Friday, August 21, 2020

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

1962 मध्ये 'मला म्हणतात लवंगी मिरची' ही लावणी सुपरहिट झाली आणि सगळ्यांच्या तोंडी सुलोचना चव्हाण यांचं नाव आलं. विशेष म्हणजे या लावणीने त्यांचेही आयुष्य पार बदलून गेलं. पूर्वी त्या कोरसमध्ये गायच्या. हिंदी,मराठी,गुजराती,पंजाबी गाणी आणि बॅलेसाठी त्यांनी गायलं होतं. पण 'मला म्हणतात...'लावणीमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळालीच,पण इथून पुढे त्यांना फक्त लावणी गायनासाठीच बोलावले जाऊ लागले. 'नाव गाव कशाला पुसता', 'खेळताना रंग बाई होळीचा', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', 'राग नका धरू सजना', 'पाडाला पिकलाय आंबा', 'लाडे लाडे बाई करू नका' अशा एकापेक्षा एक सरस ,ठसकेबाज लावण्या सुलोचना यांनी गायल्या. आचार्य अत्रे यांनी त्यांना लावणीसाम्राज्ञी हा किताब दिला. 

सुलोचना या वयाच्या 11 व्या वर्षांपासून गायला लागल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या घरात संगीताचे वातावरण अजिबात नव्हते. कुणी गाणारे नव्हते.  त्यांना कुणी गुरू नव्हता. संगीतकार जेव्हा गाणं बसवायचे तेव्हाच त्यांना देण्यात आलेलं गाणं त्या त्यांच्याबरोबर बसून शिकायच्या. गाण्यातला मात्रा, ताल, शब्द सर्व काही तेव्हाच समजून घ्यायच्या आणि मग गायच्या. त्यांचं 20 व्या वर्षी लग्न झालं. त्यांच्या नवऱ्याने म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी त्यांना साथ दिली. तेही संगीत शिकले नव्हते, पण त्यांना लावणीचा ठसका,ताल, रुबाब समजत होता. त्यामुळे लावणी कशी गायची, त्यातले शब्द कसे उच्चारायचे, हे त्यांनीच सुलोचनाबाईना शिकवले. खऱ्या अर्थाने त्यांचे लावणीचे गुरू तेच ठरले. पहिली लावणी गाण्याची संधी संगीतकार वसंत पवार यांनी दिली. 'रंगल्या रात्री' या चित्रपटातील आणि जगदीश खेबुडकर लिखित 'नाव गाव कशाला पुसता , अहो मी आहे कोल्हापूरची ,मला म्हणतात लवंगी मिरची' ही लावणी लोकप्रिय झाली. नव्हे ही लावणी नंतर अजरामर झाली. सुलोचनाबाईनी आयुष्यभर कलेची सेवा केली. त्यांना 2010 मध्ये प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. 14 मार्च 2020 मध्ये त्यांनी 87 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आजच्या तरुण-तरुणींना त्या सांगतात की, एक दोन गाणी, एक दोन चांगले चित्रपट करणं म्हणजे संगीत करिअर नाही. तुम्ही संगीताची मनापासून सेवा व भक्ती केलीत तरच सरस्वती तुमच्यावर प्रसन्न होते. कोणत्याही पुरस्कारासाठी म्हणून कधीच काम करू नका.पुरस्कार मिळवणे, पैसा मिळवणे हे तुमचे लक्ष ठेवू नका. कलाकार म्हणून चार पैसे मिळाले की त्यातील दोन पैसे गरिबांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा. आजची पिढी हुशार आहे. चांगली गाणारी आहे. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी गाणं गाताना आणि संगीत देताना गाण्यातील अर्थ समजून घ्या. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...