Monday, February 15, 2021

बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लग्ने


बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोण कोणाशी लग्न करणार आणि वय उलटत गेलं तरी ही बया किंवा बाबा का अजून करत नाहीत, अशा सारख्या चर्चा मागे सातत्याने वाचायला, बघायला मिळायच्या. काहीजणांनी तर आपलं करिअर बरबाद होऊ नये म्हणून लग्न करायचं टाळलं तर काही जणांनी आपलं लग्न माध्यम आणि आपल्या चाहत्यांपासून लपवले. गोविंदाने कित्येक वर्षे आपल्या करिअरला धोका पोहचेल म्हणून आपलं लग्न झाल्याचं सांगितलं नाही. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. लोकंही कलाकारांची लग्ने आणि त्यांनाही आयुष्य आहे हे स्वीकारायला लागले आहेत. राणी मुखर्जीने लग्न झाल्यावरही चित्रपटात काम केलं. ऐश्वर्या रॉय-बच्चन, दीपिका पादुकोन हेही  काम करत आहेत. हा कालानुरूप बदल आपण स्वीकारालाच पाहिजे. कोरोना काळाने तर सगळ्यांनाच मोठा धडा दिला आहे. यामुळे अनेक माणसं आपल्या लोकांच्या सानिध्यात राहिली. काहींना आपली माणसं कळली, समजून घेता आली. यात बॉलिवूड कलाकारदेखील मागे नाहीत. याच कोरोना लॉकडाऊन काळात अनेक कलाकारांनी आपली लग्ने उरकली तर काही कलाकार 

2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकायला आतुर आहेत. यात सगळ्यात सुरुवातीला नाव येतं ते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं. रणबीर कपूर यापूर्वी नेहमीच 'लव्हर बॉय'च्या छबीत कैद असल्याचं आपण पाहिलं आहे. आणि त्याने  कित्येक सुंदर अभिनेत्रींचे हृदयदेखील तोडून टाकली आहे. मग कॅटरिना कैफ असो किंवा दीपिका पादुकोन. रणबीर कपूर सुरुवातीपासूनच प्रेम आणि ब्रेकअपच्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. पण आता रणबीर कपूर तिच्या पेक्षा दहा वर्षे लहान असणाऱ्या आलिया भट्टच्या प्रेमात आहे. 

रणबीर-अलिया प्रेमाच्याबाबतीत इतके गंभीर आहेत की रणबीर कपूर आणि  तिने यापूर्वी आधीच आपल्या लग्नाची योजना आखली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडलेले लॉकडाऊन  रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले. पण आता माध्यमातून येणाऱ्या बातम्यांनुसा ‘ब्रह्रमास्त्र’ च्या रिलीजनंतर लग्न करण्याचे त्यांचे पक्के झाले आहे.

सुष्मिता सेन ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगली आहे. मधे ती आजारी पडली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेला रोहमन. रोहमन आणि सुष्मिता यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. यानंतर ते बराच काळ 'लिव इन रिलेशन' मध्ये राहिले. बातम्यांनुसार यावर्षी त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. यावर्षी सोनाक्षी सिन्हा देखील लग्नाच्या बोहल्यावर चढू शकते. बंटी सचदेव याच्याशी सोनाक्षीचं नातं जुळलं आहे. फिल्म आणि टीव्ही कलाकार एजाज खानचं आणि मॉडेल अभिनेत्री असलेल्या पवित्रा पुण्या यांच्यात नाजूक नाते संबंध जुळल्याची वार्ता आहे. 41 वर्षाच्या एजाज खाननेदेखील यावर्षीचा लग्नाचा मुहूर्त शोधला आहे. कॅटरिना कैफच्याही नावाची चर्चा सुरू आहे.  श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचेही नाते बहरात आहे. बातम्यांनुसार यावर्षी या दोघांचाही लग्नाचा विचार आहे. एका बातमीनुसार फरहान अख्तर तिच्या पेक्षा निम्या वयाच्या  शिबानी दांडेकरसोबत  लग्न करण्याचा इराद्यात आहे. फरहान अख्तरशिवाय मलाइका अरोड़ा खानदेखील तिच्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत लवकरच लग्नाच्या बेढीत अडकणार आहे.  दिशा पटनी आणि टाइगर श्रॉफदेखील 2021मध्ये लग्न करू शकतात.

हे अडकले लग्नाच्या बेढीत

2020 सगळ्यांसाठीच अडचणींचा गेला. अशा कठीण काळात देखील काही कलाकार मास्क लावून लग्नाच्या बेढीत अडकले. यात सर्वात अगोदर नाव येत ते  गायिका नेहा कक्करचं. तिने लॉकडाऊन काळ असताना सर्व ती खबरदारी घेत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिचा प्रेमी रोहन प्रीत यांच्या लग्न बंधनात अडकली. याशिवाय  उदित नारायण यांच्या मुलाने म्हणजेच आदित्य नारायणनेदेखील डिसेंबर 2020 मध्ये श्वेतासोबत लग्न केलं. यानंतर मॉडल अभिनेत्री गौहर खाननेदेखील प्रेमी जैद दरबारसोबत 25 डिसेंबरमध्ये विवाह केला.

प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन तिची बालपणापासूनची मैत्रीण आणि प्रेमिका नताशा हिच्यासोबत  24 जानेवारी 2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकला. दक्षिण आणि बॉलीवुड कलाकार काजल अग्रवाल हिनेदेखील ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केलं. डांसर कोरियोग्राफर प्रभुदेवा यांनी मुंबईतील डॉक्टर हिमानी हिच्याशी लॉकडाऊन काळात अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह केला.याशिवाय साउथ आणि बॉलीवुड एक्टर राणा डग्गूबातीनेही  प्रेमिका मिहिकाशी लग्न केलं. मिहिका इंटीरियर डिजाइनर आहे.

कोरोनाने आणलं जवळ

कुणीच असा विचार केला नव्हता की, आपली स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागतील. घराबाहेर पडायला देखील बंदी होती. मात्र कोरोना काळाने सगळ्यांनाच एक नवीन विचार दिला. या काळात जेव्हा संपूर्ण आयुष्यच थांबलं तेव्हा काही कलाकारदेखील एकत्र आले. आपल्या कामात ते एकमेकांना वेळसुद्धा देऊ शकत नव्हतं. याच काळात सलमान खान आणि जैकलीन फर्नाडिस त्याच्या फार्म हाउसमध्ये एकत्र राहिले. आलिया आणि रणबीर कपूरदेखील सोबत राहिले. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूरसुद्धा एकमेकांसोबत होते. या कालावधीत सतत व्यस्त असणाऱ्या कलाकारांनादेखील जाणवलं की त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम किती महत्त्वाचं आहे. लग्न आयुष्यभरासाठी कैद असली तरी या बेढीत प्रत्येकालाच राहायला आवडतं.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली


Sunday, November 29, 2020

बप्पीदा एवढं सोनं गळ्यात का घालतात?


बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी, बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खास करुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचे गाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोने किती आवडते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र, ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठाऊक आहे. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेल्या बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. मात्र, १९७६ साली आलेल्या 'चलते-चलते' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र वप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढे सोने घालण्यामागचे कारण सांगितले. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की, सोने माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोने घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असे बप्पीदांनी सांगितले. दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोने असल्याचे सांगण्यात येते. बप्पीदा यांनी आजवर 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरू', 'घायल', 'रंगबाज' या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.


Friday, November 13, 2020

वीणा-जिच्या सौंदर्याचे निर्मातेही दिवाने


चित्रपटसृष्टी हे एक ग्लॅमरचं जग आहे, ज्यामध्ये सौंदर्याला स्वतःचं एक महत्त्व आहे.  चित्रपटसृष्टी अजूनही मधुबालाची आठवण काढते, कारण ती चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जात होती.  मुंबई चित्रपट जगतात अनेक सौंदर्यवती अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्यावर अनेक चित्रपट निर्माते अक्षरशः लट्टू झाले.  अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती वीणा. म्हणजेच ताजौर सुलताना, जिने शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची 14 नोव्हेंबर रोजी 16 वी पुण्यतिथी आहे.

विणा ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वीणा म्हणजेच तजौर सुल्ताना. ही  घटना 1941 ची आहे.  लाहोरमधील एका फिल्म कंपनीची जाहिरात वाचल्यानंतर अमृतसरमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीने म्हणजेच ताजौर सुलतानाने  होऊ घातलेल्या 'गवंडी' नावाच्या पंजाबी चित्रपट निर्मात्याकडे आपले फोटो गुपचूपपणे पाठवून दिले. तिला तिच्या निवडीची खात्री होती, कारण तिला वाटत होते की तिच्यासारखी सुंदर दुसरी मुलगी अगदी दूर दूरपर्यंत नाही.  तिचे पालक चित्रपटाविरोधात होते.  असे असले तरी, सुलतानाचा भाऊ शहजादा इफ्तिखारदेखील 'गवंडी' ची जाहिरात देणाऱ्या फिल्म कंपनीत कॅमेरामॅनचा सहाय्यक होता.

या चित्रपटासाठी सुलतानाची निवड झाली.  'गवंडी'चे निर्माते सेठ किशोरी लाल यांनी सुलतानाचे नाव वीणा ठेवले.  जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा घरात मोठा आगडोंब उसळला.  ही गोष्ट महाविद्यालयात कळल्यावर तर महाविद्यालयाने सुलतानाचे नाव काढून टाकले. इकडे सुलतानाच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली.   चित्रपट निर्माते प्रस्ताव घेऊन घरी येऊ लागले तेव्हा घरातले लोक गडबडून गेले. त्यांनी सुलतानाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं, तेव्हा शहजादा आपल्या बहिणीला घेऊन मुंबईला आला.

सुलताना म्हणजेच वीणा अप्रतिम सुंदर होती, जो कोणी तिला पाही, तो वेडा होऊन जाई.  वीणा मुंबईला आली तेव्हा इथले प्रसिद्ध निर्माते तिच्यावर फिदाच झाले.  मजहर खान या मोठ्या निर्मात्याने तिला 'याद' या आपल्या नव्या चित्रपटात घेतले.  मेहबूब खान तर वीणाच्या सौंदर्याने इतका मोहित झाला की त्याने वीणाबरोबर दहा वर्षांचा करारच करून टाकला. तिला  दरमहा दोन हजार रुपये वेतन निश्चित झाले, शिवाय अशोक कुमार 'नजमा' (1943) आणि 'हुमायून'  (1945) मध्ये वीणाची वर्णी लावण्यात आली आणि नंतर 'मदर इंडिया'साठीही साइन करण्यात आले.  मात्र नंतर ही भूमिका नरगिसने साकारली.

यानंतर, वीणा शीर्ष अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली.  'मुगल-ए-आजम' बनवणाऱ्या आसिफने तिला 'फूल' मध्ये संधी दिली.  अशोक कुमार हेही तिच्यावर प्रभावित झाले होते, त्यांनी तिला आपल्या 'चलती का नाम गाडी' चित्रपटात घेतले.  गुरुदत्त यांनी तिला'कागज के फूल' मध्ये संधी दिली. नाडियादवाला यांनी तिला 'ताजमहाल'मध्ये नूरजहां बनवले, तर शेख मुख्तार यांनी' नूरजहां 'हा चित्रपट बनवून वीणाला प्रमुख भूमिकेत घेतले.  वय वाढत गेलं तसं वीणाने चरित्र भूमिका करायला सुरुवात केली.  'दो रास्ता', 'पाकीजा' ते 'रझिया सुलतान' पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.

अख्खी मुंबई फिल्मीदुनिया वीणावर भाळली  होती, पण वीणा मात्र अल नासिरला हृदय देऊन बसली होती. अगोदरच तीन लग्ने केलेला नासिर भोपाळच्या राजघराण्यातील होता.  सुरैया हॉलिवूड स्टार ग्रेगरी पॅकची फॅन होती.  जेव्हा ग्रेगरी मुंबईला आला, तेव्हा त्याला मध्यरात्रीत सुरैयाच्या घरी नेऊन तिची भेट घालून देण्याचं काम अल नसीरने केले. त्याकाळी सुरैयाची एक झलक पहाण्यासाठी सकाळपासूनच तिचे चाहते तिच्या घरासमोर गर्दी करायचे.  त्यांच्यात एक तिचा प्रियकरही होता जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या घरासमोर उभे राहून सुरैयाची 'झलक' पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्याला बाजूला  करण्यासाठी फिल्मी जगतातील नामांकित लोकांना खूप प्रयत्न करावे लागले होते.  सुरैयाचा तो प्रेमी दुसरा-तिसरा कोणी नाही तर वीणाचा भाऊ शहजादा इफ्तिखार होता.

Thursday, November 12, 2020

कोरोनाचा हिंदी चित्रपटांना मोठा फटका


2020 चा फिल्म इंडस्ट्रीवर खूप मोठा वाईट परिणाम झाला आहे. 2019 मध्ये बक्कळ पैसा कमावणारा फिल्म उद्योग यंदा टाळेबंदीमुळे पूर्ण  कोसळला आहे.  2019 मध्ये सुमारे 17 चित्रपट '100 कोटी क्लब'मध्ये सामील झाले होते, तर 2020 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत 40 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातला फक्त अजय देवगनच्या 'तानाजी' चित्रपटाने  तेवढा चांगला व्यवसाय केला.  मार्च 2020 मध्ये 'अन्ग्रेजी मिडीयम' च्या प्रदर्शनानंतर कोरोना टाळेबंदी दीर्घ काळ सुरू राहिली. हिंदी चित्रपट ज्या देशांमध्ये प्रदर्शित व्हायचे, त्या जगभरातील बर्‍याच देशांमध्ये, कोरोना आटोक्यात आल्याने  दिलासा मिळाल्यामुळे सामान्य जीवन खूप अगोदर  सुरळीत सुरु झाले होते. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि देशात सात महिन्यांची टाळेबंदी मागे घेतल्याने चांगले दिवस येतील असेही संकेत दिसत होते, पण आता वाढत्या थंडीमुळे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी लादण्यात आली आहे,त्यामुळे पुन्हा हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या पदरी निराशा आली आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर चित्रपटाची निर्मितीही सुरू झाली आहे.  महाराष्ट्र हा हिंदी चित्रपटसृष्टीचा कणा आहे.  म्हणून निर्मात्यांनी विस्तृत योजना बनवण्यास सुरुवात केली होती आणि परदेशातील मुक्त बाजारपेठाही त्यांना आकर्षित करत होती, परंतु ब्रिटन, अमेरिका, मलेशिया आणि इतर देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट आल्याने सगळा गडबडघोटाळा झाला आहे. ब्रिटनमध्ये पूर्ण एक महिन्यासाठी पूर्णवेळ टाळेबंदी लागू केली गेली आहे आणि त्याचबरोबर आणखी काही युरोपियन देशांमध्ये अशाच प्रकारची टाळेबंदी करण्यात आली आहे. विदेशांमध्ये हिंदी चित्रपटांची चांगली कमाई होत असते . त्यामुळे निर्माते आपल्या देशाबरोबरच विदेशातही एकाच वेळी चित्रपट रिलीज करत असतात. आता परदेशात संधी नाही,त्यामुळे फक्त भारतात चित्रपट प्रदर्शित करून नुकसानच पदरी पडणार आहे. शिवाय देशात आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत आहे, अशा परिस्थितीत लगेच चित्रपटगृहांना गर्दी होणार नाही. साहजिकच देश-परदेशात कमाईवर पाणी सोडावे लागणार असल्याने अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. सर्रास मोठे निर्माते दिवाळी आणि नाताळ यांसारख्या सण-उत्सव काळात आपले चित्रपट प्रदर्शित करत असतात. पण यावर्षी हा मुहूर्त सगळ्यांनी टाळला आहे. बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटाचीही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशाच प्रकारे रणवीर सिंह अभिनित क्रिकेटवर आधारित असलेल्या '83' या चित्रपटाचे प्रमोशन एमएमआर डी ग्राउंडमध्ये रियल क्रिकेटर्स आणि रील क्रिकेटर्स यांच्या उपस्थित होणार होते, परंतु इंग्लंड आणि मलेशियासह आणखी काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टाळेबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन रद्द करण्यात आले आहे.

फिक्कीच्या एका अहवालानुसार 2019 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला 191 अब्ज रुपयांची कमाई झाली होती, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारातून 21 अब्ज रुपये मिळाले होते.  मलेशिया, चीन, ब्रिटन आणि यूएसएमध्ये हिंदी चित्रपट बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत आणि येथे चित्रपट रिलीज केल्याने चित्रपट निर्मात्यांची मोठी कमाईदेखील  होते.  मलेशिया तर हिंदी आणि तमिळ चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठच आहे.  सध्या तेथे सर्व थिएटर बंद आहेत, त्यामुळे चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

चीन गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडसह  भारतीय चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.  सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट 70 देशांमधील 1300 थिएटरांमध्ये रिलीज झाला होता. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने देशात 387 कोटींचा व्यवसाय केला होता, तर केवळ चीनमध्ये याच चित्रपटाने तब्बल 1200 कोटींची कमाई केली होती. त्यामुळेच 2021 च्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत कोणताही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे.  एका चित्रपट व्यवसाय अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार परदेशी बाजाराशिवाय बडे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट रिलीज करण्याचा धोका पत्करणार नाहीत.  साहजिकच ते योग्य वेळेची वाट पाहणे पसंद करतील.  असो, कोरोनामुळे या उद्योगाला आतापर्यंत 1500 ते 2000 कोटींचे नुकसान झाले आहे.  अशा परिस्थितीत निर्मात्यांना आपले चित्रपट यूके, अमेरिका आणि मलेशियामध्ये घाईगडबडीत प्रदर्शित करणं आणखी आर्थिक नुकसानीचं ठरणार आहे. त्यातच हॉलिवूड चित्रपट देखील रिलीज होणार नाहीत. हॉलीवूड आणि भारतीय चित्रपट यांच्याबाबतची परिस्थिती वेगवेगळी आहे. हॉलीवूड निर्माते वेळ आणि पैशांचे गणित लावले तर त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन वर्षभरदेखील पुढे ढकलू शकतात. पण भारतीय चित्रपटांचे तसे नाही. भारतीय निर्माते पैसे जास्त काळ गुंतवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे विदेश बाजार खुला होण्याची वाट पाहण्याबरोबरच देशांतर्गत व्यवहारांवर सुरळीत होण्याची वाट पाहताना त्यांना आणखी चार महिने तरी आपले चित्रपट दडपून ठेवावे लागणार आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday, November 6, 2020

चित्रपट निर्मात्यांना आता 2021 ची प्रतीक्षा


महाराष्ट्र सरकारने 6 नोव्हेंबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लगेच प्रेक्षक सिनेमागृहांकडे फिरकणे शक्य नाही. साहजिकच दिवाळीनंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती आणि काही राज्यांनी सुरूही केली, पण नवीन चित्रपट नसल्याने त्याला मरगळ आली आहे.  महाराष्ट्रात बॉलीवूड चित्रपटांना अधिक पसंदी दिली जाते,परंतु राज्य सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. सिनेमागृहे लवकर सुरु करण्यास परवानगी दिली असती तर दिवाळीत तरी चित्रपट प्रदर्शित झाले असते आणि इंडस्ट्रीला दिवाळी उत्सवाचा फायदा झाला असता, पण आता त्यामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले, असे बोलले जात आहे. शेवटी कोरोनाचा संसर्गाचा प्रसार वाढू नये, यासाठी राज्य सरकारची भूमीकादेखील महत्त्वाचीच आहे. कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात 50 टक्के आणि अन्य राज्ये मिळून 50 टक्के, असे भयानक चित्र असताना महाराष्ट्र सरकारला काळजी घेणं भाग होतं. महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी नाही, तिथे सिनेमागृहांचे काय! पण आता मंदिरेदेखील उघडली जातील, अशी चिन्हे आहेत. सगळे काही व्यवस्थित चालले तर लवकरच  मंदिरे उघडली जातील. त्याची नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

गेल्या सात-आठ महिन्यापासून राज्यात सिनेमागृहे आणि नाटक- थिएटर बंद होते. या कालावधीत नाटकांचे आर्थिक कंबरडे  मोडले. पण सांगतो कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला. या कालावधीत ओटीटी माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. पण ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय नाही, हे मात्र पुढे आले.

कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून बिग बजेट चित्रपट ओटीटी(ओवर द टॉप) प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा जवळपास सगळ्याच नामवंत कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला नकार दिला होता. यात ईदला प्रदर्शित होणारा सलमान खानचा 'राधे',अजय देवगणचा 'मैदान' आणि अमीर खानचा 'लालसिंह चड्डा' , विकी कौशलचा 'सरदार उधमसिंह', अक्षय कुमारचा 'बेलबॉटम', रणवीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र',रणवीर सिंहचा '83' आदी चित्रपटांचे निर्माते  गोंधळात होते. ही सगळी निर्माता मंडळी प्रतीक्षा करायला तयार होते. या निर्मात्यांना वाटत होते की, ओटीटी प्लेटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे घाटयाचा सौदा आहे.

ओटीटी प्लेटफॉर्म हा नवीन पर्याय असला तरी तो सिनेमागृहांची बरोबरी कदापि करू शकत नाही. या प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांना घरातून बसून नवीन चित्रपट पाहायला मिळत असला तरी निर्मात्यांना या माध्यमातून व्यवसाय करायला अधिक फायदा दिसत नव्हता. जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' असेल किंवा विद्या बालनचा 'शकुंतला देवी' असेल अथवा अमिताभ बच्चन चा 'गुलाबो सीताबो', या चित्रपट निर्मात्यांना ओटीटी प्लेटफॉर्ममधून कसलाच मोठा फायदा नाही  झाला. त्यामुळे अन्य बाकी निर्माता आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला पुढे आले नाहीत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे चित्रपट निर्माते मंडळींचे 2020 मध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माता आता 2021 मध्येच आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

2020 मध्ये काही चित्रपट प्रदर्शित होणार होते,परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सिनेमागृहे बंद राहिली, साहजिकच या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. आता हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होतील. शिवाय 2021 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपटदेखील याच वर्षात प्रेक्षकांपुढे येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. 2021 साल चित्रपटसृष्टीसाठी फारच महत्त्वाचे असणार आहे. 2021 मध्ये अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी', 'रक्षाबंधन', आणि 'बेलबॉटम', अजय देवगणचा 'मैदान', 'कभी ईद कभी दिवाली', सलमान खानचा 'राधे', अमीर खानचा 'लालसिंह चड्डा', जान्हवी कपूरचा 'तख्त', 'आदित्य राय कपूरचा 'एक विलेन2', वरुण धवनचा 'मिस्टर लेले' असे काही महत्त्वाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

असं मानलं जातं आहे की, 2021 साल चित्रपटसृष्टीला मालामाल करून सोडेल. कारण या खजान्यात काही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. सिनेमागृहांचे मालकदेखील मोठ्या चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. कारण त्यांनी 2020 मध्ये मोठं नुकसान झेललं आहे. आता परीक्षा सिनेमागृहांची आहे. त्यांना सरकारने जाहीर केलेल्या नियम-कायद्याच्या चौकटीत चित्रपट प्रदर्शित करावयाचे आहेत. प्रत्येक शोनंतर सिनेमागृहांना जंतू मुक्त करावयाचं आहे. प्रेक्षकांना मास्क लावल्याशिवाय चित्रपट गृहांमध्ये प्रवेश मिळणार नाही.सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांचे नियम इत्यादी पाळावे लागणार आहेत.

2020 मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वच लोकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आशा आहे की, 2021 साल चित्रपट आणि त्यांच्या निर्मात्यांना मालामाल करून सोडेल. चित्रपट कर्त्यांना तर आता आशेची किरणे 2021 मध्येच दिसून येत आहेत. पूर्ण वर्षभर प्रतिबंध घालण्यात आल्याने सिनेमागृहांची रयाच गेली होती. भारतात सिनेमा आणि क्रिकेट यांचं वेड असणाऱ्या लोकांची संख्या भरमसाठ आहे. 2020 मध्ये जवळपास वर्षभर चित्रपट प्रेमी सिनेमागृहांपासून दूर राहिले आहेत. आता सिनेमागृहे नियम-अटींसह सुरू होत आहेत. हळूहळू नियम-अटी शिथिल होतील आणि प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील, परंतु यासाठी 2021 सालाची वाट पाहावी लागणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Sunday, October 25, 2020

बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखिका:ट्विंकल खन्ना


ट्विंकल खन्ना म्हणजे डिंपल कपाडिया आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांची कन्या आणि प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी. स्वतः ट्विंकलने पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतः ही या ग्लॅमरमध्ये न्हाऊन निघालेली ट्विंकल आता वेगळ्याच मार्गावर आहे. आणि हा मार्ग आहे लेखनाचा. तिची आतापर्यंतची सर्व पुस्तकं बेस्टसेलर आहेत. विविध ठिकाणी स्तंभ लेखन करता करता तिने कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. वास्तविक तिच्यात लेखनाचं बीज फार पूर्वीपासून होतं. साधारण वीस-एकवीस वर्षांची असताना तिने एक कादंबरी लिहिली होती. पण नंतर तिला त्याचा कंटाळा आला आणि ते काम तिनं सोडून दिलं.

मात्र अलीकडे ती स्तंभ लेखन करता करता गोष्टी लिहू लागली. या प्रासंगिक लेखनाची पुस्तकं निघायला लागली आणि आता ती चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखिका बनली. तिची खास निरीक्षणं, विनोदाची मस्त फोडणी आणि उपरोधाची सुरेख झालर यांतून तिच्या लेखनाचा एक वेगळाच मसाला तयार झाला आहे. अगदी अवचितपणे सापडलेली ही लेखनवाट हाच ट्विंकलचा 'यूएसपी' बनला आहे. 'मिसेस फनीबोन्स' या पुस्तकाबरोबर तिची ओळख इतकी घट्ट झाली की, तिनं नंतर स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस काढलं, तेव्हाही त्याचं नाव मिसेस फनीबोन्स मूव्हीज'असंच ठेवलं आहे.

'फनीबोन्स' नंतर तिने 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहिलं नाही. या पुस्तकात ट्विंकलनं छोट्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा अरुणाचलम मुरूगनाथम यांच्यावर आधारित होती. याच कथेच्या आधारावर अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट आला. हा चित्रपट खूप गाजलाही. आतापर्यंत तिने तीन पुस्तकं लिहिली आहेत आणि तिन्हीही बेस्टसेलर ठरली आहेत. 'मिसेस फनीबोन्स' हे पुस्तक 2015 मध्ये देशातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. आता अलीकडेच तिचं'पैजामाज आर फर्गीव्हिंग' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सध्या हे पुस्तकही गाजतं आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे

Thursday, October 8, 2020

आशा पारेख


बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने एकेकाळी सर्वांना घायाळ करणार्‍या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरातमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांनी १९५९ पासून ते १९७३ पयर्ंतच्या काळात बॉलिवूडवर जादूच केली होती. १९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंझील इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटासाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

नुकतेच एका रिअँलिटी शोमध्ये आशा पारेख यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा धर्मेन्द्र यांनी आशा पारेख यांच्याविषयीचा मजेदार किस्सा सांगितला. एरवी बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे मदिरापान फारच सामान्य बाब मानली जाते. पण, आशा पारेख या बाबतीत अपवाद होत्या. त्या स्वत: मदिरापान करीत नव्हत्या आणि इतर कोणी कामाच्या वेळी असे आलेलेही त्यांना आवडत नसायचे. दारूचा साधा वासही आला तरी त्या रागवायच्या. 'आये दिन बहार के' या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी धर्मेन्द्र रात्री उशीरापर्यंत दारूच्या पार्टीत असायचे आणि सकाळीही त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत असते. आशा पारेख यांना हा प्रकार आवडला नाही. म्हणून यावर उपाय म्हणून धर्मेन्द्र यांनी सकाळी शुटिंगला येताना कांदा खाऊन येण्याचा प्रकार सुरू केला. आशा पारेख यांनी त्यांची तक्रार करीत आपल्याला कांद्याचाही वास आवडत नसल्याचे सांगितले. तेव्हा धर्मेन्द्र यांनी कांदा खाण्याचे खरे कारण स्पष्ट केले. नंतर हे दोन्ही कलाकार चांगले मित्र बनले. पण, त्या काळातील किस्से आजही त्यांना भावूक करून जातात.

१९९२ साली तिच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पारेखचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी आशा पारेख यांचे सर्वजण दिवाने होते. मात्र स्वत: आशा देखील कोणाच्या तरी प्रेमात होत्या.

एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या नशीबात लग्न हे लिहिलेच नव्हेत आणि त्या सिंगल खूप आनंदी आहेत असे म्हटले आहे. त्यावेळी आशा या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणल्या जात होता. त्यांचे हे यश पाहून कोणीही त्यांच्याशी लग्न केले असते. पण दिग्गज अभिनेत्रीला भेटणे, तिच्यासोबत फिरणे हे कादाचित सोपे नाही असे मानून त्यांना कोणी लग्नाची मागणी घातली नसावी असे म्हटले जात आहे. आशा यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एण्ट्री झाली होती. मात्र ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती होती. दुर्दैवाने त्यांचे त्या व्यक्तीशी लग्न होऊ शकले नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता आमीर खानचे काका आणि दिग्गज दिग्दर्शक- निर्माते नासिर हुसैन होते. आशा यांचे नासिर यांच्यावर प्रेम होते. परंतु नासिर त्यावेळी विवाहित होते. नासिर यांनी त्यांचा संसार सोडून आपल्याशी लग्न करावे हे आशा यांना कदापी मान्य नव्हते. म्हणून आशा यांनी नासिर यांच्याशी लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नासिर हे माझ्या आयुष्यात येणार पहिले आणि शेवटचे व्यक्ती होते. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. पण मला त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलापासून विभक्त करायचे नव्हते. माझे लग्न व्हावे अशी माझ्या आईची इच्छा होती आणि तिने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचे ही माझी अट असल्यामुळे माझे लग्न होऊ शकले नाही, असे आशा म्हणाल्या.

यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...