बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, कंगना आणि आलिया भट्ट सारख्या अनेक सुंदर आणि प्रतिभावान कलाकार आहेत. ज्यामध्ये काहींनी त्यांच्या अभिनयाने तर काहींनी त्यांच्या अफाट सौंदर्याने चाहत्यांना चकित करून सोडले आहे. प्रत्येकजण नाव आणि प्रसिद्धीबरोबरच भरपूर पैसा कमावत आहे. चित्रपट, म्युझिक व्हिडीओ किंवा जाहिरातीसाठी करोडोंचे शुल्क आकारत आहेत. दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला आजची ड्रीम गर्ल किंवा नंबर वन अभिनेत्री म्हटल्यास काहीच गैर नाही. तिला तिच्या अप्रतिम सौंदर्य आणि प्रतिभेच्या अप्रतिम संयोगामुळे हे स्थान मिळाले आहे. तिच्या अलीकडच्या 'पठाण' चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे. आज ती तिच्या एका चित्रपटासाठी 20 ते 30 कोटी रुपये घेते.
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्राला आज आंतरराष्ट्रीय स्टारचा दर्जा मिळाला आहे. तिने हिंदीसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची जादू दाखवली आहे. ती एखाद्या चित्रपटासाठी किंवा मालिकेसाठी 20 ते 25 कोटी रुपये घेते. आत्तापर्यंत प्रियांका चोप्राला काळजी सतावत होती की, जेव्हा ती पुरुष स्टार्सइतकीच मेहनत करते, तर मग तिला त्यांच्या इतके मानधन का मिळत नाही, पण एका बातमीनुसार, पहिल्यांदाच तिला तिच्या आगामी 'सिटाडेल' मालिकेसाठी पुरुष स्टार्सच्या बरोबरीने मानधन मिळाले आहे. खुद्द प्रियांकानेही ही गोष्ट मान्य केली आहे.
कंगना राणौतला बॉलिवूडची 'क्वीन' म्हटले जाते. ती प्रियांका चोप्रा आणि दीपिका यांच्याइतकी सुंदर नसली तरी तिच्या प्रत्येक पात्राला जिवंत करण्यासाठी मेहनत घेण्याबाबत ती त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. कमाईच्या बाबतीत ती 15 ते 20 कोटी रुपये घेते. कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही ती स्वत: करत आहे. इमर्जन्सी मध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.कटरिना कैफ लग्नानंतर तिच्या करिअरच्या बॅकफूटवर असली तरी तिच्याकडे अजूनही बरेच प्रोजेक्ट्स आहेत. ती अजूनही बॉलीवूडमधील उच्च मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि एका चित्रपटासाठी ती 15 ते 20 कोटी रुपये घेते. सलमानसोबतच्या तिच्या 'टायगर 3'ची तिचे चाहते वाट पाहत आहेत.
लग्नानंतर आलिया लगेच आई बनली,पण आता ती तितक्याच लवकरच तिच्या कामावर परतण्याच्या मूडमध्ये आहे. तिला माहित आहे की अभिनेत्रीकडे काम करण्यासाठी जास्त वेळ नसतो. तीस - चाळीस वयातपर्यंतच त्यांचं करिअर असतं. आणि आलिया भट्ट हा आपला मौल्यवान वेळ वाया घालवण्याच्या मनस्थितीत नाही. आलियाने अगदी लहान वयातच इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आणि 'नेपोटिज्म' ची निंदा करून तिने तिचे कौशल्य सिद्ध करायला वेळ लावला नाही. तिला तरुण पिढीतील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. एका प्रोजेक्टसाठी ती 10 ते 20 कोटी रुपये घेते. ती शेवटची 'ब्रह्मास्त्र' मध्ये तिचा पती रणबीर कपूरसोबत दिसली होती जी बॉयकॉटच्या घोषणेनंतरही खूप हिट ठरली.
2000 साली अभिषेक बच्चनसोबत 'रिफ्युजी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी करीना कपूर गेल्या 23 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. लग्न करून दोन मुलांची आई झाल्यानंतरही तिच्या आकर्षणात कोणतीही कमतरता दिसून येत नाही. एका चित्रपटासाठी सुमारे 20 कोटी रुपये आकारणी करणाऱ्या करिनाला कधीच मागे वळून पाहण्याची गरज वाटली नाही. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने 2010 मध्ये 'तीन पत्ती'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा 2013 मध्ये रिलीज झालेला 'आशिकी 2' जबरदस्त हिट ठरला होता. 'स्त्री' नंतर आज तिचे नाव बॉलिवूडच्या हाय पेड अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे. ती एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये घेते. अलीकडे, तिने रणबीर कपूर विरुद्ध "तू झुठी में मक्कर" रिलीज केला, जो 100 कोटी क्लबमध्ये सामील होऊन अजूनही चांगला व्यवसाय करत आहे.
विद्या बालन प्रत्येक पात्रात सहजतेने घुसण्यासाठी म्हणून ओळखली जाते. 'डर्टी फीचर' असो किंवा 'पा', ती प्रत्येक पात्रात जीव ओतते. ती एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये घेते. अनुष्काने आई झाल्यानंतर आपल्या करिअरमधून ब्रेक घेतला असला तरी पण तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. अभिनयासोबतच ती निर्मितीशीही जोडली गेली आहे. आज ती एका प्रोजेक्टसाठी 8 ते 12 कोटी रुपये घेत आहे. ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. तिचं वय वाढतंय तसं तिच्या सौंदर्यात आणखी निखार येत आहे. तिने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. ती एका चित्रपटासाठी 10 कोटी आणि एका जाहिरातीसाठी 2 ते 3 कोटी रुपये घेते. कियारा अडवाणीने 'भूल भुलैया 2' नंतर तिची बॉलिवूड मधील स्थिती मजबूत केली आहे. आता तिला एका चित्रपटासाठी 5 कोटींपर्यंत मिळत आहे. कियारा व्यतिरिक्त, जान्हवी कपूर, कीर्ती सेनॉन आणि तापसी पन्नू देखील आपली स्थिती मजबूत करत आहे. तिला 3 ते 5 कोटींचे मानधनही मिळत आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment