Saturday, February 20, 2021

नंबर वन कोण?


सध्याच्या काळात बॉलिवूडमध्ये नंबर वन कोण याचीच चर्चा सुरू आहे. सलमान खान की अक्षय कुमार यावर सध्या खल चालला आहे. अक्षय कुमार लोकांचे आवडते कलाकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र शाहरुख खानची 'नंबर वन'ची खुर्ची धोक्यात आली आहे. इकडे सलमान खान शाहरुख खानचे कौतुक करताना बॉलिवूडचा 'किंग ' शाहरुखच असल्याचे सांगत आहे. काही दिवसांपर्यंत शाहरुख आणि सलमान यांच्यात साधा विस्तवही जात नव्हता मात्र आता त्यांच्या शत्रुत्वामध्ये मैत्री निर्माण होत असल्याचे हे संकेत आहेत. कारण या दोघांनीही एकमेकांच्या चित्रपटांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली आहे. दुश्मनी फार काळ टिकत नाही,हेच खरे. शाहरुखचा 200 कोटी बजेटचा चित्रपट  'झिरो' बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला असताना बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान कसा असू शकतो, असा प्रश्न चित्रपट चाहत्यांना  पडला आहे. त्याच्या मागच्या चित्रपटांच्या आलेख किंवा गल्ल्याचा विचार केला तरी त्याची परिस्थिती लक्षात येते. कालपर्यंत तरी सलमान की शाहरुख यांच्यात नंबर वन कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता हा प्रश्नच बदलला गेला आहे. दोन्ही खानांना प्रतिस्पर्धी म्हणून उभा केलेल्या लोकांना सलमानद्वारा शाहरुखचे कौतुक ऐकताना घेरी आली आहे. आता लोकांना कोण समाजावून सांगणार की शाहरुखने सलमानच्या 'ट्युबलाईट' मध्ये आणि सलमानने शाहरुखच्या 'झिरो'मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.

सलमानने तर त्याच्या 'राधे' चित्रपटाचे व्हिएफएक्स' शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीत केले आहे. व्यवसायाबरोबरच मैत्री आणखी दृढ करताना शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्याचे निश्चित करताना दोघांनी चित्रपटाचे वजनही वाढवले आहे. लेखनी बहाद्दर शाहरुख-सलमान यांना एकमेकांसमोर उभे करत असताना हे दोघे मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकमेकांचे कौतुक, मैत्री आणि व्यवसाय जोपासताना दिसत आहेत. 

आमिर खानचा मुलगा चित्रपटात

कालपर्यंत श्रीदेवीची दुसरी मुलगी चित्रपटात येणार असल्याची आणि प्रसिध्द दिग्दर्शक बोनी कपूर वयाच्या 65 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची चर्चा असतानाच आणखी एक बातमी येऊन थडकली आहे, ती म्हणजे आमिर खानच्या मुलाची! आमिर खान त्याच्या मुलाला कॅमेऱ्यासमोर उभे केल्याची ही बातमी असून चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याची चर्चा आहे. अर्थात यात नव्हे काय आहे, असा सवाल तुम्हाला पडला असणार! उद्या शाहरुख खानची मुलं-मुलीदेखील चित्रपटात येतील. यात सलमान खान बराच मागे आहे, पण उद्या कदाचित त्याचीही मुलं-मुली चित्रपट सृष्टीत येतील. उलट लोकांनाही तसंच वाटतं. आमिर खानचा मुलगा जुनैद याने 'महाराजा' नावाच्या चित्रपटासाठी कॅमेऱ्याच्या सामोरा गेला आहे. वास्तविक त्याच्या वडिलांनी आमिरने याअगोदर त्याला कॅमेऱ्याच्या मागे उभे केले होते. 2014 मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' साठी त्याला त्यांचा असिस्टंट बनवले होते. आता जुनैद पडदयावर एन्ट्री करणार आहे. यश चोप्रा यांच्या कंपनीद्वारा सिद्धार्थ दिग्दर्शित बनवल्या जात असलेल्या 'महाराजा' चित्रपटात तो एक पत्रकार म्हणून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'महाराजा' हा चित्रपट 1862 मधील सत्य परिस्थितीवर आधारित आहे.  यात करसनदास मूलजी या गुजराती पत्रकाराने त्याच्या 'सत्यप्रकाश' या वृत्तपत्रात महिलांवर अत्याचार करणाऱ्या जदूनाथजी ब्रजरत्न महाराज यांची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमी नंतर खूप वाद उफाळला होता आणि हे प्रकरण शेवटी न्यायालयात पोहचले होते. यात पत्रकाराचा विजय झाला होता. 


सूरज बडजात्या सक्रिय

 असं वाटतंय की, चित्रपटवाल्यांनी आपल्या मुला-मुलींना सिनेमात आणण्यासाठी स्पर्धाच लावली आहे की काय?  ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’ सारखे चित्रपट बनवणारे सूरज बड़जात्यादेखील यावर्षी आपल्या मुलाला- अनवीशला चित्रपट क्षेत्रात आणण्याच्या तयारीत आहेत. गेल्या पाच वर्षात सुरज बडजात्या यांनी एकही चित्रपट केला नाही. अर्थात त्यांच्या दिग्दर्शनात एक चित्रपट तयार झाला की किमान ते चार पाच वर्षांचा गॅप राहत असतोच, पण यंदा त्यांच्याविषयी नवीनच ऐकायला मिळत आहे. एका वर्षात ते कमाल तीन चित्रपटांवर काम करणार आहेत म्हणे. मागे असे ऐकायला मिळाले होते की, सुरज बडजात्या अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांना घेऊन एक चित्रपट करत आहेत. याशिवाय सलमानला घेऊनही एक चित्रपट करत आहेत, असेही कानावर आले आहे. शिवाय ते स्वतःच्या मुलालाही पडद्यावर आणणार असल्याने ते नेमके किती चित्रपट करणार आहेत, याचा लवकरच खुलासा होईल. त्यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहता ते एका वर्षात तीन चित्रपट करणं शक्य नाही.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...