Sunday, March 19, 2023

अभिनेता शाहिद कपूरच्या कारकिर्दीची वीस वर्षे


शाहीद कपूरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज त्याला बॉलिवूड मध्ये येऊन वीस वर्षे झाली. बॅकग्रआऊंड डान्सर म्हणूनही त्याने सुरुवातीच्या काळात काम केलं. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने विवाह, जब वी मेट, कमीने, उडता पंजाब, उडता पंजाब, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. 

शाहिद कपूरचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्लीत झाला. वडिलांचे नाव पंकज कपूर आहेत, जे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता निर्माता आहेत.त्यांच्या आईचे नाव नीलिमा अझीम आहे. त्याला 3 भावंडे आहेत - सना कपूर, ईशान खट्टर आणि रुहान कपूर. ईशान खट्टरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहिद कपूर हा आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे, परंतु त्याने यापूर्वी टीव्ही जाहिरातींमध्ये आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केले आहे. 'इश्क विश्क' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या शाहिदने पहिल्याच चित्रपटातून  प्रेक्षकांची मने जिंकली. त्या काळात विशेषतः मुलींमध्ये रोमँटिक हिरोंची खूप क्रेझ दिसून येत होती. 

या चित्रपटासाठी शाहिदला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता.यानंतर 2006 मध्ये सूरज बडजात्याचा 'विवाह' हा चित्रपट खूप गाजला. त्याचवेळी 2007 मध्ये आलेला इम्तियाज अलीचा 'जब वी मेट' हा शाहिदच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील यादगार चित्रपटांमधला एक गणला जातो. 2009 मध्ये, शाहिदला विशाल भारद्वाजच्या 'कमिने' या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली. यादरम्यान त्यांनी दिल बोले हडिप्पा, चांस पे डान्स, पाठशाला, बदमाश कंपनी, मिलेंगे मिलेंगे, मौसम आणि तेरी मेरी कहानी या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.  2013 साली शाहिदचे 'फटा पोस्टर निखला हिरो ' आणि 'आर राजकुमार'  हे चित्रपट प्रदर्शित झाले.   प्रभुदेवा दिग्दर्शित आर राजकुमारला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले. या चित्रपटात शाहिदने आपल्या जबरदस्त अॅक्शन सीन्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. 

शाहिदचा 'हैदर' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपटातील दमदार अभिनयासाठी शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 'पद्मावत' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. कबीर सिंग हा शाहिदचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहिदची करीना कपूरसोबतची जोडीही छान जमली होती.  या दोघांच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. शाहिद आणि करिनाच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत राहिल्या. मात्र, करिनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. विशेष म्हणजे मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे, पण दोघांचे बाँडिंग पाहून तुम्हीही म्हणाल की, दोघांमधील वयाचे हे अंतर फक्त सांगायला आहे. मीरा आणि शाहिदचे 2015 साली लग्न झाले होते. दोघांनी अरेंज मॅरेज केले होते.  मीरा आणि शाहिदचे काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्ये एका खाजगी समारंभात लग्न झाले. दोघांना दोन लाडकी मुलं आहेत, ज्यांची नावे मीशा कपूर आणि झैन कपूर आहेत. अलीकडेच त्याने 'फर्जीं ' द्वारा वेबमालिकेद्वारा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...