Friday, August 21, 2020

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

1962 मध्ये 'मला म्हणतात लवंगी मिरची' ही लावणी सुपरहिट झाली आणि सगळ्यांच्या तोंडी सुलोचना चव्हाण यांचं नाव आलं. विशेष म्हणजे या लावणीने त्यांचेही आयुष्य पार बदलून गेलं. पूर्वी त्या कोरसमध्ये गायच्या. हिंदी,मराठी,गुजराती,पंजाबी गाणी आणि बॅलेसाठी त्यांनी गायलं होतं. पण 'मला म्हणतात...'लावणीमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळालीच,पण इथून पुढे त्यांना फक्त लावणी गायनासाठीच बोलावले जाऊ लागले. 'नाव गाव कशाला पुसता', 'खेळताना रंग बाई होळीचा', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', 'राग नका धरू सजना', 'पाडाला पिकलाय आंबा', 'लाडे लाडे बाई करू नका' अशा एकापेक्षा एक सरस ,ठसकेबाज लावण्या सुलोचना यांनी गायल्या. आचार्य अत्रे यांनी त्यांना लावणीसाम्राज्ञी हा किताब दिला. 

सुलोचना या वयाच्या 11 व्या वर्षांपासून गायला लागल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या घरात संगीताचे वातावरण अजिबात नव्हते. कुणी गाणारे नव्हते.  त्यांना कुणी गुरू नव्हता. संगीतकार जेव्हा गाणं बसवायचे तेव्हाच त्यांना देण्यात आलेलं गाणं त्या त्यांच्याबरोबर बसून शिकायच्या. गाण्यातला मात्रा, ताल, शब्द सर्व काही तेव्हाच समजून घ्यायच्या आणि मग गायच्या. त्यांचं 20 व्या वर्षी लग्न झालं. त्यांच्या नवऱ्याने म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी त्यांना साथ दिली. तेही संगीत शिकले नव्हते, पण त्यांना लावणीचा ठसका,ताल, रुबाब समजत होता. त्यामुळे लावणी कशी गायची, त्यातले शब्द कसे उच्चारायचे, हे त्यांनीच सुलोचनाबाईना शिकवले. खऱ्या अर्थाने त्यांचे लावणीचे गुरू तेच ठरले. पहिली लावणी गाण्याची संधी संगीतकार वसंत पवार यांनी दिली. 'रंगल्या रात्री' या चित्रपटातील आणि जगदीश खेबुडकर लिखित 'नाव गाव कशाला पुसता , अहो मी आहे कोल्हापूरची ,मला म्हणतात लवंगी मिरची' ही लावणी लोकप्रिय झाली. नव्हे ही लावणी नंतर अजरामर झाली. सुलोचनाबाईनी आयुष्यभर कलेची सेवा केली. त्यांना 2010 मध्ये प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. 14 मार्च 2020 मध्ये त्यांनी 87 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आजच्या तरुण-तरुणींना त्या सांगतात की, एक दोन गाणी, एक दोन चांगले चित्रपट करणं म्हणजे संगीत करिअर नाही. तुम्ही संगीताची मनापासून सेवा व भक्ती केलीत तरच सरस्वती तुमच्यावर प्रसन्न होते. कोणत्याही पुरस्कारासाठी म्हणून कधीच काम करू नका.पुरस्कार मिळवणे, पैसा मिळवणे हे तुमचे लक्ष ठेवू नका. कलाकार म्हणून चार पैसे मिळाले की त्यातील दोन पैसे गरिबांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा. आजची पिढी हुशार आहे. चांगली गाणारी आहे. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी गाणं गाताना आणि संगीत देताना गाण्यातील अर्थ समजून घ्या. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Thursday, August 20, 2020

रणदीप हुड्डा: टॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूड अभिनेता

रणदीप हुड्डा अशा कलाकारांपैकी एक आहे जे डोळ्यांनी बोलतात आणि जे न बोलता बरेच काम करतात. रणदीपला बॉलिवूडमध्ये नॅचरल Actor म्हणून ओळखले जाते. रणदीप हुड्डाने कमी चित्रपटात काम केले आहे. पण त्याने जितके चित्रपट केले आहेत, त्यामध्ये रणदीपने जबरदस्त काम केले आहे. रणदीपने अल्पावधीत बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे रणदीपने शिक्षण घेतले आहे. त्याचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. इतकेच नाहीतर रणदीप स्विमिंग आणि घोडोस्वारीमध्ये खूप माहिर असल्याचे मानले जाते. यामुळेच रणदीपला अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे, म्हटले जाते. 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहटक येथे झाला. रणदीप स्वतः कुटुंबाची खूप काळजी घेतो. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये पकिटमनीसाठी त्याने ट्रॅक्सी चालवली, रेस्ट्रारंटमध्ये काम केले आणि कधी कधी गाड्या देखील धुतल्या. पण हे सगळे करणे व्यर्थ गेले नाही. रणदीपने थिएटरपासून मॉडेलिंगपर्यंत सर्व काही केले. नंंतर त्यानेे दिल्लीतील थिएटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शिका मीरा नायर यांनी रणदीपचा अभिनय पाहिला आणि त्याला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ब्रेक दिला. २00१ साली मॉन्सून वेडिंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या रणदीपने या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. मात्र त्याचे जिस्म २ आणि बॉम्बे टॉकीज हे चित्रपट विशेष चर्चिले गेले. या दोन्ही चित्रपटांमध्ये रणदीपने बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले.
बॉम्बे टॉकीज या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर चार वर्षांनंतर 'डी' चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. रणदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला वेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले. रणदीपचे त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आहेत. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये रणदीप 'एक्सट्रैक्शन' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटातील त्याच्या Action अवतारने सर्वांना इम्प्रेस केले. रणदीप त्याच्या आवडीनुसार चित्रपटात काम करतो. त्याने 'हायवे', 'सरबजीत', 'किक', 'रंग रसिया' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Friday, August 14, 2020

बांग्ला कलाकार आणि हिंदी चित्रसृष्टी

हिंदी सिनेमासृष्टीत बांगलाभाषी कलाकारांचं अनोखं योगदान राहिलं आहे. अशोककुमार, प्रदीपकुमार,केष्टो मुखर्जी, निर्मलकुमार, असित सेन, तरुण बोस, किशोरकुमार, विश्वजीत, उत्पल दत्त, उत्तमकुमार, मिथुन चक्रवर्ती, समित भांजा, राहुल बोस, रोनीत रॉय आणि रोहित रॉय आदी नावांचा उल्लेख केल्याशिवाय हिंदी चित्रसृष्टी म्हणजे बॉलिवूडचा इतिहास अपूर्णच आहे. 

अशोक कुमार पहिले बांग्लाभाषी अभिनेता आहेत, ज्यांनी हिंदी सिनेमासृष्टीत  पहिलं पाऊल ठेवलं. 13 ऑक्टोबर 1911 रोजी बिहारमधील भागलपुरमध्ये जन्मलेल्या अशोक कुमार यांचे खरे नाव कुमुदलाल गांगुली होते. त्यांना नंतर हिंदी चित्रसृष्टी 'दादामुनी' या नावाने  ओळखत होती.  90 वर्षे आयुष्य जगले ते.  10 डिसेंबर 2001 रोजी त्यांचं निधन झालं. अशोक कुमार यांचा पहिला चित्रपट होता, 'जीवन नैया'. जो 1936 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर याच वर्षी त्यांचा 'अछूत कन्या' नावाचा चित्रपट आला. 1941 मध्ये  'झूला' आणि 'किस्मत' (1943) पासून 'मिस्टर इंडिया' (1987) पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक ते चरित्र अभिनेता असे काम केले. अशोक कुमार यांचा शेवटचा चित्रपट होता 'आंखों में तुम हो'.  हा चित्रपट 1997 मध्ये आला होता.

