Sunday, October 25, 2020

बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखिका:ट्विंकल खन्ना


ट्विंकल खन्ना म्हणजे डिंपल कपाडिया आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांची कन्या आणि प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी. स्वतः ट्विंकलने पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतः ही या ग्लॅमरमध्ये न्हाऊन निघालेली ट्विंकल आता वेगळ्याच मार्गावर आहे. आणि हा मार्ग आहे लेखनाचा. तिची आतापर्यंतची सर्व पुस्तकं बेस्टसेलर आहेत. विविध ठिकाणी स्तंभ लेखन करता करता तिने कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. वास्तविक तिच्यात लेखनाचं बीज फार पूर्वीपासून होतं. साधारण वीस-एकवीस वर्षांची असताना तिने एक कादंबरी लिहिली होती. पण नंतर तिला त्याचा कंटाळा आला आणि ते काम तिनं सोडून दिलं.

मात्र अलीकडे ती स्तंभ लेखन करता करता गोष्टी लिहू लागली. या प्रासंगिक लेखनाची पुस्तकं निघायला लागली आणि आता ती चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखिका बनली. तिची खास निरीक्षणं, विनोदाची मस्त फोडणी आणि उपरोधाची सुरेख झालर यांतून तिच्या लेखनाचा एक वेगळाच मसाला तयार झाला आहे. अगदी अवचितपणे सापडलेली ही लेखनवाट हाच ट्विंकलचा 'यूएसपी' बनला आहे. 'मिसेस फनीबोन्स' या पुस्तकाबरोबर तिची ओळख इतकी घट्ट झाली की, तिनं नंतर स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस काढलं, तेव्हाही त्याचं नाव मिसेस फनीबोन्स मूव्हीज'असंच ठेवलं आहे.

'फनीबोन्स' नंतर तिने 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहिलं नाही. या पुस्तकात ट्विंकलनं छोट्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा अरुणाचलम मुरूगनाथम यांच्यावर आधारित होती. याच कथेच्या आधारावर अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट आला. हा चित्रपट खूप गाजलाही. आतापर्यंत तिने तीन पुस्तकं लिहिली आहेत आणि तिन्हीही बेस्टसेलर ठरली आहेत. 'मिसेस फनीबोन्स' हे पुस्तक 2015 मध्ये देशातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. आता अलीकडेच तिचं'पैजामाज आर फर्गीव्हिंग' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सध्या हे पुस्तकही गाजतं आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे

Thursday, October 8, 2020

आशा पारेख


बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने एकेकाळी सर्वांना घायाळ करणार्‍या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरातमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांनी १९५९ पासून ते १९७३ पयर्ंतच्या काळात बॉलिवूडवर जादूच केली होती. १९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंझील इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटासाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

नुकतेच एका रिअँलिटी शोमध्ये आशा पारेख यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा धर्मेन्द्र यांनी आशा पारेख यांच्याविषयीचा मजेदार किस्सा सांगितला. एरवी बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे मदिरापान फारच सामान्य बाब मानली जाते. पण, आशा पारेख या बाबतीत अपवाद होत्या. त्या स्वत: मदिरापान करीत नव्हत्या आणि इतर कोणी कामाच्या वेळी असे आलेलेही त्यांना आवडत नसायचे. दारूचा साधा वासही आला तरी त्या रागवायच्या. 'आये दिन बहार के' या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी धर्मेन्द्र रात्री उशीरापर्यंत दारूच्या पार्टीत असायचे आणि सकाळीही त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत असते. आशा पारेख यांना हा प्रकार आवडला नाही. म्हणून यावर उपाय म्हणून धर्मेन्द्र यांनी सकाळी शुटिंगला येताना कांदा खाऊन येण्याचा प्रकार सुरू केला. आशा पारेख यांनी त्यांची तक्रार करीत आपल्याला कांद्याचाही वास आवडत नसल्याचे सांगितले. तेव्हा धर्मेन्द्र यांनी कांदा खाण्याचे खरे कारण स्पष्ट केले. नंतर हे दोन्ही कलाकार चांगले मित्र बनले. पण, त्या काळातील किस्से आजही त्यांना भावूक करून जातात.

१९९२ साली तिच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पारेखचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी आशा पारेख यांचे सर्वजण दिवाने होते. मात्र स्वत: आशा देखील कोणाच्या तरी प्रेमात होत्या.

एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या नशीबात लग्न हे लिहिलेच नव्हेत आणि त्या सिंगल खूप आनंदी आहेत असे म्हटले आहे. त्यावेळी आशा या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणल्या जात होता. त्यांचे हे यश पाहून कोणीही त्यांच्याशी लग्न केले असते. पण दिग्गज अभिनेत्रीला भेटणे, तिच्यासोबत फिरणे हे कादाचित सोपे नाही असे मानून त्यांना कोणी लग्नाची मागणी घातली नसावी असे म्हटले जात आहे. आशा यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एण्ट्री झाली होती. मात्र ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती होती. दुर्दैवाने त्यांचे त्या व्यक्तीशी लग्न होऊ शकले नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता आमीर खानचे काका आणि दिग्गज दिग्दर्शक- निर्माते नासिर हुसैन होते. आशा यांचे नासिर यांच्यावर प्रेम होते. परंतु नासिर त्यावेळी विवाहित होते. नासिर यांनी त्यांचा संसार सोडून आपल्याशी लग्न करावे हे आशा यांना कदापी मान्य नव्हते. म्हणून आशा यांनी नासिर यांच्याशी लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नासिर हे माझ्या आयुष्यात येणार पहिले आणि शेवटचे व्यक्ती होते. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. पण मला त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलापासून विभक्त करायचे नव्हते. माझे लग्न व्हावे अशी माझ्या आईची इच्छा होती आणि तिने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचे ही माझी अट असल्यामुळे माझे लग्न होऊ शकले नाही, असे आशा म्हणाल्या.

Friday, September 4, 2020

( किस्सा...गाण्याचा..!)'अष्टविनायका तुझा महिमा कसा...?


श्री गणेश पुराणात अनेक कथा आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवर काहीतरी नाविन्यपूर्ण चित्रपट काढण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपट निर्माते शरद पिळगावकर त्यापै़कीच एक! पिळगावकरांच्या लक्षात आले की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही चित्रपट आजपर्यंत आलेला नाही. विषयाचं नाविन्य ही कोणतीही कलाकृती यशस्वी होण्याची पहिली खूण असते. चित्रपट निर्मिती हा इतका अवघड विषय आहे की प्रत्येक निर्मात्याला नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागते. निर्माता या आव्हानांना कसे सामोरे जातो यावर चित्रपट निर्मितीचा संकल्प पूर्णत्वाला जातो अथवा नाही हे ठरत असतं.

'अष्टविनायक' हा चित्रपटही याला अपवाद नव्हता. सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती. पण त्यांच्या अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार? सचिन पिळगावकर यांचे त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम जोरात होते. त्यामुळे घरीच नायक असूनही पिळगावकरांना नायक कोण हा प्रश्न पडला होता.

वडीलांची तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाला, "मी अष्टविनायकमध्ये काम करतो. पण माझी एक अट आहे." आधीच विक्रम गोखलेंच्या अटींनी वैतागलेले शरद पिळगांवकर आपल्या मुलाला म्हणाले, "आता तुझ्यापण अटी? बरं, तरीपण तुझ्या अटी तर सांग."

तेव्हा सचिन म्हणाला, "अष्टविनायक गाण्याच्या शूटींगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिग पेस्टिंग करून गाणं करायचं नाही."

"डन", शरद पिळगावकर म्हणाले. त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण नव्हती.

आता नायिकेचा शोध सुरु झाला. भक्ती बर्वेंपासून अनेक नावं समोर आली. पण काही केल्या ते गणित जमेना. तेव्हा सचिनच्या मातोश्रींनी नाव सुचवलं- वंदना पंडित! आता ही वंदना पंडित कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली. वंदना पंडित तेव्हा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करायची. झालं ठरलं, वंदना पंडित नायिका!

पण याच काळात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं तिचं उत्तर आलं. निर्मात्यांना अशा अडचणी फारशा कठीण वाटत नाहीत बहुतेक! कारण शरद पिळगावकरांनी निरोप पाठवाला, "लग्नाआधीच शूटिंग संपवलं तर?"

वंदना पंडित राजी झाली. होकार मिळाला. मुलीच्या वडीलांची भूमिका पंडित वसंतराव देशपांडे यांना द्यायचं ठरलं. पण तेव्हा वसंतरावांचे "कट्यार काळजात घुसली" चे प्रयोग जोरात चालू होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण पिळगावकर माणसांना राजी करण्यात हुषारच होते. त्यांनी पंडितजींना कसतरी पटवलं.

शूटिंग मार्गी लागलं.

"आली माझ्या घारी ही दिवाळी", '"दाटून कंठ येतो" ही गाणी रेकॉर्ड पण झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला, ज्याच्यासाठी भर मध्यरात्री पिळगांवकर दादरच्या 'राम निवास'वर पोहचले आणि त्यांनी खालूनच हाका मारायला सुरुवात केली.

"अहो खेबुडकर. अहो खेबुडकर ... "

जगदीश खेबुडकर राम निवासमध्ये राहत नव्हते. पण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम रामनिवासवर असायचा हे पिळगांवकरांना माहिती होतं . आणि त्या रात्री खेबुड्कर मुंबईत आहेत हे पिळगावकरांना कळल्यावर ते थेट पोहोचलेच! पिळगावकरांना पाहून खेबुडकर खाली आले आणि चिंतेच्या सुरात विचारलं, "एवढ्या रात्री काय काम काढलंत?"

"गाडीत बसा. मग सांगतो", पिळगांवकर म्हणाले. खेबुडकर आणखीच चिंतेत पडले.

"अष्टविनायकचं एक महत्वाचं गाणं आहे, आणि ते तुम्हीच करायचं."

"पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? "

"हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं होईना. ते तुम्हीच करणार ह्याची मला खात्री आहे."

"अहो, पण मला अष्टविनायकांची काहीच माहिती नाही. मी त्यांपैकी एकही गणपती पाहिलेला नाही." खेबुडकरांनी त्यांची अडचण मांडली.

"त्याची काळजी करू नका.", असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. तोपर्यंत ते पिळगावकरांच्या घरी पोहोचले होते.

गाडीतून उतरता उतरता पिळगावकर म्हणाले, "खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवे. उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे. गणेश वर्णन लोक संगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं."

एकेकाळी नमनाचं गाणं न ऐकलेल्या खेबुडकरांनी फक्कड लावणी लिहिली होती आणि ती गाजली पण होती. तेच खेबुडकर आता अष्टविनायकाचं गाणं लिहायला बसले होते ज्यांचं त्यांनी कधीच दर्शनही घेतलं नव्हतं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं. कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली.

कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन

काळजात सिंहासन मधोमधी गजानन,

दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

जय गणपती, गणपती गजवदना!!

बघता बघता एकेक गणपतीचं वैशिष्ट्य-विशेष सांगता सांगता ते आठव्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले.

पाली गावच्या बल्लाळेश्वरा,

आदिदेव तू बुद्धीसागरा,

स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख,

सूर्यनारायण करी कौतुक,

डाव्या सोंडेचे रूप साजिरे,

कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे,

चिरेबंद या भक्कम भिंती,

देवाच्या भक्तीला कशाची भीती,

ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा....

आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली होती. खेबुडकरांनी पेन खाली ठेवलं. पिळगांवकर त्याचीच वाट बघत होते. "आता चालीत म्हणून दाखवा." ते म्हणाले आणि हे म्हणेपर्यंत अनिल-अरुणही येऊन पोहोचले.

सगळे प्रभादेवीच्या बाँबे साऊंड लॅबोरेटरीत पोहोचले. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनिष वाघमारे असे गायक आधीच येऊन बसले होते. पिळगांवकर खेबुडकरांना म्हणाले, "आज गायकाची जबाबदारी पण तुम्हीच पार पाडायची ..." आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला. सातव्या गणपतीपासून सुरुवात केली.

महड गावाची महसूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर..

मंदिर लई सादसूदं, जसं कौलारू घर..

घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर..

सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं..

मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ..

दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,

वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा!!

गाणं झकास झालं. तब्बल १३ मिनिटाचं गाणं!! आधी केलेलं शूट रद्द करून गाण्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता आणि तो सुपरहिट झाला. चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाला. अष्टविनायकाचा महिमा आणखी दुमदुमतच राहीला!! अशी ही कहाणी एका रात्रीत निर्माणा झालेल्या गीताची...!

Thursday, September 3, 2020

वेगळा अभिनेता:टायगर श्रॉफ


टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी मुंबईला जॉकी श्रॉफच्या घरी झाला. सुरुवातीला त्याचं नाव जय हेमंत ठेवण्यात आलं होतं. जॉकी यांचा हेमंत नावाचा भाऊ वारला होता. त्याच्या नावावरून जॉकीनं आपल्या मुलाचं नाव जय हेमंत ठेवलं होतं. मात्र या लहान  जय हेमंतला लहानपणापासून दुसऱ्यांना चावण्याची आणि ओरबडण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे त्याचे नातलग, मित्र त्याला टायगर म्हणत. पुढे तेच नाव सगळ्यांना खरे वाटू लागल्याने जय हेमंतचा टायगर श्रॉफ झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने याच नावाने एन्ट्री केली. 

अर्थात टायगर श्रॉफला इतर स्टारपुत्रासारखं स्वीकारलं गेलं नव्हतं. त्याला टोमणे, अवहेलना झेलत प्रवास करावा लागला. त्याचा पहिला चित्रपट चालला नाही. गुळमुळीत चेहऱ्यावरून त्याच्यावर टीका झाली. 'हिरोपंती' या सिनेमानं नफा कमावला, पदार्पणाचे पुरस्कार पटकावले असले तरी टायगरचा ठोकळेबाज वावर, भावनाशून्यता आणि संवादफेकीच्या अपयशयावर कडाडून टीका झाली.  'अ फ्लाईंग किस', 'मुन्ना मायकल' या चित्रपटाच्या यशांनीही पाठ फिरवली. 'मुन्ना मायकल'मध्ये त्याने एकाहून एक सरस नृत्य स्टेप्स दाखवल्या होत्या. पण ही डान्सची जादू कमाल दाखवू शकली नाही. नंतरच्या 'बागी 2 'ने मात्र 200 कोटींचा धंदा केला. लष्करातील जवान झालेल्या टायगरने अधिकच कोरून काढलेलं शरीर आणि करकरीत स्टंटस दाखवून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून घेतलं. ऍक्शन हिरो म्हणून त्याची नोंद झाली. सुरुवातीला अभिनयात सुधारणा करावी किंवा तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट दिसण्यावर भर द्यावा, असे दोन पर्याय त्याच्यासमोर होते. त्याने दुसरा पर्याय स्वीकारला. तो नृत्यानिपुण होता. शरीरही आखीवरेखीव होते. त्यानं याच गोष्टींवर अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली. संवादापेक्षा स्टंटच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. भावानेऐवजी रोमांचक दृशयांतून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

डुप्लिकेट न घेता स्वतःच सगळे स्टंट करण्याच्या निर्णयामुळे टायगरच्या'बागी'चं कौतुक झालं. तरुणाईला आकर्षित करून घेणारा डान्स आणि मार्शल आर्टच्या करामती दाखवून टायगरने नव्या पिढीच्या स्पर्धेत भक्कम पाय रोवले. अक्शन थिल्लर वगळता इतर कोणतेही प्रयोग करण्यात टायगरला सध्या तरी रस नाही. 'स्टुडेंट ऑफ द इयर 2 'च्या फजितीनंतर त्याने हा निर्णय अधोरेखित केलाय. म्हणूनच 'बागी 3' हा तिसरा थरारपट त्यानं वेळ न दवडता साइन करून टाकला. दरम्यान, सिल्व्हेस्टर स्टॅलॉनच्या सुप्रसिद्ध रॅम्बो फ्रेंचायजी'चा फर्स्ट ब्लड' हा पहिला भाग हिंदीत यायचा ठरल्यावर टायगर श्रॉफच्या नावाला पर्याय सापडेना. 'रॅम्बो'नं सिल्व्हेस्टर स्टॅलॉनला जगभरात प्रसिद्ध केलं. आता बॉलिवूडचा टायगरीरॅम्बो काय करामत करून दाखवतो, याची उत्सुकता आहे.

अफलातून डान्स, कोरीव शरीरसंपदा, नम्र स्वभाव, गोड चेहरा, मोहक हास्य अशी विविध कारण टायगरच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरली आहेत. याच बळावर तो तरुण-तरुणींच्या गळ्यातला ताईत झालाय. तरीसुद्धा पूर्ण रोमँटिक भूमिका करायला तो तयार नाही. असं वाचनात आलंय की, तो बायोपिक, अर्थपूर्ण सिनेमे किंवा कॉमेडीसुद्धा सध्या नकोच म्हणतोय. उत्कट भावना व्यक्त करणं, चेहऱ्यावर विविध हावभाव दाखवणं, अस्खलित संवाद बोलणं या एका अभिनेत्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गुणांमध्ये आपण काहीसे कमी पडतोय, याची जाणीव त्याला झाली असावी का? म्हणून कदाचित रॅम्बो'सारखा अॅक्शन थिलरचा आधार त्याला सोपा वाटला असेल. स्टंट्समध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत तो स्वत:ला आजमावणार असेल. पण, रॅम्बो-सिल्व्हेस्टर स्टेंलोन असो, नाहीतर आपल्याकडचे धर्मेंद्र, सन्नी देओल, अक्षयकुमारसारखे अॅक्शन हिरो; शरीरसंपदेच्या पुढे जाऊन त्यांनाही अभिनयाच्या कसोटीवर स्वतःला पारखून घ्यावंच लागलं होतं. स्पर्धेत टिकायचं असेल, तर टायगरलाही भविष्यात या गोष्टीचा विचार करावा लागेल.

Wednesday, September 2, 2020

अष्टपैलू कलाकार:कमल हसन


कमल हसन म्हणजे अभिनय,निर्माता,दिग्दर्शक, गीतकार,गायक ,नर्तक अशा चित्रपटाशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये लीलया संचार करणार हरहुन्नरी कलाकार. प्रयोगशील अभिनेता म्हणून त्याची दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ओळख आहे. अलीकडेच त्याने राजकारणातही उडी घेतली आहे. इथे अजून त्याचे सामर्थ्य कळून यायचे आहे. पण उत्तम,बहुश्रुत कलाकार म्हणून चित्रसृष्टी त्याची नक्कीच दखल घेईल. 

कमल हसन चार भावंडांपैकी सगळ्यात लहान. त्याचं खरं नाव पार्थसारथी. त्याचे वडील क्रिमिनल लॉयर होते. लहानपणीच त्याचा चित्रपटाशी संबंध आला आणि ते इकडे खेचले गेले. 7 नोव्हेंबर 1954 रोजी कमल हसन याचा जन्म झाला असला तरी त्याच्या चेहऱ्याला रंग लागला तो 1960 मध्येच. म्हणजे अवघ्या सहाव्या वर्षी त्यांना कमेऱ्यापुढं उभं राहावं लागलं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, 'कालातूर कन्नम्मा' या चित्रपटातल्या बालकलाकाराची भूमिका त्यांनी अशी काय वठवली की, त्याला एकदम राष्ट्रपती पुरस्कारच देऊन गेला. अर्थात या पुरस्काराचं महत्त्वही फारसं माहीत नसलेला कमल नंतर मात्र आवडीने सातत्याने काम करीत राहिला. 1960 पासून आतापर्यंत तब्बल 60 वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्याने तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांच्या चित्रपटांमध्ये जवळपास दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांचा दर्जा, आशय, आणि देश-परदेशात मिळालेले सन्मान पाहता त्यांचा या चित्रपट सृष्टीतील कार्यकाळ दखल घेण्याजोगा, भारदस्त असा आहे. 

कमल हसन फक्त अभिनेताच नाही तर या क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. या क्षेत्रातील एकही प्रांत त्यांनी सोडला नाही. उत्तम कलाकार म्हणून नावलौकिक आहेच,पण चांगला निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप त्याने सोडली. नर्तक, गायक, लेखक म्हणूनही त्याने आपली ओळख निर्माण केली. असे क्वचितच कलाकार चित्रपट सृष्टीला लाभले. कमल हसन यांनी वयाच्या 18 व्या वर्षी चित्रपटाची पहिली स्क्रिप्ट लिहिली. लेखक म्हणून त्यांच्या नावावर सुमारे 25 चित्रपट आहेत. 1975 मधील के.बालचंदर यांच्या 'अपूर्व रागनगल' चित्रपटानं त्याला पहिल्यांदा 'स्टार' म्हणून यश मिळवून दिलं. या चित्रपटामध्ये त्याने एका वृद्धेच्या प्रेमात पडणाऱ्या बंडखोर तरुणाची भूमिका साकारली होती. 'मुंद्र पिराई' चित्रपटात त्याने अभिनयातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.हाच चित्रपट नंतर हिंदीत 'सदमा' नावाने प्रदर्शित झाला. पुढच्या काळात त्याला अभिनयाचे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अभिनयात सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक आहे. 

1997 मध्ये 'चाची 420' या चित्रपटाचे पहिल्यांदा त्याने दिग्दर्शन केले. हा चित्रपट हिट ठरला आणि त्यांच्यातील प्रदीर्घकाळ लपून राहिलेला दिग्दर्शक जागा झाला. नंतर 2000 मध्ये त्याने 'हे राम ' दिग्दर्शित केला. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला तरी या चित्रपटाच्या कलात्मकतेचं कौतुक झालं. 1990 च्या दरम्यान कमल हसन याच्या अभिनयाची गाडी सुसाट होती. पुढे त्याने स्वतःच्या संस्थेमार्फत चित्रपटांची निर्मिती केली. 1970 ते 1987 या कालावधीत सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला होता सुपरस्टार राजेश खन्ना. नंतर चिरंजीव या कलाकाराने सर्वाधिक मानधन घेतले होते. 1992 मध्ये चिरंजीवीने एका चित्रपटासाठी तब्बल सव्वा कोटी मानधन घेतले होते. त्यावेळी हा आकडा ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण पुढे 1994 मध्ये कमल हसनने एका चित्रपटासाठी तब्बल दीड कोटी रुपये मानधन घेऊन कलाकाराला चित्रपटांमध्ये अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले. 

हिंदी चित्रपट सृष्टीत त्याने 'एक दुजे के लिए' या चित्रपटातून दणदणीत आगमन केले. सुरुवातीलाच चांगले यश मिळाले असले तरी त्याने हिंदीत अधिक चित्रपट केले नाहीत. नंतर त्यांचा 'सागर' हा चित्रपटही गाजला. 'राजतीलक', 'सनम 'तेरी कसम', 'गिरफ्तार', 'ये तो कमाल हो गया', 'जरा सी जिंदगी' या चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी यात त्याचे एकट्याचेही अपयश नाही. 'सदमा' ,'अप्पूराजा' अशा काही दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक त्याने हिंदीत यशस्वी केला. 'अप्पूराजा', 'इंडियन', 'मेयरसाब' साठी घेतलेली त्याची मेहनत लक्षात येते. तमिळ चित्रपट सृष्टीत त्यानं चांगलं काम केलं. 'विक्रम', 'साथी मुथ्थम' असे कित्येक यशस्वी चित्रपट त्याने आंध्र भाषेतही दिले. चित्रपट सृष्टीत तो यशस्वी ठरला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक वादळं आली. वाणी जयराम सोबत दहा वर्षे संसार केल्यानंतर त्यांचा विवाह मोडला. नंतर त्याने अभिनेत्री सारिकाशी विवाह केला. एका मुलीनंतर 16 वर्षांनी 2004 मध्ये त्यांच्यात काडीमोड झाला. नंतर तो अभिनेत्री गौतमीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होता. पण इथे त्याला अपयश आले. -मच्छिंद्र ऐनापुरे

Saturday, August 29, 2020

'ये देश है वीर जवानों का' (नया दौर)


ये देश है वीर जवानों का

अलबेलोंका मस्तानों का ,

इस देश का यारो क्या कहना,

ये देश है दुनिया का गहना

1957 साली प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटातील हे जोशपूर्ण गाणं आहे. बी. आर.चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला  दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या अभिनयाबरोबरच साहिर लुधियानवी आणि ओ.पी.नय्यर यांच्या गीत-संगीतामुळे संस्मरणीय ठरलेला हा चित्रपट. प्रभावी शब्दकळा, ढंगदार संगीत आणि पडद्यावरचं जोशपूर्ण नृत्य यामुळे आज 63 वर्षे उलटली तरी या गीतावर काळाच्या चुण्या पडलेल्या नाहीत. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी हमखास हे गाणं सर्वत्र वाजतं.

 यहां चौडी छाती वीरों की

यहां भोली शक्ले हिरों की,

यहां गाते हैं राझें मस्ती में

मस्तीमे झुमे बस्ती में

या शब्दातला जोश वीररसाची निर्मिती करतो आणि गीताला निर्णायक उंचीवर नेऊन ठेवतो. या शब्दसुरांना पंजाबच्या उमद्या आणि रांगड्या मातीचा सुगंध आहे. या चित्रपटाचे संगीतकार नय्यर आणि गीतकार लुधियानवी यांच्या आयुष्यातील तरुण उमेदीची वर्षे लाहोरमध्ये गेली होती. गायक महंमद रफी यांचेही बालपण लाहोरमध्ये गेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः बी. आर.चोप्रा फाळणीपूर्वी लाहोरामध्येच पत्रकार म्हणून कार्यरत होते. फाळणीनंतर ही सगळी मंडळी मुंबईत आली आणि स्थिरावली. पण पंजाबी गीत-संगीत मात्र त्यांच्या रक्तात होतं. 'नया दौर'मधील 'उडे जब जब जुल्फे तेरी', 'रेशमी कुर्ता जाली का' ही तिन्ही गाणी अस्सल पंजाबी रंगाची आणि ढंगाची आहेत. या चित्रपटासाठी गायक महंमद रफी, संगीतकार ओ. पी.नय्यर आणि अभिनेता दिलीपकुमार या तिघांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.'नया दौर' 2007 साली रंगीत होऊन पुन्हा पडद्यावर आला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


भयपटांचा ट्रेंड बदलतोय


हिंदी चित्रपट सृष्टी आणि भूत यांचं खूप जुनं नातं आहे. साधारणपणे चालीसच्या दशकापासून भयचित्रपटांच्या निर्मितीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात रुपेरी पडद्यावरील भूतांनी प्रेक्षकांना प्रचंड घाबरवलं आहे. अर्थात प्रेक्षकांनाही असेच भयपट आवडत असल्यानं चित्रपटांतून जास्तीतजास्त हॉरर सीन दाखवून त्यांना घाबरवून सोडण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आला. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातही अशा भयपट,गुढपटांना प्रेक्षकांची पसंदी असायची. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिला गुढपट तयार केला तो कमाल अमरोही यांनी. त्यांच्या 'महल' या चित्रपटात अशोककुमार आणि मधुबाला प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील 'आएगा आनेवला...' हे गाणं आणि चित्रपट खूप गाजला. त्यानंतर जवळपास बारा वर्षांनंतर 'बीस साल बाद' आला. मग मात्र भयपटांचा सिलसिला चालू राहिला. त्याच काळात 'गुमनाम', 'भूतबंगला' चित्रपट आले. 1970 ते 1980 या दशकात तर अनेक चित्रपट आले. याच्याबाबतीत 'रामसे बंधू' चित्रपट निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. 'दो गज जमीन के नीचे', 'जानी दुश्मन', 'दरवाजा', 'जादू टोना', 'और कौन', 'सबूत', 'दहशत', 'सन्नाटा' असे अनेक चित्रपट आले. 1980-90 च्या दशकात तर भयपटांची लाटच आली होती. अशा चित्रपटांचं बजेट कमी आणि यशाची हमी असं सूत्र होतं. पण त्यामुळे त्याचा दर्जा घसरला आणि या चित्रपटांची गर्दी ओसरली. ननंतर काळ बदलला तसं भयपटांची शैलीही बदलली. आजच्या संगणक युगातही पडद्यावर भयापटांचं अस्तित्व कायम आहे. उलट नव्या तंत्रज्ञानाने प्रेक्षकांना अधिक घाबरवता येऊ लागलं. अन्य चित्रपटांच्या तुलनेत या भयपटांची संख्या कमी असली तरी प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाही. २००० नंतर पुन्हा अशा भयचित्रपटांचा सिलसिला सुरू झाला. भयचित्रपटांच्या निर्मितीमध्ये विक्रम भट्ट यांचं नाव अग्रेसर ठरलं. 'राज', 'राज-३', 'राज रिबूट', 'क्रिचर', '१९२०', '१९२० इव्हिल रिटर्न्स' असे अनेक भूतपट विक्रम भट्ट यांनी दिले. तसंच भारताला पहिला थ्रीडी भयचित्रपट 'हॉन्टेड' विक्रम भट्ट यांनीच दिला. त्यामुळे विक्रम भट्ट यांना भयपटांचा बादशाह म्हटलं

जातं. भयपटांची आवड असणारा अजून एक दिग्दर्शक म्हणजे रामगोपाल वर्मा, 'रात', 'भूत', 'डरना मना है', 'वास्तुशास्त्र', 'अग्यात', 'फूंक', 'फूंक-२','डरना जरुरी है' असे अनेक भयपट रामगोपाल वर्मानं बनवले. निर्माती एकता कपूरनंही 'रागिनी एमएमस' आणि 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' यांसारखे बोल्ड हॉरर चित्रपट बनवले. 'अलोन', 'डर अॅट द मॉल', 'हॉरर स्टोरी', 'घोस्ट', '१३ बी' यांसारखे अनेक चित्रपट आले, पण यातल्या फारच कमी चित्रपट गाजले. त्यामुळे असं म्हणता येईल की, भयपटांच्या यशाचं गणित फारच कमी दिग्दर्शकांना मांडता आलं. आता तर भयपटांना विनोदाची फोडणी देऊन बॉक्स ऑफिसवर यशाची चव
चाखण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. सध्या चित्रपटांमधून दिसणारी भुतं घाबरवण्याऐवजी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे अभय देओल आणि पत्रलेखाचा 'नानू की जानू' हा चित्रपट, या चित्रपटातील भूत बघून प्रेक्षक घाबरणं वगैरे दूर, उलट पोट भरून त्यांचं
मनोरंजनच होतं. त्यामुळे आता हिंदी चित्रपटसृष्टीतील या भयपटांची व्याख्या हळूहळू बदलत चालली आहे. कारण पूर्वी चित्रपटांमधील भुतं अतिशय विद्रूप, ओंगळवाणी असायची. आता चित्रपटांमधून दिसणारी भुतं सर्वसामान्य लोकांसारखीच दिसणारी आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा बदल घडवण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं जातं ते दिग्दर्शक सतीश कौशिक यांना. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला विनोदी हॉररपट म्हणून त्यांनी 'गैंग ऑफ घोस्ट' या चित्रपटाची निर्मिती केली. कॉमेडीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात एकत्र आले.अनुष्का शर्मानं 'फिल्लौरी' या चित्रपटात हाच कित्ता गिरवला. यात तिनं
साकारलेलं भूत खूपच प्रेमळ होतं. याआधी आलेला 'गोलमाल अगेन'मधील परिणिती चोप्रा असो
वा अमिताभ बच्चन यांनी साकारलेला 'भूतनाथ' आणि 'भूतनाथ रिर्टन्स' हे चित्रपटही याच वाटेनं जाणारे होते. आता भयपटांसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. 2020 मध्ये 'बुलबुल', जान्हवी कपूरचा 'घोस्ट स्टोरी' प्रदर्शित झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली

यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...