बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अक्षयचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतात, पण सध्या अक्षयचं स्टारडम संपलं की काय, अशी शंका यायला लागली आहे. सध्या अक्षयच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 24 फेब्रुवारीला 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांना खेचून आणण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने केवळ 11.9 कोटींची कमाई केली आहे. 2023 या नव्या वर्षातला अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट असल्याने चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण चित्रपट प्रेक्षकांचे हवे तसे मनोरंजन करू शकलेला नाही. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 2.6 कोटींपर्यंतची कमाई केली. तर चौथ्या दिवशी चित्रपटाला 1.6 कोटींची कमाई करता आली आहे. यापूर्वीचे अक्षयचे 'बेलबॉटम”, लक्ष्मी”, 'राम सेतू', 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे' व 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेले नाहीत. आता 'सेल्फी' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला बॉलीवूडच्या खिलाडीचा हा सलग सहावा चित्रपट आहे. गेल्यावर्षी 'सम्राट पृथ्वीराज'सारखा बिग बजेट सिनेमादेखील पडद्यावर काहीच कमाल करू शकला नव्हता. अशा या एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनंतर अक्षयचे स्टारडम धोक्यात आल्याचे दिसते. आता असं सांगण्यात येत आहे म्हणे की, त्याच्या या घटत्या लोकप्रियतेचा परिणाम त्याच्या मानधनावरही दिसू लागला आहे. त्यामुळे अक्षयने त्याच्या फीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अक्षयचा आगामी ‘बडे मियां, छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. आता या बिग बजेट चित्रपटाला ब्रेक लागणार अंसल्याचेही दिसत आहे.
राजीव हरी ओम भाटिया असं खरं नाव असलेल्या अक्षयने व्यावसायिक दृष्टीने अक्षय कुमार हे नाव स्वीकारलं आहे. हा भारतीय वंशाचा कॅनेडियन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. 30 वर्षांच्या अभिनयात अक्षयकुमारने जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून परिचित असलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. 9 सप्टेंबर1967 अशी जन्मतारीख असलेल्या या अभिनेत्याने आता 56 व्या वर्षात पर्दापण केले आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकत्या आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत.नेमाने पहाटे चार वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याला पुढील काळ कठीण दिसतो आहे. शाहरुख खानचा 'पठाण' सोडला तर गेल्या वर्षभरात बॉलिवूडचा कोणताच अभिनेता हिट झालेला नाही. उलट दक्षिण अभिनेत्यांनी आणि चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. बॉलीवूड अभिनेत्यांच्या त्याच त्याच पठडीतल्या चित्रपटांना प्रेक्षक कंटाळले आहेत. यात अक्षय कुमारचाही समावेश आहे.
सध्याच्या घडीला अक्षय कुमार या आघाडीच्या बॉलीवूडच्या स्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक कोसळत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अक्षय कुमारचे सहा चित्रपट ओळीने फ्लॉप झालेत. यात 'बेलबॉटम”, लक्ष्मी”, 'अतरंगी रे”, 'बच्चन पांडे, 'सम्राट पृथ्वीराज” आणि आता सेल्फी या चित्रपटाची भर पडली. 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या नावामुळे वादही निर्माण झाला होता. चित्रपट निर्मात्यांनी फार खळखळ न करता 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' केले. बिग बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मात्र काहीच कमाल दाखवली नाही.
अक्षय कुमारचा विचार केला तर त्याने केलेल्या सात चित्रपटांपैकी 'सूर्यवंशी' हिट हा एकमेव चित्रपट हिट झाला होता. मात्र 'सूर्यवंशी"मध्ये अजय देवगण, रणवीर सिंगसारखे यशस्वी आणि कसलेले कलाकारही होते. त्यामुळे या चित्रपटाचे श्रेय एकट्या अक्षय कुमारला देता येणार नाही. 'पृथ्वीराज'च्या भूमिकेत अक्षय कुमारला लोकांनी मूळात स्वीकारले नाही. अलीकडच्या काळात अक्षयने गंभीर भूमिकांपेक्षा विनोदी भूमिकांवर भर दिला आहे. निव्वळ मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.त्यामुळे या कॉमेडी अक्षय कुमारची सिरीयस भूमिका लोकांच्या पचनी पडली नाही. याशिवाय अक्षयचे चित्रपट फ्लॉप व्हायला आणखीही काही कारणे आहेत.अक्षय कुमारची 'बच्चन पांडे’ ही फिल्म एका साऊथ सिनेमाची रिमेक होती. यात त्याचा प्रभाव दिसून आला नाही.'पृथ्वीराज ’ ची पटकथा सशक्त तर नव्हतीच, मात्र त्यात अनेक कच्चे दुवेही होते. प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी जो वेगळेपणा लागतो, तो या सिनेमांमध्ये नव्हता. किंबहुना हा चित्रपट सामान्य श्रेणीतील होता, असे आपण म्हणू शकतो. साहजिकच त्याचे स्टारडम संपले की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली






