Sunday, February 19, 2023

बाहुबली 2'वर 'बादशाह'ने बाजी मारली, प्रभासच्या चित्रपटाला मागे टाकत 'पठाण'ने केला विक्रम


शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा जास्त रेकॉर्ड तोडण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.  शाहरुखचा 'पठाण चाहत्यांना खूप आवडला आहे.२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बादशाहच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की, लोक त्याच्या तिकिटासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होते. त्याचवेळी शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे 'पठाण'ने बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, पठाणने आपल्या उत्कृष्ट कामाईने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे आणि कामाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. 'पठाण'ने कमाईच्या बाबतीत साउथ चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली 2'ला मागे टाकत हा विक्रम केला आहे. पठाणने रिलीजच्या 25 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हिंदीमध्ये 3.25 कोटी आणि इतर भाषांमध्ये 7 लाखांचा गल्ला जमवला आहे. यानंतर, पठाणचे सर्व भाषांमधील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 511.60 कोटी रुपये झाले आहे.

शाहरुख खानच्या पठाणने साऊथ सुपरस्टार प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड मोडला आहे.  रिपोर्ट्सनुसार, बाहुबलीची एकूण कमाई 510.99 कोटी रुपये होती. यासह पठाण हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाणने चार दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2' ने ऑस्ट्रेलियात 4.50 दशलक्ष डॉलर (रु. 25.71 कोटी) चे एकूण कलेक्शन केले होते, तर सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' ने 4.51 दशलक्ष डॉलर (रु. 25.77 कोटी) कमावले होते. केवळ बाहुबली 2च नाही तर सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' ने आपल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर दक्षिण चित्रपटातील ब्लॉकबस्टर चित्रपट KGF Chapter 2, RRR, टायगर जिंदा है, दंगल आणि वॉर सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यासह पठाण बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

Friday, June 4, 2021

'शोले' म्हणजे एक आग


भारतीय चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' एक असा चित्रपट आहे,जो पुन्हा पुन्हा कितीदा जरी पाहिला तरी मन भरत नाही. 15 ऑगस्ट 1975 रोजी 'शोले' रिलीज झाला. आता त्याला 46 वर्षे होताहेत.या चित्रपटातले काही कलाकार अजून जीवित आहेत तर काही कलाकारांनी 'एक्झिट' घेतली आहे. 'शोले'चे  दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटातले कलाकार धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमामालिनी, जया भादुरी, हेलन ,जगदीप, असरानी तसेच पटकथा लेखक सलीम-जावेद या सगळ्यांनी हा चित्रपट संस्मरणीय केला.साल 2002 मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने 'शोले'चा सार्वकालिक दहा सर्वश्रेष्ठ (टॉप टेन) भारतीय चित्रपटांच्या श्रेणीत समावेश केला.

हा पहिला भारतीय चित्रपट आहे,ज्यामध्ये स्टीरियोफोनिक साउंड ट्रॅकचा वापर केला गेला 70 एमएम पडदयावर दाखवला गेला. या चित्रपटाचे शुटिंग 3 ऑक्टोबर1973 रोजी सुरू झाले होते आणि जवळपास अडीच वर्षे हा चित्रपट पूर्ण व्हायला लागला. चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावली गेली आणि मग शेवटी 15 ऑगस्ट 1975 रोजी भारतभर रिलीज झाला.

'शोले'चे कॅमेरामन द्वारका दिबेचा आणि कला दिग्दर्शक राम यादेकर होते. दोघेही आपापल्या क्षेत्रात निपुण होते. त्यांनी  अक्षरशः या चित्रपटात आपला जीव ओतला. आर्ट डायरेक्टर यादेकर यांनी 'शोले' च्या शुटिंगसाठी बंगरुळू हाय-वेवर म्हणजेच कर्नाटकातल्या दक्षिण क्षेत्रातल्या एका निर्जन भागात रामनगर नावाचे एक पहाडी गावच वसवले होते. अजूनही हा भाग 'शोले'च्या शुटिंगसाठी ओळखला जातो. 'शोले' 198 मिनिटांचा होता. याच्या निर्मितीसाठी त्यावेळी 30 कोटी रुपये इतका खर्च आला होता. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा गल्ला जमवला. परदेशातही या मोठी कमाई केली. असं म्हटलं जातं की, हा चित्रपट पाहण्यासाठी सोव्हिएत रशियामध्ये लोकांच्या अक्षरशः उडया पडत. मुंबईतल्या मिनर्वा थिएटरमध्ये हा चित्रपट सलग पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालला. 

मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासारख्या दिग्जजांनी याची कथा आणि पटकथा नाकारली होती. तेव्हा याचे पटकथा लेखक सलीम आणि जावेद या जोडगोळीने जी. पी.सिप्पी यांच्याशी संपर्क साधला. ते या चित्रपटासाठी पैसा घालायला तयार झाले आणि त्यांच्या मुलाने-रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. 'शोले'चा आणखी एक इतिहास असा की, 50 व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या समारोहात या चित्रपटाचा 'गेल्या पन्नास वर्षातील सर्वश्रेष्ठ भारतीय चित्रपट' म्हणून गौरव केला गेला. संगीतकार आर.डी.बर्मन यांनी याचा ओरिजनल साउंड ट्रॅक तयार केला होता. या साउंड ट्रक आणि  'शोले'च्या गब्बरसिंग व कालियावाल्या डायलॉगने विक्रीचा अनोखा रेकॉर्ड बनवला. साल 2014 च्या जानेवारीमध्ये या चित्रपटाचा 3डी फॉर्मेट रिलीज केला गेला. म्हटलं जातं की हा चित्रपट जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकिरा कुरोसोवा यांच्या 'सेवन सामुराई' या गाजलेल्या चित्रपटावर बेतला होता.

अभिनेता अमजद खान यांनी गब्बरसिंगची क्रूर भूमिका साकारली होती. परंतु या भूमिकेसाठी पहिल्यांदा डॅनी डोंजोंप्पा यांना विचारण्यात आले होते. पण त्यावेळी डॅनी फिरोज खानच्या 'धर्मात्मा' (1975) मध्ये व्यस्त होते.त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि तो अमजद खान यांना मिळाला. अशाच प्रकारे अमिताभच्या 'जय' भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी निवड करण्यात आली होती तर ठाकूरवाल्या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना पसंदी देण्यात आली होती. परंतु योगायोग काही जुळला नाही आणि या भूमिका अमिताभ आणि संजीव कुमार यांच्या वाट्याला आल्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

फिल्मी कलाकारांची 'खबरबात'


'हीरोपंती 2’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार खलनायकाची भूमिका 'हीरोपंती 2' चे शुटिंग सुरू झाले होते. आता चित्रपटाच्या पुढील शुटिंगच्या शेड्युलची तयारी सुरू झाल्याची बातमी आली आहे.  टाइगर श्रॉफ आणि तारा सुथारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. 'हिरोपंती2' एक अशा युवकाची कहाणी आहे,जो रात्रीच्या वेळी लोकांना मदत करत असतो. त्याला एका मिशनवर काम करण्यासाठी रशियाला जावं लागतं. रजत आरोरा लिखित आणि साजिद नादियादवाला निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

अमिताभ,प्रभास आणि दीपिका यांचा नवा चित्रपट विषाणूवर आधारित

अश्विन नाग दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोन आणि 'बाहुबली'फेम प्रभास यांचा नवीन चित्रपट जैविक युद्ध आणि मानवाने बनवलेल्या विषाणूवर आधारित आहे. या चित्रपटात कोरोना सदृश महामारीनंतर बनलेल्या परिस्थितीचे चित्रण पाहायला मिळणार आहे. 'महानटी'चे दिग्दर्शक अश्विन नाग यांचा हा चित्रपट 2050 च्या पार्श्वभूमीवर असणार आहे.चित्रपटात प्रभास लार्जर दॅन लाईफ किरदार साकारणार आहे.


ओम : द बॅटल विदइन’ ची टीम जाणार तुर्कीला

आदित्य राय कपूर आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘ओम : द बॅटल विदइन’ चित्रपटाचे पुढचे शेड्युल तुर्कीमध्ये सुरू होणार आहे आहे. कोरोना टाळेबंदी हटल्यानंतर चित्रपटाची टीम शूटिंगसाठी तुर्कीला रवाना होणार आहे. चित्रपटात आदित्य राय कपूर ऍक्शन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तुर्कीमध्ये मारधाड दृश्यांचे शुटिंग होईल. अक्षत सलुजा आणि निकेत पांडे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओसोबत मिळून अहमद खान आणि शायरा खान करत आहेत.


सोशल मीडियावर मलिकाच्या घराचे फोटो

बॉलीवुड अभिनेत्री मलिका शेरावत सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. त्यांच्यासाठी आपले फोटो सतत शेअर करत असते.आता तिने तिच्या लॉस एंजिल्समधल्या घराचे फोटो पाठवले आहेत. ते पाहून तिचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. तिने तिच्या घराचा एक व्हिडिओ इन्स्टंग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकाचे घर मोठ्या एरियामध्ये बांधण्यात आल्याचे दिसत आहे. घरासमोर बाग आहे. मालिकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी खूपच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने तिच्या घराला 'जन्नत'पेक्षाही सुंदर म्हटले आहे. मालिकाच्या या व्हिडिओला एक लाखांपेक्षा अधिकवेळा पसंद करण्यात आले आहे.

Thursday, June 3, 2021

हिंदी चित्रपट आणि पोलीस


थरारक गुन्हेगारीकथांचे आकर्षण बॉलिवूडला नेहमीच राहिले आहे. आणि जिथे गुन्हेगारी असते,तिथे पोलीस आणि कायदा आपोआप येतोच. त्यामुळे हिंदी चित्रपट गुन्हेगारी, पोलीस आणि कायदा यांच्या अवतीभवती घुटमळताना आजही पाहायला मिळतो. हिंदी चित्रपटातला क्वचितच एखादा हिरो असेल,ज्याने पोलिसांची 'खाकी वर्दी' घातली नसेल. आतापर्यंत बरेच हिंदी चित्रपट पोलीस आणि कायद्याच्या आधार घेऊन बनत राहिले आणि आजही बनत आहेत. हा विषय कधीच थांबणारा नाही. कारण गुन्हेगारी जिथे आहे,तिथे बॉलिवूड असणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'किस्मत'.1943 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोलकात्यातील रोक्सी थिएटरमध्ये तब्बल 187 आठवडे चालला होता. या चित्रपटाद्वारा पहिल्यांदाच गुन्हेगार क्षेत्राशी संबंधित हिरो पडद्यावर दाखवण्यात आला होता. अशोक कुमार यांनी यात पाकिटमाराची भूमिका साकारली होती. 1975 मध्ये आलेला 'शोले' चित्रपट एका दरोडेखोराने एका रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याच्या कथानकावर आधारलेला होता. दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. प्रेक्षकांना अशा चित्रपटांमध्ये रुची आहे,हे लक्षात आल्यावर निर्मात्यांनी गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेले चित्रपट बनवायला सुरुवात केली. मग कधी 'जंजीर'मध्ये पोलिसांची खाकी वर्दी घातलेला अमिताभ बच्चन पाहायला मिळाला तर कधी 'शक्ती' मध्ये याच वर्दीत दिलीप कुमार पाहायला मिळाले. 

खाकीचं खणखणीत नाणं कधी कमकुवत पडल्याचं दिसलं नाही.नाना पाटेकर 'अब तक छपन्न'मध्ये गुन्हेगारांशी आपल्या स्टाईलने भिडले. 'मैं खिलाडी तू अनाड़ी' मध्ये अक्षय कुमार पोलीस इन्स्पेक्टर बनला होता तर सैफ अली खान फिल्मस्टार. याशिवाय अक्षय कुमारने 'मोहरा', 'राउडी राठौड़’मध्ये तर अमीर खानने 'सरफरोश' पोलीस अधिकाऱ्यांचा भूमिका साकारल्या. नवाजुद्दीन सिद्दीकीनेदेखील 'रात अकेली है' मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका निभावली. अजय देवगनने साकारलेल्या 'गंगाजल’ मधील एसपी अमित कुमारच्या भूमिकेचे तर जोरदार स्वागत झाले. चित्रपट हिट झाला.शशी कपूर यांनी साकारलेली 'दिवार' मधील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका आजही आठवली जाते.यातल्या 'मेरे पास मां है...' या वाक्याने प्रत्येक वेळी टाळ्या घेतल्या आहेत.

मधल्या काळात मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, सनी देओल यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका केल्या. त्या पसंदही केल्या गेल्या. अलिकडच्या काळातही गुन्हेगारीवर आधारित अनेक चित्रपट आले. मुंबईतल्या गँगस्टरवर तर अनेक चित्रपट येऊन गेले आणि अजूनही यात खंड पडलेला नाही,कारण हा विषय प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आगामी काळातही असे चित्रपट येऊ घातले आहेत. 'सूर्यवंशी’ मध्ये अक्षय कुमार डीसीपी वीर सूर्यवंशी यांची भूमिका साकारत आहे. यात तो मुंबईच्या दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखाच्या भूमिकेत आहे. फक्त अक्षय कुमारच नाही तर अजय देवगनदेखील या चित्रपटात डीसीपी बाजीराव सिंघम आणि रणवीर सिंग इन्स्पेक्टर संग्राम भालेरावच्या रुपात दिसणार आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या या 'सूर्यवंशी' चित्रपटात 'सिंघम' आणि 'सिंबा' ही दोन्ही कॅरेक्टर एकत्र पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण चित्रपट पोलीस आणि कायद्याच्या डावपेचावर आधारित आहे. 'अंतिम : द फाइन ट्रुथ’मध्ये सलमान खान एका शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सलमानने यापूर्वी साकारलेल्या 'दबंग’ आणि ‘दबंग 2’ मधील पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिका लोकांनी डोक्यावर घेतल्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'राधे' चित्रपटातदेखील सलमान अंडरकवर पोलीस ऑफिसरच्या रुपात दिसला आहे. सिनेमागृहे बंद असल्याने हा चित्रपट ओटीटीवर दाखवण्यात आला. साहजिकच या चित्रपटाला अपेक्षित यश मिळणं दुरापास्त झालं. हा चित्रपट घाट्यात गेला. ऍक्शन हिरो म्हणून ज्याला पसंद केलं जातं, तो जॉन अब्राहिम 'अटॅक' चित्रपटात खाकी वर्दीत दिसणार आहे. बऱ्याच वर्षातून 'भूत पुलिस'मध्ये सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'बेलबॉटम’मध्ये अक्षय कुमार पोलीस कॉन्स्टेबलबरोबरच जासुसाची भूमिका साकारत असून तो चोरांची गँग पकडताना दिसणार आहे.

दबंग’ हिट झाल्याने जसा  ‘दबंग 2’ बनला, तसाच ‘सिंघम’ हिट झाला नी मग  ‘सिंघम 2’ तयार झाला. ज्याप्रकारे सलमानने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत 'दबंग3' बनवला,तशाच प्रकारे आता अजय देवगन पुढे सरकताना दिसत आहे. 'दबंग'प्रमाणेच अजय देवगनचा 'सिंघम' हिट झाला आणि त्यामुळे त्यांचे दुसरे भागदेखील निघाले आणि हिट झाले. अजय देवगन 'सिंघम'चा तिसरा भागही लवकरच घेऊन येणार आहे.

पोलिसांची वर्दी फक्त हिरो म्हणजेच नायकांनीच घातली नाही तर वेळोवेळी हिरॉईननेदेखील खाकी वर्दी घातली आहे. 'अंधा कानून'मध्ये हेमामालिनी पोलीस इन्स्पेक्टर बनली होती. शिल्पा शेट्टी 'दस', तर राणी मुखर्जी 'मर्दानी', व 'मर्दानी 2', आणि बिपाशा बसूने 'धूम2'मध्ये खाकी वर्दी घातली आहे. येणाऱ्या 'धाकड' चित्रपटात कंगना राणावत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच यात अनेक स्टंट सीन असणार आहेत. 'शतरंज' मध्ये एकता जैनदेखील पोलीस बनली आहे.विद्या बालन 'शेरनी' या नव्या चित्रपटात वनअधिकाऱ्याच्या वर्दीत दिसणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित आणखीही काही चित्रपट येत आहेत. आयुष्यमान खुराना आपल्या 'आर्टिकल 15’च्या यशानंतर याच विषयावरचा आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. काही चित्रपट निर्मात्यांनी आपल्या असोसिएशनकडे अशाच प्रकारची मिळतीजुळती नावे रजिस्टर्ड केली आहेत.‘सेक्शन 376’, ‘सेक्शन 302’, ‘आर्टिकल 14’, ‘आर्टिकल 35 ए’, ‘धारा 370’, ‘375 इंडियन पीनल कोड’ अशी काही ही नावं आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, May 8, 2021

ओटीटीकडे संधी म्हणून पाहायला हवे


बॉलिवूड ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मला स्वत: चा प्रतिस्पर्धी मानत आहे, बॉलीवूड उद्या त्याच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कार्यक्रमांची मागणी पूर्ण करेल.  देशातील सुमारे 40 ओटीटी वाहिन्यांची मागणी पूर्ण करणे बॉलिवूडला सोपे जाणार नाही, कारण आजही बॉलिवूडमध्ये देशात बनवलेल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटांची मागणी पूर्ण करता येत नाही.  सध्याच्या संकटामुळे बॉलिवूडसमोर आलेली संधी कदाचित त्याला समजू शकणार नसेल पण ओटीटी बॉलिवूडसाठी संकट नसल्याचे सिद्ध करेल,मात्र त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.

महाराष्ट्रातील सिनेमाँगृहे बंद आहेत, पण देशातील अनेक राज्यांत सुमारे 40 ओटीटी आणि चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित होत आहेत.  मुंबईत शूटिंग ठप्प आहे पण ते अजूनही अनेक राज्यांमध्ये सुरू आहे.  परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही सगळे मार्ग बंद झालेले नाहीत. जर खिडकी बंद असेल तर कुठे दरवाजादेखील उघडा असणार आहे. अमिताभ बच्चन यांचा 'गुलाबो सीताबो' किंवा अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' नाईलाजाने का होईना ओटीटीवर  रिलीज करण्यात आलाच ना! पण यामुळे निर्मात्यांना तोटा कमी करण्यास मदत झाली.

अजूनही सुमारे 40 ओटीटी प्लॅटफॉर्म चालकांना बॉलिवूड निर्मात्यांनी त्यांच्यासाठी कार्यक्रम तयार करावेत असं वाटतं.  प्रत्येकाला कार्यक्रमांची आवश्यकता असते. वेब मालिका, चित्रपट, मालिका या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. पण या मागणीची पूर्तता अद्याप व्हायची आहे. ही मागणी कायम असतानाही चित्रपटगृहे सुरू होतील. म्हणूनच थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्पर्धात्मक आणि एकमेकांना नुकसानकारक समजण्याचा विचार निरर्थक आहे.

अजय देवगनने नेटफ्लिक्ससाठी 'त्रिभंग' तयार केला.  तसेच त्याचा 'भुज' हा चित्रपटदेखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी वाहिन्यांना हळूहळू बॉलिवूड निर्मात्यांकडून कार्यक्रम मिळू लागले आहेत आणि कित्येक निर्मात्यांशी बोलणी सुरू झाली आहे. अलीकडेचेच उदाहरण आहे-शाहिद कपूरला 70-80कोटीमध्ये तीन चित्रपटांचा प्रस्ताव एका ओटीटी चॅनेलकडून मिळाला आहे.  शाहिद हे काम पहिल्यांदा निर्माता बनून करणार आहे.

20 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या शाहिदला केवळ ओटीटीमुळेच ही संधी मिळाली. अक्षयकुमारच्या 'बेलबॉटम'साठी ओटीटी चॅनेल्स 150 कोटी रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत.  झी प्लेक्ससह अनेक प्लॅटफॉर्मवर  सलमान खान 40 देशांच्या चित्रपटगृहात आपला ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे.  हे सर्व कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान शक्य झाले आहे, ज्याची कालपर्यंत कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. सलमानने आपला छोट्या बजेटचा 'पेपर' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जी 5 वर रिलीज केला आहे.

रिलायन्स, लायका किंवा यशराज फिल्म्स यासारखे बॅनरवाले आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यास तयार नाहीत.  रिलायन्सने अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' ला त्यांच्या गोदामात एक वर्ष झाले झाकून ठेवला आहे. चित्रपटाला कितीही वेळ लागला तरी चित्रपटगृहात दाखविला जाईल असा आग्रह त्यांनी धरला आहे. यावर्षी ऐवजी 2022 मध्ये लायका कंपनी आपला पाच भाषांचा चित्रपट 'आरआरआर' रिलीज करणार आहे.  लायका किंवा रिलायन्स ' डीप पॉकेट' असलेल्या कंपन्या आहेत. त्यांना  नुकसान झाले तरी फार काही फरक पडत नाही. ते जोखीम उठवू शकतात.ते  वर्षभर चित्रपट थांबवू शकतात.  परंतु बरेच छोटे उत्पादक हे करू शकत नाहीत. चित्रपटगृहे बंद झाल्यावर या निर्मात्यांनी ओटीटीवर त्यांचे चित्रपट प्रदर्शित करून त्यांचे नुकसान कमी केले.  म्हणूनच परिस्थिती समजून घेणे अधिक चांगले आहे आणि संकटाला संधी समजून बॉलिवूड निर्मात्यांनी जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पद्धतीचा स्वीकार करून संकटात संधी शोधायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday, May 5, 2021

आता घरातच बनतील सिनेमागृहे?


बातमी तशी सामान्यच आहे, सलमान खानचा 'राधे' एकाचवेळी सिनेमागृहात तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर, 'पे पर व्ह्यू' आणि डायरेक्ट टू होम' चॅनेल्सवर दिसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.  चित्रपटगृहांबरोबरच लोक त्यांच्या घरात बसून आरामात त्याच दिवशी पाहू शकतील. मात्र या बातमीचे परिणाम व्यवसायाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहेत कारण भारतीय सिनेमा व्यवसायात असे प्रथमच   घडणार आहे की, एका मोठ्या स्टारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना एकाच वेळी थिएटर व इतर व्यासपीठावर मिळणार आहे.

आतापर्यंत या मंचांवर थेट स्पर्धा होती. अगोदर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित व्हायचा, मग काही आठवड्यांनंतर त्याचा  व्हिडिओ  किंवा उपग्रह वाहिन्यांवरून प्रसारित व्हायचा.  हे सगळे चित्रपट वितरकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केले गेले होते कारण ते चित्रपटगृहात दर्शविण्यासाठी चित्रपट खरेदी करण्यासाठी मोठ्या पैशांवर पैसे मोजत असत.  त्यांचा असा वाद असायचा की चित्रपटगृह तसेच टीव्ही किंवा उपग्रह वाहिन्यांमधून जर एखादा चित्रपट एकाच वेळी दाखवला गेला तर लोक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणार नाहीत. आणि जर चित्रपट एकाच वेळी रिलीज करावा लागला तर वितरकाला मोबदला देऊन चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्याचे अधिकार का खरेदी करावेत? कोरोना काळात अमिताभ बच्चन यांचा 'गुलाबो सीताबो' किंवा अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' सिनेमागृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला गेला आणि त्यामुळे वितरकांनी त्यांना थिएटरमध्ये दाखवण्यासाठी खरेदी केले नाहीत.  पण राधेचे निर्माते झी स्टुडिओ आहेत, वितरकदेखील झी स्टुडिओ आहेत आणि त्यांचेच स्वतःचे ओटीटी चॅनेल आहेत. त्यामुळे त्यांनी कसाही चित्रपट रिलीज केला तरी कोणाचे काय  नुकसान होणार आहे.  पण प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत असे घडू शकत नाही.

आतापर्यंत लोक केबल किंवा डिशद्वारे टीव्ही पाहत असत आणि त्यासाठी दरमहा फी भरत असे. अजूनही असा प्रकार काही प्रमाणात सुरू आहे.  कोरोना कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दर्शक वाढत्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. त्यांना काहीतरी नवीन हवे होते.  ओटीटीचे कार्यक्रम वेगवेगळे होते.  पारंपारिक टीव्ही पाहणाऱ्यांपैकी पाच टक्के लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले असल्याचे मानले जात आहे.  पण ओटीटीवर हिंसाचार आणि अश्लील भाषेचा भडिमार आहे. नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी फाइव्ह, सोनी लाइव्ह यासारख्या भारतात 40 (अमेरिकेत 200 पेक्षा जास्त) ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत.  गेल्या वर्षी जुलै पर्यंत त्याचे 29 कोटी ग्राहक होते आणि अंदाजानुसार 2025 पर्यंत ओटीटीचा व्यवसाय चार हजार कोटींवर जाईल.

अशा परिस्थितीत सिनेमा बाजार आता आपल्या घरातच सिनेमा हॉल रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न होत आहे. आता प्रत्येकजण ओटीटीचे फायदे बघत आहे.  असे म्हटले जात आहे की आता चित्रपटगृहे बंद केली जातील.  खरं तर, आम्हाला 1930 च्या दशकाच्या संक्रमणाकडे परत आणलं गेलं आहे, जेव्हा जेव्हा टीव्हीच्या अस्तित्वामुळे सिनेमागृहं आता बंद होतील असं म्हटलं जात होतं.  भारतातील युवा वर्ग हा सिनेमा आणि क्रिकेटचा चाहता आहे.  स्टेडियममधील क्रिकेट किंवा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे ही एक वेगळीच भावना आहे, जी मोबाइल किंवा टीव्हीद्वारे मिळू शकत नाही.  म्हणूनच 'जुरासिक पार्क' सारखे चित्रपट बनवणारे सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता स्टीव्हन स्पीलबर्ग म्हणतात की, 'चित्रपटगृहांमध्येच एखाद्या चित्रपटाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 


ओटीटीवर बोल्ड सिरीजचा भडिमार


ओटीटीवर दाखविल्या जाणाऱ्या वेब सीरियल्समध्ये हिंसाचार, अश्लीलता आणि अभद्र भाषाचा आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने ओटीटीला नियमांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु नियमांचा हा लगाम निरर्थक ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, निर्माते असे विषय हाताळत आहेत, जे सामाजिक स्तरावर उपेक्षित केले गेले आहेत. आहेत.  उदाहरणार्थ, आजकाल गे, लेस्बियन या समलैंगिक संबंधांवर आधारितसारख्या वेब सीरिजचा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर एकप्रकारचा पूरच आला आहे.  क्वचितच असा  ओटीटी प्लॅटफॉर्म असेल,ज्याने असे बोल्ड विषय हाताळले नसतील. 

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर समलैंगिक संबंधांवर आधारित विषयांचा भडिमार होत असल्याचे दिसत आहे. परंतु, असे विषय असलेले चित्रपट किंवा वेबसिरीज न आवडणाऱ्या प्रेक्षकांचाही एक वर्ग आहे. जवळपास 25 वर्षांपूर्वी, जेव्हा नंदिता दास आणि शबाना आझमी यांचा 'फायर' नावाचा समलैंगिक संबंधावर आधारित असलेला चित्रपट आला तेव्हा  देशात खळबळ उडाली होती.  परंतु आज असे विषय ओटीटीवर अंधाधुंदपणे दाखवले आणि पसंद केले जात आहेत.  समलैंगिक संबंधांवरील बर्‍याच वेब सिरीज महिला निर्मात्यांनी बनवल्या आहेत.  दीपा मेहता असो, एकता कपूर किंवा झोया अख्तर.

ओटीटी व्यासपीठावर वाढता हिंसाचार आणि अश्लीलता पाहूनच केंद्र सरकारने काही नियम जाहीर केले होते.  प्रेक्षकांच्या वयाप्रमाणे कार्यक्रम दर्शविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण नियम निरर्थक वाटत असल्यासारखी परिस्थिती दिसत आहे तर  दुसरीकडे नियमांवर अंकुश असूनही निर्माते बेलगाम झाले आहेत.  ओटीटी व्यासपीठावर सरकारच्या नियमांचे उल्लंघन करीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड विषयांचा अक्षरशः पूर आला आहे. 

यांपैकी अल्ट बालाजीच्या 'द मॅरीड वूमन' वेबसिरीजची बरीच चर्चा आहे.  एकमेकांकडे आकर्षित झालेल्या दोन स्त्रियांची ही कथा आहे.  एकता कपूरची 'हिज स्टोरी' समलैंगिक संबंधांवरच आहे.  नीरज धवनची 'गिली पुच्ची' नेटफ्लिक्सवर दाखवली जात आहे.  व्हीआरवन बॅनरच्या 'लव्ह मुबारक' ची दोन समलिंगी माणसांची कहाणी आहे.  'अजीब दस्तान है' ही दोन महिलांच्या प्रेम प्रकरणांची कथा असून ती वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडली गेली आहे.

 जोया अख्तरच्या ‘मेड इन हैवन’ वेब सिरीजमध्ये दोन वेडिंग प्लानर एक दुसऱ्याच्या प्रेमात पडतात पण नंतर मुलीला कळते की तिचा प्रेमी 'गे' आहे.  वेब सीरीज ‘रोमिल एंड जुगल’ मध्ये दोन पुरुषांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. ‘फोर मोर शार्ट्स’ मध्ये चार मुलींची कथा आहे. यात एक लेस्बियन जिम ट्रेनर आहे. दूसरी वकील, तिसरी पत्रकार आणि चौथी बेरोजगार आहे. चौघी मैत्रिणी आहेत आणि आयुष्य आपल्या मनासारखं जगू इच्छितात.  त्या समलैंगिकतेला चुकीचं मानत नाहीत.  ‘अदर लव स्टोरी’ हीसुद्धा दोन मुलींचीच कथा आहे.

 समलैंगिकतेच्या बाजूने कायदा असला तरी कायदा या संबंधांना भारतीय समाजात मान्यता नाही. अशा नात्यांना समाज तुच्छतेणे पाहतो. इतर क्षेत्रांप्रमाणे ग्लॅमरच्या जगात म्हणजेच बॉलिवूडमध्ये देखील समलिंगी आहेत, परंतु त्यांचे संबंध उघडपणे स्वीकारण्यास तयार होत नाहीत.  याउलट, हॉलिवूडमधील बरेच तारे समलिंगी आहेत आणि ते स्वीकारण्यात अजिबात संकोच करत नाहीत.  सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की दोन प्रौढ लोक त्यांच्या जीवनाचे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार घेऊ शकतात.  कायदेशीर मान्यता असूनही भारतीय समाजाची स्वतःची एक मान्यता आहे.  त्यांचा असा विश्वास आहे की दोन विषम लिंगीमधील आकर्षण नैसर्गिक आहे, तर समान लिंगीमधील आकर्षण नैतिक नाही.

प्रेक्षकांवर सामाजिक अस्वीकृत विषयांची भुरळ घालण्यास बॉलिवूड निर्माते एका पायावर तयार असतात.  म्हणूनच चित्रपटांमध्ये समलैंगिक संबंधांनाही कथेचा विषय बनविण्यात आला होता. 'गर्लफ्रेंड', 'अलिगढ', 'माय ब्रदर निखिल', 'कपूर अँड सन्स', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'शुभ मंगलऔर ज्यादा सावधान' ' असे चित्रपट आहेत ज्यात समलैंगिक संबंधांना स्थान देण्यात आले होते.  2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'आयएम' चार कथांनी बनला होता. यातील एक कथा 'गे' नात्यांवर आधारित होती.या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात राहुल बोस ने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये समलैंगिकतेवर कॅमेरा चालवला जात असला तरी निर्माते अशा बोल्ड विषयांना मोठ्या प्रमाणात सिनेमा निर्माण करताना दिसत नाहीत. समाजातील एक वर्ग असे विषय पसंद करतो तर दुसरे कडाडून विरोध करतात.


यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...