खरं तर बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱ्यांचं आगमन दरवर्षी होतच असतं. पण स्टारपुत्र आणि स्टारकन्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. मोठ्या धुमधडाक्यात तसंच वाजतगाजत त्यांचं स्वागत केलं जातं. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. मोठ्या बॅनरचा टेकू दिला जातो. गेल्या काही वर्षांत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, कॅटरिना कैफची बहीण इजाबेलापासून ते सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांचं आगमन पडद्यावर झालं आहे. यांच्याबरोबरच काही नव्या चेहऱ्यांनीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे,तारा सुतारिया, सिद्धार्थ चतुर्वेदी, रकुल प्रीत, सई मांजरेकर, पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला, सनी देओलचा मुलगा करन देओल यांची नावे घेता येतील. यावर्षी पुन्हा कोरोना महामारीने हातपाय पसरायला सुरुवात केला आहे. त्यामुळे एक-दोन चित्रपट सोडले तर कुणीच चित्रपट रिलीज केले नाहीत. मोठ्या चित्रपटांच्या ,बनर्सच्या चित्रपटांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी आता तारखा पुढे ढकलल्या आहेत. पुढच्या काही काळात कोरोनाचे वातावरण निवळले तर चित्रपट प्रदर्शित करण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यामुळे पडदयावर आपली कलाबाजी दाखवायला उत्सुक असलेल्या आणखी काही स्टारपुत्र आणि कन्यांना संधी मिळणार आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराजा' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा 'महाराजा' दिग्दर्शन करणार आहे. सलमान खानची भाची ( अतुल अग्निहोत्री व अलविराची मुलगी) एलिजा अग्निहोत्रीला सूरज बडजात्याचा मुलगा अवनिशने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.या चित्रपटाचा नायक आहे, सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर सिंह देओल.राजवीरचा मोठा भाऊ करन याने या आधीच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. राजवीरला चित्रपटात आणण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. याखेरीज करन जौहर लवकरच संजय कपूरची मुलगी शनायाला घेऊन चित्रपट बनवत आहेत. राजकुमार संतोषी यांच्या 'बॅड बॉय' मधून मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशी चक्रवर्ती अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. त्याची नायिका असणार आहे, एक नवोदित कलाकार आमरीन कुरेशी. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
याखेरीज प्रियदर्शन दिग्दर्शित'हंगामा-2' चित्रपटातून सुरमा भूपाली म्हणजेच जगदीप यांचा नातू आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी याचे चित्रपटसृष्टीत आगमन होत आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सुनील शेट्टीची मुलगी आथिया हिच्या 'एन्ट्री' नंतर आता मुलगा आहान शेट्टीदेखील साजिद नाडीयादवालाच्या 'तडप' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपटात त्याची नायिका आहे तारा सुतारिया हा 'आरएक्स 100' या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी 'रोजी- द सॅफरॉन चॅप्टर' या चित्रपटात विवेक ओबेरॉयसोबत दिसणार आहे. स्टारपुत्र आणि कन्या यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये काही नवीन चेहरेही दिसणार आहेत. यात पहिलं नावं येतं ते मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं! ती अक्षयकुमारसोबत यावर्षीच्या दिवाळीला 'पृथ्वीराज' मधून झळकणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ 'बंटी और बबली-2' मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार असला तरी त्यावर कोरोनाचे संकट आहे.
यशराज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' बरोबरच जुनैद खानचा 'महाराजा' मध्ये शालिनी पांडे दिसणार आहे. हिने अगोदरच तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेली रास्मिका मंदाना ही शांतनू बागची यांच्या ' मिशन मजनू' मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. कन्नड, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केलेली प्रणिता सुभाष हीदेखील अजय देवगनच्या 'भूज' आणि 'हंगामा 2' मध्ये अभिनय साकारणार आहे. पंजाबचा पॉप सिंगर हांडी संधू कपिल देव यांच्या बायोपिक '83' मध्ये अभिनय करणार आहे. या चित्रपटात ट्युबर साहिल खट्टरदेखील तत्कालीन विकेट किपर सय्यद किरमाणी यांची भूमिका साकारणार आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसुजा अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत 'चेहरे' मधून प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. करन जौहरच्या 'दोस्ताना 2' मधून लक्ष्य लालवानी तर 'दिया और बाती', 'न बोले तुम, न मैने कुछ कहा' या मालिकांमधून अभिनय केलेली रिमी शेख 'ट्युसडे एन्ड फ्रायडे' नावाच्या रोमॅंटिक -कॉमेडी चित्रपटातून मोठ्या पडदयावर प्रवेश करत आहे. आणखी एक टीव्ही अभिनेत्री त्रिधा चौधरी आदित्य चोप्राच्या 'शमशेरा' मध्ये रणवीर कपूर, संजय दत्त व वाणी कपूरसोबत आगमन करत आहे. हा चित्रपट 25 जूनला रिलीज होणार असून हा चित्रपट स्वातंत्र्य पूर्व पार्श्वभूमीवर आधारित आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली