.
सागर मुव्हीटोनमध्ये काम करीत असतानाच सितारा कंपनी बाहेरच्या वसंतसेना, रेगिस्तान की रानी, प्रेमबंधनं, बेगुनाह वगैरे चित्रपटांतही चमकली. यातला 'प्रेमबंधन' (१९३६) ही कराचीमधल्या गोल्डन ईगल या बॅनरची निर्मिती. अर्थात त्याचं चित्रीकरण मात्र इथल्याच पॅरामाऊंट स्टुडिओत झालेलं. शिवाय आपल्या हंस पिक्चर्सनी सिराज हकीम यांच्या फिल्म सिटी स्टुडिओत चित्रित केलेला 'बेगुनाह' (१९३७) हा सिताराचा चित्रपट तर आचार्य अत्रे यांच्या कथेवर तयार करण्यात आला.ताडदेवच्या फिल्मसिटी स्टुडिओत
'बेगुनाह'च्या शूटिंगच्या वेळी तिथं रेकॉर्डिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या पी. एन. अरोराबरोबर सिताराची ओळख झाली आणि त्याच्या सहकार्याने तिला बागबान, पती-पत्नी, मेरी आँखे वगैरे चित्रपट मिळाले, परंतु बागबान किंवा मेरी आँखे हे त्यातले नायक अनुक्रर्मे बी. चंद्रशेखर आणि मजहरखान यांच्या अविस्मरणीय अदाकारीनं गाजले असले, तरीही 'मेरी
आँखे' मध्ये खलनायक ईश्वरलालची जोडीदारीण म्हणून सितारानं आपला थोडाफार ठसा उमटविला.
सात-आठ वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या भूमिकांमुळे सितारा चांगलीच गाजू लागली. मग ती रणजित मूव्हीटोनमध्ये महिना दीड हजार रुपये पगारावर दाखल झाली. चित्रपट होता १९३९ चा 'नदी किनारे' आणि नायक कुमार. मग अछूत, आज का हिंदुस्थान, होली, पागल, अंधेरा, दुखसुख असे चित्रपट तिला मिळत गेले. यातल्या 'अछूत'मध्ये अस्पृश्यांच्या
उद्धाराची समस्या प्रभावीपणे मांडलेली होती आणि 'आज का हिंदुस्थान' स्वदेशी मालाचा प्रचार करणारा होता. मोतीलाल, खुशीद, ईश्वरलाल आणि सितारा यांच्या भूमिकेनं सजलेल्या १९४० च्या 'होली'त सितारा खलनायिका बनली होती. त्याच वर्षी पडद्यावर आलेल्या 'पागल'मध्ये पृथ्वीराज कपूर आणि माधुरी नायकनायिका असले, तरी या 'पागल'ची खास आठवण म्हणजे त्यात एका प्रसंगी 'रोमिओ ज्युलिएट'चा नाट्यप्रवेश दाखविण्यात आला होता. त्या वेळी स्टेजवर ज्युलिएट बनलेल्या माधुरीसमवेत रोमिओ म्हणून चक्क पुरुषी वेषात सितारा वावरली होती.
रणजितचे हे चित्रपट करीत असताना नॅशनल स्टुडिओनं निर्मिलेला आणि अब्दुल रशीद कारदारनी दिग्दर्शित केलेला 'पूजा' (१९४०) हा चित्रपट झळकला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सितारा ज्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना स्थान देते, त्यात 'पूजा' हा पहिल्या क्रमांकाचा. (अलेले वतन आणि रोटी). कुमारी मातेची प्रक्षोभक कथा सांगणाऱ्या या चित्रपटात बलात्काराचं दृश्य प्रथमच पडद्यावर दाखविण्यात आलं. चाळिसाच्या दशकात सितारानं भूमिका केलेल्या चित्रपटांचा विचार करताना मेहबूब खाननी दिग्दर्शित केलेल्या रोटी (१९४२) आणि नजमा (१९४३) यांचा इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. 'रोटी'मध्ये समोर चंद्रमोहनसारखा जबरदस्त ताकदीचा अभिनेता असनही शेख मख्तारसारख्या आदिवासी शेतकऱ्याची गरीब, परंतु स्वाभिमानी पत्नी म्हणून सितारा भाव खाऊन गेली. शिवाय 'जोबन उमडाए नयन रसियाए...' आणि "आये आये मेघराज आये...' या अनिल सियासनी दिलेल्या दोन गाण्यांवरची सिताराची कृती चांगलीच गाजली.
नझीर हा त्या काळातील उमदा नट के. असिफचा तो मामा. सितारानं नझीरची नायिका म्हणून कलजुग, सोसायटी, आबरू, सलमा वगैरे चित्रपटांतून कामं केली. याचदरम्यान के. असिफनं मल्टिस्टार कास्ट 'फूल' (१९४५) ची निर्मिती सुरू करून सितारालाही त्यात सहभागी करून घेतल. पृथ्वीराज कपूर, वीणा, वास्ती, सुरेय्या, दीक्षित, मजहरखान यांसारखे तब्बल तेरा कलावंत एकत्र येऊनही के. असिफचा 'फूल' सपशेल आपटला.
मग त्यानं आपला पुढचा 'हलचल' दिलीप कुमार, नर्गिसला घेऊन सेटवर नेला. सितारा त्यात नायकावर एकतर्फी प्रेम करणारी खलनायिका बनली. नायिकेपासून त्याला तोडण्याचा तिचा विकृत खेळ अंगावर शहारे आणणारा होता. ऑपेरा हाऊस इथं १९५१ मध्ये पडद्यावर आलेला 'हलचल' बऱ्यापैकी धंदा करून गेला.
मग सितारानं चित्रसृष्टीतून निवृत्त होऊन आपलं सगळं लक्ष नृत्यावर केंद्रित केलं. अनेक ठिकाणी दौरे करून स्टेज शो सादर केले. आपल्या भारतीय चित्रपटांचा पहिला महोत्सव १९५५ मध्ये लंडन इथं आयोजित करण्यात आल्यावर तिथंही सितारानं -दिमाखदार नृत्ये करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
त्यानंतर मात्र सितारा पुन्हा पडद्यावर दिसली नाही. के. असिफच्या भव्यदिव्य 'मुगल-ए-आझम'मधली बहारची भूमिका आपल्याला मिळावी म्हणून तिनं खूप आटापिटा केला खरा; परंतु असिफ तेव्हा निगार सुलतानामध्ये गुंतल्यामुळे सिताराची वर्णी लागली नाही. तिचं खासगी आयुष्य अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरले होतंच. नझीर आणि के. असिफ या मामाभाच्यांबरोबर तिनं लावलेला 'निकाह', मग तडकाफडकी दिलेला 'तलाक' त्या काळी चर्चेचा विषय बनला होता. नामांकित कथ्थक नर्तिका म्हणून वेळोवेळी सन्मानित करण्यात आला. एका मुलाखतीत त्यांनी आज मुलींकडून ज्या 'कथ्थक'चे दर्शन घडते, त्यात भावना नसते. 'कथ्थक' मधील 'कथा' त्यापैकी कुणालाच दाखविता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कंठेमहाराज, सामता प्रसाद, किशनमहाराज, झाकिर हुसेन यासारख्या भल्याभल्यांनी त्यांना साथ केली आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि पद्मश्री त्यांच्या गाठीला असले तरी भारतरत्न किताब नाही, ही रुखरुख त्यांना सतावणारी आहे. मधुबाला, माला सिन्हा, रेखा, काजोल या अभिनेत्रींच्या त्या गुरु होत्या. 25 नोव्हेंबर2014 ला त्यांचं मुंबईत निधन झालं.


No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...