Thursday, July 20, 2023

२०२३ मध्ये ‘पठाण’ व ‘द केरला स्टोरी’ वगळता इतर चित्रपटांनी केली घोर निराशा

२०२३ चे सहा महीने उलटून गेले आहेत, या सहा महिन्यातील बॉलिवूडचं रिपोर्ट कार्ड समोर आलं आहे. २०२३ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये बॉलिवूड चित्रपट सृष्टीत ‘पठाण’ व ‘द केरला स्टोरी’ वगळता इतर चित्रपटांनी घोर निराशा केली आहे.

विशाल भारद्वाज यांच्या बॅनरखाली बनलेला त्यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेला ‘कुत्ते’ हा यावर्षीचा पहिला आणि फ्लॉप चित्रपट ठरला. अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ४.०४ कोटींचा व्यवसाय केला. ४ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानने मात्र बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. प्रचंड विरोध आणि बॉयकॉटचा सामना करूनही ‘पठाण’ ने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून तर जगभरात १००० कोटींहून अधिक व्यवसाय केला. ‘पठाण’ हा २०२३ चा पहिला सुपरहीट चित्रपट ठरला.

कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ‘शेहजादा’सुद्धा फारशी कमाल दाखवू शकला नाही. बिग बजेट असा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० कोटीसुद्धा कमवू शकला नाही. या चित्रपटाने ४७.४३ कोटींची कमाई केली. यानंतर अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसारख्या बड्या स्टारच्या ‘सेल्फी’ चित्रपटाने तर फारच निराशा केली. २३.६३ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ‘कैथी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला अजय देवगणचा ‘भोला’सुद्धा फारशी कमाई करू शकला नाही. जेमतेम १०० कोटींचा टप्पा या चित्रपटाने पार केला.

आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट तर कधी आला कधी गेला ते कोणालाच समजलं नाही. या चित्रपटाने जेमतेम १० कोटींची कमाई केली. हमखास सुपरहीट चित्रपट देणाऱ्या बॉलिवूडच्या भाईजानचीही यावेळी बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडली. सलमान खानचा बहुचर्चित ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाने १८० कोटींची कमाई केली, पण सलमानच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने मात्र अनपेक्षित असा व्यवसाय केला. कोणताही मोठा स्टार नसतानाही केवळ ज्वलंत विषय आणि त्याच्या मांडणीच्या आधारावर ‘द केरला स्टोरी’ने २४० कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला.

६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘आदिपुरुष’ने तर लोकांची घोर निराशा केली. प्रेक्षक तसेच समीक्षक सगळ्यांनीच या चित्रपटावर सडकून टीका केली. पहिल्या २ दिवसांत चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम २६६ कोटींचाच व्यवसाय केला. ‘आदिपुरुष’च्या मानाने कमी बजेटमध्ये बनलेला आणि हलकं फुलकं कथानक असलेला रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१९.८५ कोटींचा व्यवसाय केला. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या जोडीचा ‘सत्यप्रेम की कथा’ने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटाने अनपेक्षितपणे जवळपास ८० कोटींचा व्यवसाय केला आहे. 

Sunday, July 9, 2023

प्रश्न- आतापर्यंत सलमान खानच्या किती चित्रपटांनी 100 कोटींचा व्यवसाय केला आहे?

 प्रश्न- आतापर्यंत सलमान खानच्या किती चित्रपटांनी 100 कोटींचा व्यवसाय केला आहे?

उत्तर-सलमान खानच्या 16 चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा हुकमी एक्का म्हणून सलमान खान ओळखला जातो.सलमान खान हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे ज्याच्या 16 चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचा नुकताच आलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला.

प्रश्न- ‘वेड’ चित्रपटाने  मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये कितवा चित्रपट म्हणून ‘वेड’ची नोंद झाली आहे?

जानेवारी ते जून दरम्यान मराठीत ४० हून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातल्या तीन चित्रपटांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबरोबरच ‘चौक’, ‘रावरंभा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या तीन चित्रपटांनी प्रेक्षकपसंती आणि काही प्रमाणात आर्थिक यशही मिळवले. ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘फुलराणी’, ‘जग्गू अ‍ॅण्ड ज्युलिएट’, ‘र्ती’, ‘बलोच’ असे कितीतरी मोठे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र ते तिकीट खिडकीवर यशस्वी ठरले नाहीत.मराठी चित्रपटांची सुरुवात यंदा रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाच्या विक्रमी कमाईने झाली होती. या चित्रपटाने तिकीटखिडकीवर ७५ कोटी रुपयांची दणदणीत विक्रमी कमाई करत वर्षांची आनंदी सुरुवात केली होती. १५ कोटींच्या निर्मितीखर्चात बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले. रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने  मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसरा चित्रपट म्हणून ‘वेड’ची नोंद झाली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाने दहा दिवसांत वीस कोटींचा टप्पा गाठला आहे.


हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय अभिनेता संजीव कुमार उर्फ ​​हरिभाई


हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजीव कुमार. त्यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते, ज्यांना लोक प्रेमाने आणि आदराने हरिभाई म्हणत. त्यांचा जन्म 9 जुलै 1938 रोजी गुजरातमधील सुरत येथील  एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला.हे कुटुंब  मुंबईत स्थायिक झाले.  लहानपणापासूनच त्यांना चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर प्रवेश केला आणि नंतर फिल्मालयाच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने आर्थर मिलरच्या 'ऑल माय सन्स'च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. ए.के. हंगलदिग्दर्शित डमरू नाटकात संजीव कुमार याची सहा मुले असलेल्या ६० वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती. दरम्यान, 1960 मध्ये त्यांना 'हम हिंदुस्तानी' चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

1962 मध्ये त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या 'आरती'साठी स्क्रीन टेस्ट दिली, ज्यामध्ये तो उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यानंतर त्याला अनेक 'बी-ग्रेड' चित्रपट मिळाले. इतके नगण्य चित्रपट असूनही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निशान' या चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1960 ते 1968 पर्यंत संजीव कुमार यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. जी काही भूमिका मिळाली, ती स्वीकारत गेले. त्यादरम्यान त्यांनी 'स्मगलर', 'पति-पत्नी', 'हुस्न और इश्क', 'बादल', 'नौनिहाल' आणि 'गुनहगार' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.

 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिकार या चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा 'फिल्मफेअर पुरस्कार'ही मिळाला. 1968 मध्ये रिलीज झालेल्या 'संघर्ष' या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केले होते. यानंतर 'आशीर्वाद', 'राजा और रंक', 'सत्यकाम' आणि 'अनोखी रात' यांसारख्या चित्रपटांच्या यशातून संजीव कुमार यांनी आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांमध्ये प्रस्थापित केले.1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खिलौना' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर संजीव कुमार यांनी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

1970 मध्येच प्रदर्शित झालेल्या 'दस्तक' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला होता.1972 मध्ये 'कोशिश' चित्रपटात ते एका मुक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'कोशिश' चित्रपटात संजीव कुमार यांना आपल्या मुलाचे लग्न एका मुक्या मुलीशी करायचे होते आणि त्यांचा मुलगा हे लग्न मान्य करत नाही. मग ते भिंतीवर टांगलेला त्यांच्या मृत पत्नीचा फोटो खाली घेतात. त्यांच्या डोळ्यात दुःखाची आणि चेहऱ्यावर रागाची गडद छाया दिसते. 

भारतीय सिनेविश्वात संजीव कुमार हे बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जातात ज्यांनी नायक, सह-नायक, खलनायक आणि चरित्र कलाकार अशा भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. संजीव कुमार यांच्या अभिनयात एक खासियत होती की ते कोणत्याही प्रकारच्या भूमिकेसाठी नेहमीच योग्य असायचे.नंतर संजीव कुमार यांनी गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली 'आंधी', 'मौसम', 'नमकीन' आणि 'अंगूर' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 1982 मध्ये आलेल्या अंगूर चित्रपटात संजीव कुमार यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. संजीव कुमार यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आंधी' या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. यानंतर 1976 मध्ये 'अर्जुन पंडित' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 6 नोव्हेंबर 1985 रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday, July 5, 2023

येत्या सहा महिन्यात आगामी चित्रपट करोडोंची कमाई करणार!


 2023 चा पहिल्या सहामाहीचा काळ संपला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट पहिल्या सहा महिन्यांतला भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. 540 कोटींहून अधिक कमाईचा विक्रम 'आदिशुरुष'  मोडेल, असे मानले जात होते, मात्र आतापर्यंत केवळ 450 कोटींचाच आकडा 'आदिपुरुष'ला गाठता आला आहे.आता येत्या ६ महिन्यात असे अनेक चित्रपट येणार आहेत ज्यात 'पठाण'च्या रेकॉर्डला आव्हान देण्याची पूर्ण ताकद आहे. हे सिनेमे आता रिलीज व्हायला सज्ज झाले आहेत

येत्या सहा महिन्यांच्या कालावधीची अपेक्षा...

चित्रपट जगतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वर्षाच्या उत्तरार्धात चित्रपटांची लाइनअप खूपच मजबूत आहे. अशा परिस्थितीत पुढील सहामाहीत बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा आहे. 2023 च्या शेवटच्या सहा महिन्यांत, थिएटरमध्ये 'अॅनिमल', 'गदर 2', 'जवान, टायगर 3', 'ओएमजी-2' आणि 'डंकी'सह 10 हून अधिक बहुप्रतिक्षित चित्रपट आहेत.त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपट आणि हॉलिवूडचेही अनेक चित्रपट येणार आहेत. त्यामुळेच येत्या सहा महिन्यांत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे दमदार पुनरागमन होणार असल्याचे बोलले जात आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  त्याचबरोबर रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अमीषा पटेल आणि सनी देओल अभिनीत गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'ओह माय गॉड 2' 11 वर्षांनंतर 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'पठाण'नंतर आता किंग खानचा मोस्ट अवेटेड 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा 'सालार'ही 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  'फुक्रे 3' यावर्षी 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 दोन हजार कोटींची कमाई!

वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रभास, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांसारख्या आघाडीच्या कलाकारांनी अभिनय केलेल्या चित्रपटांनी फारच सुमार कामगिरी केली. त्याचवेळी शाहरुखच्या 'पठाण' आणि 'द केरला स्टोरी'च्या सरप्राईज हिट्समुळे पहिल्या सहामाहीची कमाई 2 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 'वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतील चित्रपटांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यातले सुमारे तीन महिने चांगले म्हणता येतील. तर उर्वरित तीन महिने ठीकठाक गेले आहेत. उदाहरणार्थ, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यामुळे फेब्रुवारी महिना कमाईच्या बाबतीत चांगला गेला. तर 'किसी का भाई किसी की जान' एप्रिलमध्ये कमकुवत होता. पण 'द केरल स्टोरी'ने मे महिन्यात चांगली कमाई केली.  जूनमध्ये 'जरा हट के जरा बच के' आणि प्रभासच्या 'आदिपुरुष'नेही ठीकठाक कामगिरी केली.

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' 15 डिसेंबरला रिलीज होणार 

सिद्धार्थ मल्होत्रा ​​बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे.  गेल्या वर्षी त्याचा 'थँक गॉड' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.आता सिद्धार्थ मल्होत्राचा पुढचा रिलीज अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म 'योद्धा' आहे. योद्धा आधी या महिन्यात ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने परवाच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर योद्धाचे अपडेट शेअर केले.धर्मा प्रॉडक्शनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'इंधन भरले आहे आणि उडण्यासाठी तयार आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या नवोदित दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केलेला, योद्धा, सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'योद्धा' फ्रँचायझीमधील पहिला अॅक्शन चित्रपट, 15 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिशा पटनी आणि राशी खन्ना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. स्पाय एजंट हा चित्रपट करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्राचा समावेश आहे. योद्धा हा त्याचा दुसरा चित्रपट.  यापूर्वी हा अभिनेता 'मिशन मजनू'मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत होता.


Monday, July 3, 2023

आतापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे?

कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.चित्रपटाची झलक समोर आल्यानंतर कंगनाचा लूक, तिची देहबोली आणि संवादांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही कंगना राणौतची सर्वोत्तम कामगिरी सिद्ध होईल, असे मानले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की कंगनाच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी देशाच्या माजी पंतप्रधान, लोह कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे, आज आम्ही त्याच अभिनेत्रींबद्दल बोलत आहोत.

'आंधी'मध्ये सुचित्रा सेन -1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजीव कुमार यांच्या 'आँधी' या चित्रपटात सुचित्रा सेन महिला राजकारणीच्या भूमिकेत दिसली होती.त्या भूमिकेची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली जात होती.

'बेलबॉटम'मध्ये लारा दत्ता- ऑगस्ट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि वाणी कपूर अभिनीत बेलबॉटममध्ये लारा दत्ता इंदिरा गांधी 

 च्या भूमिकेत दिसली होती आणि तिच्या लूकचीही खूप चर्चा झाली होती.या लूकमध्ये लारा इतकी परफेक्ट दिसत होती की तिला ओळखणे कठीण होते.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात किशोरी शहाणे- विवेक ओबेरॉय यांच्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात मराठीतील प्रसिद्ध तसेच टीव्ही अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. 

थलायवी मधील फ्लोरा जेकब- फ्लोरा जेकबने कंगना राणौतच्या थलायवी चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.  'रेड' या चित्रपटातही तिने ही भूमिका साकारली होती.

ठाकरे मधील अवंतिका आकेरकर- ठाकरे या चित्रपटात अवंतिका आकेरकरने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.  इंदिरा जोचे पात्र हे एक आव्हानात्मक काम आहे, जे अवंतिकाने निर्दोषपणे साकारले आहे.


समीर विद्वांस या मराठी दिग्दर्शकाने कोणत्या चित्रपटांद्वारे हिंदीत पदार्पण केले?

 प्रश्न- प्रश्न- समीर विद्वांस या मराठी दिग्दर्शकाने कोणत्या चित्रपटांद्वारे हिंदीत पदार्पण केले? त्याने दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट कोणते?

उत्तर-जून 2023 मध्ये समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘डबल सीट’, ‘वाय झेड’, ‘धुरळा’,‘आनंदी गोपाळ’सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या समीर विद्वांस यांनी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदीत दिग्दर्शकीय पदार्पण केले. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.  ६० कोटींच्या निर्मिती खर्चात बनवलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ९ कोटींहून अधिक कमाई केली. अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

प्रश्न- हिंदी चित्रपटसृष्टीत मराठमोळय़ा कोणकोणत्या  दिग्दर्शकांचा वावर वाढला आहे?

उत्तर- रवी जाधव, लक्ष्मण उतेकर, ओम राऊत, नागराज मंजुळे, निपुण धर्माधिकारी, समीर विद्वांस ही यादी वाढतच चालली आहे. लक्ष्मण उतेकर यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला.  या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.४० कोटींच्या निर्मितीखर्चात बनलेल्या या चित्रपटाने १०९.३८ कोटींची कमाई केली आहे. याआधीही लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लुकाछुपी’ आणि ‘मिमी’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने  हिंदीत दिग्दर्शित केलेला भव्यदिव्य चित्रपट कोणता?

उत्तर- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून 2023 ला प्रदर्शित झाला. ५०० कोटींच्या भव्य निर्मितीखर्चात बनलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अधिक अपेक्षा होत्या. मग ते चित्रपटातील कलाकारांचा अभिनय असो, त्यांचे संवाद असोत किंवा व्हीएफएक्स असो. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सननची जोडी असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या झाल्या पहिले तीन दिवस प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचली. मात्र नंतर चित्रपटावर टीकेची झोड उठली आणि त्याचा परिणाम चित्रपटगृहातून ‘आदिपुरुष’  उतरवण्यात झाला. याआधी ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तानाजी’ला पसंती मिळाली आणि 100 कोटींहून अधिक कमाई केली. देशभरात ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने २८० कोटी रुपये कमाई केली आहे, तर जगभरातील कमाईचा आकडा ४०० कोटींहून अधिक असला तरी चित्रपटाला निर्मितीखर्चही वसूल करता आलेला नाही.

प्रश्न- ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक कोण आहेत?

उत्तर- केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला बहुकलाकार आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्य असेलला भव्यदिव्य ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक यशस्वी चित्रपट आहे.

 

 

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...