प्रदीप कुमारदेखील बंगाली होते. त्यांचे पूर्ण नाव होते, शीतल बटबयाल. 3 जानेवारी 1925 रोजी कलकत्तामध्ये जन्मलेल्या प्रदीप कुमार यांचे खूपच हलाखीत वयाच्या 76 व्या वर्षी 27 ऑक्टोबर 2001 रोजी कलकत्ता येथेच निधन झाले. फक्त 17 वर्षे वय असताना त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.  देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'अलकनंदा' (1947) हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढे मग 'नागिन', 'घूंघट', 'राखी', 'ताजमहल', 'अफसाना', 'अनारकली' आदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे काही चित्रपट सुपरहिट ठरले. 

हास्य अभिनेता केष्टो मुखर्जी यांचा जन्म 7 ऑगस्ट 1905  रोजी मुंबईत झाला. 3 मार्च 1982 रोजी मुंबईतच त्यांनी आपल्या इहलोकीची यात्रा संपवली. केष्टो मुखर्जी यांनी दारुड्याची भूमिका अगदी हुबेहूब वठवली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात कधी दारूला हात लावला नव्हता. प्रसिध्द फिल्मकार ऋत्विक घटक यांनी त्यांना चित्रपटात आणले होते. केष्टो मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता, 'मुसाफिर', जो 1957 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात केष्टो मुखर्जी यांनी हरिराम नाव्ह्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षक अजूनही विसरलेले नाहीत. कोलकातामध्ये राहत असलेल्या निर्मल कुमार यांना 91 वर्षांचे आयुष्य लाभले. 14 डिसेंबर 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. 'बाजी' (1951), 'हावड़ा ब्रिज' (1958), आणि 'कहीं आर कहीं पार' (1971)  आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. 'बाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी केले होते. आणि 'हावड़ा ब्रिज' चित्रपटाचे दिग्दर्शन  शक्ति सामंत यांनी केले. 

असित सेन एक असे  बंगाली होते, ज्यांचा  जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपुर येथे झाला होता. 1953 पासून त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी जवळपास   200  हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.1960, 1970 आणि 1980 मध्ये असित सेन यांचा मुंबईमध्ये मोठा दबदबा होता. 

किशोर कुमार म्हणजे हरहुन्नरी बंगाली कलाकार. त्यांनी  अभिनय, गायन आणि दिग्दर्शनसह अनेक क्षेत्रात सहज मुसाफिरी केली. 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशमधील खंडवा येथे जन्मलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. 1946 मध्ये प्रदर्शित झालेला 'शिकारी' हा त्यांचा पहिला चित्रपट. हाफ टिकटसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकांना मोठी दाद मिळाली. गीत गायन क्षेत्रात तर ते 'किशोरदा'च होते.  सर्वश्रेष्ठ गायकच्या रुपात किशोर कुमार यांनी आठ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. 13 ऑक्टोबर 1987 रोजी त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध अभिनेता जय मुखर्जी यांनीदेखील एक काळ गाजवला. त्यांचा पहिला चित्रपट होता 'लव इन शिमला' (1960).  या चित्रपटात अभिनेत्री साधना त्यांची नायिका होती.

विश्वजीत यांचेदेखील हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव होते. विश्वजीत आज 83 वर्षांचे आहेत आणि  मुंबईत राहतात. प्रसेनजीत चटर्जी हा त्यांचाच मुलगा आहे, जो आज बांग्ला चित्रपटांमध्ये नंबर वन पोझिशनमध्ये आहे. उत्पल दत्त, उत्तम कुमार, मिथुन चक्रवर्ती, समित भांजा, राहुल बोस, रोनित रॉय आणि त्यांचा मुलगा रोहित रॉय यांनीदेखील हिंदी सिनेमासृष्टीत आपल्या संस्मरणीय भूमिकांनी यादगार बनवला आहे. उत्पल दत्त 'गोलमाल', 'गुड्डी', 'नरम गरम', 'शौकीन', 'भुवन सोम' आदी आठवणीत राहणारे चित्रपट आहेत. उत्पल दत्त यांचे 19 ऑगस्ट 1993 रोजी निधन झाले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

उत्तम कुमार यांचे खरे नाव  अरुण कुमार चटर्जी होते. उत्तम कुमार यांनी 'छोटी-सी मुलाकात' (1967), 'देश प्रेमी' (1982) आणि 'मेरा करम मेरा धरम' (1987) अशा काही मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. बांगला भाषी प्रेक्षकांचा मात्र हा लाडका कलाकार राहिला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत तीन नेशनल अवॉर्ड पटकावले आहेत. गरिब चित्रपट निर्मात्यांचा अमिताभ अशी त्यांची ओळख होती.  पहिल्या चित्रपटातच त्यांनी नॅशनल अवार्ड जिंकले होते. 'दो अनजाने', 'शौकीन', 'अग्निपथ', 'गुरु', 'प्यार झुकता नहीं' असे काही त्यांचे गाजलेले कामर्शियल चित्रपट आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Sunday, August 2, 2020

पडद्यावरचं देशप्रेम

हिंदी चित्रपटसृष्टीचा देशभक्ती' हा विषय आवडता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत देशभक्ती सांगणारे असंख्य चित्रपट आले. प्रेक्षकांनीही त्याला पसंदी दिली,हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मनोजकुमार यांचे अनेक देशभक्तीवरचे चित्रपट आले. 'शाहिद', 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'देशवासी' यासारखे अनेक देशभक्तीपर चित्रपट गाजले. त्यामुळे त्यांना मनोज नाहीतर 'भारतकुमार' म्हटले जाऊ लागले. आज काळ बदलला तशी देशभक्तीची व्याख्याही बदलली. पण रसिकांनी हा बदलही स्वीकारला. शौर्यगाथा मात्र त्यांना अधिक भावल्या. देशभक्ती म्हणजे बॉर्डरवरील ऐतिहासिक युद्धपट किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्ष नव्हे. सध्याच्या काळात विविध घटकांवर होणारा अन्याय-अत्याचार, भ्रष्ट कारभार मोडून काढणे हीसुद्धा एक देश सेवाच मानली जाते. त्यामुळे सलमान खान यांचे 'जय हो' सारखे चित्रपटही याच पठडीत येतात. 

1945 मध्ये 'किस्मत' आला होता. या चित्रपटातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है' हे गीत प्रचंड गाजले होते. त्यावेळी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने मोठा भाव खाल्ला.या चित्रपटातील गाणी विशेषतः 'संदेसे आते हैं...' हे गाणे आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वाजवले जाते. 2003 मध्ये आलेला 'एलओसी कारगिल' या चित्रपटानेही लोकप्रियता मिळवली. भगतसिंग ही चित्रसृष्टीची आवडती व्यक्तिरेखा. त्यांच्यावर 2002 मध्ये अजय देवगणचा 'द लिजेंड ऑफ भगतसिंग', बॉबी देओल आणि सनी देओल यांचा '23 मार्च 1931 शहीद' हे दोन चित्रपट आले. मात्र अजय देवगणच्या चित्रपटाने बाजी मारली. 1965 साली एस.राम शर्मा यांनी भगतसिंग यांच्या आयुष्यावर 'शहीद' चित्रपट बनवला. 1962 साली चेतन आनंद यांचा 'हकीकत'आला. धमेन्द्र आणि संजय खान यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. मदर इंडिया, सात हिंदुस्थानी, नया दौर, दीवार, लेट्स ब्रिन्ग अवर हिरोज बॅक,1971 अशा चित्रपटांमधूनही चित्रपट  निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे देशभक्ती पडद्यावर आणली.
2001 साली सनी देओलचा 'गदर एक प्रेमकथा', अमीर खानचा 'लगान' प्रदर्शित झाला. 'गदर'मध्ये प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानात जाऊन तिथले सरकार हलवणारा सनी आणि 'लगान' मध्ये आपली जमीन मिळवण्यासाठी इंग्रजांबरोबर आपल्या साथीदारांसह क्रिकेट खेळणारा अमीर लोकांना भावला. दोन्ही चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. नंतरच्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि देशभक्तीचा वेगळा दृष्टिकोन ठेवून निर्माता दिग्दर्शकांनी वेगवेगळे चित्रपट बनवले. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'रंग दे बसंती' आणला. आजच्या पिढीतील सहा युवक कशा पद्धतीने भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देतात ही शौर्यगाथा दाखवली आहे. ही कथा फुलवताना दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्या पात्रांचा उपयोग केला आहे. अशाच प्रकारच्या कमल हसन यांचा 'हिंदुस्थानी' (1996) नेही वाहवा मिळवली. गांधी (1982), नेताजी सुभाष चंद्र बोस द फरगॉटन हिरो (2004), सरदार (1993), झाशी की राणी (1953) स्वदेश (2004), तिरंगा, प्रहार, क्रांतीवीर, कोहराम (नाना पाटेकर), जमीन  (अजय देवगन) मंगल पांडे (अमीर खान),परमाणू, रोमिओ अकबर वॉल्टर (जॉन अब्राहम) हे देशभक्तीपर चित्रपट गाजले.'अ वेन्स्डे' या मध्ये सामान्य माणूस जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थाच हादरवून टाकण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिलं आहे. 'रोजा', '1942 अ लव्हस्टोरी', 'पुकार', 'लक्ष्य', यांतील शौर्यगाथा रसिकांना आवडल्या. खिलाडी अक्षयकुमार हा अलीकडचा 'भारतकुमार' म्हटला पाहिजे. त्याच्या हॉलिडे, बेबी, नाम शबाना, गब्बर, एअरलिफ़्ट, केसरी, मिशन मंगल, टॉयलेट एक प्रेमकथा आदी चित्रपटांमधून देशभक्ती डोकावते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012


Thursday, July 30, 2020

वेश्यावस्तीतला तो प्रसंग

'प्यासा आणि त्यामागची निर्मितीप्रक्रिया याबाबत संगीत दिग्दर्शक सुधीर मोघे यांनी एके ठिकाणी सांगितलं आहे. 'प्यासा' चित्रपटात साहिर लुधियानवींची एक अत्यंत अर्थगर्भ, दीर्घ कविता पाहिजेच, हा गुरुदत्त यांचा आग्रह होता. धगधगीत वास्तवाचे चित्रण करणाऱ्या इतक्या लांबलचक कवितेसाठी सिच्युएशन कशी शोधायची, ही संहिता लेखक म्हणून अब्रारजी हैराण होते. दरम्यानच्या काळात एका वेगळ्याच कथेचे हक्क घ्यायला ही मंडळी हैदराबादला गेली. दिवस सुट्टीचा म्हणून मुक्काम केला. मग रात्री उशिरा कोठीवरचं गाणं ऐकायची कल्पना निघाली. जाणकार हैदराबादी मित्राने एक नामजाद कोठी शोधली. पण तिथे गेल्यावर ती कोठी बंद होती. मित्राची अब्रू पणाला लागली. त्याने आत जाऊन गुरुदत्त यांच्या नावाचे वजन टाकून केवळ गाणं ऐकायचे म्हणून कोठी उघडायला लावली. एक तरुण रूपवती गायिका समोर गायला बसलेली. बघता बघता मैफल रंगत चालली. तेवढ्यात दारावर उतावीळ थापा पडू लागल्या. दरवाजात 'साहिब, बीबी...'मधलं रहेमानजींचं रूप आठवावं असा तरणाबांड नबाब उभा होता. तो भडकलेला. तो या मुलीचा सर्वाधिकारी मालक. त्याच्या नकळत कोठी चालू होतेच कशी? कुणासाठी?. त्याला कसाबसा समजावला. तोही मैफलीत शरीक झाला. पण दुखावलेला. आपल्या अहंगंडासाठी त्याने बेसुमार दौलतजादा सुरू केला. मुंबईच्या पाहुण्यांना शरमिंदं करण्यासाठी नोटा त्यांच्यावर ओवाळून टाकायला सुरुवात केली.

गुरुदत्त निर्विकार शांतपणे गाण ऐकत होते. तो त्या
दुर्लक्षामुळे अधिकच चवताळलेला. एकाएकी त्याने हुकूम सोडला... 'काफी गाना हुआ. अब नाचो.' मुलगी कावरीबावरी. हात जोडून मुलीच्या कोठीवाल्या आईने विनवले, 'इनको सिर्फ गानाही सुनना है.' 'क्यूँ? उन्हे नाच भी दिखाओ ना ! मेरा हुक्म है."
ती मुलगी नाइलाजाने उभी राहिली आणि दिसलं... ती गर्भवती होती. क्षणार्धात गुरुदत्तांनी खिशातून नोटांचे भलेमोठे बंडल काढले. पुढे ठेवीत म्हणाले, 'ये महफिल हम यही खत्म करते है. चलो दोस्तों.' सुनसान मध्यरात्री रस्त्यावर सगळे निःशब्द चालू लागले. अब्रारजीही व्यथित. पण त्यांच्यातला पटकथा लेखक रोमांचित झालेला. हलकेच म्हणाला, 'यार गुरू, उस गाने की
सिच्युएशन मिल गयी.'
ही घटना प्रतिबिंबित झालेला आणि गुरुदत्त, साहिर-बर्मनदा- रफी आणि कॅमेरामन व्ही. के. मूर्ती यांनी अविस्मरणीय केलेला वेश्यावस्तीतला तो प्रसंग माझ्यासारखाच तुमच्याही डोळ्यांसमोर या क्षणीही साकार होऊ लागला असेल...

ये कूचे, ये नीलामघर दिलकशी के
ये लुटते हुए कारवाँ ज़िन्दगी के
कहाँ हैं, कहाँ है, मुहाफ़िज़ ख़ुदी के
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

ये पुरपेच गलियाँ, ये बदनाम बाज़ार
ये ग़ुमनाम राही, ये सिक्कों की झन्कार
ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

ये सदियों से बेख्वाब, सहमी सी गलियाँ
ये मसली हुई अधखिली ज़र्द कलियाँ
ये बिकती हुई खोखली रंग-रलियाँ
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

वो उजले दरीचों में पायल की छन-छन
थकी-हारी साँसों पे तबले की धन-धन
ये बेरूह कमरों में खाँसी की ठन-ठन
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

ये फूलों के गजरे, ये पीकों के छींटे
ये बेबाक नज़रें, ये गुस्ताख फ़िकरे
ये ढलके बदन और ये बीमार चेहरे
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

यहाँ पीर भी आ चुके हैं, जवाँ भी
तनोमंद बेटे भी, अब्बा, मियाँ भी
ये बीवी भी है और बहन भी है, माँ भी
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

मदद चाहती है ये हौवा की बेटी
यशोदा की हमजिंस, राधा की बेटी
पयम्बर की उम्मत, ज़ुलयखां की बेटी
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

ज़रा मुल्क के रहबरों को बुलाओ
ये कुचे, ये गलियाँ, ये मंजर दिखाओ
जिन्हें नाज़ है हिन्द पर उनको लाओ
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012


Monday, July 27, 2020

रसिकांना भरभरून देणारे गायक: मोहम्मद रफी


मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच्या घराण्यात गायकीचा कुठलाच इतिहास नव्हता,पण मोहम्मद रफी यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. गावात येणाऱ्या फकिराची गाणीही ते गात. संगीत दिग्दर्शक श्यामसुंदर यांनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. याला कारण घडलंही तसंच होतं.

Wednesday, July 1, 2020

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा च्या चित्रपट कारकिर्दीला आज 18 वर्षे झाली. आता तिच्या कारकिर्दीला उतरंड लागली आहे. मात्र तिने या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस नायिका एवढीच आपली ओळख मर्यादित राहू न देता, तिने काही प्रमाणात आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिवाय काही काळ ती हॉलिवूडमध्ये सक्रिय होती. तिथले चित्रपट, मालिका आणि चॅट शोमध्ये तिने कामं केली आहेत.  अलीकडच्या काही वर्षांत तिने मर्यादित चित्रपट स्वीकारले, मात्र या कालावधीत ती चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची तिने निर्मिती केली आहे.

यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...