Thursday, February 23, 2023

पहिल्याच चित्रपटातून भाग्यश्री बनली बॉलिवूड स्टार, हिरोपेक्षा तिप्पट घेतलं होतं मानधन


बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली शहरात झाला. त्यांचे वडील विजयसिंहाराजे माधवराव पटवर्धन हे सांगली संस्थानशी संबंधित आहेत. आईचे नाव राजलक्ष्मी. भाग्यश्री तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी. भाग्यश्री यांनी अभिनय करिअरची सुरुवात 1987 मध्ये 'कच्ची धूप' या टीव्ही मालिकेतून केली होती. या मालिकेनंतर 1989 मध्ये 'मैंने प्यार किया' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमान खानची भूमिका होती. या चित्रपटासाठी तिने सलमान खानपेक्षा तिप्पट मानधन घेतले होते. या चित्रपटासाठी भाग्यश्रीला एक लाख रुपये मानधन मिळाले होते, तर सलमान खानला 30 हजार रुपये.

'मैने प्यार किया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.  यानंतर भाग्यश्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, मात्र तिने नाकारल्या. कारणही तसंच होतं. या कालावधीत तिने तिचा मित्र हिमालय दासानी याच्याशी विवाह केला होता. एक तर तिने वडिलांच्या विरोधात जाऊन विवाह केला होता आणि सिनेमात काम करायला पती हिमालयचा विरोध होता. शेवटी महत्प्रयासाने हिमालयासोबतच तिला काम करायला परवानगी मिळाली. अन्य नटांसोबत काम करण्यासाठीचे दरवाजे तिला बंद झाले होते. हिमालयासोबत तिने तीन चित्रपट केले. मात्र ते सगळे चित्रपट आपटले. भाग्यश्री लग्नानंतर बराच काळ फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली.  2003 मध्ये त्यांनी संतोषी माँ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. काही कन्नड, तामिळ आणि तेलगू चित्रपटातही काम केले. यानंतर ही अक्षय कुमारच्या 'हमको दीवाना कर गये' या चित्रपटात दिसली.  त्याच वेळी 'रेड अलर्ट' आणि 'द वॉर विदिन' मध्ये भूमिका केल्या.त्यानंतर पुन्हा चित्रपटातून ब्रेक घेतला.
2014 मध्ये टीव्ही जगतात पुनरागमन केले आणि 'लौट आओ तृषा' मध्ये दिसली. टू स्टेट या चित्रपटात दिसली.  त्यांच्या संगोपनासाठी ती रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. 2021 मध्ये तिने कंगना राणौतचा चित्रपट 'थलायवी' आणि प्रभासचा चित्रपट 'राधे श्याम'मध्ये देखील काम केले. 2022 मध्ये भाग्यश्रीने पती हिमालय दासानीसह स्टार प्लस शो स्मार्ट जोडीमध्ये प्रवेश केला होता. अवन्तिका दासानी आणि अभिमन्यु दासानी ही तिची मुलं आहेत. अभिमन्यू बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे.  अभिमन्यूला त्याच्या 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.  तर भाग्यश्रीची मुलगी अवंतिका हिने मिथ्या या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, February 20, 2023

अन्नू कपूर यांना लोकप्रियता कशी मिळाली?


प्रत्येक संघर्षाच्या कथेत कुठेतरी एक यशोगाथा आणि त्याचे उदाहरण दडलेले असते. हातपाय मारल्याशिवाय यश किंवा ओळख मिळत नाही. ही गोष्ट केवळ सामान्य जीवनातच घडते असे नाही तर बॉलीवूड क्षेत्रातही चपखल बसते. वास्तविक बॉलीवूडमध्ये अभिनेत्याचा संघर्ष हा मोजमापाचा मापदंड मानला जातो. त्याच्या संघर्षाच्या काळ सोडून जर एखादा चेहरा ओळखला गेला आणि त्याने नाव कमावले तरी तो संघर्ष आणि 'स्ट्रगलर'चा शिक्का त्याची पाठ सोडत नाही.  असंच काहीसं अन्नू कपूरसोबतही घडलं आहे. अभिनेता अन्नू कपूरने बॉलिवूडमध्ये 40 वर्षे पूर्ण केली आहेत.  चार दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत, त्यांनी एकापेक्षा जास्त प्रभावी भूमिका केल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले.  मात्र कधी काळी त्यांना यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे.

20 फेब्रुवारी 1956 हा अन्नू कपूर यांचा जन्मदिवस.  चहा आणि खाण्या- पिण्याच्या वस्तूंचे दुकान चालवणारा सामान्य माणूस पुढे मेहनत, जिद्दीच्या जोरावर  हिरो झाला. अन्नू कपूर यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते, पण त्यांच्या नशिबात वेगळेच काही लिहिले होते.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्नू कपूर मुंबईला आले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या तेजाब चित्रपटात त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका म्हणजे त्यांच्याच  आयुष्यातील चित्र रेखाटले  आहे. अन्नू कपूर यांना अभिनयाची आवड होती.  या आवडीमुळे अन्नू कपूरने चित्रपटात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. अन्नू कपूर एकदा म्हणाले होते की दु:ख वाटून घेतल्याने मन हलके होते आणि सत्य सांगून हौसले अधिक बुलंद होतात. अन्नू कपूर अजूनही ही गोष्ट पाळतात.  अन्नू कपूर यांना बॉलीवूडमध्ये 40 वर्षे झाली आहेत आणि इतक्या मोठ्या कालावधीत त्यांनी करिअरपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत.आज लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अन्नू कपूरला एकेकाळी क्षुल्लक नोकऱ्या करून उदरनिर्वाह करावा लागला होता, याची कल्पना कोणालाही नसेल.त्यांचा करिअरचा संघर्ष आणि अडचणीत हसण्याची जिद्द ही एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. 

भोपाळच्या इतवारा येथे जन्मलेल्या अन्नू कपूरच्या कुटुंबाचा चित्रपट जगताशी थेट संबंध नव्हता, पण कुठेतरी त्यांचे वडील आणि आई इंडस्ट्रीशी जोडले गेले होते. अन्नू कपूरचे वडील पारशी थिएटर कंपनी चालवत होते आणि त्यांनी शहरांमध्ये नाटकांच्या निमित्ताने फिरले होते, तर त्यांची आई शिक्षिका आणि शास्त्रीय गायिका होती. आजोबा ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते, तर पणजोबा लाला गंगाराम कपूर हे क्रांतिकारक होते ज्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फाशी देण्यात आली होती. अन्नू कपूर यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती.  यामुळे अन्नू कपूर यांना मध्येच शाळा सोडावी लागली. अन्नू कपूरच्या आईला 40 रुपये पगार मिळत असे.  एवढ्या पगारात घर चालवणे शक्य नव्हते. वडिलांच्या सांगण्यावरून अन्नू कपूर थिएटर कंपनीत रुजू झाले आणि नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथे अन्नू कपूरने 'एक रुका हुआ फैसला' हे नाटक केले, ज्याने त्यांचे नशीब बदलले. अन्नू कपूर यांनी या नाटकात ७० वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती.  अन्नू कपूरच्या अभिनयाने श्याम बेनेगल प्रभावित झाले आणि त्यांनी 1983 मध्ये आलेल्या 'मंडी' या चित्रपटात या अभिनेत्याला साईन केले. अन्नू कपूर यांची चित्रपटांमध्ये सुरुवात अशी झाली.  पण 'मंडी'पूर्वी अन्नू कपूर 1979 मध्ये 'काला पत्थर' या चित्रपटात दिसला होता.  मात्र या चित्रपटात त्याला कोणतेही श्रेय देण्यात आले नव्हते.

Sunday, February 19, 2023

अजित देवळे यांनी कोणकोणते चित्रपट दिग्दर्शित केले आहेत?


 मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक अजित देवळे यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात २०१२ पासूनच केली आहे. त्यांनी एकूण १२ मालिका केल्या आहेत. त्यातील स्वप्नांच्या पलिकडले, घाडगे ऍन्ड सून या सुपरहिट ठरल्या. २०१४ मध्ये 'आशियाना' हा त्यांचा पहिला चित्रपट आला. 'डा. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली. एडिटर म्हणून सात मराठी चित्रपट केले आहेत, त्यात 'हृदयांतर' हा शेवटचा चित्रपट आहे. आता त्यांनी दिग्दर्शित केलेला  'मसुटा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मसुटा म्हणजे मराठीमध्ये 'स्मशानभूमी'. गावाकडच्या ठिकाणी, सोलापूर या भागात स्मशानाला मसुटा असे म्हणतात. आपल्याकडे जसे 'स्मशानात जाऊन मर' म्हणतात, तसेच तिकडे “मसुट्यात जाऊन मर' बोलतात. स्मशानभूमीसाठी पर्यायी शब्द त्यांनी शोधून काढला. शब्दातच आम्हाला गंमत वाटली, म्हणून चित्रपटाला मसुटा' नाव देण्यात आले आहे. लोकप्रिय लेखक आणि दिग्दर्शक अजित देवळे यांचा 'मसुटा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनेष लोढा आणि भरत मोरे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मसणजोगी कुटुंबाची व्यथा मांडण्यात आली आहे. 

लोकांचे मनोरंजन करणे मला आवडते:सुदेश भोसले


“प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन शिकायला मिळते. 'जुम्मा चुम्मा' हे गीत 19 भाषांमध्ये गायले. सतत म्हणजे 24 तास गाणी ऐकत राहणे, हाच माझा रियाज आहे. इच्छा असो अथवा नसो, एकदा स्टेजवर पाय ठेवला की दुखणे पळून जाते, कळत नाही... तिथे काय जादू होते हे लक्षातही येत नाही. रसिक मायबाप हीच आमची ऊर्जा आहे...” ही भावना 64 वर्षीय सुप्रसिद्ध गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे व्यक्त केली. “मी फक्त एंटरटेनर आहे, लोकांचे मनोरंजन करणे मला आवडते,” असेही ते म्हणाले, 

आविष्कार कल्चरल ग्रुपतर्फे आयोजित संगीत महोत्सवाच्या निमित्ताने इस्लामपुरात आलेले, अमिताभ बच्चन यांच्या आवाजासाठी सुप्रसिद्ध असलेले गायक सुदेश भोसले यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “1982 पासून खऱ्या अर्थाने करिअर सुरू झाले. अशोककुमार आणि प्रमोदकुमार सराफ यांच्याबरोबर पुण्यातल्या ‘मेलडी मेकर्स' हा 61 वर्षे जुना असलेला ऑकेस्ट्रा जॉईन केला. संपूर्ण जगभर कार्यक्रम केले. 1990 ला 'जुम्मा-चुम्मा' या गाण्याने स्वतंत्र ओळख दिली. जगात सगळीकडे हिंदुस्तानी, पाकिस्तानी आणि अफगाणी लोक आहेत ते आपल्या संगीताचे चाहते आहेत. एक कलाकार म्हणून मनापासून दाद द्यायला ते येतात. आई सुमन आणि आजी दुर्गाबाई शिरोडकर या माझ्या खऱ्या गुरू आहेत. कोणत्याही प्रकारचे संगीत शिक्षण न घेता अपघाताने या क्षेत्रात आलो. वडील चांगले पेंटर होते. जुन्या सिनेमांचे पोस्टर्स ते बनवायचे. मीही हळूहळू चित्रांकडे वळलो. मेलडी मेकर्सचे मालक यांच्या कन्येशी म्हणजे हेमाशी त्यांचा विवाह झाला. आज त्यांचा मुलगा सिद्धांत हिंदी- मराठी आणि जुनी नवी गाणी म्हणत आहे. कन्या पेंटिंग करते. 

पुढे त्यामध्येच करिअर होईल, असे वाटत असतानाच अचानक संगीत क्षेत्रात आलो. घरातील सांगीतिक वातावरणामुळे आठव्या वर्षी मला दोनशे गाणी पाठ होती. वडिलांचा हिंदी गाण्यांना विरोधे होता; परंतु तरीही मी चोरून ती गाणी ऐकायचो. कॉलेजमध्ये शिकत असताना मित्रांच्या आग्रहामुळे अमिताभच्या आवाजाची सहज नकल केली आणि तेथून हा आवाज माझ्यासोबत आयुष्यभर राहिला. अनिलकुमार, अनुपम खेर या दिग्गजांना मी आवाज दिला. 'गुपचूप-गुपचूप' हे पहिले मराठी गाणे तर हिंदीत 'जलजला' मध्ये पाहिले गाणे गायले.

मी लिखित कार्यक्रम करत नाही. आज प्रत्येक माणूस तणावात आहे. त्यामुळे लोकांची निखळ करमणूक करायची, लोकांना हसवायचे हा आमचा प्रयत्न असतो. आमच्यासाठी प्रत्येक कार्यक्रम हा पहिला असतो. तो कार्यक्रम काहीतरी नवं नवं देऊन जातो. आमच्याकडे असे म्हणतात की  बढ गया, तो रेट कम होता है. आम्ही कला मंचावर कार्यक्रम करतो, लोकांच्या आमच्याकडे नजरा असतात.त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागते. गेल्या ४५ वर्षापासून मी मराठी, हिंदी, गुजरातीमध्ये गात आहे. काम आले की करायचे. त्यामुळे इतक्या वर्षात गाणी किती गायली सांगता येणार  नाही. पुणे, गोवा ही माझी आवडती ठिकाणे आहेत. आपल्या देशात इतकी  चांगली  ठिकाणे  असताना लोक  स्वित्झर्लंडला का जातात, हे समजत नाही.

सध्याचे संगीत आणि भवितव्य यावर भोसले म्हणाले, “रिअँलिटी शोमध्ये आज खूप लहान मुले चमकदार कामगिरी करत आहेत; परंतु या मुलांचे पुढे काय होते? यातील किती मुले कलाकार म्हणून मोठे होतात, लहान वयातच त्यांच्यावर वाईट परिणाम होतात. जगात त्यांच्यासारखा गायक नाही, असेच त्यांना दाखवले जाते. पालकही त्याला बळी पडतात. सहा महिन्यांत हा शो संपतो. नंतर या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार झाल्यामुळे प्रत्यक्षात वास्तवात जातात, तेव्हा हीच मुळे भविष्यात डिप्रेशन, ड्रग्जच्या आहारी जातात. पालकांनी मुलांवर अवास्तव ओझे लादू नये, त्यांना जे आवडते तेच करू द्यावे. कितीही कितीही हुशार असूद्या, पाल्यांना नॉर्मल ट्रीटमेंट द्या.” 

एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या 'लगान' आणि 'गदर' या आयकॉनिक चित्रपटांमध्ये बाजी मारली कोणी?


15 जून 2001 रोजी गदर रिलीज झाला.  पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी आणखी एक मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला होता. तो म्हणजे आमिर खानचा 'लगान' चित्रपट.  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यांनी इतिहास रचला आहे. त्यापैकीच एक सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट होता. यामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती.  आता या सिनेमाचा सिक्वेल 'गदर 2' बनवला जात आहे. सनी आणि अमिषा पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटासोबत अमिरखानचा 'लगान'देखील प्रदर्शित झाला होता. आशुतोष गोवारीकर यांचा 'लगान' हा स्पोर्ट्स ड्रामा होता.  या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.  पण आता प्रश्न असा आहे की त्या काळात या दोन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली होती. 

वास्तविक हे दोन्हीही चित्रपट 2001 मध्ये सुपरहिट ठरले होते. दोघांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.  'गदर' 19 कोटींच्या बजेटमध्ये तर 'लगान' 25 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. दोन्ही चित्रपट अभूतपूर्व होते, पण एका गोष्टीबाबतीत 'लगान' सनीच्या 'गदर' चित्रपटापेक्षा मागे राहिला. ते म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन.  1994 च्या 'हम आपके है कौन' नंतर अनिल शर्माच्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला. अहवालांनुसार  'लगान'चे एकूण कलेक्शन 65.97 कोटी इतके आहे.  तर 'गदर'चे कलेक्शन 133 कोटी इतके आहे. गदर त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. दुसरीकडे, आमिर खानचा चित्रपट पुरस्कारांच्या बाबतीत मात्र गदरपेक्षा सरस ठरला. लगानला 49 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आठ श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.  याशिवाय 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' या श्रेणीत अकादमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.


बाहुबली 2'वर 'बादशाह'ने बाजी मारली, प्रभासच्या चित्रपटाला मागे टाकत 'पठाण'ने केला विक्रम


शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा जास्त रेकॉर्ड तोडण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.  शाहरुखचा 'पठाण चाहत्यांना खूप आवडला आहे.२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बादशाहच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की, लोक त्याच्या तिकिटासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होते. त्याचवेळी शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे 'पठाण'ने बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, पठाणने आपल्या उत्कृष्ट कामाईने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे आणि कामाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. 'पठाण'ने कमाईच्या बाबतीत साउथ चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली 2'ला मागे टाकत हा विक्रम केला आहे. पठाणने रिलीजच्या 25 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हिंदीमध्ये 3.25 कोटी आणि इतर भाषांमध्ये 7 लाखांचा गल्ला जमवला आहे. यानंतर, पठाणचे सर्व भाषांमधील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 511.60 कोटी रुपये झाले आहे.

शाहरुख खानच्या पठाणने साऊथ सुपरस्टार प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड मोडला आहे.  रिपोर्ट्सनुसार, बाहुबलीची एकूण कमाई 510.99 कोटी रुपये होती. यासह पठाण हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाणने चार दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2' ने ऑस्ट्रेलियात 4.50 दशलक्ष डॉलर (रु. 25.71 कोटी) चे एकूण कलेक्शन केले होते, तर सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' ने 4.51 दशलक्ष डॉलर (रु. 25.77 कोटी) कमावले होते. केवळ बाहुबली 2च नाही तर सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' ने आपल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर दक्षिण चित्रपटातील ब्लॉकबस्टर चित्रपट KGF Chapter 2, RRR, टायगर जिंदा है, दंगल आणि वॉर सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यासह पठाण बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...