हिंदी सिनेमासृष्टीत बांगलाभाषी कलाकारांचं अनोखं योगदान राहिलं आहे. अशोककुमार, प्रदीपकुमार,केष्टो मुखर्जी, निर्मलकुमार, असित सेन, तरुण बोस, किशोरकुमार, विश्वजीत, उत्पल दत्त, उत्तमकुमार, मिथुन चक्रवर्ती, समित भांजा, राहुल बोस, रोनीत रॉय आणि रोहित रॉय आदी नावांचा उल्लेख केल्याशिवाय हिंदी चित्रसृष्टी म्हणजे बॉलिवूडचा इतिहास अपूर्णच आहे.
अशोक कुमार पहिले बांग्लाभाषी अभिनेता आहेत, ज्यांनी हिंदी सिनेमासृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. 13 ऑक्टोबर 1911 रोजी बिहारमधील भागलपुरमध्ये जन्मलेल्या अशोक कुमार यांचे खरे नाव कुमुदलाल गांगुली होते. त्यांना नंतर हिंदी चित्रसृष्टी 'दादामुनी' या नावाने ओळखत होती. 90 वर्षे आयुष्य जगले ते. 10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचं निधन झालं. अशोक कुमार यांचा पहिला चित्रपट होता, 'जीवन नैया'. जो 1936 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर याच वर्षी त्यांचा 'अछूत कन्या' नावाचा चित्रपट आला. 1941 मध्ये 'झूला' आणि 'किस्मत' (1943) पासून 'मिस्टर इंडिया' (1987) पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक ते चरित्र अभिनेता असे काम केले. अशोक कुमार यांचा शेवटचा चित्रपट होता 'आंखों में तुम हो'. हा चित्रपट 1997 मध्ये आला होता.
प्रदीप कुमारदेखील बंगाली होते. त्यांचे पूर्ण नाव होते, शीतल बटबयाल. 3 जानेवारी 1925 रोजी कलकत्तामध्ये जन्मलेल्या प्रदीप कुमार यांचे खूपच हलाखीत वयाच्या 76 व्या वर्षी 27 ऑक्टोबर 2001 रोजी कलकत्ता येथेच निधन झाले. फक्त 17 वर्षे वय असताना त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'अलकनंदा' (1947) हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढे मग 'नागिन', 'घूंघट', 'राखी', 'ताजमहल', 'अफसाना', 'अनारकली' आदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे काही चित्रपट सुपरहिट ठरले.
हास्य अभिनेता केष्टो मुखर्जी यांचा जन्म 7 ऑगस्ट 1905 रोजी मुंबईत झाला. 3 मार्च 1982 रोजी मुंबईतच त्यांनी आपल्या इहलोकीची यात्रा संपवली. केष्टो मुखर्जी यांनी दारुड्याची भूमिका अगदी हुबेहूब वठवली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात कधी दारूला हात लावला नव्हता. प्रसिध्द फिल्मकार ऋत्विक घटक यांनी त्यांना चित्रपटात आणले होते. केष्टो मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता, 'मुसाफिर', जो 1957 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात केष्टो मुखर्जी यांनी हरिराम नाव्ह्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षक अजूनही विसरलेले नाहीत. कोलकातामध्ये राहत असलेल्या निर्मल कुमार यांना 91 वर्षांचे आयुष्य लाभले. 14 डिसेंबर 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. 'बाजी' (1951), 'हावड़ा ब्रिज' (1958), आणि 'कहीं आर कहीं पार' (1971) आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. 'बाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी केले होते. आणि 'हावड़ा ब्रिज' चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ति सामंत यांनी केले.
असित सेन एक असे बंगाली होते, ज्यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपुर येथे झाला होता. 1953 पासून त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी जवळपास 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.1960, 1970 आणि 1980 मध्ये असित सेन यांचा मुंबईमध्ये मोठा दबदबा होता.
किशोर कुमार म्हणजे हरहुन्नरी बंगाली कलाकार. त्यांनी अभिनय, गायन आणि दिग्दर्शनसह अनेक क्षेत्रात सहज मुसाफिरी केली. 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशमधील खंडवा येथे जन्मलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. 1946 मध्ये प्रदर्शित झालेला 'शिकारी' हा त्यांचा पहिला चित्रपट. हाफ टिकटसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकांना मोठी दाद मिळाली. गीत गायन क्षेत्रात तर ते 'किशोरदा'च होते. सर्वश्रेष्ठ गायकच्या रुपात किशोर कुमार यांनी आठ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. 13 ऑक्टोबर 1987 रोजी त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध अभिनेता जय मुखर्जी यांनीदेखील एक काळ गाजवला. त्यांचा पहिला चित्रपट होता 'लव इन शिमला' (1960). या चित्रपटात अभिनेत्री साधना त्यांची नायिका होती.
विश्वजीत यांचेदेखील हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव होते. विश्वजीत आज 83 वर्षांचे आहेत आणि मुंबईत राहतात. प्रसेनजीत चटर्जी हा त्यांचाच मुलगा आहे, जो आज बांग्ला चित्रपटांमध्ये नंबर वन पोझिशनमध्ये आहे. उत्पल दत्त, उत्तम कुमार, मिथुन चक्रवर्ती, समित भांजा, राहुल बोस, रोनित रॉय आणि त्यांचा मुलगा रोहित रॉय यांनीदेखील हिंदी सिनेमासृष्टीत आपल्या संस्मरणीय भूमिकांनी यादगार बनवला आहे. उत्पल दत्त 'गोलमाल', 'गुड्डी', 'नरम गरम', 'शौकीन', 'भुवन सोम' आदी आठवणीत राहणारे चित्रपट आहेत. उत्पल दत्त यांचे 19 ऑगस्ट 1993 रोजी निधन झाले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.
उत्तम कुमार यांचे खरे नाव अरुण कुमार चटर्जी होते. उत्तम कुमार यांनी 'छोटी-सी मुलाकात' (1967), 'देश प्रेमी' (1982) आणि 'मेरा करम मेरा धरम' (1987) अशा काही मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. बांगला भाषी प्रेक्षकांचा मात्र हा लाडका कलाकार राहिला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत तीन नेशनल अवॉर्ड पटकावले आहेत. गरिब चित्रपट निर्मात्यांचा अमिताभ अशी त्यांची ओळख होती. पहिल्या चित्रपटातच त्यांनी नॅशनल अवार्ड जिंकले होते. 'दो अनजाने', 'शौकीन', 'अग्निपथ', 'गुरु', 'प्यार झुकता नहीं' असे काही त्यांचे गाजलेले कामर्शियल चित्रपट आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